‘एमआय-फाइव्ह’ या ब्रिटिश गुप्तचर संघटनेच्या प्रमुखपदावर छाप सोडणाऱ्या, त्या पदावरून उत्तर आयर्लंडमधील दहशतवादाच्या उच्छादाला काबूत आणणाऱ्या स्टेला रिमिंग्टन यांचे निधन रविवारी (३ ऑगस्ट) झाल्याची वार्ता सोमवारी आली; तेव्हा लोकांना पहिल्यांदा आठवली ती जेम्स बॉण्डची महिला ‘बॉस’- श्रीमती ‘एम’! जेम्स बॉण्ड हे पात्र कादंबऱ्यांतून लोकप्रिय करणाऱ्या इयन फ्लेमिंगने ‘एम’ हे पात्र फार महत्त्वाचे मानले नसेल, पण पुढे चित्रपटांतून ‘एम’ साकारण्याची वेळ आली तेव्हा अभिनेत्री ज्यूडी डेंच यांनी स्टेला रिमिंग्टन यांच्या वेषभूषेचे, केशभूषेचे, इतकेच काय पण हालचालींचेही सहीसही अनुकरण पडद्यावर आणले. अर्थात, स्टेला यांना असल्या प्रसिद्धीची गरज निवृत्तीनंतरही नव्हती… ‘इयन फ्लेमिंग आणि जॉन ल कार यांच्यानंतरच्या उत्तम हेरकथाकार’ ही ख्याती त्यांनी मिळवली, ती पुढील काही वर्षे कायम राहणारी आहे!
पूर्वाश्रमीच्या त्या स्टेला व्हाइटहेड. ग्रंथपाल म्हणून लंडनच्या ‘इंडिया ऑफिस’मध्ये काम करत असताना त्यांची ओळख त्या वेळच्या ब्रिटिश अर्थखात्याचे अधिकारी जॉन रिमिंग्टन यांच्याशी झाली आणि वर्षभरात या दोघांचे लग्न झाले. जॉन यांची बदली दिल्लीतल्या ब्रिटिश उच्चायुक्तालयाचे अर्थ-अधिकारी म्हणून झाली, त्यांच्यासह स्टेलाही भारतात आल्या. उच्चायुक्तालयातच अभिलेख पाहण्याचे काम त्यांना दिले गेले. पण १९६४ मध्ये एक दिवस, ‘आमच्यासाठी काम कराल का?’ अशी विचारणा त्यांना झाली आणि ‘टायपिस्ट’ या पदाच्या नावाखाली त्या रीतसर हेरगिरी करू लागल्या… होय, भारतात… नेहरू आणि लालबहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळात! ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान हेरॉल्ड विल्सन यांची भूमिका ‘पाकिस्तानधार्जिणी’ असल्याचा आरोप नेहमीच होत आला असला तरी, स्टेला यांनी नेमके काय केले याची माहिती उघड झालेली नाही.
अर्थात, स्टेला यांची दिल्लीतील कारकीर्द अगदीच नवखेपणाची असणार. त्यांनी प्रभावी काम केले, ते १९६९मध्ये लंडनला परतल्यावर. आंतरराष्ट्रीय हेरगिरीच्या तथाकथित ‘पुरुषी’ मानल्या जाणाऱ्या जगात स्त्री म्हणून पदोपदी येणारे कसोटीचे प्रसंग त्यांनी निभावून नेले. साधारण १९८४ पर्यंत त्यांनी अनेक विभागांत काम केले. ‘एमआय-फाइव्ह’ ही मूलत: देशांतर्गत गुप्तवार्ता यंत्रणा. परंतु ‘काउंटरइंटलिजन्स’चे आव्हान शीतयुद्धाच्या काळात मोठे होते. त्यामुळे ब्रिटनवर नजर ठेवणारे विदेशी हेर कोण असू शकतात, हे शोधून काढण्यापासून ते ब्रिटनमधील संभाव्य हिंसक वा दहशतवादी कारवाया रोखण्यापर्यंत; परदेशांच्या गोपनीय धोरणांची माहिती जमवण्यापासून ते या माहितीआधारे आणखी कुठे ‘आपली माणसे पेरण्या’ची गरज आहे हे ठरवण्यापर्यंत जबाबदाऱ्या स्टेला यांनी निभावल्या. देशांतर्गत डावे- कामगार संघटनासुद्धा- आटोक्यातच राहतील हे पाहण्याचे काम ‘एमआय-फाइव्ह’चेच होते; ते करताना ‘लोकशाहीचा आदर’ हे मूल्य जपणाऱ्या स्टेला यांना गुप्तचर यंत्रणेत आधी उपप्रमुख व शीतयुद्ध संपल्यानंतर प्रमुखपद मिळाले.
लोकशाहीविषयी त्यांचा आदर त्यांच्या ‘ओपन सीक्रेट्स’ (२००१) या आत्मपर पुस्तकातून, तसेच पुढल्या २५ वर्षांत त्यांनी लिहिलेल्या दहा ‘लिझ कार्लाइल गुप्तचरकथा’ आणि दोन ‘मॅनन टायलर गुप्तचरकथा’ पुस्तकांतून दिसतोच, पण निवृत्तीनंतर ‘एमआय-फाइव्ह’च्या अभिलेख- सल्लागार म्हणून काम करताना, ठरावीक काळानंतर या यंत्रणेच्याही फायली उघड व्हाव्यात, असे धोरण त्यांच्यामुळे आखले गेले! केवळ ‘पहिल्या महिला प्रमुख’ म्हणून नव्हे, तर ‘सच्च्या लोकशाहीवादी गुप्तचर’ म्हणूनही त्या लक्षात राहतील!