महाराष्ट्रातील सार्वाधिक जुन्या वाचनालय व व्याख्यानमालांपैकी वरच्या स्थानावर विराजमान असलेले ‘सार्वजनिक वाचनालय, नाशिक’ महाराष्ट्र विचारविश्वात ‘सावाना’ नावाने सर्वतोमुखी आहे. या वाचनालयाची शताब्दी सन १९४०मध्ये झाली, त्या निमित्ताने शताब्दी व्याख्यानमाला योजण्यात आली होती. त्या शृंखलेत दहा व्याख्याने झाली. वक्त्यांमध्ये रा. श्री. जोग, श्री. ना. बनहट्टी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गो. रा. परांजपे, प्रा. दत्तो वामन पोतदार, न. ग. दामले, वि. ह. कुलकर्णी, गोपीनाथ तळवलकर, म. ना. अदवंत यांचा समावेश होता. ही व्याख्याने विविध साहित्य प्रकार व विचारांचा गत शतकाचा आढावा (१८४० ते १९४०) घेणारी होती. त्यातून शताब्दी स्मृतिग्रंथ आकारला. तो ‘प्रदक्षिणा’ नावाने पुण्याच्या कॉन्टिनेंटल प्रकाशनाने प्रकाशित केला. आजवर या ग्रंथाच्या अनेक आवृत्ती प्रकाशित झाल्या. तद्वतच अनेक आवर्तने घडून आली. म्हणजे असे की ‘प्रदक्षिणा’चे दोन भाग झाले. (स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर). मूळ प्रदक्षिणेतील काही व्याख्याने / लेख उत्तरकाळात संपादकांनी (खरे तर प्रकाशकांनी) गाळल्याने गायब झाले. या गायब व्याख्यानातील एक व्याख्यान तर्कतीर्थांचे आहे. त्याचा विषय होता, ‘सामाजिक शास्त्रीय वाङ्मय’. ते तर्कतीर्थांचे पहिले वाङ्मयीन व्याख्यान म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सन २०१२मध्ये सीताराम रायकर, द. दि. पुंडे, पंडित टापरे त्रयींनी ‘साहित्याचे तर्कशास्त्र’ शीर्षकाचा भाषणसंग्रह प्रकाशित केला. त्यातही तर्कतीर्थांच्या ‘सामाजिक शास्त्रीय वाङ्मय’ भाषणाचा अंतर्भाव नाही.
या भाषणाची दुर्मीळता (खरे तर ‘प्रदक्षिणा’ प्रथम आवृत्तीची दुर्लभता!) हे त्याचे कारण असावे. ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’, खंड-४ (भाषणसंग्रह – साहित्य)मध्ये या व्याख्यानाचा आवर्जून समावेश केला आहे, त्याचेही एक कारण आहे.
या व्याख्यानाचे पहिलेच वाक्य आहे, ‘मराठी वाङ्मयात’ सगळ्याच शास्त्रांचे दारिद्र्य आहे. त्याप्रमाणे समाजशास्त्राचेही दारिद्र्य आहे.’ हे वाक्य मराठी साहित्य अवकाशातील वैचारिक साहित्याची पोकळी, दुर्भिक्ष्य सूचित करते. तर्कतीर्थांनी आपल्या एका विचारात महाराष्ट्रातील या वैचारिक अल्पतेकडे लक्ष वेधले आहे.
प्रस्तुत व्याख्यानात तर्कतीर्थांनी स्पष्ट केले आहे की, सामाजिक शास्त्रांमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, नीतिशास्त्र, कायदेशास्त्र, भाषाशास्त्र, टीकाशास्त्र यांचा अंतर्भाव होतो. मराठी भाषेत समाजशास्त्रासंबंधीचे प्रारंभिक लेखन ‘दाभोळकर माला’मधून झाले. विशेषत: नीतिशास्त्रविषयक ‘स्पेन्सरमीमांसा’संबंधीचे भाषांतरित लेख या मालेतून प्रकाशित झाले. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा समाजशास्त्रांच्या इंग्रजी ग्रंथांच्या प्राबल्याचा होता. तत्कालीन अध्यापक, लेखकांनी सुबोध मराठी भाषेत प्रारंभी भाषांतर आणि नंतर नवनव्या अंग नि प्रश्नांवर मौलिक लेखन करत ही शास्त्रे आधुनिक बनविली.
डॉ. सुनीलकुमार लवटे
drsklawate@gmail.com