रवीन्द्र कुलकर्णी
जी. ए. कुलकर्ण्यांच्या ‘यात्रिक’ कथेत ख्रिास्ताला धोका देणाऱ्या ज्युडासची बाजू काय असू शकते याची चुणूक दाखवलेली आहे. कथेत त्याचा युक्तिवाद कुचकामी ठरतो. त्याने केलेल्या पापाच्या पुढच्या टप्प्यांची कल्पना त्याला देताच तो आत्महत्याच करतो. हा ज्युडास जीएंनी बायबलमधूनच घेतला आहे. त्यांची ही गोष्ट सत्यकथेत १९७५ साली आलेली आहे. त्यावेळी जीएंना ज्युडासच्या गॉस्पेलची माहिती असण्याची शक्यता नाही. कारण हे गॉस्पेल सापडले १९७६ साली. त्याआधी ज्युडासचे गॉस्पेल, म्हणजे ज्युडासने दिलेल्या ख्रिास्तसंदेशाचे अस्तित्व इतर समकालीन साहित्यातून असलेल्या त्याच्या उल्लेखामुळे मोजक्याच अभ्यासकांना माहीत होते. सापडल्यावर त्यात काय आहे हे समजायला आणखी ३० वर्षे गेली. ज्युडासच्या गॉस्पेल मधील ज्युडास पश्चात्तापदग्ध नाही. त्यात त्याच्या आत्महत्येचा देखील स्पष्ट उल्लेख नाही. त्यात तो म्हणतो की ख्रिास्ताने त्यालाच विशेष ज्ञान दिले होते. शिवाय ख्रिास्ताला पकडून देण्याची आज्ञा खुद्द ख्रिास्ताचीच होती. याचा पहिला उल्लेख येशूच्या निधनानंतर केवळ १८० वर्षात सापडतो. सेंट इरेनियास नावाच्या फादरने पाहिल्यांदा ज्युडासच्या गॉस्पेलवर आक्षेप घेतलेले वाचनात आले, तेव्हापासून ज्युडासच्या गॉस्पेलचे प्रतिध्वनी अभ्यासकांना अस्वस्थ करत होते.

‘द लॉस्ट गॉस्पेल’ या हर्बर्ट क्रॉस्नीच्या पुस्तकात ज्युडासच्या ख्रिास्त संदेशाचा प्रवास एखाद्या रहस्यकथेसारखा मांडला आहे. इजिप्तमध्ये माघाघा हे नाईलच्या पश्चिम तीरावरचे शहर. या शहराबाहेर अनेक नैसर्गिक गुहा आहेत, ज्या एके काळी दफनभूमी म्हणून वापरल्या जात. इजिप्तमध्ये अशा गुहा, दफनभूमी, पडीक पिरॅमिडस् धुंडाळणे हा तिथल्या गुराख्यांचा, रिकामटेकड्यांचा व चोरांचा उद्याोग. त्यात काही वेळा पुराणवस्तू, सोने वा कागदपत्रे मिळाली की ती नेऊन जुन्या बाजारात विकणे व त्यावर पुढचे काही महिने गुजराण करणे हे गेले अनेक दशके चालू होतेे. १९७० च्या दशकाच्या मध्याला असे काही लोक एका गुहेत शिरले, त्यांना एका आवरणात गुंडाळलेला मानवी सापळा दिसला आणि बाजूला एका चुनखडीच्या दगडाच्या पेटीत त्यांना काहीतरी लिहिलेली भूर्जपत्रे मिळाली. आपली पुढच्या काही महिन्यांची सोय झाल्याच्या आनंदात त्यांनी अम शमिहा या दलालाशी संपर्क साधला. तो कैरोमधील पुराणवस्तू विकणाऱ्या दुकानांच्या सतत संपर्कात असे. तेथून त्या भूर्जपत्रांचा प्रवास जवळपास ३० वर्षे सुरू राहिला. एक तर तो संदेश कॉप्टिक भाषेतला; तो कुणाला लगेच वाचता आला नाही. त्यामुळे त्याचे महत्त्व समजायला वेळ गेला. नंतर काही काळ ती पाने स्विस बँकेच्या लॉकरमध्ये होती. नंतर अमेरिकेतल्या न्यू जर्सीतल्या बँकेच्या तिजोरीत बरीच वर्षे होती. तिथल्या दमट हवेमुळे त्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले. मध्येच ती चोरीलाही गेली. अखेर २००६ साली नॅशनल जिओग्राफिकच्या अर्थसाह्याने ज्युडासच्या ख्रिास्ताच्या संदेशाचे अस्तित्व सिद्ध झाले.

हे आधी झाले असते तर जीएंनी ज्युडास हे पात्र अधिक ताकदीने खुलवले असते!

अशी सापडत नसलेली, बंदी घातलेली, नष्ट झालेली पुस्तके आणि हस्तलिखिते त्यांच्याबद्दलची ओढ वाचकाच्या मनात निर्माण करतात. भासाची नाटके असाच अडकून पडलेला विषय होता. त्याच्या लेखनाचे प्रतिध्वनी कालिदास आणि भवभूतीच्या नाटकातून पंडितांना ऐकू येत होते. शेवटी १९१० साली श्री टी गणपती शास्त्री यांनी केरळच्या मालिनक्कर मठात इसवी सनपूर्व चौथ्या शतकातल्या या नाटककाराची १३ नाटके शोधून काढली व ती भासाची आहेत हे सिद्ध केले.

लेखन नष्ट व्हायला अनेक कारणे असतात. त्यात ज्यावर हस्तलिखितच जीर्ण होऊन नष्ट होणे हे महत्त्वाचे कारण आहे. वाचणे शक्य नसलेल्या किंवा हरवलेल्या पुस्तकांची यादी करायला सुरुवात केली तर, तिची लांबी आपल्याला वाचायच्या असलेल्या पुस्तकांपेक्षा जास्त मोठी होऊ शकते. त्या यादीत लेखकाच्या केवळ मनात असलेल्या किंवा त्याने थोडेसे काम करून नंतर सोडून दिलेले लेखनही समाविष्ट केले तर यादी आणखी वाढेल.

भूर्जपत्रावर लिहिलेले ज्युडासचे गॉस्पेल, सापडल्यावर जास्त वेगाने खराब होत गेले याला पूर्णपणे मानवी अज्ञान, गोंधळ आणि पैशाची अतिरिक्त हाव असे घटक जबाबदार होते. पण बंदी घातलेल्या, जळलेल्या पुस्तकांचा इतिहास मोठा आहे. या आरोपातून जगातल्या कुठल्याही सत्ताधाऱ्याला मुक्त होता येणार नाही. ख्रिाश्चन धर्मपीठाने बंदी घातलेल्या वा धिक्कारलेल्या पुस्तकांची यादी १५५९ साली पाहिल्यांदा प्रकाशित केली. पुढल्या काळात त्यात गॅलिलिओ, व्हॉल्टेरच्या लेखनापासून अनेक कादंबऱ्यांचीही भर पडत गेली. सार्त्रचे ‘बीइंग अॅण्ड नथिंगनेस’ आणि सिमॉन द बूव्हा हिचे ‘द सेकंड सेक्स’ ही चर्चने धिक्कारलेली शेवटची पुस्तके. १९६६ नंतर त्यांची यादी प्रकाशित करणे चर्चने सोडून दिले. व्हॅटिकनच्या वाचनालयात यातील बहुतेक पुस्तके आहेत. तिथे ती लोकांना पाहायलाही मिळतात. पण या ग्रंथसंग्रहालयाचा एक भाग आजही कुणालाच पाहायला मिळत नाही तो म्हणजे चर्चचा पत्रव्यवहार, चर्चने केलेल्या धार्मिक छळाच्या नोंदी व चर्चने घेतलेले महत्त्वाचे निर्णय. त्यांचे जतन मायक्रोफिल्मिंगही न करता होते आहे. ज्युडासचे गॉस्पेल सापडल्यावर लक्षात आले की त्याचा धोका सत्यापेक्षा धर्माच्या संघटनेला होता!

सत्ताधाऱ्यांनी पुस्तकांवर घातलेल्या बंदीविरुद्ध लेखकांनी व ग्रंथप्रेमींनी दिलेल्या लढ्याला एक झळाळी आहे व तो चिरंतन चालणारा विषय आहे. त्यावर बरेच लिहिलेही गेले आहे. लेखकाच्या मृत्यूमुळे अर्धवट राहिलेली किंवा त्याच्या मनात असून न लिहिली गेलेली पुस्तके चुटपूट लावतात. यात जेन ऑस्टिनच्या सॅण्डिटनपासून शेजवलकरांच्या संकल्पित शिवचरित्रापर्यंत अनेक पुस्तके यावीत. जेन सॅण्डिटनच्या रूपरेषेबद्दल काही लोकांशी बोलली होती आणि ते लोक तिला पत्रातून या कथानकाचे नवनवे तपशील सुचवत राहिले. पण तिने ते सगळे धुडकावून लावले. यात प्रिन्स रीजंट लायब्ररीचा ग्रंथपालदेखील होता. त्याला तिने लिहिले, ‘तू म्हणतोस मी हाउस ऑफ सॅक्सकोबर्गच्या घराण्यातील एखाद्या ऐतिहासिक घटनेवर प्रेमकथा लिहावी. अशा कादंबरीचा खप उत्तम होईल आणि माझी प्रतिष्ठा वाढण्यासाठी उपयोग होईल. पण मला माझ्याशी प्रामाणिक राहायला आवडेल. त्यामुळे इंग्लिश खेड्यातील लोकजीवन हेच माझ्या लेखनाचे बलस्थान आहे.’ या ग्रंथपालाला मराठी कादंबरीकाराचा पत्ता लगेच द्यावा असे वाटून गेले. जेन ऑस्टिनची सॅण्डिटन कादंबरी नंतर काही लोकांनी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले.

लेखकाला काही विषय आकर्षित करतात. कधी वेळ कमी पडतो. तर कधी त्याला मध्येच दुसरा काही जास्त आकर्षक विषय मिळतो आणि काही विषय हाताळायला लेखक घाबरतोदेखील. दर वेळेला त्याची कारणे सामाजिक वा राजकीय असतात असे नव्हे. गुस्ताव फ्लोबेरला मनोविकारांविषयी ‘ल स्पिराले’ या नावाची कादंबरी लिहायची होती. वेड कसे लागत जाते हीच त्याची मध्यवर्ती थीम असणार होती. त्याचे धागेदोरे केवळ बाह्य परिस्थितीत शोधणे पुरेसे नव्हते तर त्याला स्वत:च्या मनाचाही शोध घ्यावा लागला असता. ‘लेखकाला विषयापासून लांब जात अभ्यासही करावा लागतो आणि त्यात गुंतावेही लागते. लेखकाला दारुडा न होता दारू प्यावी लागते, प्रेमात नसताना प्रेम करावे लागते व सैनिक नसताना त्याला लढाई करावी लागते’ असे त्यानेच म्हटले होते. या विषयात असे होणे सहज शक्य नव्हते. एखादी कादंबरी लिहून हातावेगळी केली की पुन्हा फ्लोबेर या कादंबरीचा विचार करायचा आणि पुन्हा सोडून द्यायचा. या विषयाच्या अभ्यासाला फ्लोबेर घाबरला असे स्टुअर्ट केलीने म्हटले आहे.

केवळ मनोरथात कल्पिलेल्या वा अर्धवट राहिलेल्या कलाकृतींची उदाहरणे केवळ साहित्यात नव्हे तर इतर कलेतही आहेत. मोत्झार्टने मरणाच्या उंबरठ्यावर असताना रेक्विइम (requiem) ही सिंफनी लिहायला घेतली. त्याच्या मृत्यूने ती अर्धवट राहिली. पृथ्वी आणि स्वर्ग यांच्यामध्ये असतानाचा तो मोत्झार्टचा शेवटचा श्वास होता असे त्याच्या शिक्षकाने म्हटले आहे. गणितातील प्रसिद्ध उदाहरण फर्माचे आहे. ‘फर्माज् लास्ट थिअरम’ या पुस्तकात सिमॉन सिंगने फर्माच्या सिद्धांताची सांगितलेली कथा खिळवून टाकणारी आहे. त्या प्रश्नाने तब्बल ३५८ वर्षे गणितज्ञांना झुंजवत ठेवले होते. १६३७ साली डायफोंटसचे ‘अरिथमॅटिका’ हे पुस्तक वाचत असताना न्यायाधीश असलेल्या फर्माने त्या पुस्तकाच्या समासात त्याला सुचलेले काही सिद्धांत लिहून ठेवले. काळाच्या ओघात त्यातले सिद्धांत गणितज्ञांनी एक तर सिद्ध केले वा ते चूक आहेत हे सिद्ध केले. फक्त त्याच्या शेवटच्या सिद्धांताने मात्र दाद दिली नाही. फर्माने पायथागोरसच्या सिद्धांताशी खेळताना लिहिले xn yn= zn यात घातांकाची किंमत जर २ पेक्षा जास्त असेल, (तो घन आणि पूर्णांक असेल) तर तिथे हे समीकरण लागू पडत नाही. हे लिहून त्याने पुढे लिहिले – याची सिद्धता माझ्याकडे आहे. पण जागेअभावी येथे मी ती देऊ शकत नाही. नंतर त्याने त्याची सिद्धता कधीच दिली नाही. या नोंदीमुळे लोक या प्रश्नाने जास्त पछाडले गेले. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे सारे घर व वाचनालय धुंडाळले पण ती सिद्धता मिळाली नाही. ती त्याच्याकडे नसावी असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही सिद्धता शोधण्याच्या प्रवासात काही जणांचा जीव गेला तर आत्महत्या करायला गेलेले काही हा प्रश्न सापडल्याने त्यात गुंतून गेले व वाचले. शेवटी १९९४ साली आंद्रे वाईल या ब्रिटिश गणितज्ञाने ही कोंडी फोडली आणि १५० पानांची सिद्धता जगाला दिली. गणितातील ही मोठी कामगिरी समजली जाते.

जे लेखन कालौघात विरून गेले आहे ते खरेच पूर्णपणे नष्ट झालेले असते काय? तसे नसावे. जर तसे असते तर कालिदासाच्या नाटकात भासाने का डोकवावे? भासाने लिहिले, ‘अथवा सर्वमलंकारो भवति सुरूपाणाम्’ जो सुंदर असतो त्याला सर्व गोष्टी अलंकारस्वरूप होतात. आणखी काही शतकांनी, कालिदासाने हेच आणखी धारदार करताना म्हटले, ‘किमीव हि मधुराणां मंडनं नाकृतीनाम्’— ज्यांना मुळातच कमनीय आकृती लाभलेली आहे त्यांना सौंदर्याचा साज चढवू शकत नाही असे काय असू शकेल? तेव्हा विस्मरणात गेलेल्या, सापडत नसलेल्या वा तुलनेने अल्पायुषी ठरलेल्या ग्रंथांनीही काही बदल घडवलेले असतात, त्यातील काही भाग आपल्यापर्यंत पोहोचलेला असतो. अगदी फर्माच्या सिद्धांतासारख्या एखाद्या छोट्याशा नोंदीचा प्रभावदेखील पुढील अनेक पिढ्यांवर पडतो!