Homo homini lupus. – Thomas Hobbes
जगभर भ्रमंती करून कॅण्डिड त्याचा सहप्रवासी मार्टिनला विचारतो, ‘माणसं नेहमीच एकमेकांच्या कत्तली करत आली आहेत का? माणसं नेहमीच लबाड, धूर्त, ढोंगी, विश्वासघातकी, कृतघ्न, भ्रष्ट, व्यभिचारी, चंचल, भ्याड, असूयाग्रस्त, चुगलीखोर, नशेखोर, नफेखोर, लुटारू, महत्त्वाकांक्षी, लालची, सत्तापिपासू, रक्तपिपासू, नरसंहारी, कट्टरवादी, मूर्ख होती का?’ मार्टिन कॅण्डिडला प्रतिप्रश्न करतो, ‘मला एक सांग, ससाणा नेहमीच छोट्या पक्ष्यांना भक्ष्य करत आला आहे का?’ – ‘हो.’ ‘ससाण्यानं त्याचं चरित्र बदललं नाही, तर माणसानं बदललं असावं असं तुला का वाटतं?’
व्होल्टेअरच्या ‘कॅण्डिड’ या साहित्यकृतीतला हा संवाद आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाचा जनक थॉमस हॉब्सच्या ‘निसर्गावस्थेतील मनुष्य’ या संकल्पनेजवळ जाणारा आहे. सामाजिक करारपूर्व मनुष्याचं वर्णन हॉब्स ‘ homo homini lupus’ अर्थात ‘मनुष्य मनुष्यासाठी लांडगा असतो’ या प्राचीन लॅटिन वाक्प्रचाराने करतो. आधुनिकतेचा जनक रने देकार्तपेक्षा काही वर्षांनी मोठा आणि वैज्ञानिक क्रांतीचा प्रणेता गॅलिलिओपेक्षा काही वर्षांनी लहान असा थॉमस हॉब्ससुद्धा ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’चा प्रमुख सदस्य होता. हॉब्सची ‘निसर्गावस्थेतील मनुष्य’ ( man in the state of nature) ही संकल्पना ऐतिहासिक मनुष्याचा निर्देश करत नसून त्याच्या वैचारिक प्रयोगाचा निष्कर्ष आहे.
प्राप्त मानवी अवस्थेचं विश्लेषण करून हॉब्सचं डिडक्टिव पद्धतीशास्त्र या संकल्पनेच्या मदतीने पुढचा रचनात्मक प्रवास करतं आणि ‘लिव्हायथन’ अर्थात आधुनिक सार्वभौम राज्यसंस्थेच्या (theory of state) सिद्धांतापर्यंत पोहोचतं. अॅरिस्टॉटलच्या राजकीय तत्त्वज्ञानापासून पूर्णपणे फारकत घेऊन आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक अधिष्ठान प्राप्त करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तडीस नेल्यानं हॉब्सचा उल्लेख ‘आधुनिक राजकीय तत्त्वज्ञानाचा गॅलिलिओ’ म्हणून केला जातो. हॉब्सच्या राजकीय तत्त्वज्ञानाची आधुनिकता उमगण्यासाठी ‘मानवी प्रकृती’, ‘निसर्गावस्थेतील मनुष्य’, ‘सामाजिक करार’, ‘लिव्हायथन’सारख्या मूलभूत संकल्पनांची चर्चा आवश्यक आहे.
हॉब्ज आधुनिक कसा?
इंग्लिश आरमारानं १५८८ मध्ये बलाढ्य स्पॅनिश आर्माडाला धूळ चारून एलिझाबेथ सुवर्णयुगाचा परमोच्च बिंदू गाठला त्याच वर्षी थॉमस हॉब्सचा जन्म झाला. ग्रीक व लॅटिन अभिजात परंपरेत पारंगत असल्यानं आणि प्लेटोचा अनुवादक या नात्यानं हॉब्स हा इंग्लिश रनेसॉन्सचं अपत्य ठरतो. पण ‘रिपब्लिक ऑफ लेटर्स’मधील इतरांप्रमाणे त्यालाही रनेसॉन्स सदोष वाटला. हॉब्सचा देकार्त, गॅलिलिओ, गॅसन्डी, मॅरिन मर्सेन, विल्यम हार्वे सारख्या समकालीन लेखक, विचारवंत, वैज्ञानिकांशी विपुल पत्रव्यवहार होता. देकार्तशी तर टोकाचे मतभेद होते. खरंतर, हॉब्स-देकार्त वाद म्हणजे आधुनिक पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातल्या अँग्लो-सॅक्सन आणि कॉण्टिनेण्टल (प्रामुख्यानं फ्रेंच, जर्मन) परंपरांतल्या ऐतिहासिक भेदाचं प्रकटीकरण.
कॉण्टिनेण्टल परंपरेचा भर बुद्धीला स्वतंत्र, सार्वभौम सत् तत्त्व मानणाऱ्या बुद्धिवादावर अधिक. गणितीय प्रारूपावर आधारित कार्टेशियन बुद्धिवाद परंपरावादासोबतच अनुभववादालासुद्धा संशयास्पद ठरवतो. तर अँग्लो-सॅक्सन परंपरा अनुभववाद आणि व्यवहारवादाला प्राथमिकता देऊन मानवी बुद्धीला फक्त साधन समजते. ही परंपरा नॉमिनलिझमचा पुरस्कार करताना दिसते. त्यामुळे ‘युनिव्हर्सल्स’ अनुभवातीत अचल, वैश्विक सत् तत्त्व नसून फक्त शब्द ठरतात. उदा.- एकवचनी ‘मानव’ ही संकल्पना कुठल्याही अमूर्त स्थितिशील सत् तत्त्वाचा निर्देश करत नसून फक्त एक शब्द आहे. त्यामुळे, ‘मानव’ या शब्दाला स्वतंत्र वास्तव नसून फक्त हाडामासाच्या ऐतिहासिक अवस्थेतल्या माणसांना वास्तव असतं. त्यादृष्टीनं कॉण्टिनेण्टल परंपरा प्लेटोच्या चिद्वादी वास्तववादाच्या बाजूनं तर अँग्लो-सॅक्सन परंपरा अॅरिस्टॉटलच्या अनुभववादी वास्तववादाच्या बाजूने झुकताना दिसते.
अँग्लो-सॅक्सन परंपरेत जन्मलेला हॉब्स काही काळ फ्रान्सिस बेकन (१५६१- १६२६) या इंग्लिश विचारवंताचा खासगी सचिव होता. अनुभववाद आणि इंडक्टिव्ह पद्धतीशास्त्राचा अग्रदूत समजल्या जाणाऱ्या फ्रान्सिस बेकनच्या तालमीत प्रशिक्षण घेतलं असलं तरी हॉब्सचं वर्गीकरण करणं अवघड आहे. हॉब्स अनुभववादी निरीक्षणांचा गृहीतक म्हणून वापर करतो; पण निष्कर्षांसाठी तो गॅलिलिओ आणि देकार्तच्या डिडक्टिव्ह पद्धतीशास्त्राकडे वळतो. थोडक्यात, वैज्ञानिक दृष्टिकोनाची द्याोतक गॅलिलिओची दुर्बीण अंतरिक्षाकडे वळते तर हॉब्सला प्राप्त राजकीय आणि सामाजिक वास्तवाच्या वैज्ञानिक विश्लेषणाची आणि नवीन प्रारूपाच्या रचनेची निकड वाटते.
रनेसॉन्सचा शेवट आणि आधुनिकतेच्या सुरुवातीला हॉब्सला civil science (आजच्या राज्यशास्त्राचं पूर्वज!) नावाच्या विज्ञानाचा पाया रचणं अगत्याचं का वाटलं हे समजून घेण्यासाठी तत्कालीन ऐतिहासिक परिस्थिती डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. हॉब्सनुसार ‘सिव्हिल सायन्स’ त्याच्या ‘ De Cive’ (१६४२) पेक्षा जुनं नाही! सतरावं शतक म्हणजे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेचा आणि अराजकतेचा काळ. लुथरच्या विद्रोहानंतर शतकभर सुरू असलेलं धर्मयुद्ध, ‘थर्टी इयर्स वॉर’, जगभरातली वसाहतवादी युद्धं, इंग्लंडमधलं गृहयुद्ध… यातून राजकीय सत्तेची धार्मिक आणि पारंपरिक अधिमान्यता संपुष्टात आली होती. मध्ययुगात ‘राजा ईश्वराचा प्रतिनिधी’ असल्यानं सगळे राजाला उत्तरदायी आणि राजा फक्त ईश्वराला उत्तरदायी- राजाच्या विरोधात जाणं म्हणजे ईश्वराच्या विरोधात जाणं’ हेही मान्य होतं. मात्र १६४८ मध्ये ऑलिव्हर क्रॉमवेलच्या नेतृत्वात रिपब्लिकन छावणीनं इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्सचा शिरच्छेद करून मध्ययुगीन धर्माधिष्ठित राजकीय तत्त्वज्ञान नाकारलं.
राजकीय सत्तेचं धर्माधिष्ठित आणि पारंपरिक अधिष्ठान गतार्थ ठरल्यानंतर हॉब्स त्याच्या लिखाणात, विशेषत: ‘लिव्हायथन’मध्ये राजकीय तत्त्वज्ञानाला आधुनिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करतो. अॅरिस्टॉटलचा राजकीय विचार त्याला ‘अज्ञानमूलक आणि खुळचट’; तर मॅकिव्हेली ‘महत्त्वाचा पण जुजबी’ वाटतो.
मनुष्याची निसर्गावस्था
प्राप्त सामाजिक आणि राजकीय वास्तवाचं विघटन करून हॉब्स ‘मनुष्य’ या अंतिम घटकाला त्याच्या तत्त्वज्ञानाचा बिल्डिंग ब्लॉक मानतो. ‘मनुष्य’ शब्दावर चढवलेली धार्मिक, मिथकीय आणि पारंपरिक पुटं हटवून त्याला ‘निसर्गावस्थेतला मनुष्य’ दिसला; जो अॅरिस्टॉटलच्या गृहीतकाप्रमाणे ‘निसर्गत: राजकीय प्राणी’ नसून भावना, इच्छा, आकांक्षा, गंड यासारख्या गोष्टींनी प्रेरित/ नियंत्रित होणारी गतिशील भौतिक ऊर्जा (मॅटर इन मोशन) आहे. ही आदिम ऊर्जा निर्णायक क्षणी सगळ्यांना समान पातळीवर आणून ठेवते. यातून, ‘निसर्गाने काहींना राज्य करण्याची क्षमता दिलीे तर काहींना राज्यकर्त्यांच्या आज्ञांचे पालन करण्याचा शाप’, या अॅरिस्टॉटलीय सिद्धांताला छेद दिला जातो.
हॉब्स नमूद करतो की निसर्गावस्थेतील मनुष्याचं जीवन पशूवत हिंस्रा, क्रूर आणि क्षणिक असतं. निसर्गावस्थेत नियम वगैरे नसून जो तो फक्त अस्तित्व टिकवून ठेवण्याची धडपड करत असतो. त्यामुळे इष्ट/ अनिष्ट हा भेद नसून मोठ्या जनावराचं इष्ट म्हणजे एकमेव इष्ट ठरतं! थोडक्यात, निसर्गावस्थेत सगळ्यांचं सगळ्यांच्या विरोधात निरंतर युद्ध चालू असतं (Bellum omnium contra omnes). कधी शीतयुद्ध तर कधी प्रत्यक्ष युद्ध! स्वत:ला संपवण्यात येण्याच्या भीतीपोटी दुसऱ्याला संपवण्याचा सतत प्रयत्न असतो.
निसर्गावस्थेतल्या मनुष्याला कधीही भक्ष्य होण्याची भीती असल्यानं तो सतत बिथरलेल्या, भयग्रस्त मन:स्थितीत जगताना दिसतो. नैसर्गिकरीत्या मनुष्य स्वार्थाचा पाठलाग करतो. हा स्वार्थवाद मानवी व्यवहाराच्या मुळाशी असलेलं प्रमुख गतिशास्त्र आहे. त्यामुळे हॉब्सची ‘स्व’ची संकल्पना स्वार्थाभोवती आकार घेते. अस्तित्व टिकवून ठेवण्याची इच्छा, मृत्यूची भीती, सत्तालालसा. अशाप्रकारे, हॉब्सनं मनुष्याच्या नैसर्गिक अवस्थेचं अतिशय दयनीय आणि निराशावादी चित्रण केलं आहे. हा ‘निसर्गावस्थेतील मनुष्य’ म्हणजे नैतिक ठपका नसून वैश्विक निरीक्षण आहे.
सामाजिक करार आणि लिव्हायथन
सामाजिक करार म्हणजे निरंतर युद्ध, अराजकता, असुरक्षितता, अनिश्चिततेच्या भयप्रद निसर्गावस्थेतून बाहेर पडण्याचा मार्ग. मनुष्य आत्मरक्षणासाठी निसर्गावस्थेतील अमर्याद पण असुरक्षित स्वातंत्र्य आणि अधिकारांपेक्षा मर्यादित पण सुरक्षित स्वातंत्र्य आणि अधिकारांची निवड करून सामाजिक करारान्वये ( social contract) निसर्गावस्थेतून बाहेर पडतो. त्यादृष्टीनं, हॉब्सच्या तत्त्वज्ञानात मनुष्याची सामाजिक कराराचा स्वीकार करण्याची कृती हा भल्याच्या (good) स्वीकारा-पेक्षा बुरं (evil) टाळण्याचा प्रयत्न.
अॅरिस्टॉटलच्या सिद्धांतानुसार सामाजिक/ राजकीय जीवन निसर्गाचं प्रतिबिंब आणि अनुकरण असतं. हॉब्स मात्र मनुष्याची निसर्गावस्था आणि सामाजिक अवस्था यांत फारकत करून अॅरिस्टॉटलच्या सिद्धांतला छेद देतो. त्याच्यानुसार सामाजिक आणि राजकीय वास्तव माणसांनी कृत्रिमरीत्या (artificially) अस्तित्वात आणलं आहे. त्यासाठी हॉब्स ‘आर्ट’ या शब्दाचा आधुनिक अर्थ विशद करतो. अॅरिस्टॉटलनुसार आर्ट निसर्गाचं अनुकरण करते तर हॉब्सनुसार आर्ट कृत्रिमरीत्या नवीन वास्तवाला जन्म देते. सामाजिक आणि राजकीय वास्तवच कृत्रिमरीत्या अस्तित्वात येत असल्यानं त्याचं वैज्ञानिक आकलन शक्य असतं आणि त्याआधारे ते बदलतासुद्धा येतं (म्हणजेच त्यात दैवी काही नाही- असं मानणाऱ्या हॉब्सवर नास्तिकतेचा ठपका ठेवण्यात आला होता.)
सामाजिक करार ‘विखुरलेल्या भयभीत माणसांच्या’ निसर्गावस्थेचा शेवट करून सामाईक वास्तवाला ( common wealth) जन्म देतो. कॉमन वेल्थ म्हणजे सार्वजनिक हित, कल्याण, संपत्ती, क्षेत्रासाठी वापरण्यात येणारी संकल्पना. या सामाईक सार्वभौम सामाजिक आणि राजकीय वास्तवाचा निर्देश करण्यासाठी हॉब्स लिव्हायथन या बायबलमधल्या आक्राळविक्राळ समुद्री प्राण्याचं प्रतीक वापरतो. हा जरबदार, महाकाय, बलाढ्य लिव्हायथन म्हणजे सामाजिक करारपूर्व माणसांच्या हिंसेला लगाम लावून अशी सामाजिक व्यवस्था घडवणारी राज्यसंस्था जिच्यात किमान सहकार्य आणि सुसंवाद, आत्मसुरक्षेची शाश्वती असेल.
थोडक्यात, लिव्हायथन म्हणजे आधुनिक राज्यसंस्थेला हॉब्सने लोकसत्तेचा आधार दिला असला तरी ती हुकूमशाहीकडे झुकणारी आहे. कारण अखेर या लिव्हायथनला निरंकुश सत्ता आणि ‘हिंसेची मक्तेदारी’ यांचा आधार आहे. त्यामुळे, माणसं देवभीरू नसली तरी सरकारभीरू हवीतच, असं इथं अपेक्षित आहे. हॉब्सचा सर्वशक्तिमान लिव्हायथन समजून घेण्यासाठी काही गोष्टी नजरेसमोर ठेवणं आवश्यक आहे. १६४०च्या दशकात इंग्लंडचं गृहयुद्ध चालू असल्यानं हॉब्सला पळून पॅरिसला यावं लागलं. पॅरिसमधल्या ११ वर्षांत ‘लिव्हायथन’ (१६५१) हे पुस्तक लिहिलं गेलं. तत्कालीन अराजकतेच्या परिस्थितीत, शक्तिशाली राज्यसंस्था असणं त्याला गरजेचं वाटलं. या पुस्तकाला १६४८ मधल्या व्हेस्टफालिया कराराचीही पार्श्वभूमी आहे. हॉब्सच्या राजकीय तत्त्वज्ञानाला असंख्य समर्थकांसोबत टीकाकारसुद्धा लाभले, हे पुढं पाहूच.
फ्रेंच साहित्य-तत्त्वज्ञानाचे अभ्यासक
sharadcrosshuma@gmail.com