डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मालकीच्या स्थावर मत्तांचा आकार वाढीव दर्शवला आणि त्या मत्तांच्या फुगवलेल्या मूल्यांच्या प्रमाणात बँकांकडून वाढीव कर्ज पदरात पाडून घेतले. असा प्रकार ते आणि त्यांची ‘ट्रम्प ऑर्गनायझेशन’ ही कंपनी २०१४ ते २०२१ या काळात सातत्याने करत राहिले. या कालावधीत ट्रम्प यांच्या मत्तांचे मूल्य ८१ कोटी ते २०० कोटी डॉलर फुगवले गेले. यासाठी लेखापत्रांमध्ये फेरफार होत राहिले. या लबाडीवर नेमके बोट ठेवून, न्यूयॉर्कमधील एका न्यायालयाने ट्रम्प यांना आणि त्यांच्या पुत्रांना तसेच कंपनीला ३५.५ कोटी डॉलरचा दंड ठोठावला. याखेरीज जवळपास ८.६ कोटी डॉलर व्याजापोटी भरावे लागणार आहेत. म्हणजे एकूण ४४ कोटी डॉलर. गेल्याच महिन्यात ट्रम्प यांना आणखी एका प्रकरणात दंड ठोठावण्यात आला आहे. अनेक वर्षांपूर्वी ट्रम्प यांनी ई. जीन कॅरोल या महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. हा अनुभव आणि त्याविषयीची व्यथा कॅरोल यांनी पुस्तकरूपात मांडल्यानंतर ट्रम्प यांनी उलट कॅरोल यांचीच बदनामी सुरू केली. त्याबद्दल कॅरोल यांनी खटला दाखल केला आणि या प्रकरणी ट्रम्प यांना ८.८ कोटी डॉलरचा दंड झाला. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांमध्ये ५० कोटींहून अधिक डॉलरचा दंड ट्रम्प यांना झाला. दोन्ही दंड भरणे फार अवघड नाही, पण मुद्दा केवळ दंड भरण्याच्या आर्थिक क्षमतेचा नाही. न्यूयॉर्कच्या ज्या न्यायाधीशांनी फसवणुकीच्या प्रकरणात दंड ठोठावला, त्यांचे ट्रम्प यांच्याविषयी उद्गार उद्बोधक ठरतात – ‘तुम्हाला कशाचाच पश्चात्ताप झाल्याचे दिसत नाही, जे जवळपास विकृतिनिदर्शक आहे!’

हेही वाचा >>> व्यक्तिवेध: कविता चौधरी

Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
chandigarh doctor grandfather sbi share 500 rupees in 1994 know profit
याला म्हणतात खरी गुंतवणूक! आजोबांनी ३० वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ५०० रुपयांच्या शेअरवर नातू झाला लखपती
Details of election bonds held by pharmaceutical companies Worrying
लेख: रोखे घेऊन औषध कंपन्या तंदुरुस्त!

बढाईखोरी हा ट्रम्प यांचा स्थायिभाव. बढाईखोरीशिवाय ट्रम्प यांना कशातच कशाचीही गती नाही. त्यामुळे संबंधित दंड भरण्यास त्यांना वरकरणी तरी काही आर्थिक अडचण होणार नसली, तरी प्रस्तुत मालमत्तेप्रमाणेच त्यांच्या इतरही मालमत्तांचे मूल्य फुगवलेले नसेलच, याची शाश्वती नाही. ट्रम्प यांची दंड भरण्याची कोणतीही इच्छा नाही. त्यामुळे संबंधित न्यायाधीश आर्थर ओन्गॉरॉन आणि हा खटला दाखल करणाऱ्या न्यूयॉर्क राज्याच्या ॲटर्नी जनरल लेटिशिया जेम्स या दोघांचेही त्यांनी वाभाडे काढले आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पार्श्वभूमीवर ताशेरे ओढले. वास्तविक अमेरिकी व्यवस्थेमध्ये न्यायाधीशांची राजकीय मते जाहीर आणि अध्याहृत असतात. पण केवळ दंड ठोठावून न्यायाधीश थांबले नाहीत. त्यांनी ट्रम्प आणि त्यांच्या दोन पुत्रांवर बंधनेही घालून दिली. ट्रम्प यांच्या मूळ कंपनीचे परिचालनच बदलण्याचा उद्देश या निकालातून दिसून येतो. ट्रम्प यांना पुढील तीन वर्षे न्यूयॉर्क राज्याच्या हद्दीमध्ये कोणत्याही कंपनीत संचालक म्हणून काम करता येणार नाही. त्यांच्या दोन पुत्रांवर ही बंदी प्रत्येकी दोन वर्षांसाठी आहे. गतवर्षी कंपनीच्या व्यवहारांवर देखरेख ठेवण्यासाठी न्यायालयाकडून नियुक्त निरीक्षकांना तीन वर्षे मुदतवाढ मिळाली आहे. न्यूयॉर्कमधील कोणत्याही धनकोंकडून ट्रम्प ऑर्गनायझेशनला पुढील तीन वर्षांसाठी कर्जउभारणी करता येणार नाही. यात प्रतीकात्मकता अधिक, कारण न्यूयॉर्क राज्याबाहेरील धनकोंकडून कर्जे घेता येतील. परंतु त्या व्यवहारावर निरीक्षकांची करडी नजर राहील. हे प्रकरण अर्थातच ट्रम्प यांच्या राजकीय भवितव्यापाशी येऊन थांबते. ट्रम्प समर्थकांना यातून ट्रम्प यांचे काहीही नुकसान होणार नाही याची खात्री वाटते. ट्रम्प विरोधकांना तशी भीती वाटते! या निकालाविरोधात दाद मागण्याची ट्रम्प यांना मुभा आहे आणि ते मागतीलही. तोवर दंडाचा काही हिस्साच न्यायालयात जमा करावा लागेल. परंतु इतर न्यायालये व लवादांनीही दंड कायम केला तर ट्रम्प यांच्या तिजोरीला प्रचंड खिंडार पडेल, ते बुजवण्यासाठी कर्ज उभारणीचा मार्ग धरावा लागेल. तसेच खंडीभर कज्जेदलालींमुळे ट्रम्प यांना वकिलांवर पाण्यासारखे डॉलर ओतावे लागत आहेत. कधी तरी अशी वेळ येईल, जेव्हा पैशाचे सोंग घेणे जड भासू लागेल. ट्रम्प यांच्याविरोधात दाखल झालेले खटले आणि प्रकरणे विविध प्रकारची आहेत. त्यांतील काही अतिशय गंभीर आहेत. प्रस्तुत निकालाने ट्रम्प यांच्या उद्यमी प्रतिमेवर खोल ओरखडे उठले आहेत, इतकेच सध्या म्हणता येईल.