ऐंशी-नव्वदचा काळ हा दूरदर्शनचा ऐन बहराचा काळ. या काळात दूरदर्शन वाहिनीवरील जाहिराती, मालिका, चर्चात्मक वा मुलाखतींचे कार्यक्रम असोत, त्यातील आशय आणि तो प्रेक्षकांपर्यंत उत्तमपणे पोहोचवणारे कलाकार पुढे कितीतरी दशके लोकांच्या मनात घर करून राहिले. कपडे धुण्याच्या पावडरच्या जाहिरातीतून शुभ्र पांढऱ्या रंगाची साडी, कपाळावर ठसठशीत कुंकू असा भारतीय स्त्रीचा पारंपरिक साज जपणारी, पण काळानुरूप बदललेली हुशार आई ‘ललिताजी’ म्हणून लोकप्रिय झालेली अभिनेत्री कविता चौधरी या अशा कलाकारांपैकी एक. त्यांची ललिताजी आणि ‘उडान’ मालिकेतील पोलीस अधिकारी कल्याणी सिंग या त्या काळात त्यांनी साकारलेल्या खंबीर नायिका ही त्यांची ओळख लोकांच्या मनात आजही घट्ट बसली आहे. त्यामुळे त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त ऐकल्यावर एक गुणी, हुशार अभिनेत्री गमावल्याची हळहळ कित्येक मनांत उमटली. अगदी सुरुवातीला त्यांनी ‘अपराधी कौन’ नामक एका मालिकेत छोटेखानी भूमिका केली होती.

हेही वाचा >>> व्यक्तिवेध : उषाकिरण खान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या भूमिकेमुळे मनोरंजन क्षेत्रातील वाटा त्यांच्यासाठी खुल्या झाल्या. पुढे ‘ललिताजी’ म्हणूनही त्यांना ओळख मिळाली, मिनिटभराच्या जाहिरातीतले ते पात्र कविता चौधरींमुळे जिवंत झाले, घराघरांत ललिताजींचे ‘ए भैया, ठीकसे तोलो’ यासारखे वाक्य पोहोचले. मात्र खरी कमाल केली ती त्यांच्या ‘उडान’ मालिकेने. ‘उडान’चे लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तिन्ही आघाडया कविता यांनी सांभाळल्या होत्या. एका सामान्य घरातील तरुणीने पोलीस अधिकारी बनण्याचे पाहिलेले स्वप्न, त्यासाठी केलेले प्रयत्न आणि वास्तवात पोलीस अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केल्यानंतरचा प्रवास असे चित्रण १९८९ ते ९१ दरम्यान प्रसारित झालेल्या या मालिकेत करण्यात आले होते. या मालिकेची कल्पना त्यांच्या बहिणीवरून सुचली होती. कविता यांची बहीण स्वत: पोलीस अधिकारी होत्या. त्यांच्या आयुष्यावरून प्रेरणा घेत केलेली ही मालिका इतकी लोकप्रिय का झाली? याचे उत्तर खुद्द कविता यांच्या भाषेत सांगायचे तर त्यांची मालिका वास्तवावर आधारित आणि प्रामाणिकपणे चित्रित केलेली होती. आत्ता ज्या पद्धतीने पोलिसांचा गणवेश, त्यांच्या गाडया, बंदुका अशा सगळया अभिनिवेशासह रुपेरी पडद्यावर त्यांची भव्यदिव्य प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला जातो तशा पद्धतीने काम न करताही त्यांची कल्याणी सिंग प्रेक्षकांना ठळकपणे लक्षात राहिली. आजही छोटया पडद्यावर अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाल्या आहेत, मात्र कविता चौधरी यांच्याइतकी लोकप्रियता त्यांना लाभलेली नाही. आपल्याला जे योग्य वाटते तेच करायचे या भूमिकेतून त्यांनी कलाप्रांतातील मुशाफिरी केली.