जग सुधारण्याचं खूळ घेतलेला आपला साथीदार तुरुंगात आहे… वर्षांमागून वर्षं सरतायत, बातम्यांतून त्याचा चेहरा हरवत चाललाय आणि नावही. खटला जिथल्या तिथेच आहे आणि त्याचा लढाही. हाती राहिली आहे केवळ आठवडा-पंधरवड्यातून एकदा काचेमागून घडणारी भेट… गीतांजली वांगचुक यांच्या सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर यूएपीए, एनएसएसारख्या कायद्यांखाली सुनावण्यांशिवाय तुरुंगवास भोगणाऱ्यांच्या कणखर साथीदारांविषयी…
उमर खालीदला अटक होऊन गेल्याच महिन्यात पाच वर्षं पूर्ण झाली. त्याची ‘पार्टनर’ बनोज्योत्स्ना लाहिरीचं प्राध्यापक होण्याचं स्वप्न कधीच मागे पडलं आहे. आता तिचं एकच ध्येय आहे, उमरला न्याय मिळवून देणं. कायदेशीर लढा एकीकडे सुरू आहेच, दुसरीकडे उमरवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडणारे लेख लिहिणं, मुलाखती देणं, समाजमाध्यमांवरून आवाज उठवणं, चर्चासत्रांत सहभागी होणं आणि हे सारं करताना नियमितपणे तिहार कारागृहात जाऊन उमरला भेटणं. तो तगून राहील, याची काळजी घेणं हाच तिचा दिनक्रम झालाय.
क्रिकेटवेडा उमर आणि फुटबॉलप्रेमी, मेस्सीभक्त बनोज्योत्स्ना प्रेमात पडले तो २०१३-१४चा काळ ही देशातल्या परिवर्तनाची सुरुवात होती. त्यात जेएनयू म्हणजे राजकीय परिवर्तनांचे खणखणीत पडसाद उमटणारं ठिकाण. २०१६ मध्ये जेएनयूत अफजल गुरूच्या फाशीसंदर्भात आयोजित कार्यक्रमात कथित देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैय्या कुमार, उमर खालिद, अनिर्बन भट्टाचार्यसह इतरांना झालेली अटक वगैरे घटनाक्रम सर्वांना माहीत आहेच. या घटनेनंतर उमर चर्चेत आला. एकीकडे टोकाची टीका आणि दुसरीकडे हिमतीला दाद, असं सुरू होतं. त्याला ठिकठिकाणी भाषण करण्यासाठी बोलावलं जाऊ लागलं. उमरच्या भाषणांचा परिणाम म्हणजे २०१८ मध्ये त्याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला. हल्लेखोराच्या पिस्तुलात ऐनवेळी बिघाड झाला म्हणून तो वाचला. तेव्हापासून त्याचा ट्रेन, मेट्रो, बस प्रवास बंद झाला. विमान आणि कॅबशिवाय पर्याय राहिला नाही. तो ठरल्या ठिकाणी सुरक्षित पोहोचलाय की नाही, हे तपासत राहणं हा बनोज्योत्स्नाच्या दिनक्रमाचा भाग झाला. २०१९ मध्ये सीएएविरोधी आंदोलनांनी दिल्ली ढवळून निघाली होती. उमर आक्रमकपणे बाजू मांडत होता. ठिकठिकाणी ‘सीएए’विरोधात भाषणं करत होता. अखेर २०२० मध्ये दिल्ली दंगलींना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झाली.
आता याला पाच वर्षं लोटली आहेत. या काळात बनोज्योत्स्ना त्याचे आवडते लेखक-पुस्तकं, आंदोलनात झोकून देणं, दर भाषणापूर्वीची अस्वस्थता हे सारं सतत मांडत राहिली. तिचा पीएचडीचा विषय होता ‘जंगलासाठीचा संघर्ष – राज्ययंत्रणा, आदिवासी आणि झारखंडची राजकीय अर्थव्यवस्था.’ तिने आंबेडकर विद्यापीठ, जामिया, दिल्ली विद्यापीठ अशा प्रथितयश संस्थांत काही काळ अध्यापन केलं. विविध वृत्तपत्रं आणि मासिकांत आपल्या अभ्यासविषयावर लिखाणही ती करायची. आता मात्र तिचं आयुष्य उमरवरच बेतलेलं आहे.
सरकारच्या धोरणांविरोधात बोलणं एवढा मोठा गुन्हा आहे का, हा प्रश्न शक्य त्या प्रत्येक मंचावरून विचारणं, हाच तिचा दिनक्रम झालाय. उमर दोषी आहे की निर्दोष हे न्यायालय ठरवेलच, पण कधी? आणि निर्दोष ठरला तर? त्याच्या आयुष्यातल्या उमेदीच्या वर्षांची भरपाई होऊ शकेल? बनोज्योत्स्ना त्याचा आवाज बनून सदैव उभी राहीलही, पण तिचं एकाकीपणात सरत चाललेलं तारुण्य, धुळीला मिळालेलं करिअर याची भरपाई राजकीय वा न्याययंत्रणा करू शकेल?
गीतांजली अंगमो हे नाव गेल्या पंधरवड्याभरात चर्चेत आलं. ‘सोनमसाठी आम्ही देशातले सर्वोत्तम वकील उभे करू याची खात्री सरकारने बाळगावी…’ त्या सरकारला थेट आव्हानच देतात. सोनम वांगचुक यांच्या अटकेला आठवडा उलटला, तरी गीतांजली यांना त्यांची भेट घेऊ दिली गेली नव्हती. ‘त्याची चूक काय आहे. आश्वासनं कधी पूर्ण करणार, हे विचारणं गुन्हा आहे का? आठवडा उलटला तरी तो कसा आहे माहीत नाही. १५ दिवस उपोषण केलं होतं त्यानं आणि लगेचच अटक झाली. त्याच्या प्रकृतीविषयी काहीच माहिती का देत नाहीत?’ गीतांजली दर वृत्तवाहिनीवर विचारत होत्या. आता त्यांच्या प्रयत्नांना प्राथमिक यश मिळालं असलं, तरी सोनम अद्याप तुरुंगातच आहेत.
आपल्या ‘हयाल’ या शिक्षणसंस्थेवर यंत्रणा पाळत ठेवतायत, कर्मचाऱ्यांना धमकावतायत, पत्रकारांना अडवतायत असा गीतांजली यांचा दावा. त्यामुळे त्या लेह सोडून दिल्लीला गेल्या. सोनम वांगचुक संयतपणे एक एक शब्द तोलून मापून हळूहळू बोलतात, पण गीतांजली यांचं बोलणं तीरासारखं थेट, सडेतोड. विपर्यासाला वावच न ठेवणारं. लडाख पाच वर्षं लढा देतंय, तरी गीतांजली कधी चर्चेत नव्हत्या. मात्र पतीला अटक होताच त्यांनी तातडीनं पावलं उचलली. शक्य त्या सर्व माध्यमांपर्यंत पोहोचल्या. उत्तम वकील उभे केले. तरुण वयात केलेला मॅनेजमेंटचा अभ्यास इथे कामी आला असावा.
गीतांजली हे रसायन अजबच म्हणावं लागेल. स्वत:ची ओळख ‘सोशल आंत्रप्रेन्युअर’ अशी देणाऱ्या गीतांजली तिशीनंतर कराटे शिकल्या. ब्लॅकबेल्ट मिळवला. ज्या वयात बॅलेरिना निवृत्ती घेतात त्या वयात त्या बॅले शिकल्या. उंच जागांची भीती घालवण्यासाठी स्काय डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतलं. सतत स्वत:ला आव्हान देत राहण्याची सवय शिस्तबद्धपणे लावून घेतली. आज सरकारला आव्हान देताना तीच सार्थकी लागलेली दिसते. त्यांचा लढा तुलनेने ताजा, पण तो किती लांबेल याची एवढ्यात कल्पना करता येणार नाही.
सेहबा हुसैन यांनाही असाच प्रदीर्घ लढा द्यावा लागला. एल्गार परिषद खटल्यातील आरोपी गौतम नवलखा यांच्या त्या सहचर. एप्रिल २०२० मध्ये नवलखांना अटक झाली. रक्ताचं नातं असलेल्यांना किंवा पत्नीलाच भेटता येईल हा नियम पुढे करून दरवेळी भेट नाकारली जात होती. आपलं नेमकं नातं काय आहे, हे यंत्रणांना पटवून देण्यात वर्षं गेलं. नवलखांना तळोजा कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं, तेव्हा सेहबांनी खुलं पत्र लिहून दाद मागितली. नवलखा यांचा चष्मा ‘चोरी’ला गेला. त्यांची दृष्टी एवढी कमकुवत की चष्म्याशिवाय अंधच असल्यासारखी अवस्था होते. तीन दिवसांनंतर व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क झाला तेव्हा सेहबांना चष्माचोरीबद्दल कळलं. त्यांनी ताबडतोब स्पीड पोस्टने चष्मा पाठवून दिला, पण तुरुंग प्रशासनाने तो देण्यास नकार दिला. सेहबांना न्यायालयात दाद मागावी लागली तेव्हा नवलखांना चष्मा मिळाला. त्यावेळी तुरुंग अधीक्षकांसाठी ‘मानवता प्रशिक्षण शिबीर’ आयोजित करावं लागेल, असे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले होते.
प्रदीर्घ काळ तुरुंगात राहून नवलखांची प्रकृती ढासळली होती. त्यामुळे २०२२च्या अखेरीस त्यांना नजरकैदेत पण मुंबईतच राहण्याची परवानगी दिली गेली. सेहबा यांनी त्यांच्याबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिल्ली सोडून मुंबईत आल्या खऱ्या, पण यूएपीएतला आरोपी, दारात सतत पोलीस, सीसीटीव्हीचा पाहारा, मेटल डिटेक्टर, येणाऱ्या-जाणाऱ्यांच्या नोंदी एवढं सव्यापसव्य करण्यास कोणतीच सोसायटी तयार होईना. शेवटी त्यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) जुन्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांच्या प्रयत्नांतून नवी मुंबईतल्या बेलापूर भागात पक्षाच्याच एका वाचनालयावरचं सभागृह त्यांना राहण्यासाठी मिळालं.
सेहबा महिला हक्क कार्यकर्त्या आणि संशोधक आहेत. विविध राज्यांत संघटीत आणि असंघटीत क्षेत्रांत काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न, सरकारी धोरणांचा महिलांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम हे त्यांचे अभ्यासविषय. गेल्या दोन दशकांत त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फिरून तिथल्या संघर्षाचा समाजमनावर विशेषत महिलांवर झालेला परिणाम या विषयावर अभ्यास केला. नवलखांच्या नजरकैदेच्या काळात मात्र फोन, लॅपटॉप बाळगता येत नसल्याने सेहबांचे संशोधन प्रकल्प अडकून पडले होते. अखेर २०२४ च्या मे महिन्यात नवलखांना जामीन मंजूर झाला. दोघांनी मोकळा श्वास घेतला. आजही त्यांना मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही. कधीतरी दिल्लीतलं आपलं दैनंदिन जीवन पुन्हा सुरू होईल, या प्रतीक्षेत हे दोघे आहेत.
वसंता कुमारी- प्रा. जी. एन. साईबाबांच्या पत्नी. जो अखेरपर्यंत सिद्धच होऊ शकला नाही, अशा आरोपाखाली आपल्या पतीला तब्बल १० वर्षं तुरुंगात राहावं लागलं आणि तुरुंगवासानेच त्याचे प्राण घेतले या वेदनेची काजळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. २०१४ ते २०२४ असा त्यांचा प्रदीर्घ लढा. आरोपांशी आणि व्याधींशीही! ‘त्याला अंडा सेल मध्ये ठेवू नका. त्याची व्हीलचेअर तिथे हलूसुद्धा शकत नाही. त्याला हृदयरोग आहे. कोंदट वातावरणात तो श्वास घेऊ शकत नाही,’ अशा याचिका वसंता करत राहिल्या. अटक करताना हाताला खेचून फरपटत नेलं गेलं आणि हात लुळा पडला, असा त्यांचा आरोप. आधीच कमकुवत झालेल्या साईबाबांना दोनदा कोविड झाला. एकदा स्वाइन फ्लू. पण पॅरोल दिला गेला नाही. आईच्या अंत्यदर्शनासाठीही सोडलं नाही. एक साधा प्राध्यापक एवढा धोकादायक का मानला जातो, हा प्रश्न विचारण्यात वसंतांच्या आयुष्यातली उमेदीची वर्षं निघून गेली. मुलगी मंजीरा मोठी होत होती. घरची जबाबदारी, कोर्टकचेऱ्या आणि शक्य त्या सर्व सार्वजनिक व्यासपीठांवर जाऊन आपली बाजू मांडत राहणं अशी अनेक पातळ्यांवरची लढाई वसंता लढत राहिल्या.
अखेर मार्च २०२४ मध्ये आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे न्यायालयानं साईबाबांना मुक्त केलं. ते बाहेर आले, पण एवढ्या व्याधींनी ग्रासलेले की सारा वेळ रुग्णालयाच्या वाऱ्यांतच जात राहिला आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांचं निधन झालं. वसंता यांनी सनदशीर लढा देऊन ज्या साथीदाराला बाहेर आणलं तो अवघ्या सात महिन्यांतच साथ सोडून गेला.
या दोघांची साथ इयत्ता दहावीपासूनची. व्हीलचेअरला खिळलेल्या या बुद्धिमान मुलाची इंग्रजीवरची पकड आणि शिकण्याची जिद्द पाहून वसंता त्याच्याकडे आकर्षित झाल्या. त्या म्हणतात की त्यांचा लढा मी आणि मंजीरा पुढे नेऊच. पण ज्यांच्यासाठी ते प्राणपणाने लढले, त्यांनीही त्यात साथ दिली पाहिजे.
ही सारी प्रातिनिधिक उदाहरणं, यांच्यासारखे अनेक आहेत. आपल्या संघर्षाचा शेवट कसा असेल, याचा थांग लागत नसतानाही, लढा सोडून देणं हा पर्यायच त्यांना मान्य नाही. प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतून सहचराचं रोज चारित्र्यहनन होत राहतं, जिथे जावं तिथे संशयाच्या नजरा रोखलेल्या असतात, मुलांना शाळेत जाणं कठीण होतं, पण त्या ताठ मानेनं पुढे जात राहतात.
यातले कोण दोषी, कोण निर्दोष हा वेगळा मुद्दा. तो न्यायालयात प्रलंबित आहे. यापैकी अनेकांवरचे आरोप गंभीर आहेत. ‘एवढे गंभीर आरोप असूनही तातडीनं सुनावण्या घेऊन कठोर शिक्षा ठोठावण्याची निकड का भासत नाही?’ यासारखा प्रश्न विचारणाऱ्यांना सहानुभूतीदार ठरवलं जातं. आरोप सिद्ध करण्याची प्रक्रियाच सुरू न होणं आणि तरीही वर्षानुवर्षं जामिनाशिवाय तुरुंगात ठेवणं जाचक नाही का? हा प्रश्नही अन्य कुणाला पडत नाही.
याही परिस्थितीशी अनेक जणी झगडत आहेत. काचेपल्याडहून, इंटरकॉमवर होणारी ‘मुलाकात’ हाच त्यांच्या संघर्षाचा चिवट धागा. ‘तारीख पे तारीख’ पडत राहाते, तशी ‘मुलाकात पे मुलाकात’चीही सवय या साऱ्यांना करून घ्यावी लागली आहे.
vijaya.jangle@expressindia.com