गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या सेवेसाठी अविरत झटत असलेल्या आम्हा तीन मंत्र्यांवर किरकोळ जीवनोपयोगी वस्तूंच्या खरेदीखर्चाची प्रतिपूर्ती शासनास मागितली म्हणून माध्यमातून नाहक टीका केली जात आहे. हे कार्यनिष्ठेवर शंका उपस्थित करण्याबरोबरच आम्ही मेहनतीने निर्माण केलेली ‘स्वच्छ’ प्रतिमा मलिन करणारे आहे. गेल्या व आताच्या सरकारमध्ये सहभागी असल्याने यावर तातडीने स्पष्टीकरण देणे हे आमचे कर्तव्य समजतो. करोनाकाळात आम्हाला विविध आजारांमुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले. तिथूनही आम्ही जनतेची सेवा सुरूच ठेवली. तेव्हा सामाजिक अंतराचा नियम होता. तरीही मतदारसंघातले व राज्याच्या इतर भागांतले शेकडो लोक आम्हाला कामासाठी भेटायला यायचे. भारतीय संस्कृतीनुसार त्या सर्वाशी हात मिळवावा लागायचा. ते करताना कुणाला संसर्ग होऊ नये म्हणून आम्ही व्यक्तिगणिक हातमोजे बदलले. दोन तासांत मोज्यांचा मोठा ढीग पलंगाशेजारी जमा व्हायचा. मोज्यांची खरेदी ही जनतेसाठीच होती, त्यामुळे त्याचा खर्च मागण्यात गैर काय? प्रत्येक वेळी मोजा बाहेर काढून फेकला की हात धुवावाच लागायचा. त्यामुळे रोज हँडवॉशच्या अनेक बाटल्या लागायच्या. आमच्या तब्येतीची काळजी तसेच इतर कामांसाठी लोक इतक्या मोठय़ा संख्येत यायचे की अनेकदा नैसर्गिक विधींसाठीही उठता यायचे नाही. त्यामुळे युरीनबॅग मागवल्या. जनतेच्या सेवेत खंड पडू नये हाच उद्देश त्यामागे होता. तरीही त्यावरून टीका केली जाते, याचे सखेद आश्चर्य आम्हाला वाटते. प्रत्येक वेळी हात धुतल्यावर नवीन टॉवेल वापरायचा ही आमच्या घराण्यात चालत आलेली प्रथा आहे. वारंवार धुण्याची कृती करावी लागल्याने टॉवेलही भरपूर लागले यावर आक्षेप का असावा? देशभर स्वच्छतेची मोहीम सुरू असताना आम्हीच अस्वच्छ राहायचे असे माध्यमांना वाटते काय? रुबाबदार दिसावे म्हणून अनेक नेते दाढी वाढवतात. आम्ही मात्र या मोहिमेचा आदर म्हणून रोज दाढी करतो. हनुवटीवर खुंट ठेवून जनतेसमोर जाणे आम्हाला प्रशस्त वाटत नव्हते.
म्हणून आम्ही दिवसातून तीनदा दाढी करायचो. ती करताना सतत फोन वाजून त्यात व्यवधान यायचे म्हणून मतदारसंघातला केशकर्तनकार बोलावून घेतला. हे सारे जनतेच्या सेवेसाठीच करावे लागले तरीही दाढीचा खर्च मागितला म्हणून आमच्यावर टीका होत असेल तर ते योग्य नाही असे आमचे मत आहे. आम्ही रुग्णालयात राहून जनतेची कामे करत होतो, कोणत्या सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालो नव्हतो हे माध्यमांनी लक्षात घ्यावे. प्रत्येक व्यक्तीला भेटल्यावर मुखपट्टी बदलणे, हाताला लागलेली आयव्ही काढल्यावर त्यावरून कापसाचा बोळा फिरवण्यामुळे या वस्तूसुद्धा ठोक खरेदी कराव्या लागल्या. त्यात चूक ते काय? आम्ही तिथेच बसून लोकांची निवेदने स्वीकारायचो, त्यावर मार्कर पेनने शेरे मारायचो व ते कागद पेन ड्राइव्हमध्ये टाकून मंत्रालयात पाठवायचो. त्यामुळे याही वस्तूंची खरेदी करावी लागली. एक प्रकारे ही शासकीय सेवाच हे लक्षात घेणे गरजेचे. अनेकदा आलेले अभ्यागत आमच्या तब्येतीच्या काळजीने तिथेच झोपायचे. त्यामुळे भरपूर ब्लँकेट लागायचे. तशी सोय केली तर त्यात वावगे ते काय? एकूणच आम्ही रुग्णालयात असतानासुद्धा शासकीय कर्तव्य बजावले. त्यामुळे त्यावर झालेला खर्च मिळायलाच हवा. त्याच्या प्रतिपूर्तीसाठी आम्ही कुणाची दाढी कुरवाळणार नाही हे लक्षात घ्यावे व माध्यमांनीसुद्धा आता हा विषय बंद करावा, जेणेकरून आम्हाला जनतेच्या सेवेवर लक्ष केंद्रित करता येईल.