‘पंचांग’ हे पुस्तक भन्नाट आहे. तसं पाहिलं तर साधी दिनदर्शिका. पण माहितीने ठासून भरलेली. त्या पुस्तकाचं मूळ उद्दिष्ट आहे कालमापन. फार मागे जायला नको, दोन-अडीचशे वर्षांपूर्वी लोक कालमापनाकरता पंचांगाचाच उपयोग करत असावेत. दुसरं कुठलं कॅलेंडर उपलब्धच नव्हतं मुळी! म्हणजे ‘आज कार्तिक कृष्ण तृतीया का? म्हणजे आज आपल्या बंडूचा वाढदिवस’ किंवा ‘गुढीपाडव्याला महिन्याभराकरता उसने घेतलेले पैसे आज दसरा झाला तरी तू परत केले नाही आहेस’ असंच कालमापन होत असावं तेव्हा. पण या मूळ उद्दिष्टाखेरीज पंचांगात फलज्योतिषाच्या आणि धार्मिक बाबींच्या अनुषंगानेही बरीच माहिती दिलेली असते.
इथे आपण फक्त कालमापनाच्या दृष्टीने उपयुक्त माहितीचाच विचार करणार आहोत. आणि ‘पंचांग’ हे नाव अशा प्रकारच्या माहितीवरच आधारित आहे. ‘पंचांग’ हा शब्द पंच अंग असा बनला आहे. पाच अंगांचं म्हणून ‘पंचांग’. कोणती पाच अंगं? तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ही ती पाच अंगं. ही सगळी अंगं कालमापनाकरता उपयुक्त.
वानगीदाखल पंचांगातली कार्तिक कृष्ण अष्टमी या तिथीची (बुधवार, १२ नोव्हेंबर) ही नोंद पाहा:
केवढी माहिती आहे पाहा ही! बुधवारी कार्तिक कृष्ण अष्टमी तिथी आहे. पण ती रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी संपते. त्यानंतर, अर्थातच, नवमी तिथी सुरू होते. शुक्ल योग सकाळी ८ वाजून २ मिनिटांनी संपेल. त्यानंतर त्याच्या पुढचा, अर्थात, ब्रह्मा योग चालू होईल. बालव करण सकाळी १० वाजून ५८ मिनिटांनी संपेल आणि कौलव करण रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी. त्यानंतर त्याच्या पुढचं, अर्थात, तैतिल करण चालू होईल.
यातल्या तिथी, योग आणि करण या तीन अंगांचा सविस्तर ऊहापोह यापूर्वीच करून झाला आहे. आज ‘नक्षत्रांचे देणे’. ‘नक्षत्र’ या रकान्यात ‘आश्लेषा १८:३६’ असा उल्लेख आहे. म्हणजे नेमकं काय? पाहू.
पण त्याआधी काही मूलभूत माहिती. एकूण २७ नक्षत्रं आहेत. अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशीर्ष, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा आणि रेवती ही त्यांची नावं.
आता ‘आश्लेषा १८:३६’ म्हणजे त्या दिवशी संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत चंद्र आश्लेषा नक्षत्रात असेल! थोडक्यात, ‘नक्षत्र’ हे चंद्राच्या स्थितीचं निदर्शक आहे. चंद्राचीच स्थिती का? कारण महिन्याची व्याख्या चंद्रावर अवलंबून आहे. तेव्हा, त्याचं भ्रमण महत्त्वाचं. बाकीच्या आकाशस्थ ग्रहांचं स्थानही पंचांगात दिलेलं असतं. अगदी याच पद्धतीने. फक्त ते सोयीसाठी एका वेगळ्या तक्त्यात देतात.
आता त्यापुढचा मुद्दा. नेमकी कुठे असतात ही २७ नक्षत्रं? अनेकांना असं वाटतं की आकाशाचे २७ भाग केले आहेत. तसं मुळीच नाही. एक लक्षात घ्या. ‘काळाचे गणित’ सोडवताना सूर्याचं आणि चंद्राचं स्थान महत्त्वाचं. आणि गंमत अशी आहे की या अथांग आकाशात एका विशिष्ट मार्गावरूनच सूर्य आणि चंद्र भ्रमण करताना दिसतात! त्यामुळे सूर्य-चंद्राचं स्थान नक्की करायचं तर त्या मार्गाचे भाग केले पाहिजेत. हा मार्ग म्हणजे ‘क्रांतिवृत्त’ आणि त्याचे भाग म्हणजे ‘नक्षत्र’.
म्हणजे मुंबई शहर हे अनंत आकाश म्हटलं तर त्यातले रेल्वेमार्ग म्हणजे क्रांतिवृत्त! ज्याप्रमाणे ट्रेन या रेल्वेमार्गावरूनच जाणार तद्वत सूर्य-चंद्र आणि इतर ग्रह या क्रांतिवृत्तावरूनच प्रवास करणार. आणि ज्याप्रमाणे ट्रेन नेमकी कुठे आहे हे जाणून घ्यायचं तर स्टेशनचं नाव सांगितलं की पुरे. शहरातल्या बाकी गोष्टींचा विचार करायची गरज नाही. त्याप्रमाणे सूर्य-चंद्रादिकांचं या क्षणाचं स्थान जाणून घ्यायचं तर नक्षत्र सांगितलं की पुरे! आणि पंचांग नेमकं हेच करतं. पंचांगात पाहून आकाशस्थ विविध ग्रहगोल आत्ता या क्षणी नेमके कुठे आहेत हे बिनचूक सांगता येतं.
कालमापनाचं मूळ उद्दिष्ट यथासांग पूर्ण करून पुढे पंचांग जणू आकाशाचा नकाशाच बनतं! तेही सूर्य-चंद्रादिकांच्या लाइव्ह ट्रॅकिंगसह!
तिथी वार पर्यंत नक्षत्र योग करण करण
८ बु २२:५९ आश्लेषा १८:३६ शुक्ल ०८:०२ बालव १०:५८ कौलव २२:५९
