लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यासाठी अनेक दशकांपासून लढणाऱ्या व्हेनेझुएला येथील मारिया कोरिना मच्याडो यांना २०२५ या वर्षासाठी नोबेल शांतता पुरस्कार १० आक्टोबरला जाहीर झाल्यानंतर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या पारितोषिकाबाबत केलेल्या जाहीर विधानांमुळे जगात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. खरेतर शांततेचे नोबेल पारितोषिक आपल्याला मिळायला हवे होते असे म्हणणे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष या पदाला आणि त्या पदाच्या प्रतिष्ठेला साजेसे आहे का? हा प्रश्न आहे. दुसरे असे की शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीने आपल्याला पारितोषिक जाहीर झाले नाही म्हणून आकांडतांडव करणे हे सभ्यता आणि संस्कृतीला शोभणारे आहे का?
नोबेल पारितोषिक जाहीर होऊनही काही महनीय आणि कर्तृत्ववान प्रतिभावंतांना त्यांच्या राष्ट्रातील राजकीय आणि धर्मसत्तेने पारितोषिक स्वीकारू दिले नाही. अशावेळी जगातील बलाढ्य देशांनी नोबेल विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्याच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सक्षम सहकार्य का केले नाही? नोबेल पारितोषिक विजेते असणाऱ्या अनेक निर्भय प्रतिभावंतांना उपेक्षा, अवहेलना सहन करावी लागली हा अप्रिय पण सत्य इतिहास.
‘‘…अखेरीस हे बेघर आणि निराश होणारे विस्थापित निर्माणच होणार नाहीत, असं जग निर्माण करणं आपलं उद्दिष्ट असायला हवं. असं जग ज्याचा कोनाकोपरा अभय देणारा असेल; जेथील रहिवासी स्वतंत्र असतील आणि शांततेत जगतील. प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द, प्रत्येक कृती जिच्यामुळे विधायकता, सकारात्मकता वाढते; ती जगाच्या शांततेत भर टाकते. आपल्यापैकी प्रत्येक जण असं छोटं-छोटं योगदान करण्यास समर्थ असतो. चला, आपण सगळे हातात हात घालून असं शांततापूर्ण जग निर्माण करू या, जिथे प्रत्येकाला रात्री शांत झोप येईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्साहाने उठता येईल’’ आंग सान स्यू की यांचे १४ आक्टोबर २०१२ रोजीचे हे शब्द आजही तेवढेच मौलिक आणि परिणामकारक आहेत. जगाला आजही शांततेची नितांत गरज आहे. अश्रू आणि रक्त यांचा इतिहास जगाचे मन विदीर्ण करणारा आहे. युद्ध, वेदना, उपेक्षा, भूक, निरपराधांचे मृत्यू यांचे वर्तमानही जगाला नको आहे. उद्याच्या सुंदर दिवसांसाठी जगाला आजचे अश्रू पुसावे लागतील, आज जे रक्त सांडले त्या थेंबांतून मानवतेचा जागर करणारी उद्याची निर्भय सकाळ निर्माण करावी लागेल.
लोकशाही विचारांचा पुरस्कार करणाऱ्या म्यानमार येथील आंग सान स्यू की यांना १९९१ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले होते पण त्यावेळी तेथील लष्करी राजवटीने त्यांना नजरकैदेत स्थानबद्ध करून ठेवले होते आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाण्यास नकार दिला होता. लोकशाही आणि मानवतावादी विचारांचा कैवार स्वीकार प्रचार प्रसार करणाऱ्या आंग सान स्यू की यांची २०११ मध्ये नजरकैदेतून सुटका झाली. निवडणुकीत त्यांच्या विचारधारेला मानणाऱ्या राजकीय पक्षाचा विजय झाला. पुढे १६ जून २०१२ रोजी नॉर्वे देशातील ओस्लो येथे त्यांचे नोबेल पारितोषिक स्वीकाराचे भाषण झाले.
आज म्यानमारमधील राजकीय स्थिती पुन्हा बदलली आहे. आताही आंग सान स्यू की पुन्हा एकदा नजरकैदेत असण्याची शक्यता आहे.
चीनमध्ये मानवी हक्क आणि लोकशाही विचार यासाठी निर्भयपणे संघर्ष करणारे लेखक, विचारवंत लिऊ झिओबो यांना २०१० मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले. पण तत्पूर्वीच मानवी हक्क आणि लोकशाही विचार यांसाठी कार्य करीत असलेल्या लिऊ झिओबो यांना तत्कालीन सत्तेने अटक करून तुरुंगात टाकले होते. लिऊ झिओबो यांना नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी जाण्याची परवानगी जुलमी राजवटीने नाकारली. सारे जग लिऊ झिओबो यांना नोबेल पारितोषिक स्वीकारण्यासाठी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करीत होते पण चीनमधील तत्कालीन सत्तेने निष्ठूरपणे लिऊ झिओबो यांना जाऊ दिले नाही. शेवटी नोबेल पारितोषिक वितरणाच्या समारंभात लिऊ झिओबो यांचे भाषण वाचून दाखविले गेले. विचारपीठावर लिऊ झिओबो यांची खुर्ची प्रतीकात्मक रीतीने रिकामी ठेवण्यात आली. पण त्यामुळे चीनच्या निगरगट्ट सत्तेवर काहीही परिणाम झाला नाही. लिऊ झिओबो यांनी आपल्या आयुष्यातील सुमारे ३० वर्षे उपेक्षा -अवहेलना सहन केली. तुरुंगवास भोगला.
तुरुंगात असताना त्यांना कॅन्सर हा दुर्धर आजार झाला पण उपचारासाठी चीनच्या बाहेर अन्य देशांत जाण्याची परवानगी सत्तेने नाकारली. शेवटी २०१७ मध्ये तुरुंगवासातच पण रुग्णालयात लिऊ झिओबो यांचा मृत्यू झाला. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या एका प्रतिभावंत माणसाचा राजकीय सत्तेने निष्ठूरपणे, अमानुषपणे सुमारे ३० वर्षे छळ केला. नोबेल पारितोषिक वितरण समारंभातील आपल्या भाषणात झिओबो यांनी लिहिले होते, ‘‘आपल्याला शिक्षा देणाऱ्या पोलीस, न्यायाधीश आणि इतर सरकारी अधिकारी, दडपशाही करणारे चिनी शासन अशा कोणाहीबद्दल माझ्या मनात द्वेषभावना नाही कारण द्वेषभावनेमुळे सहानुभूती व मानवता नष्ट होते आणि लोकशाही व स्वातंत्र्य यांच्याकडे जाणाऱ्या देशाच्या प्रवासात अडथळे येतात.’’ सत्तेने निष्ठूरपणे, अमानुषपणे उपेक्षा अवहेलना केली पण शेवटच्या श्वासापर्यंत लिऊ झिओबो यांनी मानवी हक्क आणि मानवतावादी विचारांचाच जागर केला.
जगप्रसिद्ध लेखक बोरिस पास्तरनाक यांनी आपल्याच देशात मानहानी, छळ, द्वेष सारे काही सहन केले. १९५७ मध्ये त्यांच्या ‘डॉ. झिवॅगो’ या जगप्रसिद्ध कलाकृतीवर रशियातील सरकारने बंदी घातली. नोबेल पारितोषिक जाहीर झाल्यानंतरही रशियातील सत्ता आणि साहित्यिकांनी पास्तरनाक यांची प्रचंड मानहानी केली. त्यांच्यावर बहिष्कार टाकला गेला. नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास जर पास्तरनाक स्टॉकहोम येथे गेले तर त्यांना पुन्हा रशियात प्रवेश दिला जाणार नाही असेही कळवण्यात आले. एखाद्या गुन्हेगाराविषयी समाजाला वाटावा तसा तिरस्कार पास्तरनाक यांच्या विषयी निर्माण केला गेला. नोबेल पारितोषिक स्वीकारण्यास नकार दिल्यानंतरही पास्तरनाक यांची मानहानी सुरूच होती. रशियातील राजकीय सत्तेसह साहित्यिकांनी पास्तरनाक यांचा प्रचंड दुस्वास केला, निर्भर्त्सना केली. हा छळ सहन करताना हा जगप्रसिद्ध साहित्यिक मनातून फार दु:खी झाला. पास्तरनाकच्या या शब्दातीत दु:खाविषयी ग्रेस लिहितात, ‘‘प्रतिभावंत आपल्या समाजावर बहिष्कार टाकत नाही आणि त्याला संतापाने शापही देत नाही. तो अबोल होतो. तो बोलत नाही. तो लिहित नाही. पास्तरनाकने हेच केले; आणि रशियन साहित्याला हा पैलूदार हिरा चक्क गमवावा लागला. कलावंताचे मौन, स्वत:चे निर्मितिविश्व गुंडाळणे हाच तर त्या भाषेला, साहित्याला सर्वात मोठा शाप आहे. अशा शापाची उ:शापाने बोळवण करण्याचे कुठलेही प्रयत्न इतिहासाने कधी पाहिले नाहीत…’’ ( संध्यामग्न पुरुषाची लक्षणे, पृष्ठ २७१) हे विधान पास्तरनाक यांची वेदना विशद करणारे आहे. बहिष्कार, द्वेष, आरोप, निर्भर्त्सना सहन करीत ३० मे १९६० रोजी पास्तरनाकचा मृत्यू झाला. असेही सांगितले जाते की त्यांच्या मृत्यूला काही वर्षे झाल्यानंतर रशियन सत्ता आणि साहित्यिकांना पास्तरनाक यांच्या लेखनाची महती कळली, पण ‘डॉ. झिवॅगो’ या कलाकृतीवर मात्र १९८८ पर्यंत बंदी कायम होती.
बहिष्कार आणि छळ केला, नोबेल पारितोषिक स्वीकारू दिले नाही म्हणून पास्तरनाक यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. डॉ. झिवॅगो या कादंबरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वास्तवाचे अंकन जगातील वाचकांना मनापासून आवडले. हाच द्वेषमूलक क्रूर राजसत्तेचा खरा पराभव आहे. रशियातल्या सत्तेसह साहित्यिकांनी पास्तरनाकवर बहिष्कार टाकला, त्यांच्या अंत्ययात्रेवर बहिष्कार टाकला पण इतिहासाच्या पानांवर त्यांच्या शब्दांची अमीट मुद्रा उमटलेली आहे. गॅलिलिओ असो की पास्तरनाक असो त्यांच्या अजेय शब्दांनी क्रूर राजसत्तांचा पराभव केला हेच सत्य आहे.
बहिष्कार, द्वेष, आरोप, निर्भर्त्सना सहन करत ३० मे १९६० रोजी पास्तरनाकचा कर्करोगाने मृत्यू झाला. अवस्थेत मृत्यूच्या उंबरठ्यावर असताना पास्तरनाक म्हणाला होता, ‘‘ खलप्रवृत्तींच्या रूपात असलेला अंधार कितीही बलवान असला तरी तेजाचे चैतन्यरूपी किरण त्या अंधारावर हमखास मात करतील असा मला मृत्युशय्येवर असतानाही विश्वास वाटतो!’’ राजकीय सत्तेने छळ केला, बहिष्कार टाकला, अवहेलना केली, नोबेल पारितोषिक स्वीकारू दिले नाही म्हणून पास्तरनाक यांची निर्भयता आणि लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. ‘डॉ. झिवॅगो’ या कादंबरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वास्तवाचे अंकन जगातील वाचकांना मन:पूर्वक आवडले. हाच द्वेषमूलक क्रूर राजसत्तेचा खरा पराभव आहे. पास्तरनाकचे अखेरचे शब्द खरे ठरले. खलप्रवृत्तीच्या अंधाराचा नायनाट झाला. पास्तरनाक जिंकला. मृत्यूच्या समीप असतानाचे त्यांचे शब्द उजेडाची ओंजळ आपल्याला देणारे आहेत.
जगातील अनेक कर्तृत्ववान प्रतिभावंत व्यक्तींना नोबेल पारितोषिक जाहीर होऊनही ते स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नाही, पण ही माणसे निर्भय होती, विचारांची लढाई विचारांनी लढणारी होती. नोबेल पारितोषिकाची अपेक्षा बाळगून त्यांनी कार्य केले नाही आणि नोबेल जाहीर होऊनही ते स्वीकारण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू दिले नाही, म्हणून या कर्तृत्ववान व्यक्तींनी आकांडतांडवही केले नाही. दुसरे असे की पारितोषिकासाठी स्वत:च आग्रह धरणे ही बाब कर्तृत्वाची उंची कमी करणारी असते. हे न कळणारी माणसे आजच्या प्रगतिशील जगात उच्चपदस्थ आहेत ही मोठीच शोकांतिका आहे.
आचार, विचार, कर्तृत्व आणि वक्तृत्व यांमुळे माणूस ‘नोबेल’ आहे की नाही हेदेखील सिद्ध होत असते. खरे ‘नोबेल’पण कर्तृत्वातून सिद्ध झाले तर मग पारितोषिकाची गरजही वाटत नाही. जगाची इच्छा असूनही महात्मा गांधींना नोबेल पारितोषिक मिळाले नाही हे खरे आहे. क्रांतिकारक, कलावंत, विचारवंत, समाजसेवी कर्तृत्ववान आणि ‘नोबेल’ व्यक्तींनी जुलमी सत्तांसह मृत्यूलाही नेहमीच पराभूत केले आहे. नोबेल पुरस्कार जाहीर झाला पण स्वीकारता आला नाही तरीही या महनीय व्यक्तींच्या कर्तृत्वाचे सोने उजळून निघाले आहे. जगाच्या इतिहासाच्या पानांवर आणि समाजाच्या मनात या ‘नोबेल’व्यक्ती सदासर्वदा जिवंत राहणार आहेत.
समीक्षक
ajayjdeshpande23@gmail.com