‘मानवमुक्तीचे कार्य करणारे बिंदेश्वर पाठक हे अशक्यप्राय बदल घडवून आणता येतो, याची प्रेरणा देत राहातील,’ हे उद्गार त्यांच्या निधन-वार्तेनंतर अनेकजणांच्या तोंडून येतील, पणन्यू यॉर्क शहराच्या तत्कालीन महापौरांनीही २०१६मध्ये अशाच शब्दांत त्यांचा गौरव केला होता. त्या वर्षी न्यू यॉर्कच्या ‘ग्लोबल लीडर्स डायलॉग समिट’चा पुरस्कार पाठक यांना मिळाला होता. अर्थात, स्टॉकहोम वॉटर प्राइझ किंवा जपानचे निकेइ एशिया प्राइझ, फ्रेंच सिनेटतर्फे दिला जाणारा पुरस्कार, केम्ब्रिज विद्यापीठाच्या वादसभेत व्याख्यानाचा मान असे कित्येक आंतरराष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले होते.शौचालयासारखी अवघड गरज ‘सुलभ’ करण्याचे कार्य त्यांनी भारतात १९७० पासून सुरू केले असले तरी अन्य विकसनशील देशांनाही त्यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा उपयोग झाला होता, त्यामुळेच संयुक्त राष्ट्रांनीही ‘सुलभ’च्या कार्यावर मान्यतेची मोहोर उमटवली होती.
समाजशास्त्राचे पदवीधर असलेल्या आणि मूळचे बिहारच्या पाठकांनी सफाई कर्मचाऱ्यांमध्ये काम सुरू केले ते १९६८ पासून. पण गांधीविचाराशी प्रामाणिक राहून काम करण्याच्या शक्यता इतक्या अमर्याद असताना तसे होत का नाही, यासारखा प्रश्न त्यांना पडला आणि त्याचे उत्तर त्यांनी स्वत: शोधले. मैलावाहू कामापासून सफाई कामगारांना मुक्त करायचे असेल तर आधी तांत्रिक आणि व्यवहार्य उत्तरेही शोधली पाहिजेत, हे त्यांना पटले. दोन टाक्या (ओली आणि तुलनेने कोरडी) बांधण्यापासून सुरू झालेला प्रवास, कमी पाण्याने स्वच्छ होणाऱ्या शौचकूपापर्यंत आला, तोवर त्यांच्या ‘सुलभ इंटरनॅशनल सोशल सव्र्हिस ऑर्गनायझेशन’चा व्याप वाढला होता. देशभर ५० हजार ‘स्वयंसेवकां’चे जाळे उभारून शौचालयांची सोय या संस्थेने उपलब्ध करून दिली होती.
संस्था-उभारणी आणि पूरक संस्थांना बळ देणे, हा गांधीजींचा गुण त्यांच्यात होता. मात्र काळ निराळा, गरजा निराळय़ा, त्यामुळे त्यांनी संस्थाही निराळय़ा पद्धतीने उभारल्या. दिल्लीच्या पालम गावाजवळील ‘सुलभ टॉयलेट म्यूझियम’ हे याचे एक उत्तम उदाहरण. ‘सुलभ’चे मुख्यालय म्हणून बांधलेल्या इमारतीच्या काही भागात हे संग्रहालय आहे. आवारातच आधुनिक काळातील शौचकूपांचे नमुने, तर आत शौचकूपांचा इतिहास आणि विज्ञानसुद्धा- ‘दोन महिन्यांत मानवी विष्ठा पूर्णत: कोरडी आणि गंधहीन होऊ शकते, त्यातील सारे जंतूही एवढय़ा काळातच नष्ट होऊ शकतात. अशा कोरडय़ा पदार्थाला काठीण्यही प्राप्त होते’.. यासारखे पाठय़पुस्तकांत नसलेले विज्ञान! पाठक यांच्यामुळे मोक्याच्या जागी सार्वजनिक शौचालये बांधली गेली. त्यांच्या कामाचे अनुकरणही झाले आणि अनेक संस्था/ कंपन्या या शौचालयांच्या ‘समाजोद्योगा’त उतरल्या. पाठक हे तोवर आणखी पुढे गेले होते, आंतरराष्ट्रीय ख्याती त्यांना मिळाली होती आणि धोरणे आखणाऱ्यांमध्ये त्यांची ऊठबस वाढली होती. त्यांच्या पाठिंब्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ घोषणेला सुरुवातीस आवश्यक असणारी विश्वासार्हता लाभली होती. त्यांच्या निधनाने एक प्रेरणास्थान निमाले असले, तरी त्यांची पुस्तके प्रेरक ऊर्जा देत राहणार आहेत.