शैक्षणिक व्यवहारात, त्यातही विशेषत: विद्यापीठीय शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा भ्रष्टाचार, राजकारण आणि अनीतीचा शिरकाव होऊ लागला होता, त्याच काळात डॉ. राम ताकवले यांच्यासारख्या सुज्ञाकडे पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद आल्यामुळे या सगळय़ा प्रकाराला त्यांनी केवळ गुणवत्तेच्या आधारे दूर ठेवण्यात यश मिळवले आणि शिक्षण व्यवहार ही अतिशय महत्त्वाची आणि देशाच्या भविष्याची काळजी घेणारी बाब आहे, यावर शिक्कामोर्तब केले. मितभाषी परंतु कार्यदक्ष असणाऱ्या डॉ. ताकवले यांच्याकडे  बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी याचा सुरेख संगम होता. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न ही त्यांची खरी ओळख ठरली. त्यामुळे निवृत्तीनंतरही देशपातळीवर त्यांचा दबदबा राहिला. लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेल्या ताकवले यांनी विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात अध्यापनास सुरुवात केल्यानंतर तेथेही शिक्षणाची प्रक्रिया केवळ एकतर्फी न राहाता, विद्यार्थी आणि अध्यापक यांना एकमेकांशी जोडून घेता येण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षणाचा जगण्याशी जो संबंध असायला हवा, त्यासाठी उद्योग, उत्पादन साखळी यांच्याशी संपर्क असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन डॉ. ताकवले यांनी नव्या विषयांची ओळख करून देणारे अभ्यासक्रम सुरू केले. ऐन उमेदीच्या काळात, वयाच्या पंचेचाळिशीतच ते कुलगुरू झाले. पुणे विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा सतत वाढत राहील, यासाठी त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांचा हवाला आजही दिला जातो. विद्यापीठे ही उच्च शिक्षणातील संशोधन केंद्रे व्हायला हवीत, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. १९७८ मध्ये जेव्हा संगणकीय क्रांती भारताच्या उंबरठय़ावर होती, तेव्हा पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी अद्ययावत् संगणक कार्यान्वित केला आणि त्याचा फायदा अध्यापक, विद्यार्थ्यांबरोबरच समाजालाही होण्यासाठी त्यांनी योजना आखली. शिक्षणाची प्रक्रिया समाजाच्या विकासाला अनुकूल असायला हवी, यासाठी मुक्त शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्रात करण्यात आली, त्याचे पहिले कलगुरू होण्याचा मान ताकवले यांना मिळाला. नाशिक येथे असलेल्या या विद्यापीठात परिसरातील द्राक्ष उत्पादकांना पिकावर पडणाऱ्या रोगांचे निदान  करण्यासाठी पुणे विद्यापीठातील सीडॅकच्या संगणाकाचा उपयोग करून घेणारी यंत्रणा उभी केली. मुक्त शिक्षणाद्वारे शिक्षणाची गंगा सामान्यांपर्यंत पोहोचवताना, कुणालाही कोणत्याही वयात शिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी राबवलेल्या अनेक योजनांना भरघोस प्रतिसादही मिळाला. ज्ञानाचा समाजाच्या विकासासाठी उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल प्रारूप देश पातळीवर नावाजले गेले. या कामगिरीमुळेच दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीच्या कुलगुरुपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. निवृत्तीनंतरही अखेपर्यंत कार्यरत असणाऱ्या डॉ. ताकवले यांनी ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळा’च्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने, देश पातळीवरील एक अभ्यासू, बुद्धिमान आणि गुणवान शिक्षणतज्ज्ञ हरपला आहे.

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vyaktivedh dr ram takwale in the field of university education pune university vice chancellor ysh
First published on: 15-05-2023 at 00:02 IST