‘तत्त्वज्ञान, विज्ञान, इतिहास, भाषा अशा विषयांचा भरपूर ग्रंथसंग्रह करणारे’ अशी कुणा वाचकाची ओळख एखाद्याने करून दिल्यास समोरचा क्षणभर भारावतो! पण इयान हॅकिंग यांनी या साऱ्या विषयांवर आणि त्यापैकी काहींची सांगडही घालणारी किमान आठ पुस्तके लिहिली होती!! ‘विज्ञानाचे तत्त्वचिंतक’ म्हणून ते ज्ञात होते. मात्र १० मे रोजी टोरांटोत झालेल्या त्यांच्या निधनाची माहिती जगाला उशिरा कळली, याचे कारण त्यांनी जपलेला खासगीपणा.
‘व्हाय इज देअर अ फिलॉसॉफी ऑफ मॅथेमॅटिक्स अॅट ऑल?’ (२०१४) हे त्यांचे पुस्तक सर्वात अलीकडले. त्यात प्लेटोपासून देकार्त ते विटगेन्स्टाइन आणि नंतरच्या तत्त्ववेत्त्यांचे गणिताबद्दलचे विचार आणि या साऱ्यांपैकी प्रत्येकाची एकंदर तत्त्वज्ञानात्मक मांडणी यांचा तौलनिक वेधही आहे. ‘शुद्ध गणित’- प्युअर मॅथेमॅटिक्स – आणि तत्त्वज्ञान ही शाखा यांचा संबंध काय याचा धांडोळा घेणारे हे पुस्तक ‘उपयोजित’ गणिताशी ‘शुद्ध’ गणिताचा संबंधही शोधते, उपयोजित गणिताच्या आठ शाखा मोजते, आकडे हे ‘स्वान्त, सार्वभौम अस्तित्व’ असल्याच्या विचारधारेला (म्हणजे प्लेटोनिझमला) गांभीर्याने आव्हान देण्याच्या वैचारिक वाटा शोधते आणि संरचनावादाचा गणिताशी संबंध का आहे, हेही सांगते. इयान हॅकिंग यांच्या १९६५ सालच्या पहिल्या पुस्तकापासून ‘शक्यतां’च्या मानवी समजेबद्दलचा अभ्यास दिसून येतो, तो गणिताच्या निमित्ताने परिष्कृतपणे अखेरच्या पुस्तकात आल्याचे काही जाणकारांचे मत आहे. ‘बाहेरून आत’ अशा विचारव्यूहाद्वारे तत्त्वज्ञान-प्रवाहांची पारख करणाऱ्या इयान हॅकिंग यांनी ‘बाहेर’च्या बाजू म्हणून विज्ञान, समाजशास्त्र, भाषा, मानसशास्त्र यांचा वापर केला. या साऱ्या तत्त्वज्ञानाच्या मनोऱ्याच्याच खिडक्या.. त्या खिडक्यांतून आत शिरून मनोरा कसा दिसतो, हे सांगणारे हॅकिंग!




ते १९३६ मध्ये आणि कॅनडाच्या ब्रिटिश प्रांतात जन्मल्यामुळे फ्रेंच अवगत असणे, दहाच वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या मायकल फुकोचा प्रभाव पडणे, विटगेन्स्टाइन ते लेव्ही-स्ट्राउस या तत्कालीन नव्यांबद्दल सटीक वाचता येणे, असा काळाचा लाभांश त्यांना मिळालाच! पण ‘तिसऱ्या-चौथ्या वर्षीपासून डिक्शनरी वाचायचो’ असे सांगणाऱ्या इयान हॅकिंग यांचा स्थायीभाव कुतूहल हाच होता आणि तोच राहिला. वर्गीकरण हा निष्कर्षांचा पाया मानला जातो- पण वर्गीकरणपद्धतीतच काहीएक प्रमाणात निष्कर्षही दडले नसतात का, हा प्रश्न विचारणारे इयान हॅकिंग विचाराने चिरतरुणच राहिले होते. ‘शिस्त सोडून’ विचार केल्यास नवे दिसेल, हे संगणकोत्तर मानवी बुद्धीचे इंगित त्यांना बहुधा कधीच कळले असावे.