मोठमोठे डोंगर कापून विकासाची व्याख्या लिहायला अजून प्रारंभ झाला नव्हता. झाडांच्या बेसुमार कत्तली होत नव्हत्या. जंगलात बाहेरून येणारे रस्ते रुळलेले नव्हते. वन्य प्राण्यांसाठीचे पाणवठे हे घनगर्द झाडीत लपलेले होते. जंगलांच्या जमिनीवर कोणाचा डोळा नव्हता. जल, जंगल, जमीन यांच्यावरची मालकी तिथे राहणाऱ्यांचीच होती. त्यांना हुसकावून त्यांचं सगळंच गिळंकृत करणारे जबडे अजून ‘आ’ वासलेले नव्हते. आदिवासींनी निर्माण केलेल्या कलावस्तू मोठमोठ्या मॉलमध्ये अजून आलेल्या नव्हत्या आणि आदिवासी क्षेत्रातही अजून बाजार पोहोचला नव्हता. जिथलं हसू निर्मळ होतं. जंगलातले सगळे बारकावे हीच जणू तिथली बाराखडी होती… अर्थात ही खूप जुनी गोष्ट आहे. पाहता पाहता काळ बदलला. या बदलत्या काळाचा वेग पकडणारं आणि आदिवासींच्या जीवनातल्या स्थित्यंतराला नेमकेपणाने सांगणारं साहित्य गेल्या दोन-तीन दशकांत देशभरातल्या वेगवेगळ्या भागांतून आलं. जिथे जिथे आदिवासींचे समूह राहिले त्या त्या समूहातूनही या काळातला शब्द उच्चारला गेला. निर्मला पुतुल, जसिंता केरकेट्टा, अनुज लुगुन यांसारख्या कवींच्या कविता वाचल्या म्हणजे आदिवासींच्या जगण्याचा आजचा कोलाज लक्षात येईल.

गोपीनाथ मोहंती यांची ‘परजा’ ही कादंबरी १९४५ या वर्षी ओडिया भाषेत आली. ८० वर्षांपूर्वी लिहिलेली ही कादंबरी आजही तितकीच महत्त्वाची आहे कारण या कादंबरीत आदिवासी जीवन जिवंतपणे चित्रित झालं आहे. गावातल्याच आदिवासींच्या शोषणात सहभाग असणारा आणि वनाधिकाऱ्यांचं बाहुलं असणारा गावचा पुढारी, आदिवासींच्या मुलीबाळींचे शोषण करणारे वन अधिकारी असे तपशील या कादंबरीत येतात. मोहंती हे प्रशासकीय सेवेत अधिकारी होते. आपल्या अधिकारपदाच्या काळात ते आदिवासी जीवनाशी इतके एकरूप झाले होते की त्यांची ही एकरूपता त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होते. ‘मन गहिरर चाष’, ‘परजा’, ‘अमृतर संतान’, ‘माटी मटाल’ या कादंबऱ्या आणि शेकडो कथांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी जीवन रेखाटलं. अर्थात त्यांचं सर्व लेखन आदिवासी जीवनाशी संबंधित नाही. मध्यमवर्गीय आणि नागर जीवनावरही त्यांच्या कथा, कादंबऱ्या आहेत पण मुख्यत्वे ते ओळखले जातात आदिवासी जीवनाचे महत्त्वपूर्ण चित्रण करणारे कलात्म भाष्यकार म्हणूनच. ओडिया भाषेतील त्यांच्या महत्त्वाच्या कादंबऱ्या हिंदी भाषेत अनुवादित झाल्या आहेत तर ‘परजा’ या कादंबरीचा मराठी अनुवाद २० वर्षांपूर्वीच आला आहे.

‘माटी मटाल’ ही त्यांची कादंबरी तर केवळ ओरिसाचंच नव्हे तर अवघ्या भारताचं ग्रामीण जीवन चित्रण करणारी कादंबरी मानली जाते. माणसाचं जीवन कधी स्थितिशील असत नाही. नव्या परिवेशात ते नव्या संघर्षाला भिडत असतं. आयुष्यातल्या आव्हानांना पुरून उरण्याची जिजीविषा हेच या जगण्याचं सूत्र आहे. व्यक्ती ज्या समाजाचा घटक असते तो समाजही बदलत असतो. त्या समाजाचे पर्यावरण बदलत असते. गोपीनाथ मोहंती यांनी जे जीवन पाहिलं, त्या जीवन वास्तवाचेच अनेक पैलू त्यांनी आपल्या लेखनातून उलगडले. त्यांच्या कादंबऱ्या वाचताना त्या केवळ वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या आहेत असं वाटत नाही. काळाचा विशाल पट साकारून ते कादंबरीला कवितेची भाषा देतात. त्यामुळे या कादंबऱ्या कमालीच्या वाचनीय ठरतात. केवळ वाचनीयता हेच त्यांचे वैशिष्ट्य नाही. त्यांच्या गद्याला तत्त्वज्ञानाची उंची प्राप्त होते याचं उदाहरण म्हणूनही ‘माटी मटाल’ ही कादंबरीच आहे. जिला खरंतर महाकादंबरी असं म्हणावं लागेल. हे बृहत् कथन वाचकाला खिळवून ठेवतं. ही कादंबरी पूर्ण करायला गोपीनाथ मोहंती यांना दहा वर्षे लागली होती. म्हटलं तर ही एका नायक आणि नायिकेची प्रेमकथा आहे पण या कथेला असलेल्या असंख्य उपकथांमुळे ती विलक्षण गुंतागुंतीची आणि वाचनीय ठरते. व्यक्तीला समष्टीशी जोडून एका मोठ्या पटावर जीवनसंघर्ष उभा करणं हे मोहंती यांच्या सर्वच कादंबऱ्याचे वैशिष्ट्य आहे.

‘परजा’ या कादंबरीत एका आदिवासी कुटुंबाची कथा आहे. सुकरू जानी हा या कुटुंबाचा प्रमुख. एका भयंकर घाटातल्या नागमोडी रस्त्यावरून खाली पाहिल्यानंतर जे दृश्य दिसतं त्यात दोन्ही बाजूला ४०- ५० डोंगर दाटीवाटी करून स्वत:चा पायथा टेकायला जागा मिळावी म्हणून एकमेकांवर रेलून बसल्यासारखे दिसतात. तिथून उत्तरेला तीन-चार मैलांच्या अंतरावर एका उंच डोंगराच्या उतारावर वसलेलं एक छोटंसं खेडं आहे. कोरापट आणि रायगड या दोन शहरांना जोडणारा रस्ता ओलांडून या गावात पोहोचावं लागतं. शाकारलेल्या झोपड्या, दोन्ही बाजूला असलेल्या वस्त्यांमध्ये जाण्यासाठी दोन रस्ते, एक वस्ती ‘परजा’ या आदिवासी समूहाची तर दुसरी डोंबाची. परस्परांना समांतर असलेल्या या दोन्ही वस्त्यांच्या झोपड्यांसमोर मिरची, तंबाखूचे वाफे, खाण्यासाठी बाजूला असलेलं मक्याचं शेत. गावाच्या मध्यभागी आनंदाच्या प्रसंगात नाचण्यासाठी मोकळी जागा. या गावात फक्त २२ कुटुंबं राहतात. ‘परजा’च्या वस्तीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर सुकरू जानी राहतो. त्याची एक झोपडी आणि दोन मुली, दोन मुलांचं कुटुंब. एके दिवशी भल्या पहाटे त्याची बायको झाडाचा पाला आणण्यासाठी जंगलात जाते. महाबला जातीचा एक पट्टेरी नरभक्षक वाघ त्या जाळीत दबा धरून बसलेला असतो. तो तिच्यावर झडप घालतो. झाडपाला आणण्यासाठी एका घळीत उतरलेली त्याची बायको पुन्हा परत येतच नाही. आता आपल्या जीली आणि बिली या दोन मुली, मांडिया, टीकरा ही दोन मुले यांच्यासोबत सिकरू राहतो.

संध्याकाळ होते तेव्हा समोरच्या पटांगणात जाळ पेटवला जातो. तिथल्या चुलीवर आंब्याच्या कोयीचं पीठ, काही रानभाज्या मिसळून मडक्यात शिजायला ठेवलं जातं. सुकरूच्या मुली हे अन्न शिजवत असतात. आपली ही चार लेकरं, आभाळाचं पांघरूण आणि धरतीचं अंथरूण या बळावर सुकरू आनंदी आहे. घरातही फारसं काही सामान नाही. दोन-चार मडकी, दोरीवर टांगलेले अंगावरचे अंग झाकण्यापुरते कपडे, एवढ्यावर तो खूश आहे. तो जेव्हा संध्याकाळी झोपडीसमोरच्या पटांगणात बसतो तेव्हा त्याला अचानक वेगवेगळ्या रंगांत बुडून गेलेले डोंगर दिसतात, पर्वताच्या पायथ्याला गर्द रानात पसरलेलं पाणी दिसतं. चिंतनात तो खोल बुडतो तेव्हा त्याला आपला वृद्धापकाळ दिसू लागतो. या वस्तीतली माणसं मृतांच्या स्मृती कशा जतन करतात हेही त्याला आठवतं आणि एक दिवस आपणही असेच विस्मृतीत जाऊ असा विचार तो करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचा एक जमिनीचा तुकडा आणि या तुकड्यावर त्याची होणारी गुजराण. असं हे साध्या संसाराचं गणित… पण पुढे ते विस्कटून जातं. जमिनीचा तुकडा सावकाराच्या मालकीचा होतो. कोर्टकचेऱ्या सुरू होतात. मग सुकरूचा सावकाराशी संघर्ष सुरू होतो. कोर्टात तो हरतो कारण त्याला खटल्याबदलची नेमकी माहिती मिळत नाही. जमिनीचा तुकडा सावकाराच्या घशात गेल्यानंतर तो काढण्यासाठी सुकरू धडपडतो. तो आणि त्याची मुलं पुन्हा सावकाराच्या दारात जायचं ठरवतात. त्याला विनवणी करतात. ‘सावकार, तुमच्याकडे भरपूर पैसे आणि जमिनी आहेत. आमच्या जमिनीचा तुकडा म्हणजे आमच्या अन्नाचं जणू जन्मभराचं ताट. ते तुम्ही परत द्या, तुमचं भलं होईल.’ अशी विनवणी हे सगळेच करतात. तेव्हा ‘तुम्ही मला न्यायालयात खेचणार आणि आता पुन्हा माझ्या दारात न्यायासाठी भीक मागणार? इथून जा नसता तुम्हाला तुरुंगात धाडतो’. असं तो सावकार या सर्वांना धमकावतो. सुकरूला तो लाथाडतो. खूप अपमानित झाल्यानंतर असा एक क्षण येतो. सुकरू, त्याची मुलं विजेच्या वेगाने चवताळतात आणि सावकाराच्या अंगावर कुऱ्हाडीचे घाव घालतात. तू आम्हाला जमिनीतून हुसकावलंस, पण या जमिनीचा आनंद तुला घेता येणार नाही असं म्हणत सुकरू आणि त्याची मुलं सावकाराला लोळवतात. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा देह पडतो. त्याच दुपारी हे तिघेही पोलीस ठाण्यावर जातात आणि आम्ही एका माणसाला ठार मारलं आहे. जी शिक्षा असेल ती भोगायला तयार आहोत असे सांगतात. पोलीस अधिकारी हादरून या तिघांकडे आश्चर्याने पाहतो. साधारण तीनशे पानांच्या जवळ जाणारी ही कादंबरी. अतिशय सुखा- समाधानात राहणाऱ्या आणि पोट भरण्यापुरती जमीन कसणाऱ्या एका कुटुंबाने आपल्या शोषणाविरुद्ध केलेला हा विद्रोह हे ‘परजा’ या कादंबरीचे कथानक आहे. आज आदिवासींमध्येही स्वत:च्या हक्क आणि अधिकारासंबंधी आत्मभान येत असल्याचे सांगणाऱ्या अनेक कथा, कादंबऱ्या, कविता आपल्याला दिसतात पण ८० वर्षांपूर्वी एखाद्या लेखकाने अशी ठिणगी जमिनीत पुरून ठेवावी ही गोष्ट थोरच मानली पाहिजे.