डॉ.किरण मजुमदार-शॉ
भारताच्या विकासकथेत महिलांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा आहे. प्रयोगशाळा, रुग्णकक्ष, शेती आणि जैवतंत्रज्ञानाशी निगडित नवोद्योग या क्षेत्रांतील महिलांच्या मूक पण प्रभावी कामगिरीमुळे भारताचे भविष्य आकार घेत आहे. आता महिलांकडे केवळ लाभार्थी म्हणून नव्हे, तर भविष्याच्या सहशिल्पकार म्हणून पाहिले जाणे गरजेचे आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करत असताना, महिलांच्या संपूर्ण सहभागाशिवाय भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, या त्यांच्या प्रतिज्ञेचे स्मरण होते. त्यांनी सुरू केलेल्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियाना’तून एक गहन सत्य समोर येते : ‘‘जर माता निरोगी असेल, तर संपूर्ण घर निरोगी राहते. जर माता आजारी पडली, तर संपूर्ण कुटुंबाची यंत्रणा कोलमडते.’’ महिलांचे आरोग्य हा राष्ट्रीय प्रगतीचा मूलभूत आधार आहे- हा विश्वासच भारताच्या विकास प्रवासाच्या केंद्रस्थानी आहे.
भारताच्या विकासकथेत महिला केंद्रस्थानी
महिला या प्रवासात केवळ सहभागी नाहीत, तर त्या या प्रवासाच्या चालक आहेत. प्रयोगशाळा, रुग्णकक्ष, शेती आणि जैवतंत्रज्ञानाशी निगडित नवोद्याोग या क्षेत्रातील महिलांच्या मूक पण प्रभावी कामगिरीमुळे भारताचे भविष्य आकार घेत आहे. भारताच्या प्राथमिक आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या १० लाख आशा कार्यकर्त्यांचेच उदाहरण घ्या- कोविड साथीच्या आव्हानात्मक काळात त्यांनी सर्वप्रथम प्रतिसाद दिला आणि कोणत्याही आरोग्यविषयक संकटाच्या वेळी त्या खंबीरपणे उभ्या राहतात. आयसीएमआर, एनआयव्ही आणि एम्समधील महिला शास्त्रज्ञांनी २०२० मध्ये सार्स-कोव्ह-२ विषाणू वेगळा करून भारतातील स्वदेशी लसीकरणाचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या या योगदानामुळेच जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम राबवून दोन अब्जांहून अधिक व्यक्तींचे लसीकरण शक्य झाले.
भारतात ६२.९ टक्के महिला कामगार कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यापैकी अनेक जणी आता दुष्काळाच्या प्रतिकारासाठी आणि पिकांच्या संरक्षणासाठी जैव तंत्रज्ञानावर आधारित उपायांचा अवलंब करण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्याोगांचा विचार करता महिला परवडणाऱ्या निदान पद्धती, जीनोमिक्स आणि लसनिर्मिती नवोपक्रमांशी संबंधित नवउद्याोगांचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही कामगिरी अपवादात्मक नाही, तर भारताच्या नारी शक्तीच्या सक्षमीकरणाचा हा जिवंत पुरावाच आहे.
धोरणात्मक आणि संस्थात्मक पाठिंबा
महिलांच्या या कार्यक्षमतेला चालना देण्यात सरकारी उपक्रमांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’पासून ‘मिशन शक्ती’, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ (संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करणारा) आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया, जनधन योजना- या आणि अशाच अन्य योजनांतून महिला-केंद्रित विकासाची रचना मजबूत झाली आहे.
देशभरात ५४ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली असून, त्यापैकी जवळपास ५६ टक्के खाती महिलांच्या नावावर आहेत. जगात क्वचितच दिसणारा आर्थिक समावेशाचा स्तर आज भारतीय महिलांबाबत दिसू लागला आहे. मुद्रा योजनेअंतर्गत देशभरात एकूण ४३ कोटी रुपयांची कर्जे देण्यात आली आहेत आणि विशेष म्हणजे, त्यापैकी सुमारे ७० टक्के कर्जे महिला उद्याोजकांनी मिळवली आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लागू झाला की लवकरच संसदेतील एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव असतील- धोरणनिर्मितीत त्यांचा आवाज सुनिश्चित केला जाईल.
विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष
भारतीय महिला केवळ स्थानिक आणि राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक स्तरावरही भारताची नाममुद्रा उमटवत आहेत. भारतीय महिला विज्ञान आणि तंत्रज्ञानात अक्षरश: ताऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. इस्राोमध्ये महिला शास्त्रज्ञांची संख्या लक्षणीय आहे. ‘चंद्रयान-२’ आणि ‘मार्स ऑर्बिटर मिशन’साठी ‘मिशन डायरेक्टर’ पदाची जबाबदारी महिलांनी सांभाळली होती. हे भारताच्या अंतराळ शक्ती म्हणून उदयाचे द्याोतक आहे.
महत्त्वाचे म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित अर्थात स्टेम शिक्षणशाखांमधील महिलांच्या सहभागाचा विचार करता, भारत जगात आघाडीवर आहे. भारतात ४३ टक्के स्टेम पदवीधर महिला आहेत, तर अमेरिकेत हे प्रमाण ३४ टक्के, युरोपियन युनियनमध्ये ३२ टक्के आणि ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट’मधील देशांमध्ये सरासरी ३३ टक्के आहे. असे असले तरीही स्टेम क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांपैकी केवळ १९ टक्केच शास्त्रज्ञ, अभियंते आणि तंत्रज्ञ वैज्ञानिक संस्थांमध्ये थेट संशोधन आणि विकासात कार्यरत आहेत. त्यामुळे यापुढे शिक्षणातील प्रगतीला रोजगारात रूपांतरित करण्याची गरज अधोरेखित होते.
बायोटेक्नॉलॉजी करिअर अँड अॅडव्हान्समेंट अँड रीओरिएंटेशन प्रोग्राम अर्थात BioCARe आणि WISE- KIRAN सारख्या सरकारी कार्यक्रमांमुळे करिअरमध्ये ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा आपापल्या क्षेत्रात परतणाऱ्या महिला शास्त्रज्ञांना पुन्हा करिअर सुरू करण्यास मदत झाली आहे. अलीकडेच, बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंस कौन्सिल BIRAC ने ७५ पेक्षा अधिक महिला बायोटेक उद्याोजकांचा सन्मान केला. यातून नवीन नेतृत्व विकसित होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. जागतिक स्तरावर, जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व २० टक्क्यांपेक्षा कमी आहे. भारताची प्रगती विज्ञान उद्याोजकतेतील समावेशकतेसाठी मापदंड ठरू शकते.
पुढे पाहताना…
जीनोमिक्स, आण्विक निदान, बायोलॉजिक्स आणि अचूक उपचारपद्धतींमध्ये महिला प्रगती करत आहेत. त्या बायोटेक पुरवठा साखळी, नियामक परिसंस्था आणि तळागाळातील आरोग्य सेवा वितरण नेटवर्क यामध्ये नेतृत्व करतील. त्यांच्या नेतृत्वामुळे परवडणाऱ्या उपचारपद्धती अगदी दुर्गम गावांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास वाटतो.
गॅरेज लॅबपासून ते जागतिक बायोलॉजिक्स उद्याोग उभारण्यापर्यंतच्या माझ्या स्वत:च्या प्रवासाने मला हे शिकवले आहे की नवोपक्रम केवळ बोर्डरूममध्ये जन्माला येत नाहीत. ते तळागाळातून उदयास येतात आणि चिकाटीच्या बळावर आकार घेतात- तंत्रज्ञ, पोस्ट-डॉक, आरोग्य कर्मचारी यांच्या प्रतिभेतून ते विकसित होत जातात. जेव्हा त्यांना संधी आणि मान्यता मिळते, तेव्हा त्यांचा प्रभाव अनेक पटींनी वाढतो.
भारतासाठी निर्णायक क्षण
जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती, आरोग्य सुरक्षा, अन्न-धान्य क्षेत्रातील लवचीकता आणि अवकाश व डिजिटल तंत्रज्ञानाच्या नव्या सीमा पुढील दशकांमध्ये भारताच्या उदयाची व्याख्या निश्चित करतील. पंतप्रधानांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे : महिलांकडे केवळ लाभार्थी म्हणून नव्हे, तर या भविष्याच्या सहशिल्पकार म्हणून पाहिले जाणे गरजेचे आहे.
कृतीसाठी आवाहन
आता सर्व क्षेत्रांतील नेतृत्वाने हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, महिला शास्त्रज्ञ, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि उद्याोजक ठळकपणे दृश्यमान, संपूर्ण संसाधनांनी सुसज्ज आणि पूर्णपणे सक्षम असतील. जेव्हा हे प्रत्यक्षात येईल, तेव्हा भारताने आपली प्रतिज्ञा पूर्ण केलेली असेलच, शिवाय जागतिक अपेक्षांपेक्षा अधिक उत्तम कामगिरीही केलेली असेल. कारण जे भविष्य आपण सर्वांनी घडवले आहे आणि ज्याचे नेतृत्व महिलांकडे आहे त्याला आता कोणीही रोखू शकत नाही.
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,बायोकॉनलिमिटेड