यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यातील स्नेहबंधाचा काळ सुमारे पाच दशकांचा (१९३०-१९८४) आहे. शाळकरी वयात स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होताना यशवंतराव चव्हाण ज्या अनेकांची भाषणे ऐकून प्रभावित झाले होते, त्यांपैकी एक तर्कतीर्थ असल्याची नोंद चव्हाण यांच्या ‘कृष्णाकाठ’ या आत्मकथनात आहे. यशवंतराव चव्हाण यांचा समग्र पत्रसंग्रह नि ग्रंथसंभार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी जपला असून तो अभ्यासक, संशोधकांना देण्याचा अपवादात्मक मुक्त ज्ञानव्यवहार या प्रतिष्ठानने जपला आहे, त्यामुळे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ प्रकल्पासाठीही प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो पत्रसंग्रह देऊ केल्याने यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ यांच्यामधील पत्रानुबंधावर प्रकाश टाकणे शक्य होत आहे, याची सुसंस्कृत समाजव्यवहार म्हणून कृतज्ञापूर्वक नोंद घ्यायला हवी.

प्राप्त विस्तृत पत्रांपैकी निवडक पन्नासएक पत्रे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ खंड-१३ (पत्रसंग्रह)मध्ये अंतर्भूत आहेत. पैकी एक हृद्या व विचारोत्तेजक पत्र तर्कतीर्थांनी यशवंतरावांना लिहिलेले आहे; ते ३ ऑगस्ट, १९८१चे. काळ आणीबाणीनंतरचा. सत्तेवर आलेले जनता पक्ष सरकार अल्पकाळचे ठरले. १९८०च्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा काँग्रेसने ३५३ जागा जिंकून पुन्हा सत्ता मिळवली. यशवंतराव चव्हाण यांनी इंदिरा काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तसे पत्र इंदिरा गांधींना लिहिले; पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याच्या काळातले हे पत्र. तर्कतीर्थांनी यशवंतरावांना लिहिलेले. पत्र संक्षेप असा –

‘‘मी ३० जुलैला जर्मनीहून परतलो. आपला इंदिरा काँग्रेस प्रवेश लांबलेला दिसतो. आपल्या प्रवेशाच्या संकल्पावरच्या प्रतिकूल प्रतिक्रिया मी येथून जर्मनीस जाण्यापूर्वीच सुरू झाल्या होत्या. आता हा प्रवेश लांबल्याबद्दल म्हणजे प्रवेश न मिळाल्याबद्दल अनेकांचे मत अधिक प्रतिकूल झाले आहे. जे अनुकूल होते, तेही विषण्ण झाले आहेत. अनेक मित्रांना असे वाटते की, महाराष्ट्राला एक फार चांगला, समंजस, धोरणी, चिंतनशील, विवेकी, राजकारणी, मुत्सद्दी यशवंतरावांच्या रूपात योगायोगाने लाभला होता, परंतु या नव्या इंदिरा काँग्रेस प्रवेशाच्या संकल्पामुळे आणि विशेषत: इंदिराजींनी प्रवेश न देता अपमानित केल्यामुळे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे महान यश कलंकित झाले आहे.

यश आणि अपयश, मान आणि अपमान या द्वंद्वांना विशेष महत्त्व नाही. त्यांना महत्त्व आहे ते केवळ आपल्या स्वत:च्या आचरणाचे आणि कृतीचे मूल्यमापन करण्याकरिता. हा दृष्टिकोन मला ‘भगवद्गीते’पासून मिळाला आहे. कारण ‘भगवद्गीता’ ही राजनीती शास्त्रातून निघालेली परमार्थ नीती होय. राजनीती शास्त्राचे अधिष्ठान असलेली परमार्थ नीती त्यात सांगितली आहे. ख्रिास्ताने म्हटले आहे, ‘दार ठोठवा म्हणजे उघडेल.’ यावर माझे म्हणणे असे की, ‘दारापर्यंत जावे. दार ठोठवावे. नाही उघडले तर बाहेरच बसून राहावे.’ महाराष्ट्राची हवा समशीतोष्ण असल्यामुळे उघड्यावर बसले तरी हरकत नाही.

राजकारणाच्या दृष्टीने पाहिले असता असे दिसते की, भारतीय लोकशाहीने आतापर्यंत बेबंदशाही किंवा हुकूमशाही किंवा अधिकारशाही टाळली आहे आणि याचे श्रेय गेल्या दीडशे वर्षांच्या भारतीयांच्या राजकीय इतिहासाला आहे. दादाभाईंपासून नेहरूंपर्यंतच्या नेतृत्वामध्ये लोकशाही जीवनमूल्याचे संदेश प्रकट झाले आहेत. इंदिराजीदेखील या परंपरेशी निष्ठेने वागण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु परिस्थितीच्या शक्ती इतक्या विलक्षण व जबरदस्त आहेत की, त्यामुळे ही महान लोकशाही टिकवून धरणे हे त्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक कठीण होणार आहे. अधिकारशाही, हुकूमशाही किंवा लष्करशाही हे भारताचे दुदैवच ठरेल. हे दुर्दैव टाळता येण्याची शक्ती भारतीय माणसाला आहे की नाही, याची अग्निपरीक्षा होण्याची वेळ येऊनच ठेपली आहे.

आजच्यासारख्या परिस्थितीत आपल्यासारख्या अनुभवी, मुरब्बी व्यक्तीचे सहकार्य हे फार मोलाचे ठरेल, याची इंदिराजींना जाणीव असावयास पाहिजे तशी ती जाणीव आहे की नाही, हे नजीकचा काळच ठरवेल. तरुणांना संधी द्यावी, हेही योग्य होय. परंतु ‘तारुण्य’ हे शहाणपणाचे मूल्यमापक नव्हे. तरुणाला संधी देताना फार काळजी घ्यावी लागेल. ज्ञानवृद्धत्व हेच खरे शहाणपणाचे मूल्यमापक ठरते. ज्ञान म्हणजे अनुभवजन्य प्रज्ञा होय.’’
drsklawate@gmail.com