दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्र सध्या चिनी नौदलाच्या कारवायांमुळे खवळलेला असून, चीन विरुद्ध जपान, अमेरिका आणि पूर्व आशियातील व्हिएतनाम, फिलिपिन्स यांसारखे देश असा संघर्ष तेथे निर्माण झाला आहे. तो चिघळल्यास किंवा त्याचे युद्धात पर्यवसान झाल्यास भारतासही हातावर हात ठेवून बसता येणार नाही. पंतप्रधान नरसिंह राव यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुरू केलेल्या ‘पूर्वेकडे पाहा’ या धोरणास आता कुठे फळे येत आहेत. पूर्वी हे देश चीनकडे विश्वासाने पाहात असत आणि भारताविषयी त्यांच्या मनात परकेपणाची भावना होती. आज ती परिस्थिती नेमकी उलट झाली आहे. अशा वेळी भारतास अलिप्त राहता येणार नाही. त्यामुळे निव्वळ जागतिक शांततेच्याच नव्हे, तर भारताच्या आíथक आणि लष्करी हितसंबंधांच्या दृष्टीनेही चिनी समुद्रातील हे वादळ महत्त्वाचे आहे. या वादाचा इतिहास फारच जुना आहे आणि त्याचा संबंध थेट पाश्चात्त्य साम्राज्यवादाशी आहे. चिनी माध्यमे आणि विश्लेषकांच्या मते या वादास अमेरिका जबाबदार आहे. चीन-जपान युद्धानंतर १८९५ला झालेल्या करारात जपानला तवान देण्यात आले होते. १९५१ मध्ये सॅनफ्रान्सिस्को करारानुसार जपानने तवानसह अनेक भागांवरील हक्क सोडला. मात्र त्या वेळी सेनकाकू-डियाओयू बेटे चीनला परत करणे आवश्यक होते. तसे झाले नाही. त्यामुळे या बेटांवर जपानचा ताबा आहेच. परंतु त्यावर चीनप्रमाणेच तवानही हक्क सांगत आहे. अनेक वर्षांपासून हे भांडण सुरू आहे. आता गेल्या दोन-तीन वर्षांत, त्यातही शि जिनिपग यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चीनने याबाबत अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. संपूर्ण पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्रावरच पद्धतशीरपणे आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वेगवेगळ्या बेटांवर त्या भागातील विविध देश आपला हक्क सांगत आहेत.
१९७४ मध्ये तर त्यातील एका बेटावरून व्हिएतनाम आणि चीनमध्ये मोठी चकमक झाली होती. आता त्या सगळाच भाग आपल्या पंखाखाली घेण्याचा चीनचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे पूर्व चिनी समुद्रात ‘हवाई संरक्षण विभाग’ निश्चित करून चीनने जपान आणि अमेरिकेला थेट आव्हान दिले आहे. या भागात जपान, तवान आणि दक्षिण कोरिया या अमेरिकी मित्रराष्ट्रांनी असा हवाई संरक्षण विभाग आधीच निश्चित केला आहे. त्यालाच चीनने छेद दिला. त्यामुळे या विभागातून जाणाऱ्या विमानांनी चीनला आधी तशी कल्पना देणे आवश्यक बनले. मात्र ते अमेरिकेने धुडकावून लावले. गेल्या आठवडय़ात अमेरिकी लढाऊ विमानांनी या विभागातून उड्डाण करीत चीनला आव्हान दिले. त्यानंतर दक्षिण कोरिया आणि जपाननेही तसेच केले. त्यावर चीनने शड्ड ठोकणे अपेक्षितच होते. समुद्री मार्ग, मच्छीमारी आणि तेलविहिरी यांवरील ताब्यासाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे, हे स्पष्टच आहे. परंतु त्याला चीन आणि जपान यांच्यातील ऐतिहासिक शत्रुत्वाचीही किनार आहे. ते अधिक धोकादायक आहे. आताच चीन आणि जपानमधील तथाकथित राष्ट्रवाद्यांच्या देशभक्तीला उधाण आले आहे. त्याचा दबाव येऊन तेथील राजकीय नेतृत्वाने वेडीवाकडी पावले उचलली, तर चिनी समुद्रातील संघर्षांचे हलाहल संपूर्ण आशियात पसरण्यास वेळ लागणार नाही.