त्या साधकाला स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह घेतल्यापासून आंतरिक समाधान लाभलं. आपलं आंतरिक समाधान कशावर अवलंबून असतं आणि ते कशामुळं बिघडतं हो? याचं एकच उत्तर आहे, ‘बाह्य़ परिस्थिती’! आपल्या सभोवतालच्या स्थूल भौतिक स्थितीत किंचित प्रतिकूल असा पालट झाला किंवा तो होईल, अशी शंका जरी मनात आली तरी आपलं आंतरिक समाधान क्षणार्धात डचमळतं. आता आपली आंतरिक स्थिती ज्या भौतिकावर अवलंबून आहे, ते भौतिक कसं आहे? हे भौतिक अशाश्वत आहे, सतत बदलणारं आहे. आता थोडा आणखी खोलवर विचार करा, आपल्या सभोवतालचं भौतिक जसं अशाश्वत, सतत बदलणारं, अस्थिर आहे तशाच माझ्या आंतरिक वृत्ती आणि ऊर्मीही अशाश्वत, अस्थिर, सतत बदलणाऱ्या आहेत. आज माझी जी वृत्ती आहे तीच उद्याही तशीच राहील, याची शाश्वती नाही. आज ऊर्मीच्या ज्या ओढीनं मी तिच्या पूर्तीसाठी धडपडत आहे ती ऊर्मी टिकेलंच याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवनात आज मला जे सुखाचं वाटतं ते उद्याही सुखमय वाटेल, याचा भरवसा नाही. जे आज हवंसं वाटतं तेच उद्याही हवंसंच वाटेल, असंही नाही. आज जे सुखाचं वाटतं, तेच उद्या दु:खाचं वाटू शकतं. आज जे हवंसं वाटतं तेच उद्या नकोसंही वाटू शकतं. तेव्हा माझी आंतरिक स्थिती आणि बाह्य़ स्थिती या दोहोंची गती अशी आहे! आता याचं वास्तविक भान मला नसतं. त्यामुळे प्रसंग जसा उद्भवतो त्या क्षणीच्या माझ्या आंतरिक भावस्थितीनुसार मी तात्काळ वागतो. याचाच अर्थ माझी कृती ही विचारपूर्वक नसते. क्षणिकाच्या प्रभावातून प्रतिक्रियात्मक रूपात ती घडते. वरवर पाहता आपल्याला वाटतं की आपण कृतीचं नियोजन करतो. पुढील दोन-तीन वर्षांत काय-काय करायला पाहिजे, हेही ठरवतो. वरकरणी हे जरी खरं भासलं तरी एक-दोन वर्षांत काय करायचं, याचा जो निर्णय आपण घेत असतो तो त्या क्षणीच्या वृत्ती वा ऊर्मीच्या तरंगानुसारच साकारतो. म्हणजेच आमची कोणतीही कर्मे ही विचारपूर्वक, आमच्या बाजूनं पूर्वनियोजित अशी नसतात. ती आमच्या बाजूनं पूर्वनियोजित असती तर आमच्या नियोजनबरहुकूम ती पार पडली असतीच ना? साधं पाहा. नववर्षांचे किती संकल्प आपण मनात योजतो, पण ते नववर्षांच्या पहिल्या आठवडय़ातच बारगळतात ना? असं असलं तरी आपलं सगळं जगणं कर्ममयच असतं. अनंत र्कम आपण करतो आणि त्यातली कित्येक आपल्याला पार पाडावीच लागतात. अशी अगणित र्कम करीत असतानाही त्या कर्माचं खरं प्रयोजन, त्या कर्माचा खरा हेतू, त्या कर्माचं वास्तविक स्वरूप आणि मर्यादा आपण जाणत नाही. त्यामुळे ते कर्म पूर्णत्वास गेलं तर कर्तेपणाच्या मदात आम्ही गर्वानं फुलून जातो. ते कर्म विफल झालं, पूर्णत्वास गेलं नाही, त्यात अपयश आलं तर आम्ही निराश तरी होतो किंवा त्या अपयशाचं खापर परिस्थितीच्या, इतरांच्या किंवा दैवाच्या माथी फोडून चरफडत राहातो. गंमत पाहा, कार्य यशस्वी झालं तर त्याचं श्रेय मात्र आम्ही परिस्थितीला, इतरांना आणि दैवाला देत नाही! ते केवळ स्वकर्तृत्वालाच देतो.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2014 रोजी प्रकाशित
१९८. हरपले श्रेय
त्या साधकाला स्वामी स्वरूपानंद यांचा अनुग्रह घेतल्यापासून आंतरिक समाधान लाभलं. आपलं आंतरिक समाधान कशावर अवलंबून असतं आणि ते कशामुळं बिघडतं हो? याचं एकच उत्तर आहे,
First published on: 08-10-2014 at 12:22 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Credit disappear