उत्तुंग पर्वतांनी वेढलेल्या अनेक गावांत उजाडले तरी सूर्य दिसत नाही, तो डोंगरामागे लपलेलाच राहतो. हिमालयाच्या कुशीतल्या नेपाळमधील लोकशाहीची गत काहीशी अशीच आहे. या देशात दहा वर्षांपूर्वी राजेशाही संपून लोकशाहीची स्थापना झाली, परंतु घटना समितीचे काम दशकभर सुरूच आहे आणि ही घटना समितीच संसदेसारखे कायदे मंडळाचे दैनंदिन कामही करते आहे. घटना समिती एकदा अपयशी ठरली, म्हणून दुसऱ्या घटना समितीसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली नोव्हेंबरात, पण तिची पहिली बैठक होण्यासाठी दोन महिने वाट पाहावी लागली. तोवर काळजीवाहू सरकारकडेच सूत्रे होती. नेपाळात अखेर  पुढील आठवडय़ाभरात नव्या लोकनियुक्त पंतप्रधानांकडे सूत्रे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २ फेब्रुवारीपर्यंत लोकनियुक्त सरकार स्थापा, अशी मुदतच नेपाळचे राष्ट्रपती रामबरन यादव यांनी घालून दिली आहे. म्हणून ‘उजाडले आणि सूर्यदर्शनही झाले’ हा आनंद मात्र नेपाळवासींना कितपत मिळेल याबद्दल शंकाच आहे. सर्वात मोठा पक्ष असलेल्या ‘नेपाली काँग्रेस’मध्ये नेतृत्वासाठी रविवारी अंतर्गत निवडणूक होऊन सुशील कोईराला यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी व माजी पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांच्यावर १६ मतांनी का होईना मात केली, तीच पक्षातील तिसऱ्या गटाचा पाठिंबा ऐन वेळी स्वत:कडे खेचून. सुशील कोईराला हे पक्षाध्यक्ष. परंतु पक्षाचे एक उपाध्यक्ष रामचंद्र पौडेल हेही त्यांचे प्रतिस्पर्धी. देऊबा ज्येष्ठ आहेत, राजकारणात मुरलेले आहेत आणि कोईरालांकडे नेतेपद जाणारच असेल तर पक्षाची सूत्रे तरी आपल्या हाती असावीत, असा त्यांचा आग्रह होता. पण कोईरालांनी त्यांच्यावर इथेही मात केली. पौडेल यांचा पाठिंबा कोईरालांनी खेचला, तोच पौडेल यांना पक्षाची सूत्रे तुमच्याकडे देतो असे आश्वासन देऊन.  प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष मतदानातून निवड झालेल्या या ६०१ लोकप्रतिनिधींच्या सभागृहात ‘नेपाली काँग्रेस’ने १९६ जागा मिळवल्या आहेत. बहुमत नसल्याने संयुक्त सरकार स्थापणे भाग आहे. अन्य मोठय़ा पक्षांपैकी दोघेही कम्युनिस्ट. त्यापैकी मार्क्‍स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्षाचे १७५ लोकप्रतिनिधी आहेत, तर हेकट नेते पुष्पकमल दहाल ऊर्फ ‘प्रचंड’ यांच्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे अवघे ८०. प्रचंड यांनी नेहमीचा हेकटपणा दाखवून, सहमतीचे सरकार वगैरे आम्हाला मान्य नाही आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार, असा पवित्रा त्यांनी पक्षाची कार्यकारिणी बैठकही न घेता जाहीर करून टाकला आहे. म्हणजे उरला मार्क्‍स-लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष. सत्ताकारणात हा कम्युनिस्ट पक्ष दुबळा अजिबात नाही. कोईरालांच्या निवडीनंतर या पक्षाने सोमवारीच ‘नेपाली काँग्रेस’शी बोलणी सुरू केली. पण महत्त्वाची खाती पटकावल्यानंतरच हा पक्ष सहकार्यास तयार होणार, अशी चिन्हे आहेत.  त्याच वेळी शेरबहादूर देऊबा यांचा गट आम्हाला ही खाती हवीत, अशी यादी घेऊन तयार असेल. पौडेल यांच्या पाठिंब्यावर कोईरालांनी पहिली फेरी तर जिंकली, पण पक्षातच ११५ मते कोईरालांकडे आणि ९१ देऊबांकडे आहेत, हेही रविवारीच झालेल्या अंतर्गत नेतानिवडीने स्पष्ट केलेले आहे. देऊबांना चुचकारायचे की मवाळ कम्युनिस्टांना, हे ठरवणे कोईराला गटाला जड जाणार आहे. शिवाय, कोईराला भारतद्वेष्टे आहेत की चीनशी त्यांचे पटणार नाही, अशा नकारार्थी चर्चाना आतापासूनच तोंड फुटले आहे आणि कोणत्याही राजकीय नेत्याचा उत्साहच संपवून टाकण्याचा जो खेळ नेपाळी प्रसारमाध्यमांच्या साथीने नेहमीच खेळला जातो, त्या खेळातील ‘राज्य’ आता कोईरालांवर लादण्यात आले आहे. नेपाळी लोकशाहीची पहाट होईल अशी आशा आपण ठेवणे योग्यच असले, तरी २ फेब्रुवारीनंतरही नेपाळात सूर्यदर्शन घडेलच, असे नाही.