गुकेश दोमाराजूने गेल्या वर्षी बुद्धिबळ जगज्जेतेपद पटकावले, तेव्हा त्याचे वय होते इनमीन १८ वर्षे. नागपूरच्या दिव्या देशमुखने सोमवारी बुद्धिबळ विश्वचषकावर नाव कोरले, तिचे वय आहे १९ वर्षे. गुकेश ज्याप्रमाणे सर्वांत युवा जगज्जेता, तद्वत दिव्याही सर्वांत युवा विश्वचषक विजेती. जगज्जेतेपदासाठी दिव्याला आणखी दोन अडथळे ओलांडावे लागतील वगैरे ठीक. पण विश्वचषक जेतेपद मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला बुद्धिबळपटू. शिवाय देशातली केवळ चौथीच ‘ग्रँडमास्टर’.

वयाची विशीही न ओलांडलेल्या या युवकांची ही कामगिरी बुद्धिबळ या खेळात भारताने केलेल्या प्रगतीचा पटच मांडते. ही दोन्ही विजेतेपदे आपल्याकडे प्रथम मिळवली ती अर्थातच विश्वनाथन आनंदने. त्याने या सहस्राकाच्या सुरुवातीस बुद्धिबळाच्या निरनिराळ्या प्रारूपांमध्ये जगज्जेतेपदांचा सपाटाच सुरू केल्यावर भारतीय बुद्धिबळ विश्वात नवचैतन्य निर्माण झाले. या चैतन्यपर्वाची परिणती गतवर्षी गुकेश दोमाराजूच्या जगज्जेतेपदाने झाली, असे बोलले-लिहिले गेले. कदाचित भारतीय महिला बुद्धिबळपटूंविषयी अज्ञान वा अनास्थेतून हे घडले असावे. इतर अनेक खेळांप्रमाणेच बुद्धिबळातही प्रसारमाध्यमांपासून पुरस्कर्त्यांपर्यंत बहुतेकांचा कल हा पुरुषांकडे असतो.

महिलांचे विश्व याही क्षेत्रात पुरुषांच्या मानाने उपेक्षितच. या उपेक्षेला दिव्या देशमुखने तिच्या असामान्य कामगिरीतून खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे. जॉर्जियामध्ये विश्वचषक स्पर्धेत दिव्याने एकाहून एक सरस चिनी आणि भारतीय प्रतिस्पर्ध्यांना मात देत अखेरीस विश्वचषकावर मोहोर उमटवली. दिव्याची कामगिरी अद्भुत खरेच. कारण ती या स्पर्धेत उतरली त्या वेळी ‘इंटरनॅशनल मास्टर’ होती. तिचे मानांकनही वीसच्या खालचे होते. पण जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावरील एक चिनी प्रतिस्पर्धी आणि माजी जगज्जेती, पाचव्या क्रमांकावरील आणखी एक चिनी प्रतिस्पर्धी, भारतात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील अनुक्रमे कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणवल्ली अशा चौघींना हरवून ती विश्वचषक विजेती बनलीच, शिवाय ‘ग्रँडमास्टर’ही ठरली.

छोट्या-मोठ्या स्पर्धांचा आधार घेत या किताबासाठी लागणारे एकेक निकष पार करण्याऐवजी दिव्याने थेट विश्वचषक स्पर्धेचा द्रुतगती महामार्ग निवडला! भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने ३८ वर्षांपूर्वी ज्युनियर जगज्जेतेपद पटकावत ग्रँडमास्टर किताबाला थेट गवसणी घातली होती. दरम्यानच्या काळात भारतामध्ये अनेक प्रतिभावान बुद्धिबळपटू होऊन गेले नि अजूनही होत आहेत. तरी आनंदप्रमाणे ग्रँडमास्टर किताबाला थेट भिडणारी दिव्या ही दुसरीच. पण या ऐतिहासिक जंत्रीपलीकडेही दिव्याच्या विजयामागे अनेक अर्थ दडलेले आहेत, त्यांची चर्चा होणे आवश्यक.

दिव्याच्या आधी ग्रँडमास्टर किताब मिळवणाऱ्या तिन्ही भारतीय मुली या दाक्षिणात्य आहेत. हम्पी आणि हरिका या आंध्रातल्या, तर आर. वैशाली तमिळनाडूतली. दिव्या ही नागपूर म्हणजे महाराष्ट्रातली. महाराष्ट्रातही पुण्या-मुंबईतील बुद्धिबळपटूंची संख्या अधिक. नागपूरला या खेळाची फारशी परंपरा नाही. महाराष्ट्रातून जे नव्या पिढीतील बुद्धिबळपटू सध्या चमकत आहेत त्यांपैकी एक म्हणजे विदिथ गुजराती, जो नाशिकचा. दिव्या नागपूरची. बुद्धिबळ हा खेळ भारत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झिरपू लागल्याचे हे सुलक्षण. मक्तेदारीच्या चर्चेत आणि चिंतेत अडकून पडलेल्यांच्या पोटी दिव्या जन्मालाच आली नसती. दिव्याच्या दुप्पट वयाची हम्पी वयाच्या १५ व्या वर्षी ग्रँडमास्टर बनली.

तिने कारकीर्दीत आजवर अनेक लक्षणीय अजिंक्यपदे पटकावली, पण विश्वचषकाने तिला हुलकावणीच दिली. हरिकाची कारकीर्द उतरणीला लागली असून, तिच्याकडून अत्युच्च कामगिरीची अपेक्षा फार ठेवता येत नाही. वैशाली ही विख्यात बुद्धिबळपटू प्रज्ञानंदची बहीण. तिची कारकीर्दही बहरत आहे. तरी ती दिव्याला ‘सीनियर’. या प्रतिभावान त्रिकुटाच्या मागून येऊन दिव्याने विश्वचषकासह ग्रँडमास्टर किताब पटकावला हे विशेष. हरिका आणि हम्पीला दिव्याने पराभूत केले. हम्पीला हरवण्यासाठी रॅपिड किंवा जलद प्रकाराचा अवलंब झाला. या प्रकारात हम्पी ही विद्यामान जगज्जेती. तरी जराही न डगमगता दिव्याने तिला पराभूत केले.

महिलांच्या बुद्धिबळ विश्वात चीनचे वर्चस्व वादातीत आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच चिनी आहेत. गेल्या चार खेपेच्या जगज्जेत्या नि विद्यामान जगज्जेतीही चिनीच. पुरुषांच्या बुद्धिबळातील एके काळच्या सोव्हिएत रशियाप्रमाणे चीन ही महिला बुद्धिबळातील निरंकुश महासत्ता. पण त्या पाचातील दोघींना दिव्याने हरवून दाखवले, तेही पारंपरिक प्रकारातील पहिल्याच टप्प्यात. निव्वळ गुणवत्तेवर हे शक्य नाही. त्यासाठी मानसिक कणखरपणाही तितकाच आवश्यक. हरिका आणि हम्पीविरुद्धच्या लढतीनंतर दिव्या भावनाविवश झाली, पण प्रत्यक्ष पटावर खेळादरम्यान त्या भावनेला स्थान नाही हे उमगण्याइतपत परिपक्वता दिव्यामध्ये आली आहे. पुढील अधिक खडतर प्रवासासाठी ती निर्णायक ठरू शकते.

गुकेश किंवा दिव्या यांनी त्यांच्या वयाच्या व्यस्त प्रमाणात दाखवलेल्या परिपक्वतेतून भोवतालच्या समाजालाही बोध घेता येईल. गुकेशच्या जगज्जेतेपदानंतर जवळपास प्रत्येक दिवशी कोणी ना कोणी – या खेळात सर्वशक्तिमान बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनची भूमिका सर्वाधिक – त्याच्या योग्यतेवर संशय घेतो, शंका उपस्थित करतो. यावर प्रत्येक वेळी गुकेशला विचारण्यात आले, त्या वेळी त्याने दिलेली उत्तरे आवर्जून तपासावीत. जगज्जेते आहोत याचा गुकेशला दंभ नाही नि जगात अव्वल नसल्याचे शल्यही नाही. तरीदेखील त्याचा प्रयत्न अव्वलतेकडे, अजेयत्वाकडे जाण्याचा आहेच, त्यात तो कोणतीही कसूर सोडत नाही हे अलीकडेच त्याच्या कार्लसनविरुद्धच्या विजयांनी दाखवून दिले.

त्यानेही जगज्जेतेपदाच्या लढतीत तत्कालीन चिनी जगज्जेत्याला चीतपट केले. पण आपण अजूनही शिखरावर पोहोचलेलो नाही हे भान त्यास आहे. दिव्यासाठीही कँडिडेट्स स्पर्धा खडतर ठरेल. तिने ज्या प्रतिस्पर्ध्यांना विश्वचषकात हरवले, त्यांतील अनेक तिच्यासमोर कँडिडेट्स स्पर्धेतही असतील. पण त्या सर्वांसाठी समोर खेळणारी दिव्या आता ‘निराळी’ असेल हे नक्की! मानांकन २०-३० गुणांनी वधारून हे शक्य होत नाही. त्यासाठी मानसिकता बदलावी लागते. त्याच आधारावर गुकेश किंवा दिव्याने फार काही न बोलता – किंबहुना काहीच न बोलता अल्पावधीत मोठी मजल मारली. प्रतिस्पर्धी चिनी आहेत, की आणखी कोणी ही बाब दिव्याच्या स्वयंनिर्धारापुढे गौण ठरत गेली. आपण ग्रँडमास्टर नाही नि जवळपास प्रत्येक टप्प्यावर ग्रँडमास्टर किताबधारी आपल्यासमोर खेळत आहे याचा विचार तिला अस्वस्थ करू शकला नाही.

गतवर्षी दिव्याने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये वैयक्तिक आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले, ते ऐतिहासिक ठरले. त्याच वर्षी ती ज्युनियर जगज्जेतीही ठरली. गतवर्षाच्या सुरुवातीस ‘लोकसत्ता’ने तिला ‘तरुण तेजांकित’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यावर प्रतिक्रिया देताना तिने दोन गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला. पहिली म्हणजे, इतरांचे ऐकू नका. केवळ पालकांचे ऐका. आणि दुसरी म्हणजे, लक्ष्य उच्च ठेवावे आणि ते गाठण्याचा प्रयत्न करावा. दिव्याच्या लोभस व्यक्तिमत्त्वाची चर्चा करून तिच्या खेळाकडून लक्ष इतरत्र वळवणाऱ्यांना तिने या युवा वयातही सुनावले आहे. महिला बुद्धिबळपटूंच्या खेळाची चर्चा करावी, ‘दिसण्या’ची करू नये हे तिचे शब्द तिच्या अनेक उत्कृष्ट डावांइतकेच गाजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वयंकौतुकाच्या सध्याच्या केकारवात आणि कलकलाटात दिव्या देशमुखची असामान्य कामगिरी शीतल आनंद देतानाच अंतर्मुखही करते. विख्यात बुद्धिबळपटू नि माजी जगज्जेता गॅरी कास्पारॉव्हने भारताच्या या तेजस्वी तरुण बुद्धिबळपटूंचे वर्णन ‘विश्वनाथन आनंदची मुले’ या शब्दांत केले होते. आनंदच्या ‘बुद्धी’बरोबरच त्याची ‘शुद्धी’ही घेणाऱ्या या पिढीची दिव्या देशमुख अग्रप्रतिनिधी ठरते. ‘तेजांकित’ दिव्याच्या दिग्विजयाबद्दल ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे तिचे मन:पूर्वक अभिनंदन!