अमेरिकी अध्यक्षांचे अशास्त्रीय वर्तन, त्यांच्या अशास्त्रीय धारणा या त्या देशाला घोर लावणाऱ्या आहेत हे त्यांच्या वक्तव्यांमधून पुन्हा पुन्हा दिसून येते.
आपल्याला ज्याबाबत काडीचाही गंध नाही, त्यावर केवळ सत्तेच्या जोरावर भाष्य करणारे अंतिमत: हास्यास्पद ठरतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या सत्याचे जागरूक, जितेजागते उदाहरण. नुकताच त्यांनी गर्भवती स्त्रियांनी पॅरासिटॅमोल हे औषध घेतल्यास अपत्य स्वमग्न (ऑटिस्टिक) जन्मते, असा शोध लावून गर्भवती स्त्रियांना हे औषध न घेण्याचा सल्ला दिला. यासाठी कोणीतरी संशोधन केले, नमुना चाचण्या घेतल्या असे काही नाही. ट्रम्प यांना वाटले, त्यांनी ते सांगितले.
या गतीने उद्या ते गर्भसंस्काराचा पुरस्कार करण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ. केनेडी (दुसरे) हे अध्यक्षांहून दिव्य. काही राज्यांतून ते बालकांसाठीचे सर्व प्रकारचे लसीकरण बंद करू इच्छितात. करोना काळातही प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्यास ज्यांचा विरोध होता त्यातील हे दोन विद्वान. या अशा विज्ञानदुष्ट व्यक्ती एखादा आश्रम वा आरोग्य केंद्र चालवत असल्यास त्याबाबत कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. पण अमेरिकेसारख्या महासत्तेच्या प्रमुखपदावरून अशा व्यक्ती विज्ञानद्रोह करतात, तेव्हा त्याचे दुष्परिणाम व्यापक होतात.
ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या वर्धापनदिनी केलेले भाषण असे दुष्परिणामकारी होते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वर्धापन दिन समारंभात भाषण करताना हे महाशय विज्ञानद्रोहाबरोबरीने आपणास किमान पाचपोचही कसा नाही, त्याचे दर्शन घडवत होते. म्हणून त्याची चिरफाड करणे आवश्यक.
एखादी व्यक्ती/संघटना किती निष्क्रिय आहे आणि तिच्या अस्तित्वाचे काही प्रयोजन राहिलेले नाही असे काही कोणी ती व्यक्ती/संघटना यांच्या जन्मदिन सोहळ्यात सांगणार नाही. तसे करणे असभ्य आणि औद्धत्याचे ठरेल. पण ट्रम्प तेच करतात. ही संघटना किती निरुपयोगी आणि नष्क्रिय आहे हे ते त्याच संस्थेच्या वर्धापन दिन समारंभात नमूद करतात. यामुळे केवळ शिष्टाचारभंगच झाला असे नाही, तर त्यातून जबाबदारी झटकणेही दिसून आले.
‘यूएन’सारखी संघटना जर निष्प्रभ होत असेल तर त्यामागे अमेरिका हे एकमेव कारण आहे. ज्या वेळी सामर्थ्यवानच नियमभंग, संकेतभंग करत असतो तेव्हा सर्वसामान्यांसही तसे वागण्याची प्रेरणा मिळत असते. ‘यूएन’सारख्या संघटनेचे अमेरिकेमुळे हे असे झाले आहे. पहिल्या महायुद्धानंतर वुड्रो विल्सन यांच्यासारख्या द्रष्ट्या अमेरिकी अध्यक्षांच्या पुढाकारामुळे या संघटनेचा पाया रचला गेला. त्याआधी, त्या काळात आणि नंतरही तिची सैद्धांतिक पाठराखण केली ती अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या तत्त्वज्ञ संशोधकाने.
शांतिवादी आईन्स्टाईन अशा आंतरराष्ट्रीयवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यामुळे यहुदींवरील अत्याचारांविरोधात त्यांनी आवाज उठवला तरी फक्त यहुदींच्या संकुचितवादी इस्रायलचे ते समर्थक नव्हते. अशा विचारी जनांच्या प्रयत्नांतून आजची ‘यूएन’ आकारास आली. एवढा काळ तिचे सर्वात मोठे समर्थन सातत्याने केले ते अमेरिकेने. जागतिक बँक असो वा संयुक्त राष्ट्र. अमेरिकेने यांसाठी आपला हात कधीही आखडता घेतला नाही.
तथापि व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि सगळेच चित्र बदलले. एक तर त्यांची ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ची ‘मागा’ संकुचित भूमिका. त्यापाठोपाठ त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय संस्थांसाठीच्या निधीस लागलेली कात्री. आणि तिसरे आणि अधिक दुर्दैवी कारण म्हणजे अशा आंतरराष्ट्रीय संघटनेचाच भाग असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ठपका ठेवूनही ट्रम्प यांच्याकडून सुरू असलेली इस्रायलची पाठराखण. या तीनही कारणांचे दर्शन ट्रम्प यांच्या तेथील भाषणात झाले.
‘हमास’ या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्या नृशंस दहशतवादी हल्ल्याचे स्मरण त्यांना झाले, ते योग्यच. पण त्यानंतर इस्रायलने पॅलेस्टिनींचा वंशच्छेद चालवलेला आहे त्याबद्दल एक चकार शब्द त्यांनी या भाषणात काढला नाही. ‘हमास’च्या बेजबाबदार हल्ल्याचे निमित्त इस्रायलला मिळाले आणि त्या देशाने आजपर्यंत ६० हजारांहून अधिकांचे शिरकाण केले. त्यात जवळपास २० हजार तर बालकेच आहेत. ती कोणत्या कोनातून दहशतवादी ठरतात याबद्दल ट्रम्प यांनी भाष्य केले असते तर त्यातून त्यांचा मोठेपणा तरी दिसला असता.
पण तोच मुळात अंगी नसल्यामुळे दिसणे अवघडच. या शिरकाणासाठी संयुक्त राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय न्यायालय अशा अनेक जागतिक संघटनांनी इस्रायलला दोषी ठरवलेले आहे. पण ट्रम्प यांच्या अमेरिकी ‘मागा’ हृदयास काही घरे पडताना दिसत नाहीत. फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी अमेरिकी गटातील अनेकांनी ट्रम्प यांची साथ सोडून पॅलेस्टिनच्या अस्तित्वास मान्यता देण्याचे पाऊल उचलले आहे. तथापि अमेरिकेचा वरदहस्त जोपर्यंत खलनायकी इस्रायली पंतप्रधानांच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत कोणतीही मानवतावादी विचारी संघटना यशस्वी ठरणार नाही. म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या अपयशाचे एक महत्त्वाचे कारण ट्रम्प हेच आहेत.
याच भाषणात ट्रम्प यांनी युरोपीय देशांवर आगपाखड केली. वास्तविक देशांची अंतर्गत धोरणे हा त्या देशाचा अंतर्गत मुद्दा. ट्रम्प त्यावरही भाष्य करण्यात मागेपुढे पाहात नाहीत. या देशांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांमुळे त्याचे नरक झाले आहेत आणि परिणामी त्या देशांची परिस्थिती बिकट झालेली आहे हे ट्रम्प यांचे इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी देशांस उद्देशून विधान. पण मुळात या देशांची उठाठेव ट्रम्प यांनी करण्याचे प्रयोजनच काय? त्या देशांतील नागरिकांनी ट्रम्प यांच्याकडे मदतीची याचना केली, ट्रम्प यांचा धावा केला असेही नाही.
पण ट्रम्प यांना या कशाचेच सोयरसुतक नाही. इतकेच नव्हे तर लंडनसारख्या शहराचा महापौर किती ‘हॉरिबल… हॉरिबल’ आहे हे सांगण्याचा अव्यापारेषु व्यापार ट्रम्प व्यासपीठावर करतात. त्यांच्या दृष्टीने लंडनचा महापौर हॉरिबल आहे कारण त्याचे नाव ‘सादिक खान’. ट्रम्प तेथेच थांबत नाहीत. लंडनमध्ये शरिया लागू करण्याचा या महापौराचा प्रयत्न आहे असे बेधडक विधान ते करतात. सादिक खान हे त्या शहरातून निवडून आलेले आहेत.
उद्या न्यू यॉर्कच्या महापौरपदी झोराब ममदानी निवडून आले तर ट्रम्प काय करणार? आणि दुसरे असे की त्यांचा हा इस्लाम-धर्म विरोध प्रामाणिक असता तरीही एक वेळ तो क्षम्य ठरवता आला असता. पण ट्रम्प यांची ही धर्म भूमिकाही मतलबी आहे. सौदी राजपुत्राकडून स्वत:च्या कंपनीसाठी, जामातासाठी व्यवसायसंधी मिळत असल्याने, पाकिस्तानकडून त्यांच्या कंपनीत गुंतवणूक होत असल्याने त्यांचा इस्लाम गोड मानून घेण्यास ट्रम्प तयार. म्हणजे त्यांच्या धर्मनिष्ठाही पोकळ.
तिसरा मुद्दा वसुंधरेच्या तापमानवाढीचा. तापमानवाढ हा मुद्दा सर्वात मोठा घोटाळा आहे, असे हा गृहस्थ संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावरून म्हणतो. अमेरिकेसह जगभरातील अनेक देशांस भेडसावणाऱ्या पर्यावरणीय समस्या, वादळे, पूर, दुष्काळ या सगळ्याचा वातावरणीय बदलाशी काहीही संबंध नाही असे ट्रम्प यांस वाटते. ते तसे बोलूनही दाखवतात. ‘‘तुम्ही पर्यावरणस्नेही ऊर्जा व्यवसायापासून दूर गेला नाहीत तर तुमचे देश अपयशी ठरतील’’, अशी भविष्यवाणी ट्रम्प आपल्या भाषणात व्यक्त करतात.
अमेरिकी अध्यक्षांचे हे अशास्त्रीय वर्तन, त्यांच्या अशास्त्रीय धारणा या त्या देशाला घोर लावणाऱ्या आहेत हे त्यांच्या भाषणातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. सहा वर्षांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प यांनी पहिल्यांदा जेव्हा संयुक्त राष्ट्र सभेस संबोधित केले तेव्हा त्या वेळी त्यांचे अशास्त्रीय दावे, असत्य कथने आणि आचरट विधाने उपस्थितांनी हसण्यावर नेली. या वेळी त्यांच्या समोरचे आणि हा समारंभ दूरचित्रवाणीवर पाहणारे सुन्न होते. सत्ताधीश जेव्हा इतके अज्ञानी होतात तेव्हा शहाण्यांचे अगतिक आणि असहाय होणे अपरिहार्य असते.