एके काळी चीनला घाबरवणारा रशिया! पण आता चीनकडे युक्रेन युद्धासाठी शस्त्रसामग्री मागण्याची पाळी पुतिन यांच्यावर आली आहे..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा रशियाचा दौरा आणि अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी त्यांच्या होत असलेल्या गुलुगुलु गप्पा हा जागतिक माध्यमांत अगदीच औत्सुक्याचा विषय दिसतो. तसे होणे साहजिकच. एक तर हे जिनिपग फारसे चीनबाहेर पडत नाहीत. त्यातून ते पडले आणि थेट रशियात गेले. सध्याची जागतिक परिस्थिती अशी की जिनिपग यांना बोलावणारे कोणी नाही आणि पुतिन यांनी बोलावले तरी त्यांच्या देशात कोणी जायला तयार नाही.

जागतिक पातळीवर अनेकांनी एका अर्थी कोपऱ्यात उभे केलेले हे दोघे. तेव्हा एकमेकांत आधार शोधणे साहजिक. अशा परिस्थितीत या दोघांचा प्रेमालाप महाविद्यालयीन नवथर प्रेमिकांच्या हास्यास्पद कृत्यांशी स्पर्धा करणारा ठरतो. जिनिपग हे रशियन भूमीवर पाऊल ठेवण्याआधी पुतिन यांनी मुख्य चिनी वर्तमानपत्रात विशेष लेख लिहून उभयतांतील निष्ठांची ग्वाही दिली. आपण चाळीस वेळा कसे एकमेकांस भेटलो, आमच्यात कोणत्याही अधिकाऱ्यांशिवायसुद्धा अनौपचारिक गप्पा कशा होतात, आमचा एकमेकांवर विश्वास कसा आहे इत्यादी. त्याची परतफेड जिनिपग यांनी रशियन वर्तमानपत्रांत असाच लेख लिहून केली. त्यांचा सूर त्यामानाने प्रौढ म्हणायला हवा. जागतिक दादागिरीविरोधात आपण एकमेकांनी कसे उभे राहायला हवे, आपल्या परस्परसहकार्यात जगाचे हित कसे आहे इत्यादी. या दोन्ही लेखांचा उद्देश एकच. अमेरिकेस ‘जळवणे’ आणि तुमच्याशिवायसुद्धा आपले कसे उत्तम चालले हे दाखवणे. तथापि अमेरिकेच्या मनात अशी असूया निर्माण करण्याची गरज वाटणे यातच या दोन प्रेमालापींच्या मर्यादा दिसून येतात. ही भेट सुरूच आहे तर यानिमित्ताने उभयतांतील संबंधांचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य तपासणे अगत्याचे ठरते.

जिनपिंग आणि पुतिन कितीही दाखवत असले तरी हे दोन देश एकमेकांचे आघाडी घटक कधीच नव्हते. अगदी १९४९ साली चिनी प्रजासत्ताकाची स्थापना झाल्यावर माओ झेडाँग यांस वैचारिक ‘लालभाई’ रशियाचे जोसेफ स्टालिन हे नकोसेच होते. इतके की साम्यवादी माओंनी साम्यवादी स्टालिन यांच्याविरोधात भांडवलशाही अमेरिकेची मदत मागितली होती. अमेरिकेने ती देऊही केली होती. पण माओ यांना त्यांचेच काही झेपेनासे झाल्याने अमेरिकी फौजा चिनी भूमीतून माघारी गेल्या. पुढे १९७२ साली अमेरिकेशी पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित झाल्यानंतर चीन भेटीवर आलेल्या अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना ‘आय लाइक राइटिस्टिस’ (मला उजवे आवडतात) असे म्हणण्याइतके चातुर्य डाव्या माओंनी दाखवले होते. ते तसे त्यांस दाखवावे लागले कारण विस्तारवादी रशिया हा चीनसाठी मोठे आव्हान होता. सीमेवरचा हा वैचारिक सहकारी कधी आपल्या देशात हातपाय पसरेल याची माओंना खात्री नव्हती. म्हणूनच जागतिक पातळीवर अमेरिकेने तत्कालीन सोव्हिएत रशियाविरोधात काही ‘मोजक्या’ देशांची आघाडी स्थापन करावी आणि त्यात चीनला सहभागी करून घ्यावे असे साक्षात माओंचे प्रयत्न होते. माओंनंतर सत्ता मिळवणारे डेंग झियाओ पिंग यांचाही कल अमेरिकेकडे होता. डेंग हे तर डाव्यांतले उजवे. त्यामुळे त्यांची अमेरिकानुभूती समजून घेणे सोपे. चीनला तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आदी क्षेत्रांत आघाडीवर त्यांना रशियापेक्षा अमेरिका जास्त जवळचा वाटत होता, ही बाब महत्त्वाची. तेव्हा चीन आणि रशिया हे नैसर्गिक मित्र, सहकारी नाहीत. असलेच तर ते स्पर्धकच आहेत. सध्या हे मैत्रीचे नाटक करण्याची वेळ उभयतांवर आली याचे कारण बदलती जागतिक परिस्थिती.

ही जागतिक परिस्थिती बदलवण्यास कारणीभूत पुन्हा जिनपिंग आणि पुतिन हेच. रशियाची सूत्रे पुतिन यांनी २००० साली हाती घेतली आणि जिनिपग यांनी चिनी अधिकार २०१२ साली बळकावले. दोघांचीही मानसिकता एकच. र्सवकष सत्ता. देशांतर्गत पातळीवर ती गाजवून झाल्यावर दोघांसही आंतरराष्ट्रीय पातळीवर याची पुनरावृत्ती करण्याची आस निर्माण झाली आणि अमेरिकेचा पाडाव हे उभयतांचे ध्येय बनले. अमेरिकी व्यवस्थेत ९९ त्रुटी दाखवता येतील. पण एक जमेची बाजू या उर्वरित त्रुटींवर मात करते. ती जमेची बाजू म्हणजे प्रामाणिक, पारदर्शी लोकशाही. जिनिपग काय वा पुतिन काय. आसपास केवळ खुशमस्कऱ्यांची गर्दी. या उभयतांना स्वत:चेच प्रतिध्वनी ऐकायची सवय. मतभिन्नता आणि मतभेद ऐकायची सोयही नाही. त्यामुळे आपला बेडकी आकार अमेरिकी बैलास घाबरवेल इतका मोठा झाल्याचे खरोखरच उभयतांस वाटू लागले. त्यामुळे आपले देश महासत्ता झाल्याचे त्यांच्या मनाने घेतले. हे असे अलीकडे अनेकांस वाटू लागले आहे. अशा इतरांचा भ्रमनिरासही होईलच. तो कसा होतो हे जिनिपग आणि पुतिन यांच्या अवस्थेवरून लक्षात येईल. चिनी अर्थव्यवस्था वाढली खरी; पण जिनिपग यांच्या धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चीनला अपेक्षित सहकार्य नाही. रशियाची अर्थव्यवस्था वाढता वाढता बसली. त्यांची युद्धाची खुमखुमी त्यास जबाबदार. आता परिस्थिती अशी की युद्धही जिंकता येत नाही आणि युद्ध सुरू केल्यामुळे लादलेले निर्बंधही उठत नाहीत. अशा परिस्थितीत जे काही मिळते ते पोटापुरते. विस्ताराची संधी नाही. एके काळी चीनला घाबरवणाऱ्या या देशावर आता चीनकडे युक्रेन युद्धासाठी शस्त्रसामग्री मागण्याची पाळी पुतिन यांच्यावर आली. हे वास्तव हा या भेटीमागील रेटा. अमेरिका-केंद्रित संघटनांकडून निर्बंधांचा दबाव अधिकाधिक वाढत असताना पुतिन यांस कोणी एक खंदा औद्योगिक समर्थक हवा. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला कोणी एक साथीदार हवा. ही या उभयतांची गरज. ती उभयतांकडून पुरवली जात असल्याने ही भेट या दोघांसाठी अपरिहार्य ठरते. हे झाले या उभयतांबाबत.

या वास्तवाची डोकेदुखी आपल्यासारख्या देशासमोर नव्याने उभी राहणार आहे हे वास्तव आपण लक्षात घ्यायला हवे. रशियाकडून स्वस्तात तेल मिळते म्हणून आपणास रशियाचे महत्त्व. आपण रशियाची धन करतो म्हणून अमेरिकेस आपण नकोसे; पण तरी चीनविरोधात आपले भौगोलिक साहचर्य असल्याने अमेरिका आपणास दूर ठेवू शकत नाही. आपले पाकिस्तानचे जन्मापासून वाकडे आणि चीन हा आपल्या या शत्रूचा मित्र. परत आपलाही शत्रू. पण तो रशियाचा; म्हणजे आपल्या मित्राचा मित्र. पण आपला शत्रू. तरी आपण चीनला पूर्णपणे टाळू शकत नाही. त्यात दुसरा गुंता असा की चीन आणि रशिया या दोघांनाही अधिक रस आशियात. त्यामुळे परत त्या आघाडीवरही आपणास आव्हान. अशा तऱ्हेने आपल्यासाठीही ही भेट आणि तिचे फलित महत्त्वाचे ठरते. ‘ही भेट शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची ठरेल’, असे पुतिन म्हणतात. म्हणजे सध्याच्या युक्रेन युद्धात शस्त्रसंधीसाठी चीनने प्रयत्न केलेच तर त्यात अधिक यश मिळण्याची शक्यता. तसे झाल्यास ‘‘ही युद्धाची वेळ नव्हे’’ या आपल्या अत्यंत बुद्धिमान मसलतीचे काय होणार हा प्रश्न उरतो.

युक्रेन युद्धाच्या दगडाखाली अडकलेला हात सोडवण्यासाठी पुतिन यांस काही मानभावी कारण हवे आहे. ते क्षी जिनिपग यांच्या मध्यस्थीच्या देखाव्यातून मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्य कोणास मोठेपणा देण्यापेक्षा तो जिनिपग यांना देणे पुतिन पसंत करतील. कारण पुतिन यांच्या सटवाईस कोणी नवरा देण्यास तयार नाही आणि जिनिपग यांच्या म्हसोबास कोणी मुलगी देण्यास उत्सुक नाही. अशा तऱ्हेने जागतिक राजकारणातील हे उपेक्षित एकत्र आले असून त्यांचे हे मीलन जगापेक्षा आपणासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता अधिक. म्हणून त्याची दखल.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Editorial chinese president xi jinping visit to russia and talks with president vladimir putin amy
Show comments