scorecardresearch

अग्रलेख : नकोसा नायक!

पाकिस्तानचे माजी लष्करशहा आणि अध्यक्ष निवृत्त जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी भारतातील दोन मतप्रवाह पुन्हा जिवंत झाले!

parvez mushruff
पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ

मुशर्रफ यांची पाकिस्तानी शासकपदाची कारकीर्द ही आधुनिकता आणि पारंपरिक द्वेष यांतून निवड न करता येण्याच्या दुभंग मानसिकतेची कहाणी ठरते..

.. लोकशाहीला मर्यादित पैस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या धोरणांविरोधात राजकीय आणि जिहादी अशा दोन्ही प्रकारच्या समूहांना तीव्र आंदोलने करता आली..

पाकिस्तानचे माजी लष्करशहा आणि अध्यक्ष निवृत्त जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी भारतातील दोन मतप्रवाह पुन्हा जिवंत झाले! कारगिल घडवून आणणारा खलनायक, शांततेचा बनाव निर्माण करून भारताला बेसावध गाठण्याचा प्रयत्न करणारा आणि काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीविषयी कधीही गंभीर नसलेला पाकिस्तानी लष्करशहा अशा स्वरूपाचे मुशर्रफ यांचे वर्णन करणारा एक प्रवाह. पाकिस्तानी लष्करशहांपैकी त्यातल्या त्यात बरा, काश्मीर मुद्दय़ावर किमान चर्चेची कास न सोडणारा आणि माध्यमस्वातंत्र्य जपणारा शासक असे मुशर्रफ यांना मानणारा दुसरा मतप्रवाह. दोन्ही मतप्रवाहधारकांना दोन भिन्न मुशर्रफ दिसले. याचे प्रमुख कारण म्हणजे, खुद्द मुशर्रफ यांच्या व्यक्तिमत्त्वातच या दोन व्यक्ती दडलेल्या होत्या आणि त्यांच्या मनात यांपैकी कोणाला झुकते माप द्यायचे याविषयी अखेपर्यंत गोंधळ होता. मुशर्रफ यांची पाकिस्तानी शासकपदाची कारकीर्द या गोंधळलेल्या, दुभंग मानसिकतेची कहाणी ठरते. पाकिस्तानचे लष्करप्रमुख या नात्याने वर्षांनुवर्षे पढवलेला भारतद्वेष आणि पाकिस्तानी राजकारण्यांविषयीचा तिटकारा एकीकडे; तर लष्करी बंडाच्या साह्याने लोकनियुक्त सरकार उलथून पाकिस्तानचे शासक बनल्यानंतर तो देश स्थिरसमृद्ध करण्यासाठी प्रथम काश्मीरवर तोडगा काढण्याची निकड दुसरीकडे अशी ही अजब कात्री होती. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात आश्वासक होती. अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर त्या देशाला लागेल ती मदत करण्यासाठी पाकिस्तानी भूमी, लष्कर आणि संसाधने तत्पर उपलब्ध करून दिल्याच्या मोबदल्यात त्यांचे लष्करशहा असणे अमेरिकेने मंजूर केले होते. परंतु या नव्या मैत्रीपर्वाचा म्हणावा तसा फायदा मुशर्रफ यांना करून घेता आला नाही. ओसामा बिन लादेनला छुपा आश्रय देण्याची त्यांची चलाखी अमेरिकेने नंतर ओळखली. त्या कृतीमुळे अमेरिकेच्या नजरेतून पाकिस्तान जो उतरला तो कायमचाच. ते पाप सर्वस्वी मुशर्रफ यांचेच. त्या वेळी बराक ओबामांसारखे समंजस अध्यक्ष असल्यामुळे या फसवेगिरीचा निष्कारण बागुलबोवा त्यांनी केला नाही. परंतु अमेरिकेचा सर्वात विश्वासू सहकारी असे वर्णिलेले मुशर्रफ कालांतराने ‘दहशतवादविरोधी लढय़ातील सर्वात बेभरवशाचे सहकारी’ असल्याचा साक्षात्कार झाल्यानंतर पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याशी गरजेपेक्षा अधिक सलगी ओबामा, त्यांच्यानंतरचे अध्यक्ष, तसेच अमेरिकेतील राजकीय व लष्करी धुरीणांनी केली नाही.

मुशर्रफ हे  पाकिस्तानचे आजवरचे शेवटचे लष्करी हुकूमशहा. लष्करी बंडांचा या देशाला मोठा इतिहास. १९५८-१९७१, १९७७-१९८८ आणि १९९९-२००८ या काळात तेथे लष्करशहा सत्तेवर होते. यांतील तिसरा व तसा ताजा कालखंड अर्थातच मुशर्रफ यांचा. पण तो  पाकिस्तानसाठी सर्वाधिक रक्तलांच्छित आणि नुकसानदायी ठरला. मुशर्रफ यांच्या अमदानीत जवळपास ८० हजार पाकिस्तानी नागरिक आणि सैनिक मारले गेले. काही लाख कोटी रुपयांचा चुराडा झाला. गंमत म्हणजे, तरीही मुशर्रफ हे पाकिस्तानने पाहिलेले तुलनेने सर्वात उदारमतवादी लष्करशहा ठरतात! ते मूळचे मुहाजिर, म्हणजे फाळणीनंतर पाकिस्तानात आलेल्या कुटुंबातील. वडिलांच्या उच्चपदस्थ राजनैतिक नोकरीनिमित्त सुरुवातीची काही वर्षे तुर्कस्तानात गेल्यामुळे, तेथील आधुनिक इस्लामी जीवनशैलीविषयी आकर्षण मुशर्रफ यांच्या मनात निर्माण झाले. पुढे लष्करात अधिकारीपदावर भरती झाल्यानंतर सिगारेट, परदेशी मद्य आणि पाश्चिमात्य संगीत यांची आवड  जोपासल्यामुळे मुशर्रफ ‘रॉकस्टार’ म्हणून ओळखले जात. पाकिस्तानातील उच्च लष्करी अधिकाऱ्यांमध्ये दोन ठळक प्रवाह आजही दिसून येतात. जनरल मुहम्मद झिया उल हक यांनी पाकिस्तानी लष्कराला धर्मयोद्धय़ांची ओळख दिली. परंतु ब्रिटिशांच्या प्रभावामुळे आधुनिक राहिलेल्या मिलिटरी अकादमींमधून बाहेर पडलेले तरुण लष्करी अधिकारी पोथीबद्ध धार्मिक राहणे शक्यच नव्हते. त्यातही भीतीपोटी काहींनी धार्मिकतेचा मार्ग अनुसरला, तर मुशर्रफ यांच्यासारखे काही आधुनिकतेत मश्गूल राहिले. मुशर्रफ मुहाजिर होतेच, शिवाय पाकिस्तानात परतल्यानंतर कराचीत स्थिरावले. पाकिस्तानातील लष्करप्रमुख सहसा पंजाबी किंवा पठाण (पख्तून) असतात. मुशर्रफ यांच्यात त्या जमातींचा अहंगंड नसल्यामुळे असेल किंवा त्यांच्यात कट्टरतेचा अभाव दिसल्यामुळे असेल, तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन अधिकाऱ्यांची वरिष्ठता डावलून त्यांना लष्करप्रमुखपदी नेमले. पण मुशर्रफ यांच्यातील कावेबाज, महत्त्वाकांक्षी जनरल जोखण्यात शरीफसाहेब कमी पडले. कारगिलमध्ये पाकिस्तानी लष्कर घुसवण्याचे दु:साहस मुशर्रफ यांचेच. पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज असल्यामुळे या घुसखोरीचा लष्करी मार्गाने बंदोबस्त करण्याचा विचार भारतीय नेतृत्व करणारच नाही, अशी मुशर्रफ यांची अटकळ होती. ती फसली आणि सुरुवातीस नामुष्की सोसूनही भारतीय लष्कराने कारगिल टापूतील पाकिस्तानव्याप्त प्रदेश पुन्हा जिंकून दाखवला. त्या वेळी ‘अमेरिकेच्या दबावापुढे नवाझ शरीफ झुकले नि पाकिस्तानी लष्कराला माघार घ्यावी लागली’, असे चित्र मुशर्रफ यांनी रंगवले. त्यामुळेच अणुचाचण्यांपश्चात लादले गेलेले आर्थिक निर्बंध आणि कारगिलमधील पराभव अशा दुहेरी नैराश्याच्या कालखंडात मुशर्रफ यांनी ऑक्टोबर १९९९मध्ये शरीफ सरकारविरुद्ध बंड केले, त्या वेळी त्यांच्यात पाकिस्तानी जनतेला ‘मसीहा’ दिसून आला.

पण कारगिल घडवून आणणारा हा लष्करशहा, अचानक भारतीय नेत्यांशी सातत्याने काश्मीर मुद्दय़ावर का बोलू लागला? प्रथम अटलबिहारी वाजपेयी आणि नंतर डॉ. मनमोहन सिंग या दोन भारतीय पंतप्रधानांशी वेगवेगळय़ा स्तरांवर चर्चा केल्यानंतर काश्मीरप्रश्नी तोडगा दृष्टिपथात आल्याचे मुशर्रफ यांनी जाहीर केले होते. पाकिस्तानी भूमीवरून भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करू देणार नाही, असे दुर्मीळ वचन देणारेही ते पहिलेच आणि एकमेव पाकिस्तानी नेते. भारत आणि अमेरिका या पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या देशांसमवेत संबंध, लष्करशहा असूनही सर्वाधिक सकारात्मक पातळीवर आणण्याचे श्रेय मुशर्रफ यांना द्यावे लागेलच. कदाचित ९/११मुळे हा भूमिकात्मक बदल मुशर्रफ यांना स्वीकारावा लागला असेल. कदाचित एखाद्या क्षणी भारताशी सततच्या संघर्षांतील आर्थिक आणि सामरिक फोलपणा त्यांच्या लक्षात आला असेल. केवळ राजनैतिकच नव्हे, तर समांतर संवादाचे मार्गही (उदा. क्रिकेट मालिका) मुशर्रफ यांच्या अमदानीत सक्रिय होते. पाकिस्तानी अर्थव्यवस्था नवीन सहस्रकात केवळ दोन वेळा ६ टक्क्यांच्या वर दराने विस्तारली, तीही त्यांच्याच काळात. माध्यमांच्या बाबतीत त्यांच्या राजवटीने बऱ्यापैकी उदारमतवादी धोरण अवलंबले. त्यामुळे लोकशाही मूल्यांची जाण ठेवणारा लष्करशहा अशी काहीशी प्रतिमा निर्माण करण्यात मुशर्रफ यशस्वी ठरले.

पण पाकिस्तानच्या दुर्दैवाने हे यश क्षणिक ठरले. आधुनिकतेची कास धरायची, तर धार्मिक, जिहादी गटांचाही बंदोबस्त करणे क्रमप्राप्त. त्या आघाडीवर मुशर्रफ यांची इच्छाशक्ती आणि प्रयत्न कमी पडले. लोकशाहीला मर्यादित पैस उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या धोरणांविरोधात राजकीय आणि जिहादी अशा दोन्ही प्रकारच्या समूहांना तीव्र आंदोलने करता आली. पाकिस्तानी लष्करातील जिहादी तत्त्वांना लष्करप्रमुख आणि पुढे अध्यक्ष या नात्यानेही ते आवर घालू शकले नाहीत. ओसामा बिन लादेनला आश्रय देणे, त्या वेळच्या पाकिस्तानी सरन्यायाधीशांना पदावरून काढून टाकणे, गुलाम बुगटी या बलोच नेत्याची हत्या घडवून आणणे, पुढे साक्षात बेनझीर भुत्तो यांच्या हत्येला अप्रत्यक्ष पाठिंबा देणे आणि अखेरीस रावळिपडीतील लाल मशिदीत दडलेल्या १००हून अधिक जिहादींवर लष्कर चालवून त्यांना ठार करणे या कृतींमुळे मुशर्रफ यांची देशांर्गत आणि परदेशातील प्रतिमा धुळीला मिळाली. ‘मुशर्रफ कोणाचे’, या प्रश्नावर तेथील जनता, राजकीय पक्ष, जिहादी गट, लष्कर असे सगळेच जण ‘आमचे नाहीत’ असे उत्तर देते झाले. भारताचा प्रश्नच नाही; पण एकेकाळचे पाकिस्तानी नायक जनरल मुशर्रफ हे त्या देशालाही नकोसे झाले तेव्हा देश सोडून परागंदा होण्याशिवाय त्यांच्यापुढे पर्याय उरला नाही. पाकिस्तानचा आणखी एक नकोसा नायक परदेशात पैंगबरवासी झाला.

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 00:08 IST