Editorial Mobile usage is prohibited till the age 18 years TV Mobile Ban village Yavatmal Bansi in Osmanabad Jakoorwadi ysh 95 | Loksatta

अग्रलेख : डिजिटल उपवासाची कहाणी..

यवतमाळमधले बान्सी आणि उस्मानाबादमधले जकेकूरवाडी ही दोन गावे या आठवडय़ात सगळीकडे झळकली ती त्यांनी केलेल्या त्यांच्या गावापुरत्या मोबाइलबंदीसाठी.

अग्रलेख : डिजिटल उपवासाची कहाणी..

मोबाइल वापरावर १८ वर्षे वयापर्यंत बंदीचा किंवा दोन तास टीव्ही-मोबाइलबंदीचा उपाय एखादे गाव करते आहे; पण शहरांत स्वयंनियमनाच्या उपायांची जास्त गरज आहे.. 

समाजमाध्यमांतून मनात, समाजात निर्माण होणारा विखार दूर ठेवायचा तर मोबाइलपासून काही काळ दूर राहणे बरे..

यवतमाळमधले बान्सी आणि उस्मानाबादमधले जकेकूरवाडी ही दोन गावे या आठवडय़ात सगळीकडे झळकली ती त्यांनी केलेल्या त्यांच्या गावापुरत्या मोबाइलबंदीसाठी. मोबाइल न वापरणारा माणूस थेट अश्मयुगातूनच अवतरलेला असावा असे मानून घेण्याचा सध्याचा जमाना. मी समाजमाध्यमे वगैरे वापरत नाही, असे म्हणणारेही याच न्यायाने आदिमानवाचे भाऊबंद ठरू शकतात. मोबाइल, समाजमाध्यमे, ओटीटी प्लॅटफॉर्म या सगळ्यांनी आजच्या माणसाचे जगणे असे काही झपाटून टाकले आहे की नेटफ्लिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रीड हास्टिंग खुलेआम सांगतात की आमची स्पर्धा इतर कुणाशी नाही तर फक्त माणसाच्या झोपेशी आहे. असे सगळे चाललेले असताना कुणीतरी उठते आणि विशिष्ट वयाच्या मुलांसाठी सरळ मोबाइल वापरावर बंदी आणते, हे खरे तर जगाच्या विपरीत वागणे. पण त्याची चर्चा झाली कारण खेळणे, बागडणे सोडून आज घराघरांतील मुले अक्षरश: हातात मोबाइल घेऊन बसलेली दिसतात. अर्थात मुलांचीच नाही तर मोठय़ा माणसांचीही तीच परिस्थिती आहे. काही वर्षांपूर्वी विविध टीव्ही वाहिन्यांनी जे वेड लावले होते, त्याच्याही पुढची गत आज  दिसते. या पार्श्वभूमीवर बान्सी आणि जकेकूरवाडी या दोन्ही गावांनी उचललेले पाऊल थोडे टोकाचे खरे, पण काळाची गरज अधोरेखित करणारे आहे.

या दोन्ही गावांनी केले काय तर बान्सी गावाने १८ वर्षांखालील मुलांच्या मोबाइल वापरावर थेट बंदीच आणली. तीही ग्रामसभेत ठराव वगैरे करून. गावातील सगळ्यांनाच हा निर्णय पटला नसला, त्याच्या मर्यादा त्यांना जाणवत असल्या तरी हा प्रयोग करून बघायला हरकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर जकेकूरवाडी या गावात संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत संपूर्ण गावातच मोबाइल आणि टीव्हीसुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हे केवळ ग्रामीण शहाणपण म्हणून त्याकडे दुरून पाहता येणार नाही. भारताची ‘माहिती-तंत्रज्ञान राजधानी’ ठरण्यासाठी हैदराबादशी स्पर्धा करणाऱ्या बेंगळूरमध्ये तर एखाद्याला मोबाइल आणि तत्सम उपकरणांच्या पगडय़ामधून सुटका करून घ्यायची असेल तर त्यासाठी मदत करणारी ‘हेल्पलाइन’ हल्लीच सुरू झाली आहे. अर्थात वैयक्तिक पातळीवरही काहीजण डिजिटल तंत्रज्ञानाच्या मोहमायेपासून दूर राहण्याचा आपापल्या पातळीवर प्रयत्न करताना दिसतात. कुणी सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त काळ मोबाइल आणि गॅजेट्सपासून दूर राहण्याचे ठरवतात. कुणी झोपताना मोबाइल आपल्यापासून पूर्णत: लांब असेल असे पाहतात. कुणी उठल्या उठल्या तासभर तरी मोबाइलला अजिबात हात न लावण्याचा निश्चय करतात तर कुणी दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळाच समाजमाध्यमांवर फिरकतात. असे सगळे केल्यामुळे म्हणजे डिजिटल माध्यमांपासून दिवसातला काही काळ दूर राहिल्यामुळे आपल्या आयुष्यात फारसे काही बिघडत नाही, हे ज्याला उमजून येते, त्याची गोष्ट वेगळी. बाकीच्यांना हे भलतेच फॅडही वाटू शकते, पण या पद्धतीने विचार करायला सुरुवात करणे दिवसेंदिवस अपरिहार्य ठरत जाणार आहे हे मात्र नक्की.

कारण ही वेळ आपणच आपल्यावर आणली आहे. एकाचा तोंडावर हात, दुसऱ्याचा डोळ्यांवर, तिसऱ्याचा कानांवर..पण चौथ्याच्या हातात मोबाइल  आणि खाली ओळ – ‘हे पाहा गांधीजींचे चौथे माकड’..  हे मीम जितक्यांदा फिरते, तितक्यांदा पाहणाऱ्याला हसायला लावते याचे  कारण त्यामधली वस्तुस्थिती. किंवा ‘काल इंटरनेट बंद पडले, आसपास चार माणसे दिसली. मग कळले की हे आपल्याच घरामधले लोक. त्यांच्याशी गप्पा झाल्यावर लक्षात आले की बरी आहेत की ही माणसे..’ अशा प्रकारच्या सतत फिरणाऱ्या विनोदांमधली अतिशयोक्ती खरे तर वेदनादायक आहे. पण हातातल्या मोबाइलपासून, इंटरनेटपासून, ओटीटी प्लॅटफॉर्मपासून दूर केले गेले तर ‘फोमो’ म्हणजेच ‘फीअर ऑफ मिसिंग आउट’ अशी भावना बळावणाऱ्या मुलांची, तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळेच चाळा म्हणून सतत मोबाइल पाहणारे, समाजमाध्यमांवर सतत घिरटय़ा घालणारे दिसतात. एखाद्या आवडत्या वेबमालिकेचा पुढचा भाग पाहायला मिळाला नाही तर अस्वस्थ झालेले लोक दिसतात. आपली हालहवाल सतत समाजमाध्यमांवर टाकत राहणे, त्यांना लाइक मिळवत राहणे आणि दुसऱ्यांची हालहवाल सतत तपासत राहणे हा अनेकांचा उद्योगच होऊन बसतो. तसे असायलाही हरकत नाही, पण त्यातही हवे ते घडत नाही, तेव्हा होणारी त्यांची आत्यंतिक तळमळ घातक मार्गाने जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मोबाइलच्या, समाजमाध्यमांच्या, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या, इंटरनेटच्या वेडाचे काही जणांच्या बाबतीत व्यसनात रूपांतर झाले आहे, असे समाजशास्त्राच्या, मानसशास्त्राच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. हे वेड आधीही होतेच; पण करोनाच्या महासाथीने त्याला अधिक वेग आणि वाव दिला. आपल्या आसपास काय चालले आहे याकडे लक्ष नसणे, झोपेवर झालेला परिणाम, समाजापासून फटकून राहणे, सतत एकटे असण्याला प्राधान्य देणे, आसपासच्या माणसांमध्ये भावनिक गुंतवणूक नसणे, आत्मविश्वासाचा अभाव, आरोग्याची हेळसांड, व्यायाम नाही, खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, मुलांच्या बाबतीत अभ्यासाकडे तर प्रौढांच्या बाबतीत कामाकडे दुर्लक्ष, कशावरही लक्ष केंद्रित करता न येणे, काही जणांच्या बाबतीत पोर्नोग्राफीच्या अति आहारी जाणे ही आणि अशी अनेक  लक्षणे दिसतात आणि असा प्रादुर्भाव वाढल्याच्या शंकेला तज्ज्ञ  दुजोरा देतात. हे सगळे गंभीर आहे कारण त्याचा परिणाम फक्त वैयक्तिक पातळीवर नाही, तर कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरही होतो आहे.

पण ही बाबही खरी की डिजिटल माध्यमांची आजच्या जगण्यामधली अपरिहार्यता कुणालाच नाकारता येणार नाही. ती असणारच आहेत, त्यांच्याबरोबर जगावे लागणारच आहे. पण त्यांचे दुष्परिणाम मात्र टाळता यायला हवेत. त्यासाठी सुचवला जाणारा उपाय म्हणजे डिजिटल डिटॉक्स. सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमांपासून काही काळासाठी ठरवून दूर राहण्याला संकल्पनांच्या भाषेत, इंग्रजीत डिजिटल डिटॉक्स म्हटले जाते, ते अगदीच सयुक्तिक आहे. जगण्याच्या पातळीवर एखाद्या आवडत्या गोष्टीचा पाठपुरावा करत बसणे हेदेखील वेडच खरे, पण ते वेड जगणे सुंदर करणारे असते. डिजिटल माध्यमांचे वेड मात्र तसे नाही. ते माणसाच्या निरोगी मनाचा तोल बिघडवणारे, त्याच्या जगण्याचा काला करणारे आहे. त्यातून मनात, शरीरात, समाजात निर्माण होणारी विषद्रव्ये काढून टाकण्यासाठी त्यांच्यापासून काही काळ दूर राहणे म्हणजे डिजिटल उपवासच. अन्नातून शरीरात जाणारी विषद्रव्ये काढून टाकण्यासाठी अगदी निर्जळी उपवास करायची पद्धत आपल्याकडे आहे.  शब्दांच्या वापरामुळे मनात निर्माण होणारी विषद्रव्ये काढून टाकण्यासाठी, मन स्वच्छ करण्यासाठी मौनव्रत पाळायची पद्धत आपल्याकडे आहे. तसेच आता डिजिटल उपवास करण्याची, डिजिटल व्रत धरण्याची वेळ आली आहे. हे नव्या युगाचे नवे व्रत आहे. प्रत्येकाने आपल्या स्वास्थ्यासाठी त्याचा अंगीकार करावा.. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार काही काळापुरता डिजिटल माध्यमाचा त्याग करावा.. कुणी दिवसातून दोन तास करावा तर कुणी आठवडय़ातून दोन तास.. कुणी रविवारी करावा तर कुणी सोमवारी.. कुणी महिन्यातून एकदा करावा तर कुणी दोनदा.. पण प्रत्येकाने हे व्रत घ्यावे.. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये.. ही डिजिटल व्रताच्या साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो!

मराठीतील सर्व संपादकीय ( Editorial ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:02 IST
Next Story
अग्रलेख : निवृत्तीचे ओझे!