‘गानेवाल्या’ महिलांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर उपकार केल्याचा इतिहास दक्षिणेतल्या नृत्य- प्रकारांबाबत समांतर असेल, पण कर्नाटक संगीतात तो नाही..

गाणे संपल्यानंतरही सुरांची रुंजी काना-मनांत गुंजत राहावी, यासारखे सुख नाही. त्याउलट, एखाद्या वादाचा कोलाहल शमतो तेव्हा त्या वादातून उरलेल्या प्रश्नांची जाणीव पराकोटीची अस्वस्थता देते. कर्नाटक संगीतात नवनवे प्रयोग करणारे गायक टी. एम. कृष्णा यांना या क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा ‘संगीत कलानिधी पुरस्कार’ मिळाल्यानंतरचा वाद हा दोन्हीची आठवण देणारा आहे. तो वाद आता संपला, असेही म्हणता येते. कारण मुळात हा वाद ज्यांच्या पत्रामुळे घडला, त्या रंजनी-गायत्री या कर्नाटक शास्त्रीय गायिकांनी आता ‘हा पुरस्कार देणाऱ्या संगीत महोत्सवाला आमची हजेरी यंदा नसेल’ एवढेच आपल्याला म्हणायचे असल्याचा खुलासा केला आहे. हा पुरस्कार देणाऱ्या मद्रास म्युझिक अकॅडमीचे अध्यक्ष एन. मुरली यांनी ठाम राहून, आमची निवड कायम असल्याचे म्हटले आहे. एकेका संस्थांचे चिरे ढासळत असताना चेन्नईतली महत्त्वाची संगीत संस्था अविचल राहाते, याचे कौतुक आहेच. मात्र मराठीजनांना कोण रंजनी-गायत्री, इतकेच काय पण कोण टी. एम. कृष्णा आणि संगीत कलानिधी पुरस्काराचे काय एवढे महत्त्व हे माहीत नसणे स्वाभाविक. तेव्हा सर्वप्रथम या वादाला कारणीभूत ठरलेल्या पात्रांविषयी.

baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट

टी. एम. कृष्णा यांनी कर्नाटक संगीतात केलेले प्रयोग अनेक प्रकारचे आहेत. कर्नाटक शास्त्रीय संगीताला पाश्चात्त्य वाद्यामेळाची जोड द्यायची किंवा मराठीतले अभंग कर्नाटक संगीताच्या बाजाने गायचे, इतपत प्रयोग तर त्यांच्या आधीही अनेकांनी केले होते. एम. एस. सुब्बलक्ष्मींचे ‘वैष्णव जन तो…’ आजही सर्वांना आठवते, तोही कर्नाटकी संगीतातला प्रयोगच होता. पण संगीताचे हे अभिसरण पुढेही अनेकांनी वाढवले. कृष्णा यांनी त्यात भर घातली ती दलित विद्यार्थ्यांना संगीत शिकवणे, हीन लेखल्या गेलेल्या जोगत्यांना मैफलीत आपल्या बरोबरीने स्थान देणे किंवा तमिळनाडूत जात-पातविरोधी, द्रविडवंशवादी विचारांचे वारे विसाव्या शतकात पुन्हा घुमवणारे ई. व्ही. रामस्वामी पेरियार यांचे विचारही गाण्यातून पोहोचवण्याचा प्रयत्न करणे… अशा प्रयोगांनी. रंजनी-गायत्री या गायिका भगिनींचा विरोध या पेरियारांना आहे. कारण काय तर ‘द्रविड कळघम’ची स्थापना करून तमिळनाडूतील अब्राह्मण जातींमध्ये अस्मिता फुलवताना या पेरियारांनी ब्राह्मण समाजाविरुद्ध अश्लाघ्य भाषा वापरली होती. तसे करताना त्यांनी विशिष्ट समाजातील स्त्रियांबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्ये आणि लिखाण वारंवार केल्याचा आक्षेपही रंजनी- गायत्रींनी घेतला आहे. रंजनी- गायत्री या दोघी सनातन धर्माच्या अथवा विशिष्ट जातसमूहाच्या अभिमानी आहेत, असे जाहीरपणे दिसण्याचा काही प्रसंगच आजवर उद्भवला नव्हता. त्या काही कुणी खलनायिका नव्हेत. ‘पंढरीचे भूत मोठे…’ हा संतश्रेष्ठ तुकारामांचा अभंग रंजनी-गायत्री गाताहेत, हे यूट्यूबवर पाहून असाही निष्कर्ष काढता येतो की, पंढरीनाथाला ‘भूत’ म्हणणे हा इथे अपमान वगैरे ठरत नाही, याची जाण या भगिनींना असावी. त्यांची व्यावसायिक स्पर्धा टी. एम. कृष्णांशी असू शकते, पण कृष्णा यांच्या भूमिकांवर राजकीय आरोप करायचे आणि पर्यायाने आपलीही राजकीय भूमिकाच चव्हाट्यावर मांडायची, असे पाऊल केवळ व्यवसायातील स्पर्धेपायी कुणी उचलणार नाही. शिवाय हा वाद लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्भवलेला आणि तोही ‘सनातन धर्मा’बद्दलच्या टीकेपायी तमिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकविरुद्ध रान पेटवण्याचा प्रयत्न करून झाल्यानंतरचा. हे राजकीय कंगोरे असू शकतात म्हणावे, तर तेवढ्यासाठी कर्नाटक संगीत क्षेत्रातल्या एका प्रतिष्ठेच्या मंचावर ‘यंदापुरता’ बहिष्कार टाकण्याचा धोंडा रंजनी-गायत्री स्वत:च्या पायांवर कशाला पाडून घेतील? तेव्हा परातम कोटीच्या संतापातूनच या वादाची सुरुवात त्यांनी केली, असे म्हणावे लागेल. हा संताप त्यांना त्यांच्या जात-जाणिवेतून आला किंवा कसे, याचे संशोधन हा आपला विषय नाही.

जात-जाणिवेचा आरोप केवळ रंजनी-गायत्री यांच्यापुरता राहू नये इतके कर्नाटक संगीताचे क्षेत्र एकारलेले आहे, हा खरा चिंतेचा विषय. ती चिंता जाहीरपणे व्यक्त होणे चांगलेच. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताशी कर्नाटक संगीताची तुलना करण्याचा हेतू नाही; पण हिंदुस्तानीपेक्षा कर्नाटक संगीताची सामाजिक घडण निराळीच आहे, हा मुद्दा मात्र महत्त्वाचा. ती घडण निराळी असल्यानेच ‘गानेवाल्या’ महिलांनी शास्त्रीय संगीतावर उपकार केल्याचा इतिहास दक्षिणेतल्या नृत्य- प्रकारांबाबत एकवेळ समांतर असेल, पण कर्नाटक संगीतात तो नाही. पुरंदरदासांनी विजयनगर साम्राज्यकाळात रुजवलेले कर्नाटक संगीताचे बीज त्यागराज, शामाशास्त्री आणि मुत्तुस्वामी दीक्षितार यांनी वाढवले. पण पारंब्याच जमिनीत रुजून पुन्हा वटवृक्ष उगवावा, तसे काही या संगीतप्रकाराचे झाले नाही. ते जणू धर्मसंगीत आहे, त्यामुळे ते एका समाजघटकानेच गायचे, अशी बंधने मात्र पाळली गेली. ती थोडीफार सैल झाली गुरु-शिष्य परंपरेऐवजी संगीत महाविद्यालये आली तेव्हा. त्यामुळेच, १९७० च्या दशकात हिंदी गाण्यांमुळे लोकप्रिय झालेल्या के. जोसेफ येशुदास यांचा जन्म केरळमधल्या ख्रिास्ती कुटुंबात झाला तरी, त्यांना कर्नाटक संगीताचे रीतसर शिक्षण सहज मिळाले होते. पुढे गुरुवायूूर मंदिराने त्यांच्या अहिंदूपणावर बोट ठेवून त्यांना प्रवेश नाकारला, ही बाब अलाहिदा. प्रश्न केवळ कर्नाटक शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेता येते की नाही इतपत नसतो, हे सिद्ध करणारी आणखी दोन उदाहरणे म्हणजे इलयराजा आणि ए. आर. रहमान! यापैकी इलयराजानी ‘कलानिधी’ टी. व्ही. गोपालकृष्णन यांच्याकडून कर्नाटक संगीताचे शिक्षण घेतले होते; तर रहमान दक्षिणामूर्ती स्वामिगळ यांच्याकडून थोडेफार शिकले होते. भारताच्या कुठल्याही प्रांताप्रमाणे तमिळनाडूत लोकसंगीताची परंपरा धर्मसंगीत वा शास्त्रीय संगीताइतकीच सशक्त आहे. त्यात ‘पाश्चात्त्य’ समजल्या जाणाऱ्या संगीताचीही भर विसाव्या शतकापासून पडते आहे, या साऱ्यांची समरसता रहमान वा इलयराजांच्या संगीतात दिसतेच.

अशी समरसता राजकारणातच काय, समाजकारणातही आणून दाखवणे किती अशक्य, याचा पुरावा म्हणजे टी. एम. कृष्णा यांच्याबद्दल होणारे वाद. ‘पेरियार’ रामस्वामींच्या स्तुतीचे ‘थंति पेरियार’ हे कवन कृष्णांनी गायले, दलित लेखक पेरुमल मुरुगन यांच्यासाठी कृष्णा यांनी मैफल केली, इतकेच काय पण कर्नाटक संगीताला असलेला धर्मसंगीताचा आधार त्यांनी येशू आणि अल्लाहपर्यंत वाढवू पाहिला; अशा प्रत्येक वेळी काही ना काही वाद झालेले आहेत. अशा प्रत्येक वादात, कृष्णा यांचे विरोधक कर्नाटक संगीताबद्दल शुद्धतावादी भूमिका घेतात. शुद्धतावाद हा कलेच्या ढाच्यासाठी ठीक, पण अभिव्यक्तीसाठी मारकच. कर्नाटक संगीताच्या ढाच्यावर कृष्णा प्रहार करत नाहीत, मात्र अभिव्यक्तीसाठी त्याची सर्वसमावेशकता वाढवू पाहातात, त्यामुळे या अनेक वादांमध्ये कृष्णा यांची बाजू ही तार्किकदृष्ट्या धडधाकट ठरते.

म्हणून कृष्णांचा उल्लेख करताना कुणी ‘वादग्रस्त कर्नाटक संगीतकार’ वगैरे म्हणण्याचा वाह्यातपणा करत नाही. ‘संगीत कलानिधी’ समारोह येत्या २० डिसेंबरपासून सुरू होईल, त्यातील सहभागी आधीच निश्चित होतात, त्यात रंजनी-गायत्रींच्या ऐवजी अन्य कुणाला स्थान मिळेल. इथे हा वाद संपतो. पण कर्नाटक शास्त्रीय संगीत मात्र विशिष्ट समूहापुरतेच राहिले, हा आक्षेप तरीही उरतो… अभिजाताला जात नसावी, हा आग्रह कुणा समाजाच्या किंवा राजकारणाच्या फायद्याचा नसून कलेच्या प्रसारासाठी आणि निकोप वाढीसाठीच लाभदायक आहे, हे आजही काही जणांना कसे काय कळत नाही हा प्रश्न अस्वस्थ करतो.