राजकीयदृष्टया दरिद्री पक्ष करापोटी इतकी भव्य रक्कम मायभूस देणे लागतो तर धनवंत, यशवंत, कीर्तिवंत, सत्तावंत भाजपचे करपात्र देणे किती?

‘‘कर आणि मृत्यू यांइतके शाश्वत मुद्दे जगात अन्य कोणते नाहीत’’, हे कालातीत विधान बेंजामिन फ्रँकलीन यांचे. ते सद्य:स्थितीत काँग्रेसला तंतोतंत लागू पडते. एकतर आगामी निवडणुकीत सत्ताधारी भाजप ‘चारसो पार’ जाणार असल्याने काँग्रेसचा राजकीय मृत्यू अटळ तर दुसरीकडे त्याच वेळी महासत्ता होऊ पाहणाऱ्या मायदेशाच्या तत्पर, कर्तव्यकठोर, नेक अशा आयकर खात्याने त्या पक्षास १८२३ कोटी रु. अधिक १७४५ कोटी रु. – म्हणजे एकंदर ३५६७ कोटी रु.  इतक्या अबब रकमेचा कर भरण्यासाठी काढलेली नोटीस. हे म्हणजे बुडून मरण पावलेल्यास पुन्हा तोफेच्या तोंडी देण्याचा आदेश काढण्यासारखे. तसे झाले आहे खरे. तेव्हा त्याची दखल घेणे क्रमप्राप्त. एरवी खरे तर काँग्रेस पक्षात दखलपात्र असे उरले आहे काय? जेमतेम पन्नास खासदारांचा हा पक्ष कुठे आणि त्या विरोधात आकाराने दसपट ‘चारसो पार’ जाणारा सत्ताधारी भाजप कुठे?  बरे याची तुलना धनगरपुत्र चिमुकला डेव्हिड विरुद्ध महाकाय शस्त्रसज्ज गोलिआथ अशीही करणे अंमळ अवघड. कारण त्या लढतीत धिटुकला डेव्हिड अजस्र गोलिआथचा पराभव करतो. येथे ही शक्यताही नाही. कारण ‘चारसो पार’ जाणाऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्यांस चाळीस तरी मिळतील की नाही याची शाश्वती नाही. तेव्हा ती तुलनाही गैरच. ती करता येत नाही आणि विषय अंमळ महत्त्वाचा हे वास्तव! त्याची दखल घेताना अन्य कोणाशी बरोबरी करणे, साधर्म्य शोधणे यापेक्षा सामान्य बुद्धीस पडलेले प्रश्न मांडणे बरीक शहाणपणाचे!

Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
baba kalyani
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

हेही वाचा >>> अग्रलेख: अभिजाताची जात

जसे की इतका राजकीयदृष्टया दरिद्री पक्ष करापोटी इतकी भव्य रक्कम मायभूस देणे लागतो तर अत्यंत धनवंत, यशवंत, कीर्तिवंत आणि मुख्य म्हणजे सत्तावंत भाजपचे करपात्र देणे किती? ते पक्षाने कधी दिले? कशा रूपाने दिले? म्हणजे कररक्कम रोख भरली, धनादेशाद्वारे दिली की देशातील उद्योगपुत्र दानशूर राधेयांनी उदार अंत:करणाने दिलेले रोखे आयकराकडे वर्ग केले? भाजपची नैतिक स्वच्छता आणि टापटीप लक्षात घेता आपली सर्व करपात्र देय रक्कम भाजपने सरकार दरबारी भरली असेल याबाबत तीळमात्रही संशय घेण्याचे कारण नाही. तथापि काही वैश्विक कारणांनी ही रक्कम भरण्यास काहीसा विलंब झाला असल्यास कार्यतत्पर, कर्तव्यकठोर (यापुढे का. क.) आयकर खात्याने यासाठी अशी काही नोटीस जारी केली होती काय? हे झाले काही कडेकडेचे, सामान्यज्ञानाधारित प्रश्न. आता मूळ मुद्दा कर रकमेच्या देण्यांचा. करपात्र उत्पन्न असणाऱ्या प्रत्येक व्यक्ती/संस्था आदींनी आपल्या उत्पन्नावर कर भरणे आणि तसे विवरण पत्र सादर करणे अपेक्षित असते. तशी ती भरल्यावर त्यांची सखोल छाननी होते आणि ज्ञात उत्पन्नावर देय रकमेपेक्षा कमी कर भरल्याचे आढळल्यास आवश्यक कर भरण्यासाठी आयकर खात्यातर्फे रीतसर नोटिसा धाडल्या जातात आणि तफावत रक्कम भरण्यासाठी मुदत दिली जाते. त्या मुदतीत ही रक्कम न भरली गेल्यास सणसणीत दंड आकारला जातो. ही सर्व प्रक्रिया निश्चितच काँग्रेसबाबतही पार पडली. पण यातील कळीचा मुद्दा असा की काँग्रेसने अपेक्षित कर भरलेला नाही, याचा साक्षात्कार का.क. आयकर खात्यास स्वत:च्या कार्यालयीन विश्लेषणातून झाला का?

उपलब्ध तपशिलाधारे बोलायचे तर या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असे आहे. त्याउप्पर प्रश्न असा की मग का. क. आयकर खात्यास काँग्रेसच्या करचुकवेगिरीचा सुगावा नक्की लागला कसा? आणि कधी? तर झाले असे की काँग्रेसचे अत्यंत भ्रष्ट (वास्तविक ही पुनरुक्ती म्हणजे पितांबर पिवळा असतो असे म्हणणे. असो.) असे नेते कमलनाथ आणि कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निवासस्थानी घातलेल्या धाडीत का. क. आयकर खात्यास डायऱ्यांत काही नोंदी सापडल्या आणि त्यातील पैशाच्या देवाण-घेवाणीच्या उल्लेखाधारे का. क. आयकर खात्याने त्या पक्षास सदरहू कर भरण्याच्या नोटिसा बजावल्या. हे योग्यच झाले. भ्रष्ट मार्गाने जमवलेल्या निधीचा तपशील आपल्या डायऱ्यांत नोंदवण्याचा अजागळपणा करणाऱ्या पक्षास असा धडा शिकवायलाच हवा. पण पुढील प्रश्न असा की याआधी लालकृष्ण अडवाणी-कालीन गाजलेली जैन डायरी, तसेच सहारा-बिर्ला डायरी वा गेला बाजार येडियुरप्पा डायरी यांतील कथित नोंदींच्या आधारे का. क. आयकर खात्याने अशीच चौकशी केली होती काय? नसेल तर त्या डायऱ्यांतील नोंदींच्या आधारे ती प्रकरणे पुन्हा चौकशीस खुली केली जातील काय? या ढोबळ मुद्दयांनंतर काही तपशिलात्मक सवाल.

हेही वाचा >>> अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!

जसे की काँग्रेसने आयकर खात्यास सादर केलेल्या तपशिलांत आढळलेल्या त्रुटी. त्यानुसार काँग्रेसच्या उत्पन्नातील १४ लाख रुपयांचा नक्की स्रोत काय, असा प्रश्न का. क. आयकर खात्यास पडला. यावरून या खात्याची विचक्षण नजर किती भेदक आहे ते कळते. हे १४ लाख रु. कोठून आले, कोठे गेले इत्यादी तपशील देण्यास काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्याने त्यावर कर भरण्याची नोटीस का. क. आयकर खात्याने काँग्रेसच्या मुखावर भडकावली. अगदी योग्यच ही कृती. परंतु त्याच वेळी जनप्रतिनिधित्व कायद्याचा भंग करीत भाजपच्या उत्पन्नात भर घालणाऱ्या १२९७ देणगीदारांचा आवश्यक तपशील त्या पक्षाने सादर केलेला नाही. या १२९७ देणगीदारांकडून भाजपच्या तिजोरीत ४२ कोटी रु. जमा झाले. म्हणजे का. क. आयकर खाते १४ लाख रुपयांवरील कर भरण्यासाठी जंगजंग पछाडत असताना त्याच वेळी ४२ कोटी रु. इतक्या रकमेवरील कररकमेकडे दुर्लक्ष करते किंवा काय, इतकाच काय तो मुद्दा. त्याचे स्पष्टीकरण आयकर खात्याने अथवा त्या खात्याचे मायबाप असलेल्या सत्ताधारी भाजपने तरी करावे काकी या खात्याच्या का. क. प्रतिमेवर शिंतोडे उडणे टळेल. तसेच मालदार भाजपस एक कर न्याय आणि त्या पक्षाच्या विरोधकांस दुसरा असे चित्र निर्माण होणार नाही. शेवटी काँग्रेस काय वा सत्ताधारी भाजप काय! त्यांच्याकडून भरला जाणारा भरभक्कम कर देशाच्या प्रगतीच्या कामीच तर येणार. अशा विशालोद्देशी रकमेच्या वसुलीत हयगय नको, इतकेच. आता शेवटचा आर्थिक मुद्दा.

तो असा की राजकीय पक्षांस धनादेशाद्वारे दिल्या गेलेल्या देणग्यांवर कंपन्यांस आयकरातील कलमान्वये सूट मिळते. आपापल्या विवरणपत्रात या देणग्यांचा उल्लेख केला की ही सवलत या कंपन्यांकडून देय असलेल्या कररकमेत आपोआप मिळत असे. पण रोखे आले आणि त्यातील सुरक्षित गुप्ततेच्या बदल्यात ही करसवलतीची सोय कंपन्यांनी गमावली. ते ठीक. पण त्यातून राजकीय पक्षांस मिळालेल्या उत्पन्नाचे काय? राजकीय पक्षांसाठी ही रोखे रक्कम हे उत्पन्न आहे आणि त्या उत्पन्नावर त्यांनी आपल्याप्रमाणे कर भरणे अपेक्षित आहे. हे सत्य. आणि सत्ताधारी पक्ष हा तर रोखे-सम्राट! तेव्हा या सम्राटास मिळालेल्या उत्पन्नावरील कराचे काय? प्रगत्युत्सुक नागरिकांस भेडसावणाऱ्या या काही आर्थिक मुद्दयांनंतर आता काही राजकीय प्रश्न. जसे की इतक्या दमदार, आश्वासक सत्ताधारी पक्षाने मरणासन्न, कफल्लक पक्षांस इतके महत्त्व द्यावेच का? आता; ‘हे आम्ही कोठे काय करतो? जे काही सुरू आहे ते सारे आयकर खात्यातर्फे’ असे सदाचतुर सत्ताधारी म्हणू शकतील. तेही योग्यच. पण सद्य:स्थितीत राजकारणातील सत्ताधारी धैर्यधराने या काँग्रेस-नामक यत्किचिंत विरोधकाची का फिकीर बाळगावी? कृष्णाजी प्रभाकरांच्या ‘सं मानापमान’त ‘‘धनराशी जाता मूढापाशी, सुखवी तुला, दुखवी मला’’, असे एक पद आहे. भाजपने स्वत:स इतके का दुखवावे हा एक शेवटचा प्रश्न.