इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या सरकारच्या अस्तित्वावरील संकट ‘केनेसेट’ या त्या देशाच्या लोकप्रतिनिधीगृहात गेल्या आठवड्यात टळले आणि काही वेळातच त्या देशाने इराणवर हल्ला केला; हा योगायोग नाही. नेतान्याहू यांच्या आघाडी सरकारातील कडवे उजवे त्या सरकारमधून बाहेर पडून फेरनिवडणुकांची मागणी करण्याची शक्यता गेल्या आठवड्यात निर्माण झाली होती. तसा ठरावही केनेसेटमध्ये आला. पण या कडव्या उजव्यांनी ऐनवेळेस भूमिका बदलली. त्यामुळे तो ठराव मंजूर झाला नाही. आता पुन्हा किमान सहा महिने अशा प्रकारचा ठराव आणता येणार नाही. म्हणजे किमान इतका काळ नेतान्याहू यांस अभय. ते मिळाल्यावर लगेच इस्रायलने इराणवर हल्ले झाले. अर्थात अशा प्रकारचे हल्ले हे इतक्या तातडीने करता येत नाहीत; त्याची पूर्वतयारी असावी लागते हे खरे. पण गेले किमान वर्षभर तरी इस्रायलकडून अशी तयारी सुरू होती आणि इराणमध्ये घुसून इस्रायली गुप्तहेरांनी मोक्याच्या जागी हल्ल्याची जय्यत तयारी केलेली होती. गेल्या वर्षीपासून इस्रायल आज ना उद्या इराणवर तीव्र हल्ला करणार हे दिसत होते. ते आता सुरू झाले, असे म्हणता येईल. तथापि त्याचा मुहूर्त महत्त्वाचा. वैद्याकशास्त्र तितके प्रगत नव्हते त्या काळी एखाद्यास खा खा सुटली तर त्यास भस्म्या झाला असे म्हटले जात असे. सांप्रतकाली हा असा युद्धाचा भस्म्या इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांस झाला आहे की काय असा प्रश्न पडतो. गाझातील पॅलेस्टिनी, हेझबोल्ला, हमास, लेबनॉन आणि आता इराण अशा अनेक आघाड्यांवर इस्रायल सध्या संघर्षात आहे. त्या देशाच्या कथित शौर्यकथांवर भाळलेल्या वर्गास हे वाचून भरते येईल. पण वास्तव तसे नाही.
ते नेतान्याहू यांच्या भ्रष्टाचारात दडलेले आहे. न्यायालयात आपण दोषी ठरणार हे दिसू लागल्यानंतर या इसमाने न्यायिक प्रक्रिया बदलण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात प्रचंड नागरी असंतोष व्यक्त झाला. तो शमायच्या आत बिनडोक ‘हमास’ने दोन वर्षांपूर्वीच्या ऑक्टोबरात इस्रायलवर नृशंस दहशतवादी हल्ले करून संकटग्रस्त नेतान्याहू यांच्या हाती कोलीत दिले. ती संधी त्यांनी साधली. तेव्हापासून नेतान्याहू यांचे नरसंहाराचे अग्निहोत्र अव्याहत सुरूच आहे. परत हे सर्व देशप्रेमाच्या नावे. ‘‘देशभक्ती हा बदमाशांचा शेवटचा आधार असतो’’ हे सॅम्युएल जॉन्सन याचे वचन सुविख्यात आहे. त्याची प्रचीती आणून देण्याचा प्रयत्न सध्या देशोदेशी अनेक नरपुंगव करताना दिसतात. अशी देशभक्ती सिद्ध करण्यास काल्पनिक शत्रूंचा बीमोड हे उत्तम कारण असते. त्यामुळे मायदेशातील राजकीय आव्हानांवर सहज मात करता येते. इस्रायलच्या ताज्या इराण हल्ल्याची ही पार्श्वभूमी. तीस जागतिक क्षितिजावर सध्या तळपत असलेले नवे शांतिदूत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचीही पार्श्वभूमी आहे. इस्रायलचे पंतप्रधान ज्या तऱ्हेने एकाच वेळी अनेक युद्धे लढतात त्याच प्रमाणे ट्रम्प महाशय युक्रेन-रशिया, पॅलेस्टाइन-इस्रायल, भारत-पाकिस्तान अशी अनेक युद्धे थांबवतात. इतकेच नव्हे तर साधारण दोन हजार वर्षांपासूनचा (याआधी ते १५०० वर्षांपूर्वीचा असेही म्हणाले होते. तेव्हा ‘अखंड भारत’ होता आणि ही समस्या नव्हती हा इतिहास अमेरिकेतील हिंदुधर्मप्रेमींनी ट्रम्प यांस एकदा समजवायला हवा.) काश्मीर प्रश्नही चुटकीसरशी सोडवण्याचे आश्वासन ते देऊ शकतात. अशा या नवशांतिदूतास इस्रायलने इराणवर हल्ला करू नये असे वाटत होते. तसे त्यांनी नेतान्याहू यांस सांगितलेही. पण हे युद्ध ही नेतान्याहू यांची गरज आणि इस्रायलमागे फरफटत जाणे ही ट्रम्प यांची गरज! त्यामुळे नेतान्याहू यांनी ट्रम्प यांस खुंटीवर टांगले आणि इराणवर सरळ हल्ले केले. आता ट्रम्प म्हणतात आपल्याला याची पूर्वकल्पना होती. असेलही. पण त्यांचे ना इराणने ऐकले, ना रशियाने, ना इस्रायलने ! ट्रम्प यांस त्यांची जागा दाखवून देण्याची ही तीन देशांची कृती तशी कौतुकास्पद. आता ते भारत-पाकिस्तानप्रमाणे इस्रायल-इराण शस्त्रसंधीही घडवून आणतात का, हे दिसेलच. पण इराण, इस्रायल आणि रशिया या तिघांचे वर्तन अमेरिकेचा ऱ्हास दर्शवते हे निश्चित. अशा परिस्थितीत नेतान्याहू यांचे उधळलेले युद्ध घोडे आवरणार कोण, हा प्रश्न.
त्याचे उत्तर ज्या पद्धतीने इराणने या हल्ल्यानंतर इस्रायलला प्रत्युत्तर दिले; त्यात मिळू शकेल. हल्ले केले त्यावेळी आपण इराणची सर्व आण्विक ऊर्जाकेंद्रे नष्ट केल्याखेरीज थांबणार नाही, असे नेतान्याहू यांचे निवेदन होते. तथापि इराणने ज्या त्वेषाने इस्रायलला प्रत्युत्तर दिले आणि त्या देशाचे पोलादी आच्छादन भेदून तेलअविवमधील महत्त्वाच्या इमारतींवर क्षेपणास्त्रे डागली त्यानंतर नेतान्याहू यांचा सूर बदलला. ‘‘इराणी जनतेने उठाव करून सत्ताबदल करावा’’, असा शहाजोग सल्ला नेतान्याहू आता देतात. इराणच्या प्रत्युत्तरात इस्रायलमध्ये किमान चार ठार आणि २०० जखमी झाले तर इस्रायलच्या इराणवरील हल्यात ८० जणांनी प्राण गमावले. यावरून इस्रायली हल्ल्याची तीव्रता इराणपेक्षा किती जास्त होती हे कळेल. पण इस्रायलच्या दृष्टीने हल्ल्याच्या तीव्रतेपेक्षाही त्यांची क्षेपणास्त्र विरोधी ढाल कुचकामी ठरून इराणी बॉम्ब काही इस्रायली इमारती तरी उद्ध्वस्त करू शकले हे वास्तव अधिक भयकारी आहे. शत्रुपक्षाची अस्त्रे आपलाही वेध घेऊ शकतात ही जाणीव इस्रायली नागरिकांत निर्माण होणे हे नेतान्याहू यांस परवडणारे नाही. याआधी ‘हमास’ने दोन वर्षांपूर्वी इस्रायलच्या दंतकथा बनलेल्या गुप्तहेर, सुरक्षा यंत्रणा यांच्या अब्रूची रक्तलांच्छित लक्तरे त्या देशाच्या सीमेवर टांगली होतीच. आता इराणी बॉम्ब तेलअविवादी शहरांत कोसळले. याआधी नेतान्याहू यांनी लेबनॉनादी देशांतील नागरिकांनाही सत्ताबदलाचे आवाहन केले होते. ते काही झाले नाही. आणि आता इराणमध्येही तसे काही होण्याची शक्यता नाही. उलट समस्त इराणी जनता आपल्या सरकारच्याच मागे उभी असल्याचे दिसते. याचा अर्थ इराण या युद्धात वरचढ ठरेल असा अजिबातच नाही.
पण तो इस्रायलींच्या मनात दहशत निर्माण करू शकतो हे नक्की. आणि दुसरे असे की इस्रायलच्या ‘हमास’वरील हल्ल्यास काही एक कारण तरी होते. इराणविरोधात ताज्या हल्ल्याचे प्रयोजन काय? इराण अणुबॉम्ब बनवू पाहतो आणि मी ते प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, ही नेतान्याहू यांची दर्पोक्ती. हा अधिकार त्यांना दिला कोणी? त्या देशाचा संभाव्य अणुबॉम्ब आपल्याविरोधात वापरला जाईल, या गृहीतकावर एक देश दुसऱ्याविरोधात हल्ले चढवू शकतो काय? अमेरिकेच्या आंधळ्या पाठिंब्यावर, अमेरिकेतील यहुदींच्या दबाव गटावर पोसला गेलेल्या इस्रायलचे वर्तन मी म्हणेन ती पूर्वदिशा असे राहिलेले आहे. ‘बळी’ आणि ‘बाहुबली’ अशा परस्पर विरोधी भूमिका हा देश एकाच वेळी बिनबोभाट पार पाडू शकतो आणि आपण इस्लामी देशांचे कसे ‘बळी’ आहोत हे नाटक करता करता ‘बाहुबली’ होऊन अनेक निष्पापांचे सहज प्राणही घेतो. ‘हमास’च्या मूर्ख हल्ल्यांविरोधात इस्रायलच्या गाझा पट्ट्यातील कारवाईत जवळपास ५५ हजारांचे बळी गेले. त्यात निष्पाप बालके आणि महिलाही आहेत. हे असे होते कारण त्यास अमेरिका आणि अन्य बोटचेप्या देशांचे असलेले समर्थन. गेल्या आठवड्यात इंग्लंडने या इस्रायलच्या दोन मंत्र्यांवर निर्बंध घालण्याची हिंमत दाखवली. जर्मनी, फ्रान्स ते दक्षिण आफ्रिका असे अनेक देश त्या विरोधात कडक भूमिका घेताना दिसतात. तरीही गाझात इस्रायलने त्वरित शस्त्रसंधी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रातील ठरावाच्या बाजूने १४९ देश मतदान करत असताना १८ देशांनी या अमानुष नरसंहाराबाबतही बोटचेपी भूमिका घ्यावी आणि त्यात भारतही असावा हे वेदनादायी आहे. अमेरिकी गटातील ऑस्ट्रेलिया, जपान या देशांनीही इस्रायलविरोधात भूमिका घेतली. अगदी भूताननेही विरोध केला आणि आपण मात्र तटस्थ राहिलो. अनेकांचे बळी घेणाऱ्या बाहुबलींविरोधात बोटचेपी भूमिका घेणारे आहेत तोपर्यंत ही युद्धखोरी अशीच सुरू राहील. इराणनंतर आणखी कोणी असेल.