कोणीही कोणताही अश्लाघ्य आरोप केलाच तर भाजपच्या राजकीय अभयारण्यात लाखो स्वयंसेवक छातीचा कोट करून आपला बचाव करण्यास सज्ज आहेत याचा दादांना विसर पडला..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा बोरवणकर यांची कारकीर्द फारच कौतुकास्पद आणि त्यांचे निवृत्तीनंतरचे आयुष्य तर फारफारच कौतुकास्पद. सेवाकाळात त्यांच्यावर एकदाही कसलाही आरोप झाला नाही. अर्थात असा एकही आरोप ज्यांच्यावर होत नाही त्यांच्या उपयुक्ततेबाबत अलीकडच्या काळात प्रश्न निर्माण होतात हे खरे. पण मीरा बोरवणकर या त्या अर्थाने ‘जुन्या’ काळच्या प्रतिनिधी. त्या काळात काही तत्त्वे पाळली जात. कसलेही बालंट न येणे यात अभिमान मानण्याचा तो काळ. त्या सेवाकाळात बोरवणकरबाईंवर काही कसलेही आरोप झाले नाहीत आणि निवृत्तीनंतर एखाद्या पक्षाची खासदारकी, कोणत्या समित्यांवर नेमणूक किंवा गेला बाजार राज्य लोकसेवा आयोगात एखादे पद वगैरेही त्यांच्या वाटय़ाला आले नाही. तसे ते पदरात पडावे यासाठी सेवाकाळातच प्रयत्न करायचे असतात हे त्यांना माहीत नसणार. खरे तर स्वत:चे पूर्वसुरी सत्यपाल सिंग यांच्याकडून त्यांना काही शिकता आले असते. सेवाकाळात निवडक नैतिकतेचे प्रदर्शन केले की प्रतिमाही तयार होते आणि निवृत्तीनंतरही बरेच काही मिळते हे त्यांना त्यामुळे उमगले नसावे. असतात असे काही. बोरवणकरबाई पोलीस सुधारणांसाठी बऱ्याच प्रयत्नशील होत्या. त्याबाबत त्यांनी सविस्तर अभ्यास करून अत्यंत विस्तृत असा अहवाल दिला होता. पण बोरवणकरबाईंचा झाला म्हणून काय झाले? अहवाल तो अहवाल. त्यामुळे अन्य अशा अभ्यासपूर्ण अहवालांचे जे काही होते तेच बोरवणकरबाईंच्या अहवालाचे झाले. तरीही त्यांची लिहायची सवय काही गेली नाही. निवृत्तीनंतर अहवाल नाही; तर त्यांनी पुस्तकच लिहिले. ते सध्या चांगलेच गाजते आहे. अलीकडे पुस्तक न वाचताही गाजवता येत असल्याने अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.

पण त्या प्रतिक्रियांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली तेव्हा ते पुस्तक यथायोग्य ठिकाणी पोहोचले असे म्हणता येईल. पुस्तकावरील प्रतिक्रियांवर प्रति-प्रतिक्रिया देण्याआधी अजितदादांनी ते पुस्तक वाचले होते किंवा काय याची कल्पना नाही. कदाचित असेही असेल की पुस्तकाचा मथितार्थ संक्षिप्त स्वरूपात सुप्रियाताईंनी आपल्या दादासाठी पाठवला असेल. तसे त्या आपल्या दादासाठी नेहमीच खूप काही करतात. हल्ली तर जास्तच. दिवाळी जवळ आल्यामुळे बहुधा भाऊबिजेत काही विशेष ओवाळणी मिळण्याची त्यांना आशा असावी. असो. पण या बोरवणकरबाईंच्या पुस्तकात दादांच्या नसलेल्या उल्लेखाबद्दल जो धुरळा उडाला त्यात दादांच्या पांढऱ्या कुडत्यावर जी धूळ बसली ती झटकण्यासाठी काही त्या पुढे आल्या नाहीत. त्यामुळे हे काम खुद्द दादांनाच करावे लागले. दादा ते करायला गेले आणि तिथेच फसले. अशी हलकी-सलकी कामे करायची सवय नसल्यामुळे असेल, पण बोरवणकरबाईंच्या पुस्तकात नसलेल्या उल्लेखावर काही उल्लेखनीय खुलासा करण्याची गरज नसताना दादांनी तो केला. वास्तविक पवार म्हटले की राजकारणात कधी काय करायचे याचे अंगभूत ज्ञान असणे अपेक्षित असते. दादांच्या अंगीही ते आहे असा महाराष्ट्राचाही समज होता. बोरवणकरबाईंच्या पुस्तकावर खुलासा देण्याच्या त्यांच्या या प्रयत्नाने या समजाचा भंग झाला.

याचे साधे कारण असे की आपण आता कोणाच्या सान्निध्यात आहोत याचाच दादांना विसर पडला, असे स्पष्ट अनुमान त्यांच्या या खुलाशामुळे काढता येते. दादा हे आता भाजपच्या दिल्ली दरबारातले चांगले दहा-हजारी मनसबदार आहेत. एकदा का त्या दरबारात स्थान मिळाले की कवचकुंडले प्राप्त होतात आणि कोणताही भ्रष्टाचारादी आरोप अंगाला स्पर्शच करू शकत नाही. महाराष्ट्र ते आसाम ते प. बंगाल अशी सर्वत्र सर्वदूर या सत्याची प्रचीती येईल. इतके लांबचे पाहायचे नसेल तर आपल्या आसपास नजर फिरवली तरी दादांस हे सत्य अवगत होईल. अर्थात या सत्याचा अनुभव आपल्यालाही यावा म्हणूनच तर ते काकांचा हात सोडून भाजपत गेले. त्यांच्या बाजिंद्या-साजिंद्यांना भले काहीही वाटो की आपल्या नेत्यांस मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन भाजपने दिलेले आहे. पण तसे काही नाही. पाठीस लागलेल्या केंद्रीय यंत्रणांच्या तलवारी यांच्या दरबारात गेलो तर म्यान होतील याची हमखास खात्री असल्याने दादांच्या राजकीय प्रवासाची दिशा वळली. तेव्हा सध्या राजकीय अभयारण्यात वास्तव्य असतानाही कोण त्या बोरवणकरबाई, ज्यांनी न केलेल्या आरोपाचा खुलासा त्यांना करावासा वाटावा? या अभयारण्याच्या अदृश्य भिंती भेदू शकेल अशी एकही राजकीय ताकद या भारतभूमीवर आज अस्तित्वात नाही. या भिंती भेदून आत असलेल्यांस स्पर्श करू शकेल इतकी भेदकता कोणाच्याही आरोपात नाही. असे असतानाही आपल्यावर न केलेल्या आरोपांचा खुलासा करण्याची ऊर्मी दादांच्या कठोर हृदयात का निर्माण झाली, हा प्रश्न. आणि दुसरे असे की ते सध्या भाजपच्या राजकीय अभयारण्यात विहार करत असल्याने असा कोणताही अश्लाघ्य आरोप त्यांच्यावर कोणी केलाच तर आपल्या छातीचा कोट करून त्यांचा बचाव करण्यास लाखो स्वयंसेवक सज्ज आहेत याचाही त्यांना विसर पडला. आपल्या शीलाचे संरक्षण ही आता ऊठ म्हटल्यावर उठणारे आणि बस न म्हणताही बसणारे अनेक स्वयंसेवक, समाजमाध्यमातील अदृश्य पण परिणामकारक जल्पकसेना आणि राज्यभरातले भाजप सतरंजी-प्रवीण कार्यकर्ते यांची जबाबदारी आहे हे दादा नक्कीच विसरले असणार. आपण अजूनही ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाऱ्या पक्षातच आहोत असा भास त्यांना झाला असणार. अन्यथा न केलेल्या आरोपावर खुलासा करण्याच्या फंदात दादा पडते ना.

दुसरीकडे इतकी वर्षे इतक्या उच्चपदावर काम करूनही बोरवणकरबाईंचेही चुकलेच म्हणायचे. सेवेत असताना इतक्या महत्त्वाच्या विषयावर बरेच काही मौल्यवान लिहूनही त्यांच्या लिखाणाकडे कोणी लक्ष दिले नाही. असे असताना निवृत्तीनंतर किरकोळ विषयावर असे काही किरकोळ लिहून त्याची दखल घेतली जाईल, असे त्यांना वाटलेच कसे! विषय कसला तर पोलिसांच्या घरांचा. असेही पोलीस वसाहती म्हणजे दिव्य असतात. गळकी छपरे आणि ढासळत्या भिंती. अशा घरांत राहायची सवय असलेल्या पोलिसांना चांगली घरे हवीतच कशाला? तेव्हा येरवडय़ातला तीनेक एकरांचा भूखंड गेला असता एखाद्या चांगल्या बिल्डरच्या घशात तर काय बिघडले असते बोरवणकरबाईंचे? भले तो असेना का शाहीद बलवा किंवा त्याची घोटाळय़ात अडकलेली कंपनी!

त्यातही परत त्यांची चूक म्हणजे अजितदादांविषयी संशय निर्माण होईल असे काही त्यांनी लिहिले. वर ते प्रकाशितही केले. वास्तविक लिखाण आणि प्रत्यक्ष प्रकाशन यात काही वेळ तरी गेलेला असणारच ना? या वेळेत अजितदादा पूर्वी होते तेथे नाहीत, हे तरी मीरा मॅडमना कळायला हवे होते. ते कळले असते तर त्यांनी सदर मजकूर काढून आज अजितदादांचे विरोधक ज्या जागी आहेत त्या स्थळावरील नेत्यांकडे बोट दाखवले जाईल असे काही लिहिले असते. म्हणजे मग लगेच नैतिक भाजपने त्यावर गदारोळ करून चौकशीची मागणी केली असती आणि ती धसासही लावली असती. हे शहाणपण काही मीरा मॅडमना सुचले नाही. तेव्हा मीरा मॅडम ही तुमचीच मिस्टेक आहे. ती सुधारण्याचा एकच मार्ग. पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत (ती निघाली तर) या जागेवर कोणा काँग्रेस नेत्याचा डोळा कसा होता ते लिहा. आणि हो.. त्या वेळी तो काँग्रेस नेता काँग्रेसमध्येच आहे ना, हे तपासून घ्या. अन्यथा आणखी एक मिस्टेक..!

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial meera borwankar state public service commissions a lot of efforts are being made for police reforms deputy chief minister ajit pawar amy
First published on: 19-10-2023 at 00:16 IST