आनंद सार्वजनिक करण्यासाठी धडपडणाऱ्यांना, रस्त्यावर येऊन आपल्या उत्साहाला उधाण आणणाऱ्यांना आसपासच्या परिस्थितीचेही भान असायला नको काय? सण आणि उत्सव हे भारतीय समाजमानसाचे पूर्वापार वैशिष्टय़! आपल्याकडे वर्षभर सतत काही ना काही सण, उत्सव साजरे होतच असतात. त्यातून येणारी उत्सवप्रियता जगण्यामधला उत्साह द्विगुणित करत असते. नवसर्जनाचा हा काळ प्रत्येकाच्या मनात आशेची पालवी फुलवणारा आणि चित्तवृत्ती उल्हसित करणारा. नव्या वर्षांचा पहिला दिवस नव्या आशा पल्लवित करणारा, नवे संकल्प सोडण्यास प्रवृत्त करणारा, झाले गेले विसरून जाण्यास सांगणारा, मनास उभारी देणारा. समस्त समाजास अशा दिवशी आपला उत्साह साजरा करण्याची इच्छा होणे ही स्वाभाविक गोष्ट. काळ अनंत असतो. तो प्रवाही असतो. भरभरून जगलेला, निसटलेला, निराशेचा, अतीव आनंदाचा प्रत्येक क्षण पुढील क्षणी इतिहासजमा होत असतो. काळ ही संकल्पना मानवी बुद्धिमत्तेने निर्माण झालेली. त्यामुळेच काळाचे परिमाण शोधण्याचा, त्याचे मापन करण्याचा त्याचा प्रयत्न त्याचे बुद्धिवैभव दर्शवतो. घटिका, पळे, तास, दिवस, महिना, वर्ष, दशक, शतक हे कालगणनेची मोजणी करणारे घटक. वर्ष सरले आणि नव्या वर्षांचा आरंभ झाला, म्हणजेच काळाचे एक आवर्तन संपून लगेचच दुसरे सुरू होणे. काळाची ही समच जणू. या वर्तुळाकार आवर्तनाला थांबा नाही. ज्या क्षणी तो विरतो, त्याच क्षणी त्याचा नवजन्मही होतो. चैत्रातला हा पाडवा साजरा करण्यासाठीचे गुढी हे एक प्रतीक. त्याला इतिहासात संदर्भ असतील, आहेत. मात्र आपल्या सर्वासाठी वर्तमानाचे महत्त्व अधिक. त्यामुळेच जगण्याचा प्रत्येक क्षण वैभवी करण्याचा आपला हट्ट. गुढी, तोरणे, ध्वज उभारून हा दिवस साजरा करताना, नव्या वर्षांच्या स्वागताचे औत्सुक्य टिकवून ठेवण्याचे धैर्य आपण साठवत असतो. येणाऱ्या संकटांना सजगपणे सामोरे जाण्याची ही एक प्रकारची तयारी. संकटनिवारणाची ही मनाची तयारी प्रत्येक जण करतच असतो. नववर्षांरंभीच्या उत्साहातच ती दडलेलीही असते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे, करोनाच्या संकटाचे काळजीचे ढग वातावरणात पुन्हा फिरू लागले आहेत आणि उद्योग-व्यवसायातही भरभराटीचा पुरेसा उत्साह नाही, अशा परिस्थितीत राज्यात बुधवारी साजरा झालेला गुढीपाडवा केवळ भव्य यात्रांच्या आयोजनातच गुंतून राहिला की काय, असे वाटायला लागते. त्यामागे अशा उत्सवांना गेल्या काही काळापासून लाभलेली राजकीय किनारही कारणीभूत आहे, हे सहज लक्षात येणारे आहे. नववर्षांचे स्वागत असे जल्लोषात, उत्साहात झाले, हे ठीक. मात्र अशा रस्त्यावर साजऱ्या होणाऱ्या उत्सवातून नेमके काय साध्य झाले, याचा विचार करण्यास कुणाला वेळ नाही. येत्या काळात येणाऱ्या निवडणुकांचे संभ्रमित ढग आत्तापासूनच आकाश व्यापून राहू लागल्याने, अशा सणोत्सवांचे महत्त्व अचानकपणे अधिक वाढते. भव्य मिरवणुका हे जसे शक्तिप्रदर्शनाचे निमित्त, तसेच त्यासाठीची जय्यत तयारी ही मतदारांसमोर येण्याची संधी. रस्तोरस्ती मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना पन्हे, खाद्यपदार्थ, पाणी देण्यासाठी मोठमोठे फलक लावून मांडव घालणाऱ्या सगळय़ांच्याच मनात राजकीय हेतू असेल, असे मुळीच नाही. तरीही जेवढा जल्लोष अधिक तेवढी शक्ती अधिक हे समीकरण सिद्ध करण्याची घाई मात्र सामान्यांच्या नजरेतून सुटू न शकणारीच होती. गेल्या काही वर्षांत आपण आपले सारे सणवार, उत्सव असे रस्त्यावर येऊन प्रदर्शनीय करीत आलो आहोत. आनंद असा सार्वजनिक वाटण्यासाठीची ही धडपड, जगण्यातील गुंतागुंत दाखवते. दिवाळीत कुटुंबाबरोबर, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींबरोबर आनंदात घालवण्याऐवजी भल्या पहाटे सुस्नात होऊन दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना जाण्याने आनंद वृिद्धगत होतो, असा समज मोठय़ा प्रमाणात पसरू लागलेला दिसतो. आणि तरीही जागतिक आनंद अहवालात आपले स्थान तळच्या दिशेलाच असते. आपण सुखी आहोत, आनंदी आहोत, हे मोठय़ाने सांगण्याची गरज वाढत आहे, कारण आयुष्यातील दैनंदिन संकटापासून पळ काढण्याचा तो एक सोपा मार्ग असतो. गुढीपाडव्यानिमित्त राज्यभर जो आनंद साजरा झाला, त्यात सांस्कृतिक आनंद किती आणि उत्सवी उत्साह किती, याकडे कुणाचे लक्ष जाण्याची शक्यता नाही. एकीकडे अचानक येत असलेल्या पावसामुळे देशातील अनेक भागांत शेतकऱ्यांची अक्षरश: धावपळ सुरू झाली आहे. पिकांची काढणी होईपर्यंत तरी पावसाने दर्शन देऊ नये, अशा आशेवर असलेला शेतकरी ऐन काढणीच्या वेळीच हतबल होताना दिसतो आहे. त्याने पुढील वर्षांच्या अन्नधान्याच्या उपलब्धतेवर परिणाम होईल, याची काळजी फक्त त्यालाच असते. रस्त्यावर येऊन आपल्या उत्साहाला उधाण आणणाऱ्यांनाही त्याचे भान असायला नको काय? ‘मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलंच नाही, झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली’, असं कवी द. भा. धामणस्कर म्हणतात, कारण त्यांना निसर्गात साजरा होणारा आनंद अधिक महत्त्वाचा वाटत असावा. निसर्गाच्या नवनिर्मितीलाही पर्यावरण बदलाचे वारे त्रासदायक ठरू लागलेले आता दिसू लागले आहेत. ऐन उन्हाळय़ात निष्पर्ण होत चाललेल्या वृक्षांवर अचानक फुटणारी चैत्रपालवी, ही निसर्गाच्या आवर्तनपूर्तीची नंतरची सम. तिच्या आगमनाने येत्या काळातील ग्रीष्माची काहिली निदान नजरेला तरी आल्हाद देते. निसर्गाला ना माणसांची काळजी, ना त्याच्या जगण्यातील अडीअडचणींची. त्याला ना महागाईची अडचण, ना जगण्यातल्या वादळांची चिंता. तो गजराजाच्या संथ लयीतला ख्याल सादर करत राहतो. गेल्या काही दशकांत त्याचाही ताल बिघडू लागला आहे. त्याला स्वत:च्या अस्तित्वाचीच काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे तोही आपल्या जल्लोषाला आवरू लागला आहे. गुढीपाडवा हा नव्या वर्षांतला पहिला उत्सव. पुढील वर्षभरातील सण आणि उत्सवाची ती सुरुवात. तोच अशा कमालीच्या उत्साहाने साजरा झाला, तर येत्या काही काळात राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण काय स्वरूपाचे असेल, याची कल्पनाच केलेली बरी. सार्वजनिक पातळीवरील एकही संधी सोडायची नाही, अशी गरज समाजमाध्यमांच्या सुकाळी स्थितीतही प्रत्येक राजकीय पक्षाला वाटते आहे. याचा अर्थ सारे काही हवे तसे ठीक नाही. राजकारणात कधी नव्हे एवढे विसंवादी वातावरण निर्माण होत चालले आहे. ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देऊन आता कुणाचे भागत नाही. या विसंवादी वातावरणात संवादाची गुढी उभारणे अधिक उपयोगाचे आणि महत्त्वाचे. ‘गुढीपाडव्याचा सन, आतां उभारा रे गुढी..गेलं सालं गेली आढी, आतां पाडवा पाडवा.. तुम्ही येरांयेरांवरी, लोभ वाढवा वाढवा..’ असं सांगणाऱ्या बहिणाबाई चौधरींनाही मनामनातला हा सुसंवाद वाढण्याचीच आस आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा गुढीपाडव्याच्या निमित्ताने साजरा झालेला आनंद असाच टिकून राहावा, अशी मनोकामना करताना, त्यामागील अर्थ समजून घेण्याची आवश्यकताही व्यक्त करायला हवी. सार्वजनिक सुट्टी मिळण्याचे निमित्त एवढेच कारण आपल्याला हल्ली पुरायला लागले आहे. समाजात निर्माण होऊ लागलेली वितुष्टाची अढी दूर करण्यासाठी समंजसपणे विचार करण्याची क्षमता अंगी यायला हवी. त्यासाठी मन निकोप हवे. सत्ताकारणात तर ते अधिक महत्त्वाचे. तसे झाले, तर गुढी उभारताना प्रत्येकाच्या मनात येत्या वर्षांतील मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी जी इच्छा प्रकट होते, ती प्रत्यक्षात येण्यास उपयोग होईल. अन्यथा प्रत्येक सणाला उत्साहाचे उधाण आणून समाजातील तेढ अधिकच रुंदावत जाण्याची शक्यता अधिक.