बुद्धिप्रामाण्य नाकारणारी एक गोष्ट मान्य केली तर पुढची साखळी आपोआपच सुरू होते…
‘मानसिक तसेच शारीरिक अपंगत्व असलेल्या तुमच्या दोन मुली बऱ्या करतो’, असे सांगत पुण्यातील एका आयटी इंजिनीअरला तब्बल १४ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे प्रकरण जितके संतापजनक तितकेच करुण म्हणायला हवे. आता त्या बाबाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना अटक झाली असली तरी पुण्यासारख्या ‘राज्याची सांस्कृतिक राजधानी’, ‘विद्योेचे माहेरघर’ आदी ख्यातीच्या शहरात कुणी एक भोंदूबाबा पोटापाण्यासाठी इंग्लंडपर्यंत जाऊन आलेल्या एका सुशिक्षित कुटुंबाला खुलेआम लुटतो याला काय म्हणायचे? कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणेचा धाक नाहीसा होतो तेव्हाच समाजातल्या बाजारबुणग्यांची ही हिंमत होऊ शकते. या व्यवस्थेने आपले काय करून घेतले आहे, ही यातली संतापजनक बाब. आणि कसली तरी अनामिक भीती घेऊन जगणारी अशी अनेक सुशिक्षित, सधन कुटुंबे श्रद्धेच्या नावाखाली अशाच कुठल्या तरी बुवा-बाबाच्या नादी लागून गंडे-धुपारे करत बसलेली असतात, हे यातले कारुण्य. देव, निर्गुण निराकार परमेश्वर किंवा निर्मिक अशी एखादी शक्ती मानणे आणि तिच्यापुढे नतमस्तक होऊन जगणे ही वेगळी गोष्ट. पण ‘मलाच देव माना’, असे म्हणत आपल्यासमोर जमलेल्या लोकांना व्रतवैकल्ये, कर्मकांडे यात गुरफटून लुबाडणे हा केवढा घोर अपराध आहे. आणि तो करणारे भोंदू बुवा- बाबा, तांत्रिक-मांत्रिक सतत उद्भवत असतात कारण ते झुकवतील तशी झुकायला, त्यांच्यामागे मेंढरे बनून जायला तयार असलेली माणसेही दर पिढीत नव्याने तयार होत असतात. फारसे शिक्षण नसलेली, जग माहीत नसलेली भोळी भाबडी माणसे अशा भामट्यांना बळी पडत असतील तर ते समजण्यासारखे आहे, पण सुशिक्षितांमधल्या अंधश्रद्धा हा प्रकार फारच घातक.
हा प्रकार कायम आहे, कारण समाज म्हणून आपण असेच आहोत. अपवाद वगळता अनेक राजकारणी, आयएएस – आयपीएस अधिकारी, मोठमोठे कलाकार, खेळाडू, बक्कळ पैसा मिळवणारे अनिवासी भारतीय हे लोक कोणत्या ना कोणत्या बुवा-बाबाच्या चरणी लीन असतात. आपल्याकडे जे आहे ते टिकून राहावे यासाठी तो बुवाबाबा सांगेल त्या पूजा, उपाय करतात, शक्यता अशी की सहजमार्गाने येणारा पैसा तितक्याच सहजपणे निघून जाऊ नये, या अनामिक भीतीपायी ही बडी मंडळी अशा बुवाबाबांच्या मागे जात असावीत. तांत्रिक- मांत्रिक मंडळींचा आणि या लोकांचा तर एकदम घनिष्ठ संबंध. काळी जादू या प्रकारावर विश्वास असणाऱ्या आणि त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेलाही कामाला लावणाऱ्या राजकारण्यांच्या सुरस आणि रम्य कथा त्यांच्या निकटवर्तीयांकडून नेहमी चर्चिल्या जातात. अगदी आत्ताही आजारपणामुळे उपचार घेत असलेल्या एका बड्या राजकीय नेत्यावर कोणी करणी किंवा काळी जादू केली आहे, याच्या चर्चा समाजमाध्यमांतून रंगत राहातात.
आपला सर्वच पातळ्यांवरचा प्रभाव कमी होऊ नये या भीतीपोटी समाजाच्या वरिष्ठ स्तरातली मंडळी हे सगळे उद्याोग करत असतील, हे गृहीत धरले तर सर्वसामान्यांचे काय? शिकले सवरलेले मध्यमवर्गीय, उच्चमध्यमवर्गीय अशा थोतांडाला का बळी पडतात? याचे उत्तर पुन्हा आपल्या व्यवस्थेतच दडलेले आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेत विचार करायला कुठे शिकवले जाते? प्रश्न विचारण्यापेक्षा घोकंपट्टी करणे, आज्ञाधारक असणे, ‘बाबा वाक्यम प्रमाणम्’नुसार वागणे हे गुणी बाळाचे लक्षण. घरातील वडीलधाऱ्यांचे सांगणे चूक असो वा बरोबर, तेच अवलंबले पाहिजे. कोणत्याही गोष्टीमागे, अगदी आपल्या जगण्यामागेदेखील कार्यकारणभावच असतो, असे मानणे हा विज्ञानाचा मार्ग. बुद्धिप्रामाण्य किंवा किमान विवेक जागृत ठेवणे हे या मार्गावर असल्याचे लक्षण. पण त्याऐवजी तुमची प्रत्येक गोष्ट कोणाच्या तरी कृपेने होते, असे सांगितले जाते, तेव्हा आपोआप ते पोर दहावीत चांगले मार्क मिळावेत म्हणून एखाद्या देवळात किंवा आईवडिलांबरोबर एखाद्या बुवांच्या दरबारात जाऊ लागते. आपल्या प्रत्येक गोष्टीला आपणच जबाबदार असतो, हा तर्कशुद्ध बुद्धिवाद स्वीकारण्यापेक्षा त्याची जबाबदारी कोणाच्या तरी खांद्यावर टाकली की जगणे सोपे होऊन जाते. कोणाच्याही अंगी दैवी शक्ती वगैरे काही नसते, असलीच तर इतरांपेक्षा बुद्धी आणि चलाखी थोडी जास्त असते, हे ज्यांना समजते ते अशा कोणाच्या वाऱ्यालाही उभे राहात नाहीत. पण हे समजत नाही, स्वीकारता येत नाही, अशांची पैदास खूप. देवाच्या नावावर ठगगिरी करणाऱ्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, हे त्यांना कोणी शिकवत नाही. त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे असते, हेच आधी कुटुंबात सांगितले जाते आणि शिक्षणव्यवस्थेत आणि समाजव्यवस्थेत त्याला खतपाणी घातले जाते. मग ठिकठिकाणच्या बुवाबाबांच्या दरबारात अशा बाळबोधांचा मेळाच जमतो आणि मग त्याचा बघता बघता बाजार होतो. कुणी लुबाडून घ्यायला तयार असाल, तर त्याला लुबाडणारेही असणारच हा तर जगाचा न्याय. आयुष्य आहे, तर चढउतार येणारच, त्यांना भिडले पाहिजे असा विचार करण्याऐवजी संकटांनी भेदरून जाणारे हमखास बळीचे बकरे ठरतात. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये असलेली तरल, पुसट रेषा आपण कधी ओलांडली हे भल्याभल्यांना कळत नाही, याची कितीतरी उदाहरणे सांगता येतात.
इस्रोसारख्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी २०२३ मध्ये ते प्रक्षेपित करणार होते, त्या क्षेपणास्त्राची प्रतिकृती प्रक्षेपणाआधी तिरुपतीला बालाजीच्या चरणी नेऊन अर्पण केली होती. एका विशिष्ट बाबांना मानणाऱ्या एका प्रसिद्ध डॉक्टरांनी त्यांच्या क्लिनिकमधल्या त्यांच्या केबिनमध्ये अशाच एका भक्तप्रिय बाबांचे भिंत भरून छायाचित्र लावले आहे आणि प्रत्येक भक्ताला तपासण्याआधी त्या छायाचित्रातल्या बाबांना नमन करून, त्यांचा आशीर्वाद घेऊन मगच ते आपली वैद्याकीय सेवा सुरू करतात. ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी एक खेळाडू ती ज्यांना मानते अशा एका बाबांचे छायाचित्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व स्पर्धांदरम्यान आपल्याबरोबर घेऊन जात असे. याशिवाय अगदी लहानसहान कामांसाठी शुभमुहूर्त पाहणे, वास्तुशास्त्रानुसार घर, कार्यालयाची रचना करणे, विशिष्ट रत्ने परिधान करणे, लिंबू मिरची लावणे, नजर उतरवणे, शकुन अपशकुन मानणे, जन्मपत्रिकेनुसार गोष्टी करणे अशा कितीतरी गोष्टी रोजच्या आयुष्यात सर्रास केल्या जातात. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत, हेच अनेकांच्या गावी नसते. या छोट्याछोट्या गोष्टीच तर आहेत, त्या करून बघितल्या तर त्यात नुकसान काय असाही अनेकांचा प्रश्न असतो. पण बुद्धिप्रामाण्य नाकारणारी एक गोष्ट मान्य केली तर पुढची सगळी साखळी आपोआपच तुमच्यासमोर येऊन ठेपते. ती कशी नाकारणार?
जीवघेण्या संकटांसमोर माणसे अनेकदा हतबल होतात आणि परिस्थितीशरण बनतात. त्यातून ती अशा मार्गांना लागतात, त्यांची बुद्धी गहाण ठेवतात, असे या परिस्थितीचे स्पष्टीकरण असू शकते. पण तेदेखील समाज म्हणून आपले अपयशच नाही का? संकटग्रस्त माणसांना त्यातून मार्ग शोधण्यासाठी, बाहेर पडण्यासाठी दिलासा देणारे वातावरण किंवा यंत्रणा का असू शकत नाही? पुण्यातील प्रकरणात पदरी विशेष मूल असणे या प्रश्नावर बुवाबाबाच काहीतरी करू शकतात, हा विचार सुशिक्षित पालकांनीही केला, कारण या मुलांसाठी उपलब्ध संस्थात्मक पर्याय त्यांच्यापर्यंत पोहोचले नाहीत किंवा त्या पर्यायांपर्यंत पालक पोहोचले नाहीत. मित्रमंडळी, नातेवाईक यांचा भक्कम आधारही अनेकदा अशा खड्ड्यांमध्ये पडण्यापासून वाचवतो. आजच्या वेगवान जगण्यात आपले असे आधारही हरवत चालले आहेत का याचाही विचार करायला हवा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जादूटोणा-विरोधी कायदा असो वा अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना- त्यांचे असणेही त्यांनी एकदा तपासून पाहायला हवे.
