‘एसआयआर’चे नेमके फलित काय, प्रशांत किशोर यांचा परिणाम किती, नितीशकुमारांचे राजकीय भवितव्य काय आदी प्रश्न बिहारच्या निवडणुकीसंदर्भात कोणासही पडावेत…

हमखास टाळ्या मिळवणारी वाक्ये ऐकवण्याची सवय केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांनाही लागल्याचे बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत दिसले. बिहारमधील निवडणूक ही देशातील सर्व निवडणुकांची जननी आहे, असे खरे तर हास्यास्पद विधान ज्ञानेश कुमार यांनी केले. बिहारची ही निवडणूक म्हणजे पारदर्शकतेचा नमुना असेल हे त्यांचे दुसरे विधान तर अधिकच अचंबित करणारे होते. कारभाराच्या पारदर्शकतेवरून कधी नव्हे इतका केंद्रीय निवडणूक आयोग अडचणीत आला आहे. मुख्य आयुक्तांना प्रश्नांची सरबत्ती करून घेरले जात असल्यामुळे त्यांची कोंडी होत आहे. त्यातून सुटण्यासाठी निरर्थक वाक्ये फेकली जात असावीत. बिहारमध्ये ज्या पक्षाला जातींचे समीकरण जमले तो विजयी होतो, गेल्या दोन दशकांमध्ये ‘एनडीए’तील भाजप आणि नितीशकुमार यांचा जनता दल (संयुक्त) या पक्षांना ते साधले होते. यावेळीही या समीकरणावरील भाजप आघाडीची पकड सैल झालेली नाही. त्यामुळे यंदाची निवडणूकही अपेक्षित मार्गाने वेग घेऊ लागली असली तरी, यंदा ‘एनडीए’ला अस्थिर करणारे दोन घटक फायदा करून देतील की फटका देतील याचा अंदाज अद्याप कुणालाच आलेला नाही. परंतु या निवडणुकीचे वेगळेपण एवढ्यावर संपत नाही.

बिहारमध्ये एकेकाळी तीन, पाच, सात टप्प्यांमध्ये मतदान घेतले जात असे. यावेळी फक्त दोन टप्प्यांत मतदान होईल. आत्ता देशभरात कुठेही निवडणुका नसताना आणि सुरक्षा यंत्रणांची सर्व यंत्रणा उपलब्ध असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने एका टप्प्यात मतदान घेण्याचे धाडस दाखवू नये हे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण प्रत्यक्षात राबवायचे असेल तर बिहारसारख्या मोठ्या राज्यात एका टप्प्यात निवडणूक घेण्याची क्षमता आयोगाकडे असली पाहिजे. मतदान ६ व ११ नोव्हेंबरला होईल म्हणजे पहिला टप्पा छठपूजा उरकल्यानंतर नवव्या आणि दुसरा टप्पा १४ व्या दिवशी पार पडेल. छठपूजेला बिहारी आपापल्या घरी जातात, त्याच्या आगेमागेच मतदान तारखा असत्या तर स्थलांतरितांनाही मताधिकार बजावता आला असता. आता मतदानाचा दिवस उजाडेपर्यंत अनेक बिहारी आपापल्या कार्यक्षेत्रात परतलेले असतील. अलीकडच्या काळात मतचोरीचे आरोप होत असताना बिहारमधील मतदानाच्या तारखा आयोगाला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहायला लावू शकतात. बिहारमध्ये सकाळी ७ ते संध्याकाळी ६ असे ११ तास मतदान घेतले जाईल. मतदानाच्या कालावधीवर कोणी आक्षेप घेतले नसते. पण महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी संध्याकाळी पाचनंतर मतदानाचा टक्का अनपेक्षित वाढल्याच्या विरोधकांच्या शंकेनंतर मतदानाच्या वेळेकडे लक्ष वेधले गेले आहे. बिहारमध्ये एका मतदान केंद्रावर १२०० मतदार आहेत. प्रत्येक मतदाराला एक मिनिट लागले तरीही, सर्वांच्या मतदानाला २० तास लागतील. मतदान १०० टक्के होत नाही हे गृहीत धरले तरी संध्याकाळी पाचनंतर लांबलचक रांगा लागल्या तर महाराष्ट्रातील वादाची पुनरावृत्ती होणारच. मतदानाचे चित्रीकरण निवडणूक आयोग उपलब्ध करून देणार नसेल तर संशयकल्लोळ होणार हे उघड आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आरोप होत असताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार स्मितहास्य करून वेळ मारून नेताना दिसतात! त्यांच्या हास्यामागे अनेक गंभीर मुद्दे झाकले गेले आहेत. बिहारमध्ये मतदारयाद्यांमध्ये घुसखोर अथवा अवैध परदेशी नागरिक किती, या अत्यंत संवेदनशील प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश कुमार देत नसतील तर, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मौन राखून बचाव तर केला जात नाही ना, असे विचारता येऊ शकते. बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयाद्यांचे ‘शुद्धीकरण’ झाले. शुद्धीकरण हा शब्द ज्ञानेश कुमारांचाच. मतदारांच्या फेरतपासणीची (एसआयआर) गरज या शुद्धीकरणासाठीच असून त्यातून या राज्यात झालेल्या घुसखोरीची तीव्रताही समजेल असे मानले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमधून या गरजेला नैतिकतेचा मुलामाही दिला गेला होता. मात्र ‘एसआयआर’ पूर्ण झाल्यानंतर वारंवार विचारणा करूनही निवडणूक आयोगाने घुसखोरांचा आकडा जाहीर केलेला नाही. समजा, तसे केले तर या घुसखोरांचे करायचे काय, असा केंद्रीय गृह मंत्रालयाला अधिक अडचणीत टाकणारा मुद्दा पुढे येईल. त्यांना बंदिस्त छावणीत टाकणार की मूळ देशात परत पाठवणार? त्या देशांनी या घुसखोरांना घेतलेच नाही तर पुढे काय करणार? मतदारयाद्यांच्या या कथित शुद्धीकरणामुळे नवी गुंतागुंत निर्माण झालेली आहे, त्याची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालय घेणार नाही.

‘एसआयआर’चे पडसाद कसे उमटतील याचा जसा अंदाज बांधता येत नाही, तसाच बिहारच्या राजकारणातील ‘धूमकेतू’चाही नाही. हा धूमकेतू म्हणजे गेल्या काही वर्षांत निवडणुकीच्या राजकारणातील व्यावसायिक ‘रणनीती’कार अशी उपमा मिळालेले प्रशांत किशोर ऊर्फ ‘पीके’ आणि त्यांचा जनसुराज पक्ष. हे ‘पीके’ रसायन कोणासाठी घातक ठरेल याचा अंदाज भाजपमधील कथित चाणक्यांना आलेला नसावा. बिहारी मतदारांसाठी नितीशकुमार, मोदी-शहा, तेजस्वी-लालूप्रसाद, कदाचित राहुल गांधीही अशा तमाम नेत्यांची लकाकी संपलेली आहे; त्यांना नव्या युगात घेऊन जाईल असा नवा तारा पाहिजे आणि तो म्हणजे मीच, अशी प्रशांत किशोर यांची समजूत आहे. नितीश नको आणि लालूही नको म्हणणारे आपल्याला साथ देतील असा या ‘पीकें’चा दावा आहे. ‘पीके’ धडाक्यात जाहीर सभा घेत आहेत, लोकांची गर्दीही दिसते. पण तशी गर्दी महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभांनाही होते. प्रत्यक्ष निवडणुकीत मते मिळवण्याशी गर्दीचा संबंध तो किती? पीके मते खातील हे निश्चित, पण ती कोणाची आणि किती हे माहीत नाही. समजा ‘पीकें’नी पाच-सात जागा मिळवण्याइतपत ताकद दाखवली तर तेच ‘किंगमेकर’ होतील. मग सरकार बनवताना ते कोणाच्या पारड्यात आमदारांचा पाठिंबा टाकतील त्यावर ते उजवे की डावे हेही समजेल. उच्चवर्णीय, बेरोजगार तरुण, आशा-आकांक्षा असलेले नवे मतदार, होतकरू ओबीसी मतदार यांच्या प्रतिसादावर ‘पीकें’चे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. ‘पीकें’च्या प्रवेशामुळे यंदा बिहारची निवडणूक अस्थिर झाली हे खरेच. पण यंदा बिहारमध्ये या धूमकेतूचेच नाही, तर तेथील राजकारणातील ‘अढळ ताऱ्यां’चेही भवितव्य ठरणार आहे. बिहारचे मुख्यमंत्रीपद २००५ पासून टिकवणाऱ्या नितीशकुमार यांच्या या वेळच्या सार्वजनिक वावरातून त्यांचे प्रकृतिमान दिसत आहे. ‘एनडीए’ सत्ता राखण्यात यशस्वी झाली तर नितीशकुमारांना पर्याय शोधला जाईल हे निश्चित. अगदीच तडजोड झाली तर आणखी वर्षभराचा काळ नितीशकुमार यांना मिळू शकेल. बिहारच्या निवडणुकीत नितीशकुमारांना झाकून ठेवणे ही भाजपसमोरील खरी कसोटी आहे. ते उघडे पडले की बिहार भाजपने गमावले. मग, मुख्यमंत्रीपद तर खूपच लांबची गोष्ट ठरेल. आणि बिहारमध्ये राहुल गांधींना सत्तेत वाटा देणे याचा वेगळा अर्थ भाजपला तरी समजावून सांगण्याची गरज नसावी. बिहारमधील विरोधकांची आघाडी, ‘महागठबंधन’ला नितीशकुमारांचे मतदार तोडायचे आहेत. त्यांच्याकडे मुस्लीम-यादव आहेतच. ओबीसी, अतिपिछडा, दलित या मतदारांची जोडणी करावी लागेल. त्यामध्ये अतिपिछडा मतदार ‘महागठबंधन’ला सत्तेत बसवू शकतो. पण तो आत्ता नितीशकुमारांकडे आहे. अतिपिछडा जितका मिळेल तितकी ‘महागठबंधन’ची लढाई सोपी. म्हणून नितीशकुमार हवेत. इतकी अपरिहार्यता क्वचितच कुठल्या राज्यात दिसते.

यंदाची बिहारची विधानसभा निवडणूक अशा अनेक शंका-कुशंकांनी भरलेली असल्याने नितीशकुमार-ज्ञानेश कुमार यांचे हास्य अधिकाधिक केविलवाणे वाटू लागल्यास नवल नाही.