सामान्यज्ञान, रूढीज्ञान, व्यवहारज्ञान वा वैज्ञानिक ज्ञानापेक्षाही तत्त्वज्ञान वरचे असते, या जाणिवेतून एस. एल. भैरप्पांच्या अनेक कादंबऱ्यांतले प्रसंग उमलून आले…

व्यक्तिगत यशानंतर येणारा अभिमान हा व्यक्तीपुरताच उरतो. अशा व्यक्तिनिष्ठतेच्या पलीकडला, जनसमूहाच्या सामायिक स्मृतीला आवाहन करणारा स्वाभिमान जपणाऱ्यांपैकी एस. एल. भैरप्पा होते. कन्नड भाषेतच त्यांनी २५ कादंबऱ्यांचे लेखन केले असले तरी त्यांचे आवाहन भारतीय म्हणवणाऱ्या अनेकांना भिडणारे होते. मराठीला भैरप्पा परके नाहीत ते यामुळेच. स्वत:च्या लिखाणाविषयी बोलतानाही आपल्या कादंबऱ्यांचा आधार भारतवर्षात युगानुयुगे रुजलेली मूल्ये हाच असल्याचे ठाम प्रतिपादन ते करत.

त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या कादंबऱ्यांची चर्चा होत राहील; पण तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक भैरप्पा कादंबरीकार म्हणून लौकिक मिळवतात, त्यांच्या कादंबऱ्या कन्नडपुरत्या न राहता अनेक भाषांत जाऊन वाचकप्रिय होतात आणि पद्मा पुरस्कारांसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळवूनही भैरप्पा हे काहींना महत्त्वाचे तर अन्य काहींना बिनमहत्त्वाचे वाटत राहतात याचे कोडे उलगडल्याखेरीज त्यांना वाहिलेली आदरांजली प्रामाणिक ठरणार नाही. या कोड्याचे उत्तर जसे त्यांच्या कादंबऱ्यांमागील लेखनप्रेरणेत शोधता येते, तसेच लेखक म्हणून भैरप्पा ज्या काळात नावारूपास आले त्या काळातही शोधावे लागते. आधी त्यांच्या लेखनप्रेरणेबद्दल.

‘नवे काही निर्माण करायचे तर, तत्त्वज्ञानात ते बुद्ध आणि महावीर, आदिशंकराचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य यांच्यापासून स्वामी विवेकानंदांपर्यंत अनेकांनी केलेले आहे’ याची विनम्र जाणीव ही भैरप्पांच्या लेखनप्रेरणेस पायाभूत. त्या जाणिवेपायी त्यांनी तत्त्वज्ञानातील पीएच.डी.नंतर ‘डी.लिट.’ मिळवण्याचा विचार सोडून दिला आणि कादंबऱ्या लिहिणे हे कर्तव्य मानले. विशेषत: ‘वंशवृक्ष’नंतरच्या त्यांच्या काही कादंबऱ्यांत या प्रेरणेचा आधार थेटच दिसून येतो. सामान्यज्ञान, रूढीज्ञान, व्यवहारज्ञान, प्रसंगी वैज्ञानिक ज्ञानापेक्षाही तत्त्वज्ञान वरचे असते आणि ही दृष्टी वेदकाळापासूनच भारतात रुजलेली आहे, याचा अभिमान भैरप्पांनी बाळगला. या जाणिवेतून त्यांच्या कादंबऱ्यांतले अनेक अविस्मरणीय प्रसंग उमलून आले.

‘पर्व’मधला युधिष्ठिर द्याूतामध्ये काहीही पणास लावू लागतो तेव्हा भीम त्याला अडवू पाहतो. हे व्यवहारज्ञान. पण अर्जुन भीमाला म्हणतो की थोरल्या भावाला तू अडवू शकत नाहीस, हे संस्कृतीतून आलेले संस्कार इथे या प्रसंगात लागू पडतातच असे नाही, हा तात्त्विक निवाडा मात्र श्रीकृष्ण देतो. पुढल्या कादंबऱ्यांत श्रीकृष्णासारखे विराट ज्ञानी पात्र नसले तरी अशाच वरच्या पातळीचे ज्ञान नायकास अथवा नायिकांस अनुभवांच्या आणि चर्चा-संवादांच्या मालिकांनंतर होते, ही भैरप्पांच्या कादंबऱ्यांची साधारण वीण.

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘दाटु’ – मराठीत ‘जा ओलांडुनी’ या कादंबरीत भैरप्पा प्रेमकथेच्या मिषाने समाजचित्रही रेखाटतात आणि कथानकाच्या वळणावळणांतून, समाजशास्त्रीय ज्ञानापेक्षाही वरचे ठरणारे तत्त्वज्ञान मांडू पाहतात. भैरप्पांनी मांडलेला तात्त्विक आशय – ब्राह्मणांचा द्वेष हा चातुर्वर्ण्यातून बसवल्या गेलेल्या सामाजिक घडीचा कलंक खरा, परंतु ‘ब्राह्मण्य’तर सर्वच वर्णांना हवे आहे, अशा अतिसुलभ शब्दांत सांगता येईल. ही १९७३ ची कादंबरी भैरप्पांच्या तोवरच्या १८ वर्षांच्या साहित्यप्रवासाचा मानबिंदू तर ठरलीच, पण त्यांच्या तत्त्वशोधक प्रेरणांचे शिखरही तिने गाठले. तिचे स्वागत तसेच टीकेतून भैरप्पांच्या पुढील राजकीय- सामाजिक भूमिका उघड होत गेल्या, हे नाकारता येत नाही.

भैरप्पांच्या त्या वेळच्या टीकाकारांत तत्कालीन अब्राह्मणी म्हणवणाऱ्या सामाजिक चळवळींचे समर्थक होते, तसेच कर्नाटकातील ‘प्रगतिशील’ या समूहनावाने ओळखले जाणारे लेखकही होते. साहित्य क्षेत्रातले हे कर्नाटकी प्रवाह महाराष्ट्रापेक्षा निश्चितपणे निराळे. मराठी मुलखातली साहित्यिक कंपूशाही पुण्यामुंबईत तयार झाली आणि तिला उत्तर म्हणून मराठवाडा अथवा विदर्भानेही आपापले कंपू तयार केले, तसे हे समूह नव्हेत. बाबा पदमनजींची ‘यमुनापर्यटन’ ही पहिली भारतीय प्रादेशिक कादंबरी मराठीतलीच. तिचा कन्नड अनुवाद आधुनिक कन्नड साहित्याच्या सुरुवातीच्या पावलांपैकी मानला जातो. पण कन्नडमध्ये सात ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते आणि मराठीत नेमाडे धरून चारच, या विषमतेचे महत्त्वाचे कारण मराठीसारख्या कंपूशाहीऐवजी कन्नड साहित्यातले समूह वैचारिक प्रवाहांवर आधारलेले होते, यातही दडलेले आहे.

विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून ते साधारण दुसऱ्या महायुद्धापर्यंतची ‘नवोदय’ चळवळ; १९४०च्या सुमारास लालबावट्याचा प्रभाव दिसू लागल्यानंतरची- पण आजतागायत टिकताना नावाप्रमाणेच ‘प्रगतिशील’ मूल्यांचा आधार घेणारी चळवळ; स्वातंत्र्योत्तर व्यक्तिवादी जाणिवांतून आलेली पण नव्वदीच्या दशकात पाड न लागल्याने अस्तंगत झालेली ‘नव्या’ चळवळ आणि मराठीतल्या दलित साहित्याचे हुंकार ऐकून १९७० च्या दशकापासून सुरू झालेली ‘बंडया’ चळवळ, ही या वैचारिक प्रभावांची विभागणी.

तीत भैरप्पा कोठेही न बसणारे. किंबहुना, माझ्या टीकाकारांना त्यांच्या-त्यांच्या वैचारिक भूमिकांनी बांधून ठेवले असल्यामुळेच मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो, असे भैरप्पा अनेक मुलाखतींत आवर्जून सांगत. या कथित टीकाकारांपैकी यू. आर. अनंतमूर्ती यांचे स्थान सर्वांत वरचे. ‘आवरण’ या कादंबरीतल्या ‘प्रोफेसर शास्त्री’ या पात्राच्या आच्छादनाखालून अनंतमूर्तींचेच वाभाडे भैरप्पांनी काढले आहेत, अशी अनेकांची अटकळ. तीबाबत विचारले असता भैरप्पांचे उत्तर मात्र दुर्लक्षाचा रुबाब दाखवणारे असे- ‘प्रोफेसर शास्त्रींसारखी मंडळी तुम्ही आजूबाजूला पाहिलेत, तर तुम्हालाही आपापल्या प्रांतात ओळखू येतील’!

अशा उत्तरांतूनही भैरप्पांचा हजरजबाबीपणा उजळून निघे. त्यांच्या कादंबऱ्या जशा वाचकाला गुंतवून ठेवणाऱ्या, तशाच त्यांच्या मुलाखतीही श्रोत्यांची पकड घेणाऱ्या ठरत, त्यामागे वैचारिक दिशेच्या स्पष्टतेतून आलेली मुखरता (आर्टिक्युलेशन) हेही महत्त्वाचे कारण होते. या वैचारिक दिशेमध्ये खरे तर समन्वयाचा, समरसतेचा आग्रह आहे, हे ‘जा ओलांडुनी’, ‘पर्व’ इथपर्यंतच्या कादंबऱ्यांतून प्रत्ययास येते; तसेच ‘भिथ्थि’सारख्या आत्मपर लिखाणातूनही जाणवू शकते. तरीही भैरप्पांनी- विशेषकरून २१व्या शतकात- टोकाच्या भूमिका घेतल्याची टीका होत राहणे, हा काळाचा महिमा. भारतीयतेच्या संकल्पनेतला समन्वय भैरप्पा शोधत होते. लेखकीय जबाबदारी म्हणून स्वीकारलेल्या त्या शोधासाठी पुरेसे भारतभ्रमण, गावकऱ्यांशी संवाद अशी मेहनतही त्यांनी घेतली होती. मात्र कोणाही साहित्यिकाची लोकप्रियता तात्कालिक राजकीय प्रवाहांच्या वाढीवर स्वार झालेली असणे हे लेखकासाठी एक वेळ कमी पण साहित्यप्रेमी समाजासाठी अधिक घातक ठरते. हे भैरप्पांच्या बाबतीत ‘आवरण’नंतर झाले, असे खेदाने म्हणावे लागते.

राजकीय हिंदुत्वाचा भैरप्पांना गवसणी घालण्याचा प्रयत्न, त्यातून कुणा येडियुरप्पांनी भैरप्पा डावे नसल्यानेच ‘ज्ञानपीठा’पासून त्यांना दूर ठेवण्यात आल्याचा बखेडा उभा करणे आणि देशभरातील वाचकांची साथ असूनसुद्धा भैरप्पांनी याविषयी येडियुरप्पांना न फटकारणे यातून आपल्या समाजाची अविवेकी वळणे दिसून येतात, हे भैरप्पांबद्दल पूर्ण आदर बाळगूनही सांगितले गेले पाहिजे. याचे कारण ही टोचणीच आपल्या पुढल्या पिढ्यांना भैरप्पांकडे जाण्यास प्रवृत्त करेल.

निधनानंतरही त्यांच्या कादंबऱ्यांची चर्चा होत राहील, नव्हे व्हावीच, कारण त्यातून आपल्याला, काळासकटचे आणि काळाच्या पलीकडले भैरप्पा समजून घेता येतील. त्या तिथे- तात्कालिक भूमिकांच्या पलीकडे साहित्याची भूमी असते. त्या भूमीवर ‘मला एक खून माफ केल्यास मोदींवर गोळी झाडेन’ म्हणालेले तेंडुलकर, ‘मोदी पंतप्रधान झाल्यास देश सोडेन’ म्हणालेले अनंतमूर्ती यांच्याबरोबरच ‘लालबहादूर शास्त्रीजींनंतर लोकांचा विश्वास जिंकणारे अ-भ्रष्ट पंतप्रधान म्हणजे मोदीच’ अशा अर्थाचे विधान केलेले भैरप्पाही असतात. ही बहुविधतापूर्ण साहित्यिक भूमी भैरप्पांचीही आहे.

भैरप्पांना अभिप्रेत असलेली भारतीयता ही भारताच्या बहुविधतेचा आदर करणारी ठरते का, हा नंतरचा प्रश्न. राजकीय वा सामाजिक प्रश्नांवर भूमिकाच न घेण्याचा शेळपटपणा भैरप्पांनी केला नाही, याचीही दखल आवश्यकच. पण तात्कालिक भूमिकांच्या पलीकडल्या भूमीवरही त्यांचे स्थान आहे, यासाठी ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे त्यांना आदरांजली.