भारताच्या अवकाशविज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारणारे शास्त्रज्ञ एकनाथ वसंत तथा ई. व्ही. चिटणीस यांचे काम हा भारताच्या विज्ञान प्रगतीच्या इतिहासाचा दस्तावेजच…

आपल्याकडे विज्ञानाबाबतही सगळा वलयाचा मामला. ज्याच्या नावे एकही संशोधन नाही असे, केवळ भाभा अणुसंशोधन केंद्रातील चाकरीची पुण्याई असणारे आणि काही तर केवळ विज्ञानकथा सांगणारे… अशा सगळ्यांनाच येथे वैज्ञानिक म्हटले जाते. कोणालाही विचारवंत असा किताब द्यावा तसेच हे. आणि सध्याचा काळ तर काही सेकंदांच्या ‘रील’मध्ये मावणाऱ्या कर्तृत्वाला नमन करण्याचा. दर श्वासागणिक जिथे नवा तारांकित लागतो, तिथे समग्र आयुष्य विज्ञानालाच समर्पित असलेल्यांची कथा सांगणार कोण? आणि सांगितली, तरी या वावदुकी वातावरणात ऐकणार कोण? एखाद्या वाक्याच्या वा मोजक्या शब्दांच्या आत्मचरित्रात विरून जाणाऱ्या ‘स्टोरी’इतके भागधेय उरणे, हा केवळ त्या व्यक्तीवर तर अन्याय आहेच; पण तो व्यक्तीला तेवढ्यातच बंदिस्त करणाऱ्यांचा करंटेपणाही. अर्थात, शतायुषी शास्त्रज्ञ एकनाथ वसंत तथा ई. व्ही. चिटणीस यांना तर निधनानंतर एवढेही भाग्य अपवादानेच मिळाले असेल. म्हणूनच त्यांची फक्त स्मरणनोंद न लिहिता त्यांची महत्ता सविस्तर सांगायला हवी. भारताच्या अवकाशविज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारणारे चिटणीस यांचे काम ही फक्त त्यांच्या कार्यकर्तृत्वातील एकेका प्रसंगाची गोळाबेरीज नाही, तर तो भारताच्या स्वातंत्र्योत्तर विज्ञान प्रगतीच्या इतिहासाचा मोठा दस्तावेज आहे, जो उद्याच्या विज्ञानवाटेची दिशा ठरविण्यासाठी धोरणकर्त्यांनीही अभ्यासायला हवा.

चिटणीस मूळचे कोल्हापूरचे. शिक्षणासाठी पुण्यात आले. तत्कालीन पुणे विद्यापीठात पदार्थविज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर काही काळ ते गुजरातमधील एका गावात व्याख्याते म्हणून काम करत. ओढा संशोधनाकडे असूनही तो काळ असा की, संशोधनासाठी पुरेशा सुविधा नसल्याने मास्तरकीवाचून गत्यंतर नव्हते. अर्थात, कालांतराने संशोधन सहायक म्हणून काम मिळाले. आणि, मग थेट अमेरिकेत मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात ‘एमआयटी’मध्ये त्यांना संशोधनाची संधी मिळाली. रुढार्थाने स्थिरस्थावर झालेले असताना, त्यांना खुद्द विक्रम साराभाईंनी भारतात परतण्यासाठी हाक दिली. नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतासमोर भूक, रोगराई, गरिबी या समस्या आ वासून उभ्या होत्या. त्या विज्ञानाच्या मार्गे सोडविण्यासाठी भारतात परत ये, अशी साराभाईंची साद होती आणि त्याला चिटणीसांनी लगेच प्रतिसाद दिला. काही कालावधीत चिटणीस हे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च- ‘इन्कोस्पार’चे सदस्य-सचिव झाले. याच ‘इन्कोस्पार’चे रूपांतर १९६९ मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्राो’त झाले. चिटणीस हे त्या अर्थाने ‘इस्राो’ची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या महत्त्वाच्या वैज्ञानिकांपैकी एक.

‘एमआयटी’तून परत आलेल्या चिटणीसांना साराभाईंनी पहिले काम दिले, ते रॉकेट प्रक्षेपणासाठी भारतात योग्य जागा निवडण्याचे. चिटणीस यांनी पाच महिन्यांच्या अथक शोधानंतर केरळातील तिरुअनंतपुरममधील थुंबा ही पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तानजीकची जागा त्यासाठी सुचवली. संशोधनासाठी, रॉकेट प्रक्षेपणासाठी हीच जागा उत्तम, यावर बऱ्याच चर्चांनंतर एकमत झाले आणि वर्षभरातच नोव्हेंबर १९६३ मध्ये ‘नासा’च्या मदतीने, वातावरणाचा अभ्यास करणाऱ्या नाइके-अपाचे या रॉकेटचे येथून प्रक्षेपणही झाले. भारतीय शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देण्यासाठी याचा उपयोग झाला. या रॉकेटचे भाग सायकलींवर आणि बैलगाड्यांतून प्रक्षेपणाच्या ठिकाणी आणण्यात आले होते, हे आज सांगितले, तरी आश्चर्य वाटेल. पण, भारताच्या अवकाश विज्ञानातील भरारीची आस लागलेल्या वैज्ञानिकांच्या दृढनिश्चयी भूमिकेची आणि समर्पित वृत्तीची आठवण करून देण्यासाठी ते पुरेसे ठरावे. थुंबा येथील ही जागा आज विक्रम साराभाई अवकाश केंद्र म्हणून ओळखली जाते. पहिले रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी ज्या राष्ट्रांची मदत लागली, त्यांची रॉकेट आज येथून प्रक्षेपित होतात. यातून, ‘अवकाशविज्ञानात भारताची झेप प्रचंड असेल,’ असे भाकीत चिटणीस यांनी भारताच्या १०० व्या अवकाश मोहिमेवेळी काही वर्षांपूर्वी केले होते, जे प्रत्यक्षात येताना दिसते.

विज्ञान संशोधन पुढे जायचे असेल, तर त्यामागे राजकीय नेतृत्व प्रभावीपणे उभे राहण्याची गरज असतेच. चिटणीसांनीच काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत याचे महत्त्व सांगितले होते. त्या वेळच्या सोव्हिएत महासंघाने १९५७ मध्ये ‘स्पुटनिक’चे प्रक्षेपण केले. या घटनेने अमेरिकेला आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावलीच, शिवाय आपण मागे राहून चालणार नाही, हाही संदेश अमेरिकेत पोहोचला. भारतातील वैज्ञानिक हे सर्व पाहत होते. साराभाईंच्या पुढाकाराने अहमदाबादेत उभ्या राहिलेल्या ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’मध्ये त्या वेळी पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेरून येणाऱ्या किरणोत्सर्गांचा आणि त्यामुळे घडत असलेल्या आयनोस्फीअर, कॉस्मिक किरणे अशा घटनांचा अभ्यास सुरू होता. ‘स्पुटनिक’च्या उड्डाणानंतर त्याला आणखी दिशा मिळाली आणि भारत अवकाश कार्यक्रम हाती घेण्याच्या दिशेने गेला. तिसरी पंचवार्षिक योजना तोवर तयार झालेली असल्याने त्यात यासाठी तरतूद नव्हती, पण याचे महत्त्व लक्षात आले ते पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांना. त्यांनी लगेच निधीची व्यवस्था केली. आण्विक आणि अवकाश संशोधन क्षेत्रांत संशोधन करायचे तर अपयशांसाठी तयार राहावे लागते. ती तयारी असणारे विज्ञानप्रेमी राजकीय नेतृत्व असेल, तरच संशोधन पुढे जाते, याचा जिवंत इतिहास चिटणीस यांच्या रूपाने आपल्यात होता. तो ते ‘इस्राो’च्या प्रत्येक यशस्वी कार्यक्रमानंतर सांगत राहिले. विज्ञान संशोधनात पुढे जाण्यासाठी मागच्यांच्या कर्तृत्वाचा हा इतिहास समजून घेणे महत्त्वाचे.

असे चिटणीस नुकतेच शयायुषी होऊन निवर्तले. चिटणीस यांच्या जाण्याने स्वतंत्र भारतातील वैज्ञानिकांच्या पहिल्या पिढीतील एक महत्त्वाचे वैज्ञानिक आपल्यातून गेले, हे समजून घेतले, तर भारतीय अवकाश संशोधनाचा आजच्या तंत्रज्ञान युगाशी सांगड घालणारा किती मोठा दुवा निखळला आहे, हे लक्षात येईल. आज संपर्कजाळे आपल्या जगण्याच्या मूलभूत गरजांपैकी एक गरज बनले असताना, चिटणीस हे ‘इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम’ अर्थात ‘इन्सॅट’ कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्यांपैकी होते, याची आठवण ठेवावी लागेल. सुदूर संवेदन उपयोजने आणि अवकाशाधारित संज्ञापन प्रकल्प उभारण्यात त्यांचे योगदान होते. त्यांच्या या कामातील सहभागामुळे ग्रामीण भारतात दूरचित्रवाणी आणि दूरध्वनी पोहोचण्यास मदत झाली. पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शैक्षणिक बहुमाध्यम संशोधन केंद्र अर्थात ‘ईएमआरसी’ची स्थापना करण्यातही त्यांचा पुढाकार होता. शिक्षणाचे दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सार्वत्रिकीकरण करण्याचा हा प्रयोग होता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशीही ते नंतर संलग्न राहिले. विज्ञान पत्रकारितेला बळकटी देणे हा त्यामागचा उद्देश. एक प्रकारे तंत्रज्ञानाद्वारे बहुतांच्या अंतरी ज्ञान पोहोचवण्याचा वसा घेतलेला हा वैज्ञानिक होता. एखादी व्यक्ती शंभर वर्षे जगते, तेव्हा त्यांच्या शतायुषी जगण्याचे सोहळे होतात, तब्येतीचे रहस्य वगैरेवर मुलाखती होतात. चिटणीसांच्या शंभराव्या वाढदिनी ‘अवकाशविज्ञान, धोरण आणि नवोन्मेषातील अग्रक्रम’ या विषयावर विज्ञान संशोधनात कार्यरत जुन्या-नव्यांची एक परिषद झाली. कारण, त्यांचा शंभरावा जन्मदिन हा केवळ शंभरी साजरे करणे नव्हते, तर भारताच्या विज्ञान दृष्टीचा मागोवा होता. अवैज्ञानिक गोष्टींची भलामण करणाऱ्या आजच्या जगात हे विरळाच. चिटणीसांनी स्वत: संशोधनात काम केलेच, पण जोडीने गुणग्राहक राहून संशोधनात चांगले मनुष्यबळही आणले. डॉ. एपीजे अब्दुल कलामांची ‘नासा’च्या कार्यक्रमासाठी शिफारस करणारे तेच होते. निवृत्तीनंतरही अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.

इतिहास घडवूनही भविष्य साकारायची दृष्टी असलेली माणसे कमी होत असतानाच्या काळात चिटणीस यांचे जाणे नैसर्गिक असले तरी हळहळ निर्माण करते. त्यांच्याच कार्यातून प्रेरणा घेऊन विज्ञान संशोधनासाठीच्या अवकाशाचे आवाहन केवळ यशापुरते नसते- अपयशाचीही तयारी ठेवून संशोधनात पुढे जाण्याचे ते आवाहन असते, हे ओळखण्याची सुबुद्धी आपल्याला मिळणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.