विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून ज्या व्यवसायात जाऊ इच्छितो, त्यासाठीचा कल तपासणे हाच प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यामागचा उद्देश असायला हवा…

परीक्षेचा निकाल चांगला लागला, एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण मिळाले, की आनंद होणे साहजिक. त्यातून ते ९० टक्के किंवा त्याहून अधिक वगैरे असतील, तर विद्यार्थी-पालकांना आकाश ठेंगणे होते. ‘हुशार’ १० टक्क्यांमधील असणे याला सामाजिक प्रतिष्ठेचे एक लोभस वलय आहे. पूर्वी हे अधिक होते; कारण ‘हुशार’ १० टक्क्यांमध्ये परीक्षा दिलेल्यांपैकी जेमतेम एक टक्का असायचे. पण, अलीकडे दहावी-बारावीच्या निकालानंतर असे ‘गुण’वंत गल्लोगल्ली सापडतात. म्हणजे ९० टक्के मिळवणे हे चांगलेच, पण ते मिळवण्याचेही अलीकडे सुलभीकरण झाले आहे की काय, त्याचेही एक ठरावीक सूत्र सापडले आहे की काय, असे वाटावे अशी आजची शिक्षण स्थिती आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ‘सर्वोत्तम पाच’ म्हणजे सहापैकी ज्या पाच विषयांत सर्वोत्तम गुण आहेत, त्यावरून काढलेली टक्केवारी अशा पद्धतीने जाहीर करायला सुरुवात केली तेव्हापासून हे असे ‘गुण’वंत वाढले असल्याची चर्चा होत आहेच. ही निकालात वाढ होत नसून, त्याला सूज येत आहे, असेही शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक ओरडून सांगतात. पण, ‘अमुक पार’, ‘तमुक पार’ वगैरेचे आकर्षण इतके वाढले आहे, की बहुतांना नव्वदीपार म्हणजे गुणवत्ता वाटू लागली आहे. ही सगळी प्रस्तावना करण्याचे कारण म्हणजे चार दिवसांपूर्वी जाहीर झालेला नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात ‘नीट’ या परीक्षेचा निकाल आणि त्यातही भरघोस वाढलेले ‘गुण’वंत. या निकालाने मात्र अनेक प्रश्नचिन्हं आणि काही चिंता उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे त्यावर चर्चा करणे महत्त्वाचे. वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशांसाठी ‘नीट’ ही परीक्षा घेतली जाते. वैद्याकीय अभ्यासक्रमांच्या देशभरातील लाखभर जागांसाठीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा होते, ज्याला यंदा सुमारे २३ लाख विद्यार्थी बसले. यंदाच्या परीक्षेचा निकाल अनेकांसाठी अजूनही ‘अनाकलनीय’ आहे. परीक्षेत ७२० पैकी ७२० गुण मिळवलेल्यांची संख्या ६७ इतकी आहे. त्यानंतरच्या प्रत्येक गुणासाठी एवढी स्पर्धा आहे, की ७२० पैकी ७०० गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीतील क्रमांक १९९३ आहे. हे अत्यंत विचित्र अशासाठी, की देशातील आघाडीच्या दिल्लीतील ‘एम्स’मध्ये १२५ जागा उपलब्ध असताना, तेथील प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्याला ७०० गुण मिळवूनही तेथे प्रवेशाची शाश्वती नाही. आता कोणी म्हणेल स्पर्धा असणे चांगलेच. मान्यही. पण, ती यंदाच अचानक कशी काय सुरू झाली, हा मोठा प्रश्न आहे. बरे, हे फक्त ७२० पैकी ७०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्यांपर्यंत मर्यादित नाही. उदाहरणार्थ, ७२० पैकी ६४८ गुण मिळवलेल्याचा गुणानुक्रम ४०,००० च्या पुढे आहे. याचा अर्थ परीक्षेत ९० टक्के गुण मिळवूनही सरकारी वैद्याकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेलच याची शाश्वती नाही.

Loksatta editorial India Alliance Delhi Devendra Fadnavis Electoral mandate
अग्रलेख: जनादेश-पक्षादेश!
loksatta editorial Akhilesh yadav samajwadi party grand victory in uttar Pradesh lok sabha election
अग्रलेख:  योगी आणि अखिलेश योग!
Loksatta editorial Prime Minister Narendra modi shares boom Market index sensex
अग्रलेख: बाजारबोंबांचा बहर
loksatta editorial on ekanth shinde and ajit camps disappointment over the allocation of cabinet berths
अग्रलेख : उपयोगशून्यांची उपेक्षा!
Loksatta editorial BJP Lok Sabha election results Prime Minister Narendra Modi
अग्रलेख: रघूराज थक्कीत होऊनि पाहे…
legacy of political families in narendra modi led nda cabinet
अग्रलेख : घराणेदार…
accident in pune and dombivli midc blast
अग्रलेख : सुसंस्कृतांची झोपडपट्टी!
loksatta editorial today on recklessness of administration in pune porsche accident case
अग्रलेख : बालिश आणि बिनडोक!

आता हे झाले कसे, या चर्चेमध्ये पेपर फुटल्यापासून निकाल नियोजित वेळेच्या आधी लावल्यापर्यंतच्या शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत. काहींनी न्यायालयातही दाद मागितली आहे. त्यामुळे यंदाच्या ‘नीट’च्या निकालाच्या परीक्षेचा ‘निकाल’ येईपर्यंत त्यावर रान उठत राहणार हे नक्की. पण, त्याही पलीकडे जाऊन एकूणच या परीक्षा व्यवस्थेची जास्त खोलात चर्चा व्हायला हवी. दहावी-बारावीला केवळ पाठांतराने, घोकंपट्टीने भरघोस गुण मिळवणे साध्य होते, असे लक्षात आल्यानंतरच बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश, हे प्रवेश परीक्षेच्या गुणांवर करण्याची व्यवस्था केली गेली. या प्रवेश परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित ठेवताना विद्यार्थ्याला विषयाचे नीट आकलन झाले असेल, तरच उत्तराचा अचूक पर्याय निवडता येईल, अशा पद्धतीने त्यांची रचना असणे अपेक्षित होते. थोडक्यात, ही विद्यार्थ्यांच्या आकलनाची परीक्षा असेल, असे त्यात अध्याहृत आहे. दुर्दैवाने प्रवेश परीक्षांतील उत्तरे सोडविण्याचेही तंत्र विकसित केले गेले असून, त्यातील ‘आकलनाची परीक्षा’ हा उद्देशच मार खाऊ लागला आहे.

गेल्या २०-२५ वर्षांत देशभरात जसजशा अभियांत्रिकी, वैद्याकीय, व्यवस्थापन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नवनव्या प्रवेश परीक्षा निर्माण झाल्या, तसतशी या प्रवेश परीक्षांत ‘हमखास यश’ मिळवून देणारी शिकवणी वर्गांची समांतर व्यवस्थाही निर्माण होत गेली. आता तर या परीक्षांतील यशापयश या व्यवस्थेच्या हातात असण्यापर्यंतची वेळ आली आहे. देशभरात शाखा असलेल्या अनेक शिकवणी वर्गांची आर्थिक उलाढाल काही हजार कोटींपर्यंत असणे, हे त्याचेच निदर्शक. विद्यार्थ्यांना ‘हमखास यश’ मिळवून देणाऱ्या या ‘कारखान्यां’नीच प्रवेश परीक्षा सोडविण्याचे तंत्र विकसित केले. आधीच्या काही वर्षांत आलेल्या हजारो प्रश्नांची हजारो उत्तरे चक्क पाठ करणे, हे यातील प्रमुख तंत्र! दर वर्षी आधीच्या वर्षी झालेल्या परीक्षांतील प्रश्न वेगळ्या पद्धतीने पुन्हा येत असल्याने त्यांचा व्यवस्थित सराव केला, की काम फत्ते. ज्याचा दोन वर्षांत पुरेसा सराव होत नाही, त्याला चक्क ‘ड्रॉप’ घेऊन पुढच्या वर्षीच्या परीक्षेला बसायला सांगितले जाते, तर ज्याचे गुण अपेक्षेपेक्षा कमी येतात, तोही पुन्हा एक वर्ष ‘त्याग’ करून पुन्हा ही परीक्षा देतो. अशा परीक्षा सोडविण्याचे तंत्र माहीत असलेल्या पुनर्परीक्षार्थ्यांमुळेही एकूण ‘गुण’वंतांची संख्या वाढते. या सगळ्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला संकल्पना समजावून सांगणे, त्यातील बारकाव्यांची उकल करणे, त्या संकल्पनेचे प्रत्यक्ष जीवनातील, उद्याोगांतील उपयोजन रोचक पद्धतीने उलगडणे असे काही नसते. अकरावी-बारावीला कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेण्याऐवजी ‘इंटिग्रेटेड’ अशा गोंडस नावाखाली एखाद्या कनिष्ठ महाविद्यालयाशी ‘सामंजस्य’ करार केलेल्या शिकवणी वर्गातच प्रवेश घ्यायचा आणि दोन वर्षे त्या चार भिंतींत, दिलेल्या नोट्सची सकाळ-संध्याकाळ घोकंपट्टी करायची, अशी एक समांतर व्यवस्थाच अस्तित्वात आली आहे. ही व्यवस्था मग ‘गुण’ वाढवून देते, त्यामुळे पालक-विद्यार्थी खूश आणि वाढलेल्या ‘गुण’वंतांची जाहिरात करून दर वर्षी अधिकाधिक ‘गुण’लोभी मिळत असल्याने शिकवणी वर्गही खूश.

या सगळ्यामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतानाच जो आवश्यक आहे, असा खरा कस लागतच नाही. विद्यार्थी जो व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करून ज्या व्यवसायात प्रत्यक्ष जाऊ इच्छितो, त्यात करायच्या कामासाठी लागणारा कल तपासणे हाच प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेण्यामागे उद्देश असायला हवा. तो सोडून प्रवेश परीक्षेचेच सुलभीकरण करून टाकण्याला आपण अप्रत्यक्ष मान्यता दिली आहे. अशाने कसे घडायचे रोजगारक्षम मनु्ष्यबळ? आज वैद्याकीय पदवी अभ्यासक्रम म्हणजे एमबीबीएस पूर्ण करूनही पुरेसे नाही, अशी स्थिती आहे. एमडी, एमएस किंवा तत्सम पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणे ही व्यवसायात स्थिरावण्यासाठीची गरज बनली आहे, पण त्यासाठी असलेली ‘पीजी-नीट’ ही प्रवेश परीक्षा पार करणे अवघड होऊन गेलेले आहे, कारण त्यासाठी अजून काही सूत्र बनलेले नाही! शिवाय, हे ‘मार्केट’ तसे फार लहान असल्याने शिकवणी वर्ग नावाच्या व्यवस्थेला अजून त्याने फारसे खुणावलेलेही नाही. गुणवंत होणे, म्हणजे परीक्षेत गुण मिळवणे नाही. आकलनाचे क्षितिज विस्तारून कौशल्याला पैलू पाडले, तर गुणांचे अस्तित्व जाणवायला सुरुवात होते. आपल्याला मात्र हे समजून घ्यायचे नाही आणि अमलातही आणायचे नाही. पदवी शिक्षणात प्रवेश करणाऱ्यांची पटसंख्या ज्याला ‘जीईआर’ म्हणतात, तो २०३० पर्यंत सध्याच्या २७ टक्क्यांवरून ‘५० टक्के पार’ नेण्याचे देशाचे उद्दिष्ट असल्याचे सहा महिन्यांपूर्वीच शिक्षणमंत्र्यांनी सांगितले होते. यंदाच्या ‘नीट’च्या निकालातील ‘गुण’वंतांची चर्चा होत असताना, हे नेमके कसे ‘पार’ पडणार आहे, असा प्रश्न आहे.

एव्हाना आपण आपल्या दहावी, बारावी, पदवीच्या परीक्षा, अभियांत्रिकी यांचे पुरेसे वाटोळे केलेले आहेच. आज आपले पदवीधर आणि अभियंते किती उच्च दर्जाचे सुमार असतात ते आपण पाहतोच आहोत. त्यानंतर आता घसरगुंडी वैद्याकीयची असे दिसते. म्हणूनच ‘नीट’ नेटके नाही, हा धोक्याचा इशारा आताच द्यायला हवा.