परवेझ मुशर्रफ यांनी कालांतराने ज्या घटनेचे वर्णन ‘आम्हाला त्यांनी चकवा दिलाच’ या शब्दांमध्ये केले; त्या भारताच्या यशस्वी मोहिमेचा आज ४० वा वर्धापन दिन..

भारताने कोणता भूभाग गमावला किंवा जिंकला हा विषय राजकीय मुद्दा बनवण्याची प्रवृत्ती आजची नव्हे. परंतु विद्यामान राजकीय संस्कृतीमध्ये यास अधिक धार आणि काही वेळा विखार प्राप्त झाला आहे हे मात्र नक्की. आतापर्यंत सर्वाधिक काळ राज्य केलेल्या काँग्रेसच्या नेत्यांवर तर, भूभाग किती वेळा गमावले हे ऐकून घेण्याची वेळच अधिकदा येते. या साठमारीत काँग्रेसच्याच अमदानीत एक विलक्षण मोहीम फत्ते झाली याविषयी पाठ थोपटून घेण्याची संधी साधण्याची राजकीय कल्पकता किंवा इच्छाशक्ती या पक्षाच्या सध्याच्या नेत्यांमध्ये अजिबात दिसून येत नाही. अन्यथा आज, १३ एप्रिल रोजी ४० वर्षे होत असलेल्या ‘ऑपरेशन मेघदूत’ या सियाचीन दिग्विजय मोहिमेचे श्रेय राजकीय स्वार्थासाठी तरी घेण्याचा विचार झाला असता. त्याऐवजी भारत-श्रीलंका दरम्यान एका निर्मनुष्य बेटाच्या मालकीबाबत खुलासे करण्यात काँग्रेस नेतृत्व वेळ व्यतीत करत आहे. त्यांनी तसेच करावे याविषयी सत्ताधाऱ्यांनी फेकलेल्या जाळ्यात हे नेते सपशेल अडकत गेले आणि अद्यापही स्वत:ला सोडवून घेण्याचा केविलवाणा खटाटोप करत आहेत. १९४७-४८, १९६२, काही प्रमाणात १९६५ ही सर्व युद्धे व मोहिमांमध्ये काँग्रेसचे कचखाऊ नेतृत्व दिसून आले, असे ठसवणाऱ्यांची आज सत्ता आहे आणि तसे मानणाऱ्यांची चलती आहे. १९७१चे युद्ध हा(च) काय तो अपवाद. पण त्या विजयालाही ‘घर में घूस के मारा’ची खुमारी कुठे? त्यामुळेच ४० वर्षांपूर्वी, सहा हजार मीटर उंचीवरील अतिदुर्गम, अतिप्रतिकूल आणि म्हणून निर्मनुष्य अशा सियाचीन हिमनदी परिसरात, पाकिस्तानी हालचालींची खबरबात लागताच तत्परतेने सैन्य व सामग्रीची जमवाजमव करून, राष्ट्रीय नेतृत्वाच्या संमतीने आणि काही वेळा मार्गदर्शनाने घडवून आणलेल्या ‘ऑपरेशन मेघदूत’विषयी बहुधा विद्यामान काँग्रेस नेते अनभिज्ञ असावेत. आणि तो काळ म्हणजे कचखाऊ नेतृत्वपर्व असल्याचे धरून चालल्यामुळे भाजप नेतृत्वाला या मोहिमेचे सामरिक महत्त्वच उमगले नसावे. आज ७६ किलोमीटर लांबीच्या सियाचीन हिमनदी परिसरावर भारताचे नियंत्रण असून, प्रामुख्याने पाकिस्तान आणि काही प्रमाणात चीनवर ‘नजर’ ठेवण्यासाठी अत्यंत सोयीच्या व उपयुक्त ठिकाणी भारतीय फौजा तैनात आहेत. हे ज्या मोहिमेमुळे शक्य झाले, तिची दखल घेणे आज समयोचित ठरते.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial today marks the 40th anniversary of india successful siachen digvijaya campaign operation meghdoot amy
First published on: 13-04-2024 at 04:40 IST