‘विघटन रोखून’ देशाला गतवैभव मिळवून देण्याची भाषा करणारा, धर्मस्थळी झुकणारा, विरोधकांना संपवणारा नेता मिळाला की ‘समोर आहेच कोण’ असे जनतेला वाटू लागते…

समोर विरोधक नावालाही नसलेल्या निवडणुकीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे ८७ टक्के मते पडून ‘विजयी’ झाले. पुढील काळात उरलेल्या १३ टक्क्यांची मते का मिळाली नाहीत आणि मुख्य म्हणजे ते १३ टक्के कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न पुतिन करणारच नाहीत, असे नाही. गेल्या पाच निवडणुकांत ते अशाच मताधिक्याने निवडून आले. त्या निवडणुकांत त्यांचे जे काही विरोधक होते ते नंतरच्या निवडणुकांत दिसेनासे होत गेले. एक सरळ क्रेमलिनसमोर गोळ्या घालून मारला गेला तर दुसरा तुरुंगात अचानक कोसळला. आणखी कोणी लंडनच्या उद्यानात विषबाधेने गेले तर कोणाचा मृतदेह परदेशातील त्याच्या निवासस्थानाच्या न्हाणीघरात आढळला. अर्थात यातील कोणाही हत्येचे मारेकरी कधीही सापडले नाहीत आणि त्यांचा शोध घेण्याची, त्यांस शासन केले जावे याची गरज बहुतांश सामान्य रशियनांस वाटली नाही. या सामान्य रशियनांचा पुतिन यांच्यावर विश्वास आहे. ते आपल्या देशास पुन्हा गतवैभव आणून देतील यावर या नागरिकांची श्रद्धा आहे. असे हजारो, लाखो नागरिक पुतिन यांच्या या निवडणूक विजयाने भारावून जात क्रेमलिनसमोर गर्दी करते झाले. आपल्या चाहत्यांचे हे प्रेम पाहून त्यामुळे पुतिनही भारावून गेले आणि मग त्यांनी उपस्थितांस रशिया जर पुन्हा कधी महान होणारच असेल तर ते फक्त मीच कसे करू शकतो यावर मार्गदर्शन केले.

मराठीतील सर्व संपादकीय बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta editorial vladimir putin won russia presidential election with nearly 88 percent of the vote amy
First published on: 20-03-2024 at 00:08 IST