आताआतापर्यंत माणसे हसण्यासाठी भेटत. प्रयोजन शोधत. आता रडण्यासाठी भेटतात आणि कारणे शोधतात… तीही पैसे खर्चून असे दिवस आले की काय?

इतरांच्या आनंद व दु:खात सहभागी वा समरस होणे ही मानवी मनाची एक अवस्था. वास्तवात असे प्रसंग घडतात तेव्हा त्याचे कुणाला आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. मात्र, हीच गोष्ट एखाद्या कलाकृतीच्या संदर्भात घडत असेल तर त्याची चर्चा स्वाभाविक. याच चर्चेतून मग अनेक प्रश्न जन्म घेतात. ती कलाकृती खरोखर अस्सल वाटावी अशी आहे का? प्रेक्षकांच्या भावनांना हात घालण्याची तिची क्षमता खरोखर सखोल आहे की उथळच? ती वास्तवाच्या जवळ जाणारी आहे का? तिच्या प्रतिपादनात तार्किकता आहे का? यापैकी काहीही नाही तरी प्रेक्षक व त्यातल्या त्यात तरुण वर्ग धाय मोकलून रडत असेल तर त्यामागची नेमकी कारणे काय? हा प्रश्न उपस्थित होतो तो सध्या गाजत असलेल्या एका हिंदी चित्रपटाच्या बाबतीत.

हा चित्रपट सध्या चर्चेत आहे तो चित्रपटगृहातल्या सामूहिक रुदनामुळे. हे रडणे, त्याची छायाचित्रे वा चित्रफिती समाजमाध्यमावर पोस्टवल्या जाताहेत. रडणे, रडण्याचा अतिरेक होऊन रुपेरी पडद्यासमोर शर्ट काढून गडाबडा लोळणे हे प्रकार तसे चक्रावून टाकणारे. सामूहिक उत्तेजनेची साक्ष पटवणारे. हे बघून आणखी काही प्रश्न निर्माण होतात. या चित्रपटात असे वेगळे काय की तरुणाईला तो इतका आवडावा? प्रत्यक्षात त्याची पटकथा तर प्रेमातले अडथळे या जुन्याच वळणावर जाणारी.

कोणत्याही हिंदी सिनेमात येतो तसा ‘मोड’ याही चित्रपटात येतोच. प्रेयसीला म्हणे तरुण वयात स्मृतिभ्रंशाचा आजार होतो. मग तिला सांभाळताना प्रियकराची होणारी फरपट. खूप वर्षांपूर्वी येऊन गेलेला कमल हसन व श्रीदेवी यांचा ‘सदमा’ असाच. तो बघून त्या वेळचे प्रेक्षक अस्वस्थ जरूर झाले पण असे रडण्याचे प्रयोग तेव्हा काही रंगले नाहीत. त्याआधीच आलेला ‘एक दूजे के लिए’ बघून काही प्रेमवीरांनी आत्महत्या केल्या होत्या म्हणतात, पण त्या चित्रपटगृहाच्या बाहेर. या दोन्हीच्या तुलनेत ‘सैयारा’ यथातथाच आणि अतार्किकसुद्धा. ‘सदमा’मध्ये श्रीदेवीची स्मृती अपघाताने जाते. इथे अपघात वगैरे काही नाही. मुळात काहीही कारण नसताना तरुण वयात स्मृतिभ्रंशाचा आजार होत नाही. वृद्धापकाळाने येणाऱ्या विस्मरणातून, मेंदूची कार्यक्षमता कमी होऊन हा आजार बळावतो, हे वैद्याकशास्त्राने सिद्ध केलेले आहे. इथे तपशिलातच एवढी मोठी चूक असतानासुद्धा सध्याची उच्चशिक्षित म्हणावी अशी तरुणाई इतकी वेडी का झाली असेल? याचे उत्तर शोधल्यास आजच्या या पिढीला भेडसावणाऱ्या मानसिक ताणतणावाचे प्रश्न समोर येतात. ही तरुणाई १९९८ नंतर जन्मलेली ‘जेन-झी’ म्हणून ओळखली जाणारी. या पिढीच्या वाढत्या वयात जगात डिजिटल युग अवतरलेले होते. अगदी लहानपणापासून मोबाइल, इंटरनेटच्या सान्निध्यात वाढलेल्या या पिढीच्या हातात अवघे जग लहानपणीच आले. त्यात एकत्र कुटुंबव्यवस्था कालबाह्य ठरलेली. साहजिकच पारंपरिक व्यवस्थेला छेद गेलेला. असे तंत्रज्ञानाच्या मदतीने जगणे, मोठे होत जाणे आयुष्यात एकटेपणा आणत असते. त्यातून अनेक समस्या उद्भवत असतात. पटकन एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे, चटकन भावनाशील होणे, मानसशास्त्रात याला ‘इन्स्टन्ट ग्रॅटिफिकेशन’ म्हणतात. हा चित्रपट या समस्याग्रस्त पिढीच्या भावना विरेचनाला हात घालतो का? ‘सैयारा’ हा तद्दन अशास्त्रीय घटनाक्रम मांडणारा असूनही तरुणाईच्या मानसिक जखमांवरील खपली काढण्यात यशस्वी ठरला का? अलीकडे चित्रपट चालावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारची प्रचारतंत्रे अवलंबली जातात. समाजमाध्यमातून समूहाची उत्तेजना वाढवणे हा याच तंत्राचा एक भाग. प्रेक्षक रडतानाच्या चित्रफिती तयार करणे, त्याचा प्रसार करणे असे अनेक प्रयोग अलीकडे सर्रास केले जातात. त्याला ही हुशार पिढी बळी पडली असे समजायचे काय? आजकाल कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला खूप, पण खरी बुद्धिमत्ता कृत्रिमरीत्या दुसरीकडे वळवण्याचा हा प्रकार धोकादायक म्हणायचा का? प्रचारतंत्र पद्धतशीरपणे राबवून लोकांच्या भावनांशी खेळणे हे सध्या नेहमीचेच. ही मुले याला बळी पडत स्वत:च्या भावनांशी खेळू देत असतील तर ते चांगले की वाईट? या प्रश्नांसोबत नव्या पिढीत आढळून येणाऱ्या लक्षणांचाही विचार यानिमित्ताने होणे आवश्यक.

ही तरुणाई प्रेमभंगसुद्धा ‘सेलिब्रेट’ करणारी. पटकन प्रेमात पडणारी व झटकन त्यातून बाहेरसुद्धा पडणारी. भावनांपेक्षा शब्दांवर जास्त विश्वास ठेवणारी. यांच्या प्रेमाच्या संकल्पनासुद्धा वेगळ्या. त्यातून सोबती वा सहचर शोधण्याचे २४० प्रकार या पिढीने विकसित केलेले. प्रेमासाठी केवळ भिन्नलिंगी व्यक्तीच हवी ही संकल्पना यांनी कालबाह्य ठरवलेली. कपडे, पाळीव प्राणी, झाड, फळ, फुले हेही या पिढीने अनेकवार सिद्ध केलेले आहे. या सगळ्यांच्या आयुष्यात कृत्रिमतेला, प्रदर्शनाला महत्त्व आहेच. या पार्श्वभूमीवर भावना उद्दीपित होण्यासाठी या साऱ्यांना एखादा बोलपटही कारण ठरू शकतो. याचा अर्थ नेमका कसा काढायचा? पूर्वी चित्रपट बघताना रडू आले तर प्रेक्षक स्वत:ला लपवण्याचा प्रयत्न करायचा. आता रडतानाची छायाचित्रे काढण्याची टूम आलेली. ‘होय आम्ही रडलो’; आम्ही हसलो, आम्ही जेवलो- आज मधल्या वेळी अमुक खाल्ले… याचे जणू पुरावे गोळा करून ते तातडीने प्रदर्शित करण्याची पद्धत रूढ होते आहेच. हे प्रदर्शन नेमकी कोणती मनोवस्था दर्शवते? मध्यंतरी ‘छावा’ नावाचा चित्रपट आला व गाजला. त्यातही प्रेक्षक उद्दीपित होऊन ओरडायचे. काहींनी तर त्यात दाखवलेल्या एका प्रसंगाचा आधार घेत मध्य प्रदेशात जाऊन शिवकालीन नाणी शोधण्याचा प्रयत्न केला. या ‘छावा’चा तेव्हा एवढा प्रभाव पडला की एका अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्यातून दंगलसुद्धा उद्भवली. ‘केरला स्टोरी’च्या वेळी हेच घडले. एकेकाळी दक्षिणेत चित्रपटावरून समाजमनाची उलथापालथ घडण्याचे प्रकार व्हायचे. पण त्यामागे नायक-पूजन अर्थात अभिनेताभक्ती हे महत्त्वाचे कारण होते. आता तोच रोग देशभर पसरू लागला असे समजायचे काय? हे समाजस्वास्थ्यासाठी चांगले लक्षण खचितच नाही. समाजात पिढीगणिक परंपरा, चालीरीती बदलतात. मनुष्यस्वभावाची नवनवी परिमाणे स्थापित होत जातात. हा जर सामाजिक ऱ्हासाचा प्रकार असेल तर तो डिजिटल युगामुळे घडला असा निष्कर्ष आता काढायचा काय? बुद्धीचे सारे काम ‘एआय’ करीलच- आपण फक्त भावनांचे प्रदर्शन करायचे, असे याहीनंतरच्या पिढीला वाटेल का? पण हा प्रश्न फक्त या पिढीचा आहे की तो साऱ्या समाजाचाच?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणजे कोणा एका गुरूंच्या सांगण्यावरून अंगात आल्यासारखा नाचणारा-रडणारा जनसमुदाय आणि संपूर्ण अशास्त्रीय गृहीतकावर आधारित कथेच्या भावनावेगात चित्रपटगृहात अश्रूंचे पाट वाहणारे हे वेडगळ… हे आजच्या आपल्या समाजाचे चित्र. पूर्वी असे रडणे/ घुमण्यासाठी धार्मिक कारण असे. आता धार्मिक कारण अस्तित्वात आहेच; पण त्यास सामाजिकही जोड मिळालेली दिसते. म्हणजे काळानुरूप प्रगतीच्या आधारे माणसाचे रडणे कमी होण्याऐवजी त्याचे रडणे आता दुप्पट झाले म्हणायचे. वर हे रडण्यासाठी दाम मोजण्याइतका तो सधनही आहे, हे विशेष. आताआतापर्यंत माणसे हसण्यासाठी भेटत. प्रयोजन शोधत. आता रडण्यासाठी भेटतात आणि कारणे शोधतात!

परिस्थितीने पिचलेल्या आरती प्रभू यांना त्या वेळी ‘कसे? कसे हासायाचे? हासायाचे आहे मला’ असे विचारावेसे वाटले. हे आजचे पिचके प्रभू ‘‘कसे कसे रडायाचे’’ असे विचारत हिंडतात!