अवतीभवती सगळे विज्ञानमय वातावरण असताना खरे तर आपणच सरकारला सांगायला
हवे की कशाला हवी ती दरवर्षी होणारी भारतीय विज्ञान परिषद?
दरवर्षी जानेवारीत होणारी भारतीय विज्ञान परिषद म्हणजेच इंडियन सायन्स काँग्रेसचे यंदाचे १०९ वे अधिवेशन पुढे ढकलले गेले म्हणून काही नतद्रष्ट मंडळी टीका करत आहेत. करोत बापडी, आपण त्यांच्याकडे कशाला लक्ष द्यायचे? कारण २०२१, २०२२ ही कोविडची दोन वर्षे वगळता १९१४ पासून अखंडपणे ही अधिवेशने सुरू आहेत, त्याचे त्यांनी कधी कौतुक केले आहे का? निधीच्या कमतरतेमुळे २०२४ चे विज्ञान अधिवेशन पुढे ढकलले गेल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. आता पैशांअभावी सरकारने असा निर्णय घेतला असेल तर त्यात काय चुकीचे आहे? महागाई सतत वाढते आहे. सगळ्याच गोष्टींचे दर आकाशाला भिडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वसामान्य माणसे नाही का एखादा खर्च पुढे ढकलत? कुणी घरखरेदी पुढे ढकलते, कुणी घरासाठीची एखादी मोठी खरेदी नंतर करू म्हणत मन मारते, कुणी एखादी सहल नंतर कधी तरी करू असे म्हणून घरीच बसते, तर कुणी अगदी लग्न वगैरेही पुढे ढकलून मोकळे होतात. आपल्याला महागाई आहे तर तशी ती सरकारलाही असणारच ना? नाही झाली पैशांची तजवीज म्हणून सरकारने एखादा कार्यक्रम ढकलला पुढे तर आपण नाही समजून घ्यायचे तर दुसरे कोण समजून घेणार?
पण नाही, सरकारविरोधकांना दुसरा काही उद्याोगच नसावा बहुतेक. एखाद्या गोष्टीची कावीळ झाल्यासारखेच त्यांचे हे वागणे आहे. जे झाले नाही किंवा केले जात नाही त्याबद्दलच सतत बोलत राहणे याला छिद्रान्वेषीपणा म्हणतात. म्हणजे समोर आकाश असले तरी त्यात काही छिद्र दिसते का ते पाहत बसणे. असेच करतात ही मंडळी. १०७ वर्षे नेमाने होत असलेले अधिवेशन यांना दिसते, पण गेल्या ७० वर्षांत कधीही उभे न राहिलेले अयोध्येतले मंदिर आता आकाराला आले आहे हे त्यांना दिसत नाही. येत्या २२ जानेवारीला होऊ घातलेली त्याची प्राणप्रतिष्ठा त्यांना दिसत नाही. खरे तर त्यांना काहीच दिसत नाही. सरकारने दाद न दिल्यामुळे भले विज्ञान अधिवेशन पुढे ढकलले असेल, पण या सरकारचे विज्ञानाशी किती जवळचे नाते आहे ते कधी नीट डोळे उघडे ठेवून बघितले आहे का? ते न बघताच या सरकारचे धार्मिक गोष्टींशी नाते जोडून मोकळी होतात ही मंडळी. पण हे सरकार आहे भाजपचे. या पक्षाचे नाते आहे हिंदू धर्माशी आणि हिंदू धर्मात तर विज्ञान अगदी ओतप्रोत भरले आहे. जगण्यामधल्या प्रत्येक गोष्टीचा हिंदू धर्माने विज्ञानवादी विचार केला आहे आणि तोही आज किंवा काल नाही तर गेल्या हजारो वर्षांपासून. मग हिंदू धर्माशी नाते सांगणाऱ्या पक्षाच्या सरकारने एखादे विज्ञान अधिवेशन पुढे ढकलले तर असेल तेवढेच सबळ कारण असा विचार करायचा की सुरू व्हायचे? इस्लामी देशांमध्ये अशी अधिवेशने होतच नाहीत, हे दडवून का म्हणून ठेवतात ही प्रसारमाध्यमे?
किती विज्ञानवादी गोष्टी अगदी प्राचीन काळापासून आपण जगाला दिल्या आहेत… गणितातील शून्याचा शोध ही आपली जगाला देणगी नव्हे काय? ती विज्ञानवादी नाही असे कोणत्या तोंडाने म्हणता येईल? प्राचीन काळात सुश्रुत मुनींनी शंभराहून जास्त प्रकारची उपकरणे वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्याची उदाहरणे आपल्याकडे आहेत. पण रामायणातील पुष्पक विमान कसे विसरता येईल? बाकीचे जग खातेऱ्यात पडले होते, तेव्हा आपल्या देवदेवता विमानाने फिरत होत्या, तेव्हाच आपण विमानाचा शोध लावलेला होता ही मोठी गोष्ट नाही का? आपल्या आयुर्वेदाचे, योगाचे उपकार तर जग अजूनही विसरायला तयार नाही. ते विज्ञान नाही असे कसे म्हणता येईल? महाभारतातील कौरव हे तर टेस्ट ट्यूब बेबी नव्हते असे कुणीही म्हणावे. आपल्याकडे पुराणकाळात आकाशवाणी होत होती. एखादा देव किंवा देवी अचानक प्रकट होत असे. मोबाइल सुविधा आणि ओबी व्हॅनसारख्या यंत्रणांशिवाय हे सगळे कसे शक्य होते? नारद मुनी तर तिन्ही लोकी सहज संचार करत. दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधांशिवाय ते कसे शक्य होते? हनुमानाने उड्डाण करून लंका गाठली होती. नंतर पुन्हा लंकेहून उड्डाण करून हिमालयात जाऊन संजीवनी बुटी हवी म्हणून अख्खा द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला होता. म्हणजे विमानाशिवायही एकेकट्याने उड्डाण करण्याचे कौशल्य आपल्याला अवगत होते. रामायण-महाभारतकालीन युद्धातील शस्त्रांची वर्णने वाचल्यावर शस्त्रास्त्रनिर्मितीत आपण किती पुढे होतो आणि आजच्या अण्वस्त्रांच्या तोडीस तोड शस्त्रे त्या काळात कशी निर्माण करत होतो, हे कसे विसरावे? नीट विचार करून पाहा बरे, आपले आहारशास्त्र किती विज्ञानवादी आहे ते. आजच्यासारखी कोणतीही साधने उपलब्ध नसताना आपण केलेल्या खगोलशास्त्राचा अभ्यास, त्यातून मांडलेले निष्कर्ष महत्त्वाचे नव्हते? आणि त्याबरोबरच विकसित झालेले ज्योतिषशास्त्र विज्ञान नाही असे कोण म्हणते? गोमूत्र, शेण, त्यातील औषधी गुणधर्म यांचा आजच्या काळातही नव्याने वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे आवश्यक आहे, असे फक्त आपण भारतीयच म्हणू शकतो, यात चुकीचे ते काय आहे?
कारण दारात तुळस असणे आणि तिच्यासमोर रोज दिवा लावणे यातदेखील विज्ञान शोधणारी माणसे होतो आपण एके काळी… पण मधल्या ७० वर्षांत आपण आपला इतिहास विसरलो, आपल्या परंपरा विसरलो, आपले विज्ञान विसरलो आणि कुठल्या कुठे भरकटत गेलो. आपल्याला वाटत होते की आपण आधुनिकतेची वाट चालत आहोत. पण ते तसे नव्हतेच. आपण मुळात आधीपासूनच आधुनिक होतो. अगदी प्राचीन काळापासून आपण आधुनिक होतो. पण ते सगळे पूर्वसंचित विसरून पाश्चात्त्यांच्या नादाने भरकटलो होतो. जे आपले नव्हतेच, त्याला ओढूनताणून आपले म्हणत बसलो होतो. त्यातून निर्माण झालेला गोंधळ निस्तरून आता कुठे आपली गाडी रुळावर येेते आहे. काही ठिकाणी ज्योतिषाचा शास्त्र म्हणून अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. गोमूत्र कसे औषधी आहे यांवर संशोधन सुरू आहे. कुठल्या कुठल्या विद्यापीठांमध्ये आदर्श सून होण्यासाठी काय करायला हवे याचे अभ्यासक्रम आखले जात आहेत. याशिवायही आपल्या प्राचीन काळातल्या आधुनिकपणाची, विज्ञानवादाची किती तरी उदाहरणे आहेत. आपण हे सगळे विसरू नये म्हणून आजकालची वेगवेगळ्या ठिकाणची राजकीय मंडळी आपल्याला त्यांची सातत्याने आठवण करून देत असतात.
आपल्या अवतीभवती असे सगळे विज्ञानमय वातावरण असताना खरे तर आपणच सरकारला सांगायला हवे की कशाला हवी ती दरवर्षी होणारी भारतीय विज्ञान परिषद? गेल्या वर्षीच्या परिषदेवर म्हणे पाच कोटी रुपये खर्च झाले. आपल्याकडे विज्ञानाची इतकी प्राचीन परंपरा असताना आपल्याला असा वायफळ खर्च करण्याची गरजच काय आहे? काही संशोधकांनी कुठे तरी जमून कसल्या तरी संशोधनांचे पेपर वाचत बसणे आता फक्त पुढे ढकलू नका, ते बंदच करून टाका कायमचे… त्यात काहीही राम राहिलेला नाही. स्वत:ला रामाचा दास म्हणवणाऱ्या रामदासांनीही सांगितलेच आहे की ‘नसे राम ते धाम सोडोनि द्यावे…’ आणि अगदी खरे सांगायचे तर विज्ञान विज्ञान ते काय आहे? ते जसे इस्राोच्या नवनव्या उड्डाणांमध्ये आहे तसेच तेअयोध्या धामच्या भव्य उभारणीतही आहे. ते सर्वांनी समजून घेणे, हेच आजच्या काळातल्या रामराज्याचे लक्षण!
