चैतन्य प्रेम

आपलं जीवन नेहमीच सुख-दु:खानं भरलेलं आहे. एका भीषण रोगानं जगभर थैमान घातलंय तेव्हापासून जीवनाची अनिश्चितता तीव्रपणे जाणवू लागली आहे. सर्वसामान्य माणसांचं सोडा, जे थोडीबहुत साधना करीत होते त्यांच्यातही साधनेबद्दल सजगता आली आहे. पण असं पाहा, आज वैश्विक रोगसंकटामुळे जगण्यातली अनिश्चितता स्पष्टपणे उमगत आहे; पण हा रोग नव्हता तेव्हा तरी जगण्याची शाश्वती कुठे होती? अर्थात, कोणत्याही काळी जगण्याची ठाम शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. जगण्यातली अनिश्चितता कधीच लोपत नाही. मग मृत्यूच्या भीतीनं भेदरून जगावं की जगण्याची संधी मिळाल्याच्या आनंदात जीवनाचं सार्थक करीत जगावं, याचा निर्णय आपण आपल्या मनाशी घेतला पाहिजे. जर खरं आनंदात आणि अर्थपूर्ण जगायचं असेल, तर मग अधिक डोळस होऊन, अधिक अंतर्मुख होऊन जीवनाकडे पाहिलं पाहिजे. हे जीवन कसं आहे? ते दृश्य आणि अदृश्य, अर्थात सूक्ष्म आणि स्थूल, नित्य आणि अनित्य यांचा संयोग आहे. भौतिक प्रपंच हा स्थूल आहे, दृश्य आहे.. आणि हो, तो अनित्यही आहेच! अनित्य म्हणजे तो जसा या घडीला आहे, तसाच कायमचा राहात नाही. अहो, साधा स्वत:चा विचार केला तरी जाणवेल की, आपला जो देह आहे त्यातही जन्मापासून किती परिवर्तन झालं आहे! शक्ती-क्षमता विकसित होत हळूहळू क्षीण होत लोपत आहेत. अगदी त्याचप्रमाणे प्रपंचातल्या सर्वच वस्तुमात्रांचं आहे. घर घेतलं. छान रंग दिला. काही वर्ष गेली की तो नवेपणा ओसरतोच ना? तेव्हा स्थूलातलं, दृश्यातलं भौतिक जीवन अनित्य आहे. पण या जीवनाचं मूळ ज्या अदृश्यात आहे, सूक्ष्मात आहे ते नित्य आहे! आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मोठय़ा प्रेमानं काही वस्तू भेट म्हणून देतो. ती वस्तू कालौघात नष्ट होते, पण प्रेमभावना नष्ट होत नाही. अगदी असंही पाहा, आज ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्याशीच बेबनाव झाला, तर प्रेमाच्या नात्यात खंड पडतो. पण म्हणून प्रेम करण्याची जी मूळ सूक्ष्म भावना आहे ती खंडित होत नाही. ती नित्यच असते. आता थोडं आणखी खोलवर जाऊ. माणूस दुसऱ्यावर प्रेम का करतो? तर त्यालाच प्रेमाची ओढ असते, इतरांकडून प्रेमाची अपेक्षा असते! आपल्यावर जगानं प्रेम करावं, असं त्याला वाटत असतं आणि म्हणूनच तो इतरांवर प्रेम करतो. ही प्रेमाची भूक तरी माणसाला का आहे? तर प्रेमात दोनपणा असूनही द्वंद्व नाही! उलट हा दोनपणाही विलय पावून जेव्हा केवळ ऐक्य होतं, तीच प्रेमाची खरी अवस्था असते. म्हणजेच खऱ्या प्रेमात तृप्ती आहे, ऐक्य आहे, समाधान आहे, आनंद आहे. म्हणजे माणसानं प्रपंचाचा जो सर्व पसारा मांडला आहे ना, त्याचा एकमात्र हेतू आनंद मिळावा हाच आहे! प्रपंच आनंदाचा असावा, असं माणसाला प्रामाणिकपणे वाटतं. जगणं आनंदाचं असावं, असं वाटतं. पण तरी तो आनंद काही गवसत नाही. गवसला तरी टिकत नाही आणि तो टिकला तरी आपला टिकाव लागेल, याची काही शाश्वती नाही! ही जी अनिश्चितता आहे, तिचाच सल माणसाच्या अंतर्मनात कायमचा आहे. यावर मात करायची, तर एकच उपाय आहे. जो नित्य आहे त्याचाच आधार घ्यायचा! अनित्यात राहायचं, अनित्याचा स्वीकारही करायचा; पण अनित्याची ओढ मनाला लावायची नाही. त्या अनित्यातील जे नित्य आहे, त्याकडेच लक्ष केंद्रित करायचं. त्या नित्याचीच ओढ मनात ठेवायची. त्या नित्याच्या आधारासाठी नित्योपासना करायची!