– चैतन्य प्रेम
सद्गुरूशी ऐक्य पावण्याची काय गरज आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याआधी या ऐक्यतेचा कोणता मार्ग आहे, तो आधी पाहू. आता समजा काशी क्षेत्री काही कार्यक्रम आहे. त्यासाठी लोकांना बोलावलं आहे. तर जे दूर प्रांतात राहतात, त्यांना काशीपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल. मग कुणी रेल्वेनं येतील, कोणी विमानानं येतील, तर कोणी वाहनानं येतील. काशीतच जो राहतो, तो सर्वात लवकर येईल. त्याचप्रमाणे सद्गुरूशी ऐक्य पावण्यासाठी प्रथम सद्गुरूंचा अनुग्रह व सहवास घडला पाहिजे. मग त्यासाठी जो तो जिथे जिथे असेल, तिथून त्या त्या कालावधीनुसार पोहोचेल. जो सद्गुरूंच्याच गावी राहतो, तो सर्वप्रथम पोहोचेल! बरोबर ना? पण इथं थोडी मेख आहे. कारण हे ‘पोहोचणं’ आंतरिक आहे. तळमळ हेच त्यासाठीचं मुख्य साधन आहे! ज्याची तळमळ अधिक, तो भले मनोवृत्तीनं, वागणुकीनं, स्वभाव आणि मनोधर्मानं सद्गुरूंपासून अनंत योजने दूर का असेना, पण सद्गुरू त्याला वेगानं जवळ करतील. त्याउलट जो जवळच असूनही तळमळीच्या दृष्टीनं अनंत योजने दूर भरकटत असेल, त्याला जवळ असूनही लाभ मिळणार नाही. ‘उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे’ अशीच त्याची गत होणार! तर. आंतरिक भावानुसार जो जिथं आहे तिथून सद्गुरूपाशी, परम तत्त्वापाशी पोहोचण्याची प्रक्रिया या ‘एकनाथी भागवता’च्या श्रवणानं सुरू होणार आहे. ही प्रक्रिया कशी असेल? या ग्रंथाच्या फलश्रुतीत ती स्पष्ट मांडली आहे. एकनाथांच्या अक्षरसेवेनं प्रसन्न होऊन सद्गुरू जनार्दन महाराजांनीच हे वरप्रदायक उद्गार काढले आहेत. ते असे : ‘‘ग्रंथ सिद्धी पावेल यथार्थी। येणें सज्ञानही सुखी होती। मुमुक्षू परमार्थ पावती। साधक तरती भवसिंधू।।५३७।। भाळे भोळे विषयी जन। याचें करितां श्रवण पठण। हरिभक्त होती जाण। सन्मार्गी पूर्ण बहुत होती।।५३८।।’’ (अध्याय ३१ वा). म्हणजेच, ‘जे ज्ञानासह जीवन जगत आहेत, ते या ग्रंथाच्या श्रवणानं भगवद्प्रेमभाव जागृत होऊन सुखी होतील, तृप्त होतील. जे मुमुक्षू आहेत- म्हणजे मुक्तीसाठी प्रयत्नरत आहेत, त्यांना खरा परमार्थ कोणता ते उमगेल व त्यांची खरी वाटचाल सुरू होईल. जे साधक आहेत, ते भवसागर पार करतील. अर्थात जीवन्मुक्त होतील, जगत असतानाच मुक्तीसुख अनुभवतील. जे विषयांत रुतलेले आहेत, पण वृत्तीनं सरळ आहेत, अशांच्या अंत:करणात भक्तीचं बीज अंकुरेल आणि ते सन्मार्गानं चालू लागतील.’ आता हाच क्रम नीट लावल्यावर समजेल की, या ग्रंथपठणानं सामान्यजन सन्मार्गाला लागतील. भक्तीपथावर वाटचाल करीत असताना ते मुमुक्षू होतील. मग त्यांना खरा परमार्थ उमगेल. त्या मार्गानं साधना करीत गेल्यावर या ग्रंथाच्या श्रवणानं, अर्थात सद्गुरूबोधानुरूप आचरणानं ते भवसागर पार होतील- म्हणजे आपल्याच भ्रामक भावनांच्या ओढीतून मुक्त होतील. सद्तत्त्वाचं खरं ज्ञान त्यांना होईल आणि हृदयात भक्तीप्रेम उत्पन्न होऊन ते अखंड पूर्णतृप्ती अनुभवतील! म्हणजे या ग्रंथाच्या श्रवणानं मनोभावानुसार जो ज्या ठिकाणी असेल, तिथून त्याला गती मिळेल आणि तो अग्रेसर होत राहील. पण तरीही या प्रत्येक टप्प्यावर म्हणजेच बद्धाचा मुमुक्षू, मुमुक्षूचा साधक आणि साधकाचा ज्ञानी झाला, तरी या ‘ग्रंथश्रवणा’चं बोट सुटता कामा नये! अर्थात, ‘श्रवण म्हणजे ऐकलेलं आचरणात आणणं’ हे सूत्र लक्षात घेतलं तर सद्गुरूबोधानुसारचं आचरण सुटता कामा नये. ते सुटलं तर सिद्धाचाही बद्ध व्हायला क्षणभराचादेखील वेळ लागत नाही!