– चैतन्य प्रेम

आत्मजागृतीची इच्छा मनात जागण्याचा क्षण हा जीवन सार्थकी लावणारा योग असतो! भौतिक परिस्थिती मनाजोगती करण्यासाठी अविरत धडपडणारा माणूस भगवद्कृपेनं अंतर्मुख होतो. आपल्या जन्माचा, जीवनाचा आणि जगण्याचा विचार करू लागतो. या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं. प्रारब्धानुसार आपला विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट समाजात आणि कुटुंबात जन्म झाला. जन्मानुसारचं जीवन वाटय़ाला आलं. म्हणजे जन्म गरिबीशी संघर्ष करीत असलेल्या घरात झाला की कित्येक पिढय़ा काही न करता चैनीत जगतील, अशा घरात झाला? समृद्ध देशात झाला की यादवीनं पोखरलेल्या, हिंसाचारानं बरबटलेल्या देशात झाला? तर जन्म जसा झाला त्यानुरूपचं जीवन वाटय़ाला येतं, पण जीवन कसंही असलं, तरी जगणं आपल्या हाती असतं! कसं जगावं, हे ठरविण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. म्हणूनच तर, जन्म अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत होऊनही एखाद्याचं जगणं संपन्न आणि प्रेरक असू शकतं, तर जन्म वैभवसंपन्न घरात होऊनही एखाद्याचं जगणं अत्यंत हिणकस असू शकतं. तर आपला जन्म, जीवन आणि जगणं याचा अंतर्मुख होऊन विचार सुरू झाला, की ‘मी कोण’ हाच विचार सुरू होतो. ही ठिणगीच असते जणू. ती विझली नाही, म्हणजेच हा विचार मनातून सुटला नाही, तर ती ठिणगी प्रदीप्त होत जगण्यातलं जे जे हिणकस आहे, ते ते नष्ट करीत जाते. ही प्रक्रिया सत्पुरुषाच्या सहवासात वेगानं सुरू होते. खरं तर आकारभिन्नत्वातही सर्वत्र एकच परमतत्त्व व्यापून आहे. किंबहुना या जगातल्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही गोष्टी माणसाच्याच आंतरिक तपासणीसाठी आणि शिकवणुकीसाठी आहेत. आपल्याला हे उमजत नाही. आपण आकारवैविध्यात आणि चांगल्या-वाईटाच्या भेदात अडकून पडतो. अवधूत सांगतो, ‘‘का छायामंडपींच्या चित्रासी। दीपप्रभा भासे जैसी। राम रावण या नांवेंसी। दावी जगासी नटनाटय़।। ५०७।। तैशा नानाविध व्यक्ती। नाना मतें नाना कृती। तेथ प्रवेशोनि श्रीपती। सहजस्थितीं नाचवी।। ५०८।।’’ म्हणजे, चित्रे दाखविण्याच्या मंडपात दिव्याच्या प्रकाशाने चित्रे दिसतात आणि राम-रावण इत्यादी नावांनी जगाला खेळ करून दाखवतात. परमेश्वरही त्याचप्रमाणे नाना प्रकारचे प्राणी, नाना मते, नाना आकृती यांत प्रवेश करून सर्वाना सहजतेनं नाचवतो. आता इथं ‘चित्रे दाखविण्याचा मंडप’ आणि ‘प्रकाशाच्या साह्य़ाने दिसणारी चित्रे’ हा उल्लेख थोडा कुतूहल जागवणारा आहे. पण चित्रांमार्फत राम आणि रावण युद्धाची कथा लोकांना दाखवली जात असावी, असं गृहीत धरायला हरकत नाही. पण प्रभू रामांचं असो की रावणाचं असो; दोन्हीही चित्रंच असतात. एक सद्गुणांचा प्रतिनिधी, तर दुसरा दुर्गुणांची परिसीमा. पण दोन्ही चित्रं ज्या एकाच कागदावर, एकाच रंगात रंगवली जातात, त्या कागदात किंवा रंगात गुणात्मक भेद असतो का हो? रामांचं चित्र ज्या रंगांनी रंगवलं जातं, त्याच रंगांनी रावणाचं चित्रही साकारतं. एक भक्ती जागवतं, तर दुसरं सात्त्विक संताप! तर ज्याप्रमाणे एकाच तऱ्हेचा कागद आणि एकाच तऱ्हेचा रंग ‘राम’ आणि ‘रावण’ अशा दोन टोकांची अनुभूती पाहणाऱ्याच्या मनात निर्माण करतो आणि तद्अनुरूप प्रतिक्रिया निर्माण करतो, तसाच नाना आकार, नाना मताग्रहांत एकच परमात्म शक्ती सहज शिरकाव करीत असली तरी आपण वैविध्य आणि भेदांतच गुरफटतो! ही एकच परमात्मशक्ती या योगे जगाला नाचवत असते.