– चैतन्य प्रेम

प्राणधारणेपुरती भिक्षा योगी स्वीकारतो, असं अवधूत सांगतो. दाता श्रीमंत आहे, तर जास्त भिक्षा घेऊ, ही त्याची वृत्ती नसते. जालन्याचं राममंदिर भिक्षेवर चालवावं, अशी श्रीगोंदवलेकर महाराज यांची आज्ञा होती. श्रीरामानंद महाराजांनी ती प्राणपणानं आचरणात आणली. नंतर श्री. रामदास तांबे राज्यात गावोगावी फिरून मंदिरासाठी भिक्षा गोळा करीत. त्यासाठी प्रत्येकाकडून वर्षांतून एकदा केवळ ११ रुपयेच घ्यायचे, असा त्यांचा काटेकोर नेम होता. ही चाळीसेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या परिचयातील आणि गोंदवलेकर महाराजांच्या शिष्य परिवारातील एका व्यावसायिकांकडेही ते भिक्षेसाठी जात. त्यांनी एकदा तांबेकाकांना ५०० रुपये घ्यायचा आग्रह केला. एवढी पायपीट करायची आणि फक्त ११ रुपये घ्यायचे, असं कशाला? जे सहज जास्त देऊ शकतात त्यांच्याकडून ते घेतले तर कमी श्रमात जास्त रक्कम उभी नाही का राहणार, असा त्या व्यावसायिकांचा प्रश्न होता. त्यावर तांबेकाकांचं उत्तर अतिशय मार्मिक होतं. ते म्हणाले, ‘‘मी आल्यावर, ‘आता याला पैसे द्यावे लागणार’, या विचाराची आठी कुणाच्या कपाळी उमटू नये यासाठी ११ रुपये घेणंच रास्त आहे!’’ किती खरं आहे! भावनेच्या भरात आपण देऊ हो ५००-१००० रुपये. पण प्रत्येकात ती भावना तशीच वर्षांनुवर्षे राहील, याची हमी आहे का? तेव्हा देणाऱ्याच्या मनावर ताण येणार नाही इतपत भिक्षा घेण्याचा दंडक त्यांनी जपला होता. समाजावर संस्कार होण्यासाठी अशा वृत्तीच्या माणसांची फार गरज असते बरं! तर गृहस्थाला कधीच डोईजड होणार नाही, इतपत भिक्षा वा दान योगी स्वीकारतो. हा अपरिग्रह आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी; ही योगाची आठ अंगं आहेत. त्यातील यमामध्ये अपरिग्रह येतो. स्वामी विवेकानंद यांना, दानच न घेणं हा अपरिग्रहाचा अर्थ अभिप्रेत आहे (‘राजयोग’, पृ. १९६,  रामकृष्ण मठ प्रकाशन). जो दान घेतो त्याच्यावर दात्याच्या मनाचा प्रभाव पडतो, त्याच्या मनाचं स्वातंत्र्य नष्ट होऊन हीनपणा येण्याची शक्यता असते म्हणून दानच घेऊ नये, असं त्यांचं सांगणं आहे. तर अगदी गरजेपुरती भिक्षा स्वीकारणं, हा अपरिग्रहचा अर्थ प्रचलित आहे. आता ही गरज किती? तर अवधूत म्हणतो त्याप्रमाणे, प्राणधारणेपुरती! खरं पाहता दाता आणि दान घेणारा, या दोघांसाठी दान उपकारक आहे. कसं? ‘भिक्षुगीते’त म्हटलं आहे की, ‘‘दानं स्वधर्मो नियमो यमश्च, श्रुतं च कर्माणि च सद्व्रतानि। सर्वे मनोनिग्रहलक्षणान्ता:, परो हि योगो मनस: समाधि:।।’’ (श्लोक ४६). म्हणजे, दान, स्वकर्तव्य पालन, नियम, यम, वेदाध्ययन, सत्कर्म आणि आत्मसंयमाचं श्रेष्ठ व्रत; या सर्व गोष्टींचं अंतिम फळ मन एकाग्र होणं, हेच आहे. मनाचं असं समत्व हीच समाधी आहे. दात्याला हा लाभ आहे आणि दान जो स्वीकारतो त्याला काय लाभ आहे? दोन्ही बाजूंचा संक्षेपानं विचार करू.

chaitanyprem@gmail.com

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.