चैतन्य प्रेम
माणूस जन्मापासून देहभावात जगत असल्यानं तो बाह्य़ावरूनच स्वत:ची ओळख स्थापित करू पाहतो. बाह्य़ावरूनच इतरांची ओळख निश्चित करतो. त्यामुळेच साधनापथावर आल्यावर तो टिळे-माळा, भगवी वस्त्रं, रुद्राक्षाच्या माळा अशा सगळ्याचा स्वीकार करीत आपली ‘ओळख’ निर्माण करू पाहतो. पण भगवी वस्त्रं म्हणजे विरक्ती! ती विरक्ती अंतकरणात नसेल, तर ती नुसती कपडय़ांतून भासवून काय उपयोग? शरीरानं भगवी वस्त्रं घातली, टिळे-माळा धारण केल्या; पण मनाची धारणा बदललीच नसेल, तर काय उपयोग? प्रेतालाही नवेकोरे कपडे घालतात; पण त्या कपडय़ांचं कुणी कौतुक करीत नाही! अगदी त्याचप्रमाणे आत्मभावच नसेल, तर देहाला भगव्या वस्त्रांनी सजवलं तरी त्याचं जाणत्याला कौतुक उरत नाही! कारण जसं देहावरील उंची कपडय़ांचं मोल, त्या देहातून निघून गेलेल्या चतन्यानं शून्य करून टाकलेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे अंतकरणात विरक्ती नसेल, तर त्या देहाला संन्याशाच्या वेशानं कितीही ‘सजवा’, त्या कपडय़ांचं मोल ओसरून जातं. रावणानं सीतामाईच्या अपहरणासाठी संन्याशाच्या भगव्या वस्त्रांचा वापर केला होता. भगवी वस्त्रं घालून अपकृत्य केल्याचा ज्ञात इतिहासातला हा पहिलाच प्रसंग. म्हणूनच रावणानंही या वस्त्रांची नंतर क्षमा मागितली होती. त्यामुळे जो पालट घडवायचा तो बाह्य़ापुरता, दृश्यात्मक तेवढा नको. तो मन, चित्त, बुद्धीत झाला पाहिजे. त्यासाठी धारणेत सुधारणा करण्यासाठी मनावरच लक्ष दिलं पाहिजे. कारण देह तर कठपुतळी आहे आणि मन सूत्रधार आहे! ‘आनंदलहरी’ या लघुग्रंथात एकनाथ महाराज सांगतात की, ‘‘देह पाहतां अचेतन। देहासी कैचें दूषण। जो देहासी चेष्टवी जाण। सुखदु:खभोग त्यालागी॥७४॥’’ देह तर अचेतन आहे; त्या देहाला मनच नाचवतं आणि त्यापायी देहाच्या वाटय़ाला सुख-दु:ख येतं. तेव्हा दूषण द्यायचं तर मनालाच द्यावं लागेल. जिव्हेला स्वाद कळतो, पण पंचपक्वान्नं खायची इच्छा काही जिव्हा निर्माण करीत नाही; मनच ती इच्छा निर्माण करतं. इतकंच नव्हे, तर समजा गोड खाणं शरीराला हानीकारक असलं तरी मनाला इच्छेची उबळ थोपवता येत नाही. मग त्या गोड खाण्यानं जे दु:खं नंतर भोगावं लागतं त्याला जबाबदार जिव्हा नाही, तर मनच आहे. आता सतत मोबाइल पाहण्याचं नवं व्यसन फार झपाटय़ानं पसरलं आहे. दूरचं कशाला? मलाही ते व्यसन आहे बघा! बरं, हा मोबाइल तासन्तास पाहावा ही इच्छा काय डोळ्यांना असते काय? पुन्हा आंतर्कर्णे म्हणजे हेडफोनही तासन्तास कानात असतो, पण ते ऐकण्याची इच्छा काय कानांना असते का? तर नाही! मनाच्या इच्छेनुसारच डोळ्यांनी मोबाइल कित्येक वेळासाठी पाहिला जातो आणि कानांनी ऐकला जातो. त्यामुळे काना-डोळ्यांना नंतर जो त्रास होतो त्याला मनच जबाबदार असतं. एकनाथ महाराज सांगतात, ‘‘जैसी काष्ठाची पुतळी केली। सर्व इंद्रियें निर्मिलीं। परी चाळितेविण जाली। प्रेतरूप॥७५॥ तसे देह अचेतन। त्यातें चालवितें मन। सर्व इंद्रियें त्याचे आधीन। स्वामी जाण तयांचा॥७८॥’’ (आनंदलहरी). लाकडी बाहुली अगदी आखीव रेखीव केली, हात-पाय, नाक, कान, डोळे सगळे अवयव साकारले, तरी ती सूत्रधारावाचून हालचाल करू शकत नाही. तशी समस्त इंद्रियं मनरूपी सूत्रधाराशिवाय एक पाऊलही टाकू शकत नाहीत. ती जणू प्रेतवतच होतात.