विकारांचा त्याग ही सामान्य गोष्ट नव्हे. ती आपल्या आवाक्यातही नाही. त्यामुळे विकार नष्ट करण्यात कितीही शक्ती लावली तरी विकार आहे तसेच राहतात. आपली शक्ती वाया जात असते. अगदी सुरुवातीला स्वत:तील विकारांची आणि दोषांची मला फार लाज वाटत असे. ते नष्ट झाल्याशिवाय साधना होऊच शकत नाही, असंही वाटे. सर्वज्ञ अशा सद्गुरूंना आपल्या मनातील सूक्ष्मात सूक्ष्म असे विचार तरंग, वासना तरंग तत्क्षणी उमगत असतात, हे जाणवू लागलं होतं. त्यामुळे तर आपल्या आंतरिक विकारग्रस्त स्थितीची लाज अधिक तीव्रतेनं वाटत होती. आपली आंतरिक स्थिती कशी सुधारावी, या विचारातही कित्येक तास सरत. एकदा अचानक सद्गुरू मला म्हणाले, ‘‘विकार नष्ट करण्याच्या मागे लागू नकोस. कारण हे आयुष्य संपेल, पण विकार संपणार नाहीत! त्यापेक्षा मी सांगतो तसं करत जा, त्या विकारांकडे मी पाहीन!’’ मी मागेही एक रूपक सांगितलंय. एका कोरडय़ा खोल विहिरीत एक जण पडतो. अन्न नाही, पाणी नाही, स्नान नाही अशा अवस्थेत कसाबसा जगतो. कपडे मळले आहेत, केस-दाढी वाढली आहे. तरीही वर कुणाची चाहूल लागलीच, तर ‘वाचवा.. वाचवा’ अशी क्षीण सादही घालतो. अशीच एकदा त्याची साद एका तेज:पुंज व्यक्तीनं ऐकली. मग त्यानं खाली दोरखंड सोडला. म्हणाला, ‘‘या दोरीला घट्ट धर. मी तुला वर खेचतो!’’ आता तो तेजस्वी पुरुष, तो स्वच्छ दोरखंड बघून तो माणूस बावरला आणि जर म्हणू लागला, ‘‘मी इतका अस्वच्छ, मी हा दोर कसा धरू? आधी मी स्वच्छ होतो, मगच दोरखंडाला हात लावतो..,’’ तर काही उपयोग आहे का? ते शक्य तरी आहे का? त्याप्रमाणे विकार-दलदलीत फसलेले आपण स्वबळावर ‘स्वच्छ’ म्हणजे ‘विकारमुक्त’ होऊ शकत नाही. त्यासाठी जे सद्गुरू सांगतात तेच केलं पाहिजे. ते म्हणतात तसं कर्म करावं, ते म्हणतात तशी साधना करावी. सद्गुरू सांगत की, ‘‘विकार आवरणं शक्य नाही, पण आवेग आवरायचा प्रयत्न करा. मनातला आवेग आवरणं, हीसुद्धा तपश्चर्याच आहे!’’ आवेग म्हणजे त्या विकारकेंद्रित विचारांची लाट उसळणं. समजा, आपण सागरतटावर आहोत आणि लाट उसळत आली. आपण पळून किनारा गाठला. लाट ओसरताच पुन्हा समुद्रात गेलो. पुन्हा लाट दिसताच तटाकडे पळालो. लाट चुकवण्याच्या या पळापळीतच दमछाक व्हायची. किंवा एखादा लाटेबरोबर समुद्रातच ओढला जातो आणि मग स्वत:ला वाचवताना दमछाक करून घेतो. तेव्हा लाट येईल तशीच परत जाईल हे उमजून, जो आहे त्या जागी निश्चल उभा ठाकला तर लाटेचा त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही. त्याप्रमाणे आवेगाची लाट उसळताच जो शांत राहील, त्याला ती लाट ओसरल्याचंही दिसेल! तेव्हा मनात आवेग उसळताच त्याकडे पाहायचं. त्या क्षणिक आवेगापायी आयुष्यभर पस्तावावं लागेल, असं कृत्य तर घडणार नाही ना, याबाबत सावध व्हायचं. ही सावधानताच पुरेशी असते. अनवधानानंच चुका घडतात. अवधान आलं, तर त्या रोखण्याची जाणीव तरी जागी होते. तेव्हा आपण चारचौघांसारखंच जगावं, जीवनातला सर्व तऱ्हेचा आनंद घ्यावा, कामभावनेसकट सर्वच भावनांचं नैसर्गिक स्वाभाविकपण लक्षात घ्यावं आणि त्यांचं जीवनातलं यथोचित अस्तित्व दडपू नये. पण त्यांच्या अधीन होऊन जगण्याचा एकमात्र उद्देश तोच आहे, या भ्रमातही अडकू नये. जगण्याच्या व्यापक हेतूचा शोध थांबवू नये.

– चैतन्य प्रेम