चैतन्य प्रेम

विरक्तीचा अभ्यास करणाऱ्यानं आणखी कोणत्या गोष्टींबाबत सावध राहावं, हे ‘चिरंजीवपदा’त नमूद करताना नाथ आता ‘स्त्रीसंग’ या विषयाकडे वळतात. ‘‘नको नको स्त्रियांचा सांगात। नको नको स्त्रियांचा एकांत। नको नको स्त्रियांचा परमार्थ।’’ असंही ते निक्षून सांगतात  आणि त्यामुळे एकूणच धार्मिक साहित्यातील स्त्रीदेहाच्या निंदेचा मुद्दा पुढे येतो. आता काही अभंगांत स्त्रीसंगावर टीका आहे आणि ती स्त्रीचं व्यक्ती म्हणून असलेलं स्वातंत्र्य नाकारणारी आहे, असंही काहींना वाटतं. परंतु स्त्रीदेहाला भोगवस्तू म्हणून रंगविणाऱ्या मध्ययुगीन शृंगारिक साहित्याच्या प्रभावाच्या पाश्र्वभूमीवर ती लक्षात घेतली पाहिजे. खरं पाहता, अध्यात्मात केवळ एक भगवंत आणि भक्त हीच दोन नाती आहेत. भगवंताच्या भक्तांमध्ये स्त्री आणि पुरुष असा काही भेदच नाही. उलट स्त्रीमध्ये वात्सल्य, सद्भावनाशीलता, सहृदयता, सात्त्विकता, करुणा, दया, त्याग, उदारता आदी गुण सहज विकसित होऊ शकतात. त्यामुळे भक्तीमध्ये व आंतरिक प्रेरणांच्या स्पष्टतेमध्ये स्त्री अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर राहू शकते. मग इथं ‘नको नको स्त्रियांचा सांगात।’ असं जे म्हटलं आहे ते कुणाला आहे? तर, ज्याच्या मनात स्त्री आणि पुरुष हे भेद आहेत त्याला! हा भेद ज्या स्त्रीलाही दिसतो तिनं ‘नको नको पुरुषांचा सांगात।’ असंच वाचलं पाहिजे! ज्याला शुद्ध परमार्थ करायचा आहे, त्याला आयुष्याचं खरं मोल उमगलंच पाहिजे. आधीच आपल्या आयुष्यात मानसिक, भावनिक तणाव काही कमी नव्हते. अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल सुरू झाली असताना ते तणाव हळूहळू ओसरू लागतात. अशा वेळी ज्या कोणत्याही गोष्टीत आपण भावनिकरीत्या नव्यानं अडकून पडू आणि त्यापायी आपली मानसिक, भावनिक शक्ती नाहक वाया घालवू, अशा गोष्टींपासून दूर राहिलंच पाहिजे. यात कुणाचाही अवमान नाही, कुणालाही कमी लेखण्याचा हेतू नाही. प्रारब्धानुसार ज्याच्याशी वा जिच्याशी आपला विधिवत लग्नसंबंध आहे त्याच्याशी/तिच्याशी प्रामाणिक राहून साधनाभ्यास करायला कोणाचाही नकार नाही. नाथही सांगतात, ‘‘म्हणाल ‘गृहस्थ साधकें। स्त्री सांडोन जावें कें’। येच अर्थी उत्तर निकें। ऐक आतां सांगेन।।३२।। तरी स्वस्त्रियेवांचोनी। नातळावी अन्य कामिनी। कोणे स्त्रियेसी संनिधवाणी। आश्रयो झणीं न द्यावा।।३३।।’’ म्हणजे, याचा अर्थ गृहस्थ साधकानं पत्नीचा त्याग करावा काय? तर नव्हे! मात्र तिच्यावाचून कुणाला स्पर्शूही नये की कुणाच्या भावनिक आश्रयासही जाऊ नये. खरं पाहता, भगवंताच्या भक्ताला भावनिक आश्रय हा केवळ भगवंताचाच असतो आणि असला पाहिजे. त्याआड जो कामनाश्रय येतो तोच संत साहित्यातील अशा अभंगांत गृहित धरला पाहिजे. मग असा कामनाश्रय साधनाभ्यास करत असलेल्या स्त्रीचं मन ताब्यात घेत असो वा पुरुषाचं. एखादा साधक अविवाहितही असू शकतो. तर त्यानंही आपलं मन अशा भावनाश्रयात व कामनाश्रयात अडकत नाही ना, याबाबत दक्ष राहावं. कामवासना स्वाभाविक आहे; मात्र कामवासनेपायी साधकानं- मग तो विवाहित असो की अविवाहित, स्त्री असो वा पुरुष- अस्वाभाविक होता कामा नये.