चैतन्य प्रेम

श्रीमाताजीच नव्हेत, तर बहुतेक सर्वच संत-सत्पुरुष हे ‘मी’ आणि ‘माझे’च्या संकुचित परिघात चिणलेल्या जगण्याला विरोध करतात. व्यक्तीनं व्यापक व्हावं आणि जगावं, यावरच त्यांचा भर असतो. बरेचदा अध्यात्माबद्दल असा गैरसमज असतो की, अध्यात्म हे व्यक्तीला कर्तव्यविन्मुख करतं आणि त्यायोगे समाजाचं अनहितच होतं. प्रत्यक्षात अध्यात्म हे व्यक्तीला व्यापक करतं, भ्रम-मोहातून निर्माण होत असलेल्या अपेक्षांची परंपरा ते खंडित करतं. त्यामुळे माणूस निरपेक्ष आणि नि:स्वार्थ होऊ लागतो. ज्या समाजात नि:स्वार्थ आणि निरपेक्ष माणसांची संख्या वाढत जाते, त्या समाजात शांती नांदू लागते, हे का वेगळं सांगायला हवं? तेव्हा अध्यात्म हे व्यक्तीकेंद्रित नसून एका परीनं समाजहित साधणारंही असतं.

आजच्या संकटकाळात अनिश्चितता आणि अस्वस्थता दोन्ही वाढत आहे. समाजाचा लघुत्तम साधारण घटक असलेल्या व्यक्तीचं भवितव्य अंध:कारानं भरल्याची भावना आहे. त्यामुळे व्यक्तिसमूह असलेल्या समाजपुरुषाचं मनोधैर्य कसं जोपासावं, साधनारत व्यक्तीच्या आत्मकल्याणाचं प्रतिबिंब समाजाच्या कल्याणातही गवसावं का, असे प्रश्न साधकाच्याही मनात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर रमण महर्षी यांनी जे ‘समाज-सूक्त’ गायलं आहे, म्हणजेच व्यक्ती आणि समाजातील स्नेहबंधाबाबत तसंच व्यक्तीहितातून समाजहित साधण्याबाबत जे मार्गदर्शन केलं आहे, ते अतिशय प्रेरक आणि कालसंगत आहे. हा बोध महर्षीचा सहवास लाभलेले गणपतिमुनी यांनी ‘श्रीरमणगीता’ या संस्कृत ग्रंथात श्लोकबद्ध केला आहे. गणपतिमुनी हे शीघ्रकवी होते आणि ‘काव्यकंठमणि’ ही पदवीदेखील त्यांच्या प्रतिभेसमोर तोकडीच होती. तर साधारण १९१४ ते १९१७ या काळात गणपतिमुनींनी रमणांशी जो संवाद साधला तो या ‘गीते’त प्रतिबिंबित आहे. प्रज्ञाताई सुखठणकर यांनी या ‘रमणगीते’चा मराठी अनुवाद केला आहे. यात गणपतीमुनी रमणांना विचारतात की, व्यक्ती आणि समाज यांच्यात नेमका कसा संबंध असावा? त्यावर रमणांनी देहाचं मनोज्ञ रूपक वापरलंय. रमण सांगतात, ‘‘समाज हा एखाद्या शरीराप्रमाणे असतो आणि व्यक्ती ही जणू त्या समाजदेहाची भिन्न भिन्न अंगे असतात, अवयव असतात. अवयव ज्याप्रमाणे शरीरासाठी उपयुक्त कृती करतात त्याप्रमाणे व्यक्तीही समाजउपयोगी कार्य करतानाच स्वत:चाही विकास साधत असते. काया, वाचा, मनाने अर्थात शरीर, वाणी आणि मनानं आपण समाजासाठी नित्य कल्याणप्रद आणि उपयुक्त असं आचरण ठेवावं. आपल्या आचरणातून जवळच्या व्यक्तींनाही आपसूक बोध आणि प्रेरणा मिळावी.’’ इतकंच नाही, तर समाजाच्या क्षेमकल्याणासाठी एखादा लहानसा गटदेखील स्थापन करण्याची सूचना रमणांनी केली होती! तो गट जणू समाजहित साधण्याचा आदर्श नमुना ठरावा, असं ते सुचवतात. मग गणपतीमुनी एक मोठा सूक्ष्म प्रश्न विचारतात तो असा की, ‘‘हे नाथ! समाजाच्या कल्याणासाठी शांती आवश्यक आहे की शक्ती?’’

chaitanyprem@gmail.com