चैतन्य प्रेम
अंत:करणातील सर्व प्रकारचा क्षुद्रपणा, संकुचितपणा झडून जावा आणि अंत:करण व्यापक व्हावं यासाठीची साधना, कृती, प्रयत्न म्हणजेच अभ्यास! सद्गुरूसुद्धा काय करतात? तर शिष्य ज्या ‘अहं’भावात जखडला आहे त्याचा ‘सोहं’भावात विलय साधतात. म्हणजेच ‘मी’पणात चिणलेल्या जीवाला ‘मी’पणातून प्रसवणाऱ्या सर्व मोहजन्य कल्पना, अपेक्षा, भावना, वासनांच्या खोडय़ातून सोडवतात. त्याला एका परमतत्त्वाच्या अनुसंधान, चिंतन, मनन आणि अनुभवात एकरूप करतात. त्यासाठी सद्गुरू जो बोध करतील त्यानुसार जीवन जगण्याचा संकल्प माणसानं सोडला पाहिजे. मग संपूर्ण जीवन त्या उदात्त ध्येयासाठी जगत निरपेक्ष, निर्लिप्त वृत्ती बाणवली तर जगत असतानाच मुक्तीचा अनुभव त्याला किंचित येऊ लागेल. त्यासाठी ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’ या दोन्हीची जोड हवी. स्वत: भगवान श्रीकृष्णांनी ‘गीते’त हे सांगितलं आहे. आता या ‘अभ्यास’ आणि ‘वैराग्य’च्या स्थूल आणि सूक्ष्म या दोन पातळ्या आहेत, असा उल्लेख झाला आहे. त्याचा पुन्हा विचार करू. सदगुरूबोधानुरूप उदात्त जीवन जगण्याचं जे ध्येय ठरलं आहे, त्याचं सतत अनुसंधान, चिंतन, मनन करीत तशी दृढ धारणा घडवणं ही या अभ्यासाची सूक्ष्म पातळी आहे. ज्या कोणत्या कृतीनं अनुसंधान, चिंतन, मनन विकसित होत असेल ती प्रत्येक कृती; मग तो स्वाध्याय असेल, जप असेल, पूजा असेल, पठण असेल.. असं सर्व काही म्हणजे अभ्यासाची स्थूल पातळी आहे! वैराग्याच्याही स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन पातळ्या आहेत. गुरूप्रदत्त ध्येयाच्या ‘अभ्यासा’च्या आड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा मनातून त्याग हेच ‘वैराग्य’ आहे! चुकीच्या कल्पना, धारणा, कामनांचा त्याग ही वैराग्याची सूक्ष्म पातळी आहे. तर प्रत्यक्ष चुकीच्या आचरणाचा त्याग, ही स्थूल पातळीवरील वैराग्याची खूण आहे. जोवर अभ्यास आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी साधत नाहीत तोवर मन स्थिर होणार नाही. जोवर मन स्थिर होत नाही तोवर सद्गुरूबोध अंत:करणात दृढ होऊन त्या बोधानुरूप जीवन जगलं जात नाही. मनानं मुक्त होऊन आनंदात जीवन जगणं हे आपलं खरं जीवनध्येय झालं पाहिजे. आज एका वैश्विक संकटाला सामोरं जाताना आपल्यातील आध्यात्मिक धारणेची फेरतपासणी प्रत्येक साधक करीत असेलच. त्याचाही हाच निष्कर्ष निघेल की, खरं शाश्वत सुख हवं असेल तर त्यासाठीचे प्रयत्न, अभ्यासही शाश्वताचाच असला पाहिजे. वाचकहो, वैश्विक अनिश्चिततेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ‘एकात्मयोग’ या नियमित सदराला स्वल्पविराम देऊन आपण दीड महिना विविध मुद्दय़ांना स्पर्श करणारं चिंतन केलं. अनिश्चिततेनं भांबावलेल्या माणसानं अंतर्मुख व्हावं, हा हेतू या चिंतनामागे आहे. याच चर्चेतून पुढे आलेल्या वा अस्पर्श राहिलेल्या ठळक मुद्दय़ांचा आपण पुढील आठवडाभर विचार करून पुन्हा मुख्य विषयाकडे- म्हणजेच ‘एकात्मयोगा’कडे वळणार आहोत!
chaitanyprem@gmail.com