४५६. मनोनिश्चय

आपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे

आपलं मूळ स्वरूप आनंद हेच आहे, आपण परमात्म्याचाच अंश आहोत, मोक्षप्राप्ती हेच मनुष्यजन्माचं ध्येय आहे, त्यासाठी सर्व तऱ्हेच्या मनोनिर्मित बंधनांतून मुक्त झालं पाहिजे; असं आपण ऐकतो. पण मग जर मुळात आपण आनंदरूपच होतो आणि मोक्ष हेच जर लक्ष्य ठेवायचं आहे, तर जन्माला आलोच कशासाठी, असा प्रश्न काहींच्या मनात येईल. तर यावर थोडा बारकाईनं विचार केल्यावर लक्षात येईल की, आपण मूलत: आनंदस्वरूपच असलो, तरी तसा अनुभव मात्र आपल्याला नाही. उलट अनेक प्रकारच्या सम-विषम आर्थिक, सामाजिक, भौतिक व भौगोलिक परिस्थितीत आपल्याला जीवनाची वाटचाल करावी लागते. त्यातून कधी सुखाचे, तर कधी दु:खाचे; कधी यशाचे, कौतुकाचे, तर कधी अपयशाचे अन् उपेक्षेचे अनुभव वाटय़ाला येतात. तेव्हा तत्त्वज्ञान सांगतं म्हणून आपण मुळात आनंदरूप असूही, पण तसा अनुभव नाही. तो येणं शक्य आहे, असं साधनेच्या प्रारंभी वाटून मनाची उमेद वा सकारात्मकता ‘‘तू आनंदरूप परमात्म्याचाच अंश आहेस,’’ या एका वाक्यानं वाढते. त्याच वेळी मोक्ष हे उदात्त, व्यापक ध्येय निवडल्यानं जगण्यातला संकुचितपणा कमी होऊ शकतो! ध्येय जितकं शुद्ध, उदात्त आणि व्यापक तितकं जगणं आनंदाचं! स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ‘‘ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे। प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे, भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे!!’’ उदात्त, व्यापक ध्येयाच्या प्रकाशात चालणाऱ्याचं मनही हळूहळू उदात्त होत जातं. सद्गुरू सांगतात, माणसानं मोक्ष हे ध्येय बाळगावं, पण मोक्ष ही मृत्यूनंतर अनुभवण्याची गोष्ट नसून ती जगतानाच अनुभवता आली पाहिजे! ती अनुभवण्यासाठी मन व्यापक होत गेलं पाहिजे. मनाचं व्यापक होणं, म्हणजे काय? तर मनानं ‘मी’च्या, या जन्मापुरत्या असलेल्या पकडीतून स्वत:ला मुक्त केलं पाहिजे! त्यासाठी जो व्यापक आहे अशा सद्गुरूंचा आधार घेणं, हा सोपा उपाय आहे! मनाचा तसा निश्चय मात्र हवा. संत एकनाथ महाराज एका अभंगात म्हणतात की, ‘‘मन मनासी होय प्रसन्न। तेव्हां वृत्ति होय निरभिमान।।१।। पावोनि गुरूकृपेची गोडी। मना मन उभवी गुढी।।२।। साधकें संपूर्ण। मन आवरावे जाण।।३।। एका जनार्दनीं शरण। मनें होय समाधान।।४।।’’ एका सत्पुरुषानं एका माणसाची फार समजूत काढली. तो म्हणाला, ‘‘महाराज, मी माझ्या वागण्यातील चुका सुधारीन. आपली कृपा असू द्या!’’ पण त्याचं वागणं काही बदललं नाही. पुन्हा त्याच चुका आणि त्यानं निर्माण होणारे तेच दु:खभोग. परत तो दर्शनाला आला तेव्हा परत साधूनं त्याला समजावलं. त्यानंही चांगलं वागण्याचं आश्वासन दिलं, पण तरीही त्याच्या चुकीच्या वर्तणुकीत बदल झाला नाही. असं दोन-तीनदा घडलं. अखेर तो जेव्हा म्हणाला की, ‘‘माझ्यावर कृपा करा,’’- तेव्हा तो सत्पुरुष म्हणाला, ‘‘बाबा रे! आता तूसुद्धा स्वत:वर थोडी कृपा कर! आपल्या चुका सुधार..’’ तसं आहे हे! जोवर आपल्या मनाचा निश्चय होत नाही, तोवर काही खरं नाही. जेव्हा मन ठरवतं की व्यवहारातली कर्तव्यं पार पाडत असताना केवळ सद्गुरूबोधावरच चिंतन साधायचं, तो बोधच केवळ आचरणात आणण्याचा अभ्यास करायचा, तेव्हाच सूक्ष्म वृत्तीमध्ये पालट होऊ लागतो. मनाची ही तयारी सहजतेनं होत गेली, मनाची बैठक नीट झाली, की मगच गुरुकृपेचं अस्तित्व उमजू लागतं आणि त्या कृपेची गोडी अनुभवता येते.

– चैतन्य प्रेम

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व एकात्मयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Spiritual practices loksatta ekatmyog article 456 zws

ताज्या बातम्या