रूढ झालेली हूल, तिला विज्ञानाची झूल

'आता तर हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे', असे उसने अवसान आणून कित्येक घट्ट रुजलेल्या पण 'मानीव' समजुतींचे समर्थन केले जाते. विज्ञानातल्या लेटेस्ट घडामोडी, उकल न होताच, अत्यंत सुटसुटीत बातम्या म्हणून पसरलेल्या असतात. आपल्याला 'विज्ञान' या ज्ञानप्रकाराच्या अंगभूत मर्यादाही स्पष्ट कळलेल्या …

‘आता तर हे विज्ञानानेही सिद्ध केले आहे’, असे उसने अवसान आणून कित्येक घट्ट रुजलेल्या पण ‘मानीव’ समजुतींचे समर्थन केले जाते. विज्ञानातल्या लेटेस्ट घडामोडी, उकल न होताच, अत्यंत सुटसुटीत बातम्या म्हणून पसरलेल्या असतात. आपल्याला ‘विज्ञान’ या ज्ञानप्रकाराच्या अंगभूत मर्यादाही स्पष्ट कळलेल्या नसतात. विज्ञानाच्या एकशतांश हळकुंडाने पिवळे झालेले मताग्रह प्रसारक याचाच फायदा उठवतात.

मी लहान असतानाच्या काळात टॉन्सिल्स काढल्याने उंची वाढते या समजुतीपायी कित्येकांच्या टॉन्सिल्स काढल्या गेल्या. खरेतर, इन्फेक्शन स्वत: झेलून पुढील श्वसन संस्थेचे रक्षण करणाऱ्या पहारेकरी, हे त्यांचे ‘कार्य’ असते. त्याकाळी ‘हे चहा घेत नाहीत, कॉफीच घेतात’ अशीही अनेक प्रस्थे होती. कांदा-लसूण न खाणाऱ्याही बऱ्याच व्यक्ती होत्या. आता हार्टसाठी गाíलकपर्ल्सपण खातात.
कांद्याने कामवासना वाढते म्हणे! ‘लेकुरे उदंड जाली’मध्ये कांदेपाकाचा उल्लेख ‘ठडँग’ असा येतो, उलट ‘श्यामची आई’मध्ये तळवे जळजळण्याचा, ‘उष्णतेचा’ त्रास कमी व्हावा यासाठी कांदेपाक येतो. कांद्याचा परिणाम हा मुख्यत: लेखकावर अवलंबून असावा असे दिसते. मुळात, कामवासना ही वाढवणे किंवा कमी करणे, यापकी कुठल्याच दिशेला अचीव्हमेंट मानणे, हे थांबविले पाहिजे. प्रणयातील नतिक व अभिरुचीचे औचित्य हा विषय आहारशास्त्रात मावण्याइतका ढोबळ नाही हे निश्चित.
गेंडय़ाच्या िशगाला, अनन्यसाधारण औषधी-मूल्य प्राप्त झाल्याने गेंडय़ाची जीवजाती धोक्यात आली आहे. हे औषधी-मूल्य अगदीच भंकस तर्काने आले. वाजीकरण किंवा स्तंभन टिकवणे हा पुरुषांचा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला गेला आणि परफॉर्मन्स-अँग्झायटी हे अंडर-परफॉर्मन्सचे मुख्य कारण बनून बसले. यात स्त्रीच्या कामतृप्तीविषयी तर मोठेच अज्ञान आणि अनास्थाही दिसते. शिवाय गेंडय़ाचे शिंग हे केवळ आलंकारिक अर्थाने संबंधित आहे. स्तंभन हे उपमेय तर गेंडय़ाचे िशग हे उपमान आहे. उपमान-उपमेय संबंधावरून थेट कारण-कार्य संबंधावर उडी मारणे ही अफाट गफलत आहे. तसेच कारण-कार्य संबंध मानायचा तर जीव-रसायन-शास्त्रीय प्रक्रिया मांडून दाखवता आली पाहिजे. ‘व्हायग्रा’बाबत ही प्रक्रिया मांडून दाखवता येते. ‘व्हायग्रा’ शोधून सिद्ध करणाऱ्या  त्रिकुटाला, योगायोगाने अमर्त्य सेन यांच्याच बॅचमध्ये, विज्ञानाचे नोबेलही मिळाले! गेंडय़ाच्या शिंगासारख्या दृश्य साम्यावरून औषधी गुण ठरवायला लागलात तर उद्या तुम्ही मेंदूच्या वाढीसाठी अक्रोडही खाल!
 ऊर्जेतून हळूच चतन्यात शिरणे
सुरुवात ऊर्जा या विज्ञानाला ‘चालणाऱ्या’ घटकापासून करायची. मग जीवांमधले ‘सळसळते चतन्य’ या दुटप्पी टप्प्यावर यायचे. मग बोलता बोलता, चिन्मात्र, म्हणजे जाणीव-स्वरूप-सद्वस्तू, या निखळ दार्शनिक भूमिकेत कधी शिरलो ते कळूही द्यायचे नाही.
ही अनेक छुप्या गूढवाद्यांची आवडती रणनीती असते. ‘रेकी देणे’ या उपचारपद्धतीला मानणारे सुरुवात ऊर्जेपासून करतात. ‘‘काय हो या विद्य्ोचा दुरुपयोगही करता येतो का?’’ असा प्रश्न विचारला की ‘‘छे छे ती शक्ती स्वत:ला वाईट कामासाठी उपलब्धच होऊ देत नाही’’ असे उत्तर मिळते. ऊर्जेला सदसद्विवेक कसा असू शकतो? असलाच तर तिला देवता तरी म्हणा! ऊर्जा म्हणून का खपवता? माझा कोणी चिद्वादी असण्याला विरोध नाही. तर चिद्वादी असण्यात लाज बाळगण्याला आणि वैचारिक भेसळ करण्याला विरोध आहे.
फ्रिटजॉफ काप्रा हा छुप्या गूढवाद्यांचा आवडता लेखक आहे. त्याची ‘क्या आयडिया है सरजी’ पुढीलप्रमाणे आहे. १. वस्तुमान आणि ऊर्जा यांचे एकमेकात रूपांतर होऊ शकते. २. निरीक्षक जर, प्रकाशवेगाशी तुल्य वेगात असेल तर त्याला काळ आणि अवकाश एकमेकात मिसळताना दिसतात. ३. अतिसूक्ष्म पातळीवर जी तरंगही आहे आणि कणही आहे अशी वस्तू मानावी लागते. हे तीन मुद्दे वैज्ञानिक आहेत. या तीनही मुद्दय़ांत ‘सॉर्ट ऑफ’ अद्वैत दिसते. यावरून काप्रा, अध्यात्मात जे अद्वैत मानले आहे, त्याचा निष्कर्ष काढतो.
‘‘सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी’’ असे तुकोबा म्हणतात तेव्हा त्यांना त्रिपुटी (कर्ता, कर्म, क्रियापद) विशेषत: ‘जाणणारे’, ‘जाणले जाणारे, व खुद्द ‘जाणणे’ हे एकवटले असे म्हणायचे असते. जे जाणले जाऊ शकते पण स्वत: यित्कचितही ‘जाणत नाही’ ते ‘जड’ होय. वस्तुमान, ऊर्जा, काल, अवकाश, तरंग, कण ही सहाही मंडळी सणसणीतपणे जड आहेत. म्हणजेच काप्राची तीनही अद्वैते ही जडाची जडाशीच आहेत. त्यांचा चित्-जड अद्वैताशी सुतराम संबंध नाही. ही अवैध (इनव्हॅलिड) उडी मारून काप्रा जडवाद्यांना उगाचच कापरे भरवतो.
तसेच काही जण, बिग-बँग आणि ब्रह्म या शब्दातला ‘प्रसरण पावणे’ हा भाव, या असंबंधित गोष्टी एकमेकीला चिकटवून देतात. विश्व हे अनादीच असू शकते. सुरुवात होण्यासाठी जे काय अगोदर असेल ते, विश्व म्हणजे ‘सर्व’मधून कसे वगळणार? ब्रह्म हा शब्द सच्चिदानंद आत्मरूपालाच लागू आहे आणि बिग-बँग उपपत्ती, विश्वाच्या ‘आपल्या’ कोपऱ्यातल्या जडालाच लागू आहे.
मूल्यांच्या प्रांतात घुसखोरी
एन.जी.ओ. कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात बोलणारे एक सुपरहिट पर्यावरणतज्ज्ञ आहेत. एकूण वस्तुमान+ऊर्जा यात वाढ-घट होऊ शकत नाही (कन्झर्वेशन ऑफ मास अ‍ॅण्ड एनर्जी) हा मूळचा वैज्ञानिक सिद्धान्त! त्याचा गरवापर करून ते असा भन्नाट दावा करतात की, ‘‘वाढीव-मूल्य (सरप्लस) उत्पन्न होऊ शकते असे मानणारे कोणतेही अर्थशास्त्र हे खरे असूच शकत नाही.’’
गोंगाट आणि सुरावट यात ऊर्जा समान असली तरी गोंगाटाला ऋण-मूल्य आणि सुरावटीला धन-मूल्य असते. सुंदर रांगोळी आणि फिस्कटलेली रांगोळी यांचे वस्तुमान तेच असले तरी मूल्य धनपासून शून्य झालेले असते. वस्तुमान वा ऊर्जा यांना मूल्य नसून त्यांतील आकृतिबंधांना, ते मानवी प्रयोजनांची पूर्ती करतात की यानुसार मूल्य लाभते. पण ही गोष्ट लपवून, ‘सरप्लस’चा भौतिक अर्थ लावून, ते ही मखलाशी करतात.
अमेरिकेत एका भव्य डोममध्ये स्वतंत्र जैव-जग उत्पन्न करण्याचा प्रयोग केला गेला. या प्रयोगाला अर्थातच खूप खर्च आला. या खर्चावरून आपले उपरोक्त पर्यावरणतज्ज्ञ आपण सगळे जण किती डॉलर्सचा ऐवज ‘निसर्गाकडून फुकटात’ घेत असतो याची फिगर काढतात!
हे म्हणजे, एखाद्या विक्षिप्त माणसाने (तो वाचेल अशा बेताने) विष खायचे आणि त्याला वाचवायला किती खर्च आला यावरून, ‘‘असले काही न करणाऱ्या लोकांना तेवढे उत्पन्न मिळतच असते की!’’ असे म्हणण्यासारखे आहे. मूल्य हा आयामच वेगळा आहे. ‘भौतिकलोका’त (फिजिकल रेल्म) मूल्यवान, मूल्यहीन वा ऋणमूल्यवान असे काहीच नसते.
औष्णिक ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करताना येणारी तूट इतकाच ‘एन्ट्रॉपी’ या शब्दाचा व्यावहारिक अर्थ आहे. एन्ट्रॉपीची, रेणूंच्या पातळीवर व्याख्या करताना, तापमानाबरोबर वाढणारी स्थान-अनिश्चितता, या गोष्टीला (चुकून) डिस-ऑर्डर हा शब्द वापरला गेला. तो लक्षणार्थाने घेऊन, सारीच ‘र्दुव्‍यवस्था’ वाढतच जाते अशी आणखी एक अवैध (इनव्हॅलिड) दार्शनिक उडी मारली गेली. थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम हा एकूण निराशावादाचा ‘वैज्ञानिक आधार’ बनविला गेला.
तंत्रज्ञान-भय (टेक्नोफोबिया) बाळगणारे लोक, वैज्ञानिक भाषेत अत्यंत अवैज्ञानिक दावे करत असतात. ‘नको नको त्यात केमिकल असतात.’ पण जगात कोणती वस्तू केमिकल नसते? ‘नाही म्हणजे सिंथेटिक म्हणायचं होतं’ निसर्गात सिंथेसिस होत नाही काय? ‘नाही म्हणजे मॅन-मेड हो’ मानवनिर्मित म्हणजे वाईट काय? ‘तुम्हाला नाही कळणार!’ असे संवाद झडतात. लोकांना प्रमाणबद्धतेचेही भान राहत नाही. पवनचक्क्या बसवल्याने पाऊस कमी झाला. कोयना धरणाच्या पाण्याच्या वजनामुळे भूकंप झाला असे काहीही! मोबाइलमुळे मेंदूवर दुष्परिणाम होतो म्हणे! (सतत वचावचा बडबडत राहण्याने होत असेलही). मेंदूचा एमआरआय स्कॅन करताना अतिशय तीव्र चुंबकीय क्षेत्र आरपार नेऊन अगदी बारकाईने चित्रण केले जाते. पण त्या माणसात काहीही मानसिक बदल होत नाही. तसे काही झाले असते तर एमआरआय स्कॅनवर बंदी तरी आली असती किंवा, न जाणो, एखादी छानशी थेरपीसुद्धा सापडली असती!
पर्यावरणाचा प्रश्न हा ‘निसर्ग विरुद्ध माणूस’ असा नाहीच. माणूसही निसर्गाचाच भाग, त्याचा अंतर्बाह्य़ कृत्रिमता निर्माण करणारा स्वभावही निसर्गाचाच भाग, सारे कृत्रिमही निसर्गनियमानुसारच चालते. ‘मानवेतर गोष्टींना मानव-पूरक बनविताना आपण कळत नकळत काही गोष्टींना (स्वत:साठी, इतरांसाठी व पुढील पिढय़ांसाठी) मारक तर बनवत नाही आहोत ना? हा ‘मानवलोका’तला प्रश्नच खरा पर्यावरणीय प्रश्न आहे. तो सर्वस्वी न्याय, भूतदया, सौंदर्य या ‘मानवी मूल्यां’तून उद्भवतो. या प्रश्नाची भलीबुरी सर्व उत्तरे ही समानपणे नसíगकच असतात. विज्ञान हे न-नतिक आणि नीती ही न-वैज्ञानिक असते.
विज्ञानाबाबत दोन चुका टाळाव्यातच. एक, ज्या अर्थी आपल्याला त्यातले कळत नाही त्या अर्थी समोरच्याला कळत असले पाहिजे, असे नाही. दोन, एखादी व्यक्ती एकदा सकारण-अकारण थोर गणली गेली, त्याअर्थी ती बोलते ते बरोबर असते, असेही नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व गल्लत , गफलत , गहजब ! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Faint conventions has lear of science

ताज्या बातम्या