प्रमोद मुजुमदार

‘परदेशी मिशनरींनी भारतातील गरीब नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर जबरदस्तीने, गैरमार्गाने धर्मातर केले’ हे वारंवार सांगणाऱ्या हिंदूत्वनिष्ठ संघटना ईशान्येकडल्या राज्यांमध्ये कोणत्या विचाराने आणि कशा प्रकारे काम करतात, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक..

समाजशास्त्र आणि मानवविज्ञान (अँथ्रोपॉलॉजी) या दोन आधुनिक ज्ञानशाखांच्या विकासामुळे प्राचीन मानवी संस्कृतीतील बदलांविषयी एक समग्र आकलन निर्माण होत गेले आहे. गेल्या हजारो वर्षांत जगाच्या पाठीवर विविध संस्कृती/प्रकृतींमध्ये होत गेलेल्या बदलांच्या परिणामांबद्दल जगभरात सखोल संशोधन सुरू आहे. अशा बदलांमधील सूक्ष्म घटक आता ठळकपणे पुढे येत आहेत. विशेषत: आदिवासी व मूळ वांशिक जमातींच्या (इंडीजिनस ट्राइब्ज) पारंपरिक संस्कृती कशा पद्धतीने लोप पावल्या किंवा वर्चस्वातील आक्रमक संस्कृतीने अन्याय्य पद्धतीने कशा गिळंकृत केल्या, याविषयीचे अभ्यास वेगाने पुढे आले आहेत. या प्रक्रियेमध्ये सात्मीकरण (अॅसिमिलेशन) किंवा गिळंकृत करण्याची प्रक्रिया ही स्थानिक संस्कृती किंवा इंडीजिनस रिलिजन्स संपविण्यासाठी वापरली गेली.

या संदर्भात भारतातील ईशान्येकडील राज्यांमध्ये स्थानिक आदिवासी जमाती, त्यांच्या परंपरा आणि संस्कृती हे महत्त्वाचे अभ्यास विषय आहेत. ईशान्येतील राज्यांत अनेक वैशिष्टय़पूर्ण स्वतंत्र संस्कृती आहेत. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर या राज्यांतील विविध सांस्कृतिक अस्मिता जपणाऱ्या मानवी समूहांना (उत्तरपूर्व राज्यात लहानमोठय़ा दोनशेपेक्षा अधिक जमाती आहेत) एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून वर्चस्ववादी धर्माच्या दबावाला तोंड द्यावे लागत आहे. १८७० च्या दशकापासून भारतातील ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी या प्रदेशांमध्ये चहाचे मळे ताब्यात घेण्यासाठी आक्रमण केले. या परकीय आक्रमकांना विरोध करणाऱ्या स्थानिक आदिवासी जमातींची गावेच्या गावे जाळून टाकली गेली. त्यांच्या सांस्कृतिक खुणा नष्ट केल्या गेल्या. नंतरच्या काळात या आदिवासींना आपल्या धर्मात ओढण्यासाठी ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी शेजारच्या ब्रह्मदेशातून अमेरिकन बाप्टिस्ट चर्चच्या मिशनऱ्यांना बोलवून आणले. या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर ख्रिश्चन धर्माचा प्रचार केला. या आक्रमक प्रक्रियेमध्ये स्थानिक लोकांच्या प्रथा, परंपरा, संचित ज्ञान, भाषा, त्यांचे परस्पर नातेसंबंध, सामूहिक जीवन तर नष्ट झालेच परंतु त्यांचे नैसर्गिक साधनसंपत्तीवरील अधिकार व स्वायत्तताही मोडून काढली गेली. तर त्याचबरोबर ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या प्रभावामुळे आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा प्रचारही या प्रदेशात झाला.ख्रिश्चन धर्मीयांनी उत्तरपूर्वेत विविध मार्गानी घडवून आणलेल्या धर्मातराचा विषय स्वातंत्र्यानंतर हिंदूत्ववादी प्रवाहाने तीव्र राजकीय मुद्दा बनवत नेला. ‘परदेशी मिशनरींनी भारतातील गरीब नागरिकांचे मोठय़ा प्रमाणावर जबरदस्तीने, गैरमार्गाने धर्मातर केले’ असा सातत्याने प्रचार केला गेला. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी अत्यंत चिकाटीने ईशान्येकडील राज्यांमध्ये विविध शाळा आणि संस्थांचे जाळे निर्माण केले. रा. स्व. संघाचे शेकडो स्वयंसेवक आणि हिंदूत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांनी ईशान्य भारतात (संघाचा शब्द ‘पूर्वाचल’) आपले पाय रोवले.

ख्रिश्चन धर्मीयांचे आणि ख्रिस्ती संस्कृतीचे आक्रमण मोडून काढणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्याचबरोबर ‘ईशान्येतील विविध जमातींची संस्कृती, प्रथा परंपरा वेगळय़ा दिसत असल्या तरी या सर्व जमाती मूलभूतरीत्या हिंदूू आहेत. उत्तरपूर्व आणि त्या लगतच्या म्यानमार, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, इराक, इराण असा एक अखंड हिंदूस्तान आहे’ – अशी भूमिका हिंदूत्ववादी प्रवाहाने सातत्याने मांडली आहे. म्हणजेच ख्रिश्चन धर्माच्या पाठोपाठ हिंदूत्ववादी प्रवाहानेही या आदिवासी जाती-जमातींच्या स्वतंत्र सांस्कृतिक अस्मिता हिंदूू धर्मात शोषून घेण्याच्या किंवा त्यांच्या सात्मीकरणाचा प्रयत्न सुरू केला. हिंदूत्ववादी प्रवाहाच्या अखंड भारत स्वप्नाची प्रयोगशाळा म्हणजे ईशान्येकडल्या राज्यातील त्यांचे काम म्हणता येईल.

हिंदूत्ववादी प्रवाहाच्या या कामाचा चिकित्सक परंतु वस्तुनिष्ठ आढावा घेण्याचे काम ‘द ग्रेटर इंडिया एक्स्पेरिमेंट, हिंदूत्व अॅण्ड द नॉर्थईस्ट’ या पुस्तकात घेण्यात आला आहे. अर्कोटाँग लाँगकुमेर हे नागालँडमधील मूलनिवासी असलेले समाजशास्त्रज्ञ. प्रत्यक्ष हिंदूत्ववादी संस्था संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद संपर्क साधून त्यांनी हे अत्यंत उद्बोधक संशोधन केले आहे.

हा संशोधनात्मक ग्रंथ अनेक पातळीवर महत्त्वाचा आहे. स्वत: लाँगकुमेर हे नागालँडचे मूलनिवासी आहेत. त्यामुळे ईशान्येतील विविध जमातींच्या भाषा, सांस्कृतिक अस्मिता, वांशिक परंपरा याविषयीचे त्यांना स्वाभाविक आकलन आहे. दुसरे म्हणजे या सर्व संशोधनात ते अधिकाधिक वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विवेकानंद केंद्र, विश्व हिंदू परिषद, ‘रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ वल्र्ड एन्शन्ट ट्रॅडिशन्स, कल्चर अॅण्ड हेरिटेज’, जनजाती विकास समिती अशा अखंड भारताच्या उद्दिष्टासाठी काम करणाऱ्या संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी थेट आणि खुला संवाद साधला. त्यांच्या संशोधन संस्थांच्या साहित्याचाही अभ्यास केला.

अखंड भारताची कल्पना सर्वप्रथम सावरकरांनी मांडली होती. बीजरूपात असलेली ही कल्पना ईशान्येत काम करणाऱ्या हिंदूत्ववादी संघटनांनी अधिक विकसित केली. ईशान्येतील जाती-जमाती, त्यांचे देव, प्रतीके, प्रथा-परंपरा इत्यादी आणि हिंदू धर्मातील रामायण, महाभारत पंचतंत्र, पुराणे आणि वेद इत्यादी साहित्यात व्यक्त झालेल्या कथा, मिथके यांचा परस्पर संबंध जोडत या सर्व जातीजमाती हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहेत, असा सिद्धान्त विकसित करण्यात आला. ऐतिहासिक काळापासून बंगाल आसाम ते तिबेट आणि पुढे बह्मदेश, इंडोनेशिया इत्यादी प्रदेशापर्यंतचा व्यापारी मार्ग या पौराणिक कथानकांना जोडला जातो. त्या कथानकांशी आदिवासी प्रतीकांची सांगड घालत एक व्यापक भू-संस्कृतिक संकल्पना हिंदूत्ववादी प्रवाहाने विकसित केली आहे. अशा मिथकाधारित संकल्पनेला सिद्धान्तात स्थान देऊन हिंदूत्ववादी प्रवाहाने आपले काम कसे सुरू ठेवले आहे, हे लाँगकुमेर आपल्या संशोधनात दाखवून देतात.

या अखंड हिंदू राष्ट्राच्या उभारणीचा भाग म्हणून ईशान्य राज्यातील विविध सांस्कृतिक अस्मिता (इंडीजिनस आयडेंटिटीज) नष्ट करत त्यांची प्रतीके आणि देव हे हिंदू धर्मातील देवांचीच रूपे आहेत असे चित्र उभे केले गेले. लाँगकुमेर आपल्या संशोधनातून असे दाखवून देतात की, या सात्मीकरणामागचा दीर्घकलीन उद्देश वेगळाच आहे. आज संयुक्त राष्ट्रसंघ आणि अन्य अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जगभरातील मूलनिवासी जमातींच्या संस्कृती आणि धर्म यांचे स्वतंत्र आणि स्वायत्त अस्तित्व मान्य केले जाते. अशा मूलनिवासी (इंडीजिनस) जमातींवर वर्चस्ववादी संस्कृतींनी शेकडो वर्षे अन्याय केला आहे, हे आज मान्य केले गेले आहे. उत्तरपूर्वेतील या जमातींची स्वतंत्र अस्मिता हिंदू धर्मात समाविष्ट करत एक अखंड हिंदू अस्मिता उभारतानाच, भारतातील विविध आदिवासी जमाती, भटके विमुक्त, आणि बहुजन समाजातील विविध धार्मिक प्रथापरंपरांचा आधार घेत ‘हिंदूधर्म’ हाच एक मूलनिवासींचा धर्म (इंडीजिनस रिलिजन) आहे, अशी जागतिक मान्यता मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी हिंदूत्ववादी विचारांच्या संशोधन संस्था काम करत आहेत. या प्रयत्नांना मोठा दूरगामी राजकीय अर्थ आहे. ‘हिंदूू धर्म’ हाच मूलनिवासींचा धर्म आहे; असे मान्य केले तर हिंदू धर्मातर्गत सर्व समाजांच्या स्वतंत्र अस्मिता आपोआप नष्ट होतात किंवा लोप पावतात. भारतीय घटनेने मान्य केलेल्या ‘भारताच्या कल्पनेलाच’ थेट छेद देणारी ही व्यूव्हरचना आहे.

लाँगकुमेर अतिशय वस्तुनिष्ठ पद्धतीने आपले विश्लेषण मांडतात. आपल्याला भेटलेल्या हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचे संवेदनशील चित्र ते उभे करतात. अनेक कार्यकर्ते भारताच्या विविध भागांतून हिंदूत्ववादी विचारांवर निष्ठा ठेवत उत्तरपूर्व राज्यात वर्षांनुवर्षे राहत आहेत. स्थानिक जमातींच्या सांस्कृतिक परंपरा आणि उत्सव, खानपान पद्धती यांच्याशी या कार्यकर्त्यांनी कसे जुळवून घेतले हे मांडतात. दुसऱ्या बाजूला अखंड हिंदूराष्ट्र या संकल्पनेच्या वैचारिक दृष्टिकोनाची अतिशय सजग चिकित्सा त्यांनी केली आहे. हिंदूत्ववादी संस्था संघटनांनी येथील ख्रिश्चन धर्मीयांचा प्रभाव जसा कमी केला त्याचप्रमाणे स्थानिक जमातींच्या सांस्कृतिक अस्मिता बोथट करण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या हे समोर आणतात. हिंदूत्ववादी संस्था, संघटनांनी हिंदू पुराणात सांगितलेल्या प्रदेशाच्या आधारे अफगाणिस्तान, इराण, सिंगापूर, बह्मदेश, इंडोनेशिया अशा अनेक देशांचा समावेश असलेला अखंड हिंदूराष्ट्राचा नकाशा प्रचारात आणला आहे. बृहद् हिंदूराष्ट्र उभे करणे या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. नवी प्रतीके, ऐतिहासिक अभिमानाचे मुद्दे आणि स्थानिक आदिवासी समाजातील नवे आदर्श कसे निर्माण केले गेले याचा सटीक तपशील लाँगकुमेर समोर मांडतात.

लाँगकुमेर यांचे हे संशोधन म्हणजे उत्तरपूर्व राज्यांमध्ये गेल्या ५० वर्षांमध्ये हिंदूत्ववादी प्रवाहाने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हिंदूराष्ट्र उभारणीच्या प्रयोगाचा समग्र धांडोळा आहे. असा समग्र आढावा या संशोधनामुळे प्रथमच पुढे येत आहे. आपल्या निष्कर्षांत ते म्हणतात उत्तरपूर्व भारतात एकच एक अशी विविध वांशिक अस्मिता असलेली ‘हिंदू अस्मिता’ लादण्याचा हा प्रयोग आहे. या प्रयत्नांमध्ये संघ परिवाराने एक स्वतंत्र तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विविध वांशिक अस्मिता असलेल्या समाजांकडे हिंदूत्ववादी विचारवंत कशा पद्धतीने पाहतात हे समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला असे म्हणावेसे वाटते की पौराणिक मिथकांच्या आधारे मांडलेले स्वतंत्र तत्वज्ञान म्हणून त्यांचा प्रतिवाद करणे आणि मानवविज्ञानाच्या आधारे त्यातील विसंगती उघड करणे आवश्यक आहे. जगातील सर्व उजव्या विचारधारेचे प्रवाह आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी स्थानिक संस्कृती आणि परंपरांचा आधार घेतात. या मिथकांना आणि संकल्पनांना सातत्याच्या प्रचारातून जनमानसात स्थान मिळते. अनेक वेळा या दृष्टिकोनाची अन्य विचार प्रवाहांकडून टिंगलटवाळी केली जाते. परंतु या उजव्या विचारधारा अतिशय सफाईदारपणे बदलत्या परिस्थितीत स्थानिक अस्मिता आपल्या विचारधारेत सामावून घेतात. स्थानिक संस्था, संघटनांशी आघाडी करत राजकीय अवकाश व्यापतात. या प्रक्रियेमध्ये स्थानिक अस्मिता सांस्कृतिक परंपरा आणि संचितज्ञान, भाषा लोप पावतात. स्थानिक जनसमूहांवर हा मोठा अन्याय असतो. त्यातूनच विविध प्रकारचे तणाव निर्माण होतात. उत्तरपूर्व राज्यांमध्ये असेच तणाव सातत्याने निर्माण होत राहिले आहेत. हिंदी-हिंदू-हिंदूस्तान या एका सूत्रामध्ये गोवण्याच्या या सात्मीकरण प्रयोगातून असेच तणाव निर्माण झाले आहेत. उत्तरपूर्व राज्यांमध्ये ख्रिश्चन धर्म विरुद्ध हिंदू धर्म अशा ध्रुवीकरणाचा स्वतंत्र मुद्दा हिंदूत्ववादी प्रवाहासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

लाँगकुमेर यांनी ‘द ग्रेटर इंडिया एक्स्पेरिमेंट, हिंदूत्व अॅण्ड द नॉर्थईस्ट’ या ग्रंथातून उत्तरपूर्व राज्यांमधील हिंदूत्ववादी प्रयोगाची मानवविज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात सविस्तर चिकित्सा केली आहे. त्यामुळेच या अभ्यासाला एक गांभीर्य प्राप्त झाले आहे. तुम्ही हिंदूत्वाचे समर्थक असा अथवा विरोधक या ग्रंथाच्या माध्यमातून उत्तरपूर्व भागातील हिंदूत्ववादी विचारांच्या दीर्घकालीन प्रयोगाचे समग्र आकलन तुम्हाला कारता येते, हे नक्की!

दि ग्रेटर इंडिया एक्स्पेरिमेंट, हिंदूत्व अॅण्ड द नॉर्थईस्ट
लेखक : अर्कोटाँग लाँगकुमेर
प्रकाशक : नवयान,
नवी दिल्ली
पृष्ठे : ३२२;
किंमत : रु. ६९९ /-